वेळ निघून गेल्यावर...

खरंतर पूर्वीच्या काळी लोक मोठ्या कुटुंबात मुलगी द्यायचे. कारण सर्व अलबेल असायचं. एवढेच कर, तेवढेच कर असं नव्हतं. घरात खाणपिन मोकळं आणि कामही तितकच. पण हल्ली मुली आणि मुलींपेक्षा त्यांच्या घरच्यांचीच अपेक्षा खूप वाढली. त्यांची विचारसरणी बदलली. जोपर्यंत मुलगी वयात आहे तोपर्यंत योग्य त्या ठिकाणी तिचं लग्न होऊन जाणं महत्त्वाचं. शिवाय आता पूर्वीसारखा सासुरवासही राहिला नाही. आज घरात सुनांना... लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांची ‘मनतरंग’ ब्लॉग मालिका...
वेळ निघून गेल्यावर...

काल प्रवासात असतांना एक तरुण मुलगी माझ्याजवळ सीटवर येऊन बसली. बराच वेळ झाला तरी ती तिच्याच विचारांच्या तंद्रीत. एकही शब्द बोलत नव्हती. एवढेच नाही तर तिच्या हातात मोबाईल होता पण तो मोबाईलही ती बघत नव्हती. तिच्याकडे बघून मी विचार करू लागले की, हल्ली तर मुला-मुलींना एक मिनिटही मोबाईल दूर ठेवलेला चालत नाही, तो बघितल्या शिवाय चैन पडत नाही आणि ही मुलगी जवळजवळ एक तास होत आला पण तिने त्याला साधं टच सुद्धा केलं नाही. उलट हातात असलेला मोबाईल आता तिने पर्समध्ये ठेवला होता. दिसायला सुंदर असणारी ही मुलगी थोडंसं वय वाढल्यासारखी दिसत होती. कुठून आली आणि कुठे चालली काहीच कळायला मार्ग नव्हता.पुढचा स्टॉप येणार होता. मी तिला बोलतं करायचं म्हणून विचारलं, दिदी तुला इथे उतरायचं का? तिने मानेनेच नकार दिला. मुळात तिची बोलण्याची इच्छाच नव्हती असं दिसत होतं.

पुढे काही विचारावं की नाही या विचारात असतांनाच तिने मला विचारलं तुम्ही वकील आहात का? मी म्हटलं नाही मी शिक्षिका आहे शाळेत चालले. तशी ती म्हणाली सॉरी हं!तुम्ही कोट घातला म्हणून वाटलं मला. मी म्हटलं ठीक आहे हा आमच्या शाळेचा गणवेश आहे. ती बोलल्यामुळे मला जरा बोलणं सोपं झालं. मी तिला विचारलं तू कुठे चाललीस? ती म्हणाली घरी चालले माझ्या. असेच बोलता- बोलता मी तिला बरेच प्रश्न विचारले. तेव्हा कळलं की ती आय.टी.इंजिनियर आहे. चांगल्या जॉबला आहे. तिला चांगले पॅकेज आहे. पण तरीही ती मला फारशी खुश दिसत नव्हती. मी तिला विचारलं, मी तुला काही विचारलं तर तुला राग नाही येणार ना.ती म्हणाली नाही विचारा मॅम. मी म्हणाले, तुला तर चांगला जॉब आहे, पॅकेजही चांगल आहे पण तू त्यात समाधानी दिसत नाही असं मला वाटतं. सुरुवातीला तिने जरा आढेवेढे घेतले. नाही म्हणजे खुश आहे. चाललय चांगलं म्हणाली. मग मी तिला म्हणाले तेवढा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. मी केव्हाची बघते आहे तुला तू काहीतरी विचारात मग्न आहे.

