Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगलेक जगवा, लेक शिकवा

लेक जगवा, लेक शिकवा

लेक जगवा, लेक शिकवा… जिस घर मे बेटीयाँ पैदा होती ,है उस घर का पिता राजा होता है, क्योंकि परिया पालने की हैसीयत हर किसी की नही होती असे म्हटले जाते आणि ते अगदी खरे ही आहे. ‘आई दे गं जन्म मला’ अशी आर्त पुकार करणारी गर्भातील लेक जिला नेहमीच सोसावं लागतं, जिचा काहीच कसूर नसतांनाही निर्दयीपणे गर्भातच मारलं जातं,तिची हत्या केली जाते. याचे कारण म्हणजे तिच्याकडे बघण्याची दृष्टी.मुलगी म्हणजे डोक्याला ताप आणि आपल्याला मिळालेला शाप वाटते. मुलीच्या एका चुकीमुळे कुटुंबाची मान खाली झुकते.इज्जतीचा पंचनामा होतो असे बरेच काही समज. आपल्या सर्वांनाच आई-बहीण पत्नी पाहिजे पण मुलगी मात्र नको. तिची जबाबदारी नको तेंव्हा वाढवणं, घडवणं तर दूरचं.आयुष्यात नेहमीचं पुरूषाला साथ देणारी स्त्री जी नेहमीच समर्पण करत येते पण तिच्या नशिबी हे नेहमीच दुर्भाग्य लिहिलेले दिसते. आज स्त्री समाजातही सुरक्षित नाही आणि कुटुंबातही.

कुटुंबात मुलगा झाला तर अगदी आनंदी आनंद. पण मुलगी झाली तर कपाळावर आढी. मुलगा मुलगी यांना कुटुंबातही सारखं वाढवलं जात नाही. विशेषतः मुलांपेक्षा मुली घरातील जबाबदारी, बाहेरची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. मुलं मात्र घरातील जबाबदारी स्वीकारत नाही किंवा त्याने काही नाही केले तरी चालते पण मुलीने मात्र सर्व केले पाहिजे.तरीही तिला तिचा हक्क मिळत नाही.घरात मुलगा असेल तर त्याला सर्व मिळते पण मुलीला नेहमीच संघर्ष करावा लागतो. स्त्री कितीही उच्चशिक्षित असली, कमावती असली तरी तिला दुय्यमच स्थान दिले जाते. तिचं महत्त्व अजूनही मान्य केलं जात नाही. कायद्याने स्त्रियांना समान हक्क दिला पण समाजात मात्र तशी वागणूक त्यांना दिली जात नाही. बायकांचे ऐकणे जणू पाप वाटते.बऱ्याच कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जाते, स्त्रियांना त्रास दिला जातो, एकटी मुलगी बघून बलात्कार करून तिला मारून टाकले जाते आणि निर्जन स्थळी फेकून दिले जाते, कधी भोसकले तर कधी जाळले जाते. तर कधी तुकड्या तुकड्यांत तिची विल्हेवाट लावली जाते.तसं पाहिलं तर आपल्या भारतातील महिलांचा इतिहास हा गौरवशाली आहे. अगदी दिल्लीच्या गादीवरील रजिया सुलताना ते जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई रानडे, पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, अंतराळवीर कल्पना चावला, गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर अशा कितीतरी कर्तबगार स्त्रियांनी आपल्या देशाचा आलेख उंचावलेला आहे आणि अशावेळी लेक जन्माला येणं हे आपलं भाग्य न समजता आपण तिला काही कसूर नसतांना संपवत आहे. आज अनेक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुली काम करताहेत, ताठ मानेने जगताहेत. पण अजूनही त्यांना खऱ्या अर्थाने हक्क मिळत नाही. एक स्त्री, एक माणूस म्हणून तिचा विचार केला जात नाही. जगात ताठ मानेने जगायचे असेल तर या सर्व लेकींना जीवदान द्यायला हवे, माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क द्यायला हवा. आज समाजात जी स्त्री पुरुष असमानता आहे ती प्रत्येक गोष्टीतून, कृतीतून आपल्याला दिसून येते. ही असमानता दूर झाली तर स्त्री ख-या अर्थाने सबला होईल. पुरुषी वर्चस्व झुगारुन विचारांनुसार त्यांच्यात समानता आली पाहिजे. एक स्त्री शिकली तर कुटुंब साक्षर होतं.

