Monday, April 29, 2024
Homeब्लॉगनिर्णय

निर्णय

जीवन जगत असतांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणं फार महत्त्वाचं असतं. जर का आपण त्यावेळी योग्य निर्णय नाही घेऊ शकलो तर आपल्याला इतरांच्या मर्जी प्रमाणं वागावं लागतं. त्यांचं ऐकावं लागतं. म्हणून जीवनात ज्या-ज्या वेळी निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळी आपण ती घेतली पाहिजे. तसेही दररोज आपल्याला काही छोटे-मोठे निर्णय हे घ्यावेच लागतात. कधी भाजी कोणती घ्यावी, कोणता ड्रेस घ्यावा, गावी कोणत्या मार्गाने जावं, कोणते संगीत किंवा वाद्य शिकावं किंवा ऐकावं. असे रोजच्या जीवनात बरीच प्रश्न असतात. अशा छोट्या- छोट्या गोष्टींचे निर्णय घेता आले तर आपल्याला योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात होते. मग आयुष्यातील मोठे निर्णय घेणे ही अवघड जात नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेतांना गरजेपेक्षा जास्त विचार करू नये. अति विचारामुळे ताण वाढतो. मग काय निर्णय घ्यावा हा प्रश्न पडतो. काय करू, काय नको अशी मनाची अवस्था होते. तेव्हा आपल्या निर्णय क्षमतेची मात्र कसोटी लागत असते. म्हणून आपल्याला कमी वेळेत योग्य निर्णय घेता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण घरच्या मंडळींच्या दबावाखाली निर्णय घेतो. ती आपली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असते. आपली क्षमता, आवड, कुवत आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही याची जाण आपल्याला असते. त्यामुळे स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. त्यासाठी एखादी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे माणूस सजग राहतो. निष्काळजीपणा करत नाही. त्याच्या मनात नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही. कोणतेही काम चांगले किंवा बिनचूक होईल की नाही ते काम पूर्ण झाल्यावर कळते. मात्र ते सुरू करणे किंवा त्यासाठी योग्य निर्णय घेणे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे परफेक्शनचा विचार करण्यापूर्वी परिस्थिती नुसार निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं असतं. जेंव्हा योग्य निर्णय न घेता आपण भरकट जातो, अतिविचार करतो याचा परिणाम आपल्या निर्णय क्षमतेवरही होतो.

- Advertisement -

बऱ्याचदा आपण जी कामे करतो ती चांगली, वाईट आपल्या अनुभवावरून, अंदाजावरून, परिस्थितीवरून आपण अंदाज बांधू शकतो. स्वयंप्रेरणा आणि विश्लेषणात्मक विचार यांचा मेळ घालून निर्णय घेतल्यास तो कायम योग्य ठरू शकतो. आंतरज्ञानाच्या जोरावर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचे योग्य निर्णय घेतांना जास्त विचार न करता तो वेळेत घेता आला पाहिजे. निर्णय घेतांना आपल्या काही मागील चुका झाल्या असतील तर त्यांचा बोध घेऊन त्यातून शिकले पाहिजे. आपल्या सर्वांनाच एडिसन हे शास्त्रज्ञ माहित आहेत. ज्यांनी विजेचा शोध लावला. पण हा शोध लावण्यासाठी एडिसनला अथक परिश्रम घ्यावे लागले. निश्चय आणि निष्ठेने काम करावे लागले. बऱ्याच चुकांमधून शिकत- शिकत त्यांनी विजेचा शोध लावला. त्यामुळे कुठलीही गोष्ट करतांना होकार व नाकार या दोन्ही गोष्टींवर ठाम राहता आले पाहिजे. योग्य निर्णय घेण्यासाठी ह्या बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. ज्या- ज्या लोकांना जीवनात ध्येय गाठायचे आहे, प्रगती करायची आहे, यशाचे शिखर पदाक्रांत करायचे आहे त्यांनी स्वतःची निर्णय क्षमता वाढवणे फारच गरजेचं आहे.अर्थातच प्रत्येकाने जीवनात योग्य निर्णय घेण्याची कला शिकायला हवी. आपल्या निर्णयावर आपले वर्तमान व भविष्य दोन्ही अवलंबून असतात. त्यामुळे सतत काही योग्य निर्णय आपण घेत गेलो तर ती कला विकसित होत जाते. निर्णय घेतांना सर्वप्रथम पर्यायांचा विचार आपण सकारात्मक व नकारात्मक या दृष्टीने केला पाहिजे.

उदा. आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे. मग आपल्यासाठी कोणते शिक्षण योग्य आहे, आपली आवड, फील्ड विषयी माहिती असणे गरजेचे आहे. एखाद्याला छान गाता येतं, चित्र काढता येतं, खेळात नैपुण्य आहे मग प्रश्न पडतो कोणत्या क्षेत्रात करिअर करावं. तेव्हा आपण या सर्व पर्यायांचे सर्व पैलूंनी सूक्ष्म निरीक्षण करून निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे. निर्णय घेतांना कोठे व कधी थांबावे, कधी माघार घ्यावी, फायदा तोटा याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा. निर्णय घेतांना तो फार भावनिक होऊन घेऊ नये व वेळेचे भान सतत ठेवावे. कारण एखादा निर्णय घेण्यात खूप वेळ घालवला तर ती वेळही वाया जाते आणि दुसरे कामही होत नाही किंवा कशात लक्षही लागत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. आपण दिवसभरात जे- जे छोटे- मोठे निर्णय घेतो त्यामुळे व्यक्तीला मानसिक थकवा येतो. म्हणून ऑफिस मधले काम असेल, घरचे काम असेल त्याचा फार विचार न करता कमी वेळेत ते कसे होईल याकडे लक्ष द्यावे. कधी- कधी तर द्विधा मनस्थिती होते. अशा परिस्थितीत निर्णय घेणं फार अवघड होतं.

खरंतर डोक्यात सतत काही ना काही विचार असतात. काही विचार आपण सतत करत असतो. म्हणून विचार आणि अति विचार यातला फरकही आपल्याला कळायला हवा. अतिविचारामुळे आपली शारीरिक, मानसिक ऊर्जा खर्च होत असते. काही निर्णय हे लोकांच्या दृष्टीने हिताचे पण स्वतःच्या दृष्टीने हिताचे नसतात. तर काही निर्णय आपल्या हिताचे ते लोकांना चुकीचे वाटतात. पण आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे. छोटे- छोटे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. कधी- कधी आपण आपले निर्णय लिहून ठेवावे. ज्यावेळेस बिकट परिस्थिती येते त्या वेळेला त्या निर्णयामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो आणि मोठमोठे निर्णय घ्यायला ही अडचण येत नाही. मोठे निर्णय घेतल्यामुळे सर्जनशीलता वाढते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व आयुष्यात आपण यशस्वी होत जातो. निर्णय हा व्यक्तिगत, कौटुंबिक, कार्यालयीन किंवा कुठल्याही क्षेत्रात घ्यावयाचा असू शकतो. म्हणून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. कारण एक निर्णय आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते किंवा त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

आयुष्यातले निर्णय चुकतात

आणि मग आयुष्य चुकत जाते

कधी कधी प्रश्न कळत नाहीत

आणि उत्तरही चुकत जाते

सोडवतांना वाटते सुटत गेला गुंता

पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते

चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते

काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात

जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या