Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगबदलती जीवनशैली

बदलती जीवनशैली

बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा चुकीच्या सवयीमुळे माणसांच्या पुरेशा शारीरिक हालचाली होत नाही. सतत हालचाली कमी होत गेल्यामुळे कालांतराने शारीरिक अक्रियाशीलतेचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. अधिक काळ मोबाईल बघणे, टीव्ही बघणे, जास्त वेळ झोपणे, व्यायाम न करणे यामुळे पाठ दुखी, मानदुखी, सांधेदुखी जडते आहे. डोळ्यांचे आजार उद्भवत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शारीरिक क्षमतेनुसार आणि गरजेनुसार योग्य शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदल म्हणजे वर्तन बदल. सध्या एकूणच जीवनशैलीमध्ये झपाट्याने बदल घडत आहेत सगळीकडे आधुनिकीकरण, शहरीकरण झाले आहे. लहान, मोठे काम सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ लागले