- Advertisement -

शिकलेली आई कुटुंबाला पुढे नेते म्हणतो आणि जसे वागायचे तसेच वागतो.यासाठी समाजप्रबोधन होणे ही तितकेच गरजेचे आहे.भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे रूप दिले आहे. पण दुर्दैवाने आज म्हणावं लागतं की मोठ्या प्रमाणात आपल्या देशात स्त्री भृण हत्या होत आहे. यामुळे भारतात प्रति पुरुष यांचे प्रमाण हे कमी कमी होत चालले आहे. प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान करावा ही आपली संस्कृती शिकवते. परंतु आधुनिक भारतात मात्र हे स्त्रीचं अस्तित्वच संपून चालले आहे. जन्म, मृत्यू हा तर परमेश्वराच्या हातातला खेळ पण दुर्दैवाने म्हणावं लागतं की आज काही कुटुंब आपल्या मुलीला गर्भातच मारून टाकून हा खेळ त्यांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ सारखे अभियान आपल्याला सुरु करण्याची गरज पडते. आपला देश हा पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पूर्वीपासून स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत होते. पण आज समाज साक्षर झाला, चांगल्या वाईटाची जाण आली तरी महिलांवरील अत्याचार कमी का होत नाही? आजही स्त्रियांवरील अत्याचार व हिंसा मोठ्या प्रमाणात वाढलेली का दिसून येते. देशात तंत्रज्ञान पद्धती आली. नवनवीन शोध लागले. पण आपण त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी न करता लिंग तपासणीसाठी करू लागलो. स्त्रीभ्रूण हत्तेसाठी, गर्भलिंग तपासणीसाठी करू लागलो. आज बरेच कठोर कायदे, दंड आणि शिक्षाही यासाठी भोगावी लागते. त्यामुळे आज थोडीशी परिस्थिती बदलली. तरीही काही लोकांची मानसिकता बदललेली नाही. ज्या स्त्रीच्या उदरातून आपण जन्म घेतो तिलाच उदरात आपण संपवून टाकतो. आपल्या धार्मिक ग्रंथात म्हटले आहे ‘यत्र नार्यस्तु पुजयन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता’ याचा अर्थ जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे परमेश्वराचा वास असतो. पण प्रत्यक्षात आपली ही संस्कृती फक्त बोलण्या पुरतीच मर्यादित राहिली. ‘मुलगी वाचवा’ या अभियानाचा अर्थ खरोखर मुलींची संख्या वाढवणे व त्यांचा विकास करणे हा होता. पण उलट स्त्रियांचे अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढू लागले. एका बाजूला मुलीला सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. महिलांचे सक्षमीकरण झालं पाहिजे याचा विचार केला जातो आणि दुसरीकडे लिंग गुणोत्तराचा असमतोल वाढतो आहे. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राॅईड यांनी स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त मेहनती, संयमशील,अहिंसक आणि प्रामाणिक आहेत हे सिद्ध केले. तरीही आजही स्त्रीला विचारात घेतले जात नाही. कायद्याने स्त्री पुरुष समानता आली पण प्रत्यक्षात त्याची किती अंमलबजावणी होते हे सर्वांना ज्ञात आहे. तरीही काळानुरूप बदल होतोय. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ तसेच मुलींची स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी हरियाणा सरकार 14 जानेवारी रोजी ‘बेटी की लोहरी’ कार्यक्रम साजरा करतात. स्त्रीभ्रूण हत्या बंदीमुळे मुला-मुलींमध्ये होणारा भेदभाव कमी होण्यास मदत झाली. पण प्रत्येक पालकाने आपल्या मुला मुलीला समान न्याय दिला, समान हक्क दिले तर प्रत्येक क्षेत्रात मुलांसोबत मुलीही या पुढे जातील यात शंका नाही. यासाठी आता प्रत्येक पालकाने जागृत होणे गरजेचे आहे. आपल्या मुलीला स्वतंत्रपणे निपक्षपातीपणे उच्चशिक्षित, निडर केले पाहिजे. जेणेकरून तिच्या जीवनात कुठलीही अडचण आली तरी ती त्याला तोंड देऊ शकेल. तिच्यात जे सामर्थ्य आहे त्याची जाणीव तिला करून दिली आणि खंबीरपणे साथ दिली तर कोणतीच मुलगी मागे राहणार नाही.मुलांनं इतकीच मुलगी ही प्रभावशाली, कर्तबगार होईल यात शंका नाही.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या