ती मुलगी म्हणाली, नाही हो मॅडम तसं काही नाही. तुम्ही अनोळखी त्यामुळे बोलले नाही. मी म्हटलं तुला नसेल सांगायचे तर हरकत नाही. माझी बळजबरी नाही. पण म्हणतात, दुःख सांगितल्यानं मन हलकं होतं. मग म्हणाली, मॅम खरं तर मनातले कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही आणि जेव्हा मिळाली तेव्हा वेळ निघून गेली. आता माझं वय जवळ- जवळ तिशीच्या आसपास आहे. खूप मेहनत घेऊन शिकले आणि स्वतःच्या पायावर उभी राहिले. या दरम्यान अनेक चांगली स्थळ आली. मी दिसायलाही सुंदर असल्यामुळे बरीच स्थळ चालून आली. खरंतर तेंव्हा मला माझं करिअर महत्त्वाचं वाटत होतं. जॉब महत्त्वाचा वाटत होता आणि मी त्याच्या मागे धावत होते. त्यावेळी घरच्यांनीही कधी समजून सांगितलं नाही की लग्न करूनही तू हे करू शकते. तुला तुझ्या घरच्यांचाही सपोर्ट मिळेल. त्यावेळी जी- जी स्थळ आली ती आई-बाबांनी नाकारली. कारण कोणाला जमीन नव्हती, कुणाला जॉब नव्हता, तर कोणाची फॅमिली मोठी होती. माझा तर काहीच प्रश्न नव्हता. कदाचित आई-वडिलांनी समजावले असते तर मी सगळं केलं असतं. पण माझ्या आधीच आई, मावशी म्हणायची मोठं घर नको गं खूप करावं लागतं. मग जॉब करून तुझी धावपळ होईल. शक्यतो एकटा मुलगा असेल तर चांगले होईल. दोघांचं करायला वेळ नाही लागणार.

घर आणि जॉब म्हटलं की बाईची तारेवरची कसरत असते. त्यामुळे छोटे कुटुंब असले तर जाॅबही व्यवस्थित करता येईल. हळूहळू मलाही तसेच वाटायला लागले. साधारणता वयाच्या पंचविशी पर्यंत बरीच स्थळ आली आणि आता मात्र जी स्थळ येतात ती दुसाट्याची. आता वय वाढत चाललं तर लग्न करायला कोणी तयार नाही आणि जे आहे त्यांना जॉब ची गरज नाही. काय करावं कळत नाही. रोजचा दिवस आला तसाच चाललाय.आता सुट्टी आहे म्हणून दोन दिवस आले घरी नंतर पुन्हा जॉब सुरू. जो तो ज्याच्या त्याच्या व्यापात. आई-बाबांना वाटते काळजी की, माझे लग्न व्हायला हवे. पण ज्या वयात त्यांनी निर्णय घ्यायला हवा होता तो घेतला नाही. आता कितीही पैसे कमावले आणि काहीही केले तरी त्याचा काय उपयोग. आपल्या हक्काचं घर आपल्या हक्काची माणसं, त्यांचं प्रेम कुठून आणायचं? ती आता भरभरून बोलत होती आणि मी सुन्न मनाने ऐकत होते. तिचे डोळे ही भरून आले होते. हलकेच रूमलाने तिने डोळे टिपले. मला एक शब्द ही न बोलू देता ती बोलत होती. म्हणाली मॅडम माझ्यासोबतच माझी मैत्रीण आहे आम्ही बरोबरच शिकलो पण शिक्षण घेत असतांनाच तिचं लग्न झालं. तिच्या घरची माणसे खूप हौशी आहेत. त्यांनी तिला पुढे शिकवलं, जॉबला लावलं. आज ती दोन मुलांची आई आहे. घरातला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून येते. धुन्या- भांड्याला बाई आहे. बाकी घरातली सर्व कामे तीचे सासू-सासरे, नवरा आवरून घेतात. ती नेहमीच आनंदी असते. सुट्टीचा दिवस मिळाला की सर्व फॅमिली बाहेर फिरायला जातात. बाहेर जेवण घेतात. सासू-सासरे आहे म्हणून ती खूप बिनधास्त कामावर येते. मुलांचं तर तिला काहीच करावं लागत नाही. सगळं सांभाळून घेतात. पण हे सर्व आता कळायला लागलं. एरवी माझ्या घरात मोठी फॅमिली नको, सासू-सासऱ्यांचं ननंदेचं, दीराचं करन नको म्हणून माझ्या घरच्यांनी ती स्थळ नाकारली. त्यांना मोठी फॅमिली नको होती. आई जे सांगते ते बरोबर आहे असं मलाही वाटायचं. पण आता कळायला लागलं.

मागच्याच वर्षी माझ्या पेक्षा लहान भावाचं लग्न झालं. आम्ही दोघेच भाऊ बहीण. त्याचं अभ्यासात डोकं नव्हतं त्यामुळे त्याने आय. टी. आय. केला. काही दिवस त्यानं जॉबही केला. पण पुरेसा पगार नसल्याने तो जॉब सोडून दिला. आता शेतीच करतो. पण त्याला त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली मुलगी मिळाली. ती जॉब करत नाही. पण घरातले सर्वांचे करते.आई, बाबा, आजी, मी ही येते अधून-मधून पण कंटाळा करत नाही. हसून खेळून राहते सर्वांशी. उलट तिचा छानसा संसार आणि माझ्या भावाची तिला भक्कम साथ आहे. ती कुठलेही काम करतांना आमच्या कुणाचीही अपेक्षा करत नाही. सर्व आपलेपणाने करते. तेंव्हा वाटते की, तिच्याआई-वडिलांनी का हा विचार केला नाही. घरात एवढी माणसं असतांना सुद्धा त्यांनी शेतकरी मुलाला मुलगी कशी दिली. माझे आई- वडील आणि तिचे आई- वडील यांच्यात किती फरक आहे. माझ्या घरात सर्व एज्युकेटेड तरी माझं लग्न झालं नाही आणि तिच्या घरी कमी शिकलेले आईवडील तरी त्यांच्या मुलीचा सुखाचा संसार आहे. त्याच वेळी एक चांगलं स्थळ होतं पण केवळ फॅमिली मोठी होती म्हणून नाकारलं. मुलगा तर खूपच सुंदर होता. पण त्यावेळी हे सगळं कळत नव्हतं. कुणासमोर बोलण्याची हिंमत नव्हती. वेळ निघून गेली. आता जो तो ज्याच्या त्याच्या प्रपंचात रममान आहे. आणि मी विचार करते आपले भविष्य काय? चांगला जॉब असून, दिसायला चांगली असूनही मी जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.

तिचा एक एक शब्द मनाला लागत होता. ती भडभड बोलत होती. तीच्या वाट्याला आलेले एकाकी जीवन कोणाला जबाबदार धरायचे. पुढच्या स्टाॅपला ती मुलगी उतरली. पण मी मात्र विचारांच्या तंद्रीत हरवले. खरंतर पूर्वीच्या काळी लोक मोठ्या कुटुंबात मुलगी द्यायचे. कारण सर्व अलबेल असायचं. एवढेच कर, तेवढेच कर असं नव्हतं. घरात खाणपिन मोकळं आणि कामही तितकच. पण हल्ली मुली आणि मुलींपेक्षा त्यांच्या घरच्यांचीच अपेक्षा खूप वाढली. त्यांची विचारसरणी बदलली. जोपर्यंत मुलगी वयात आहे तोपर्यंत योग्य त्या ठिकाणी तिचं लग्न होऊन जाणं महत्त्वाचं. शिवाय आता पूर्वीसारखा सासुरवासही राहिला नाही. आज घरात सुनांना मुलींप्रमाणे वागवले जाते. त्यांना आधार दिला जातो. जे काही करायचं ते कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कदाचित काही कुटुंब असतीलही पण थोडं सावरून घेतलं आणि प्रेमाने वागलं तर बऱ्याच गोष्टी शक्य होऊन जातात. पण आजकालच्या आई-वडिलांना मोठं कुटुंब नकोय, एकटाच मुलगा हवा म्हणजे मुलीने कुणाचं करायला नको. मात्र आपल्या घरातील सुनेने सर्वांचे करायला हवे. खरं तर आपण कोणत्या जगात वावरत आहोत हेच कळत नाही. आजच्या ज्या आई, आज्जी आहेत त्यांचे कुटुंब नव्हते का? मग आपल्या मुलीसाठी हे नको ते नको का? कुठेतरी आपली वैचारिक पातळी ढासळत चाललेली आहे असे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आपले कुटुंब आपल्या पाठीशी नसेल तर आपण कितीही कमवा, अगदी काचेच्या बंगल्यात राहा त्याला कोण विचारणार. म्हणून मला वाटतं या मुलीची जी व्यथा आहे ती इतर कुठल्याही मुलीची व्हायला नको. म्हणून आजच्या आई-बाबांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आपल्या लेकीचं आयुष्य घडवावं, बनवावं पण त्याला स्वतःच उध्वस्त करू नये आणि याची खबरदारी प्रत्येकाने आपल्या घरापासूनच घ्यावी नाही काय?

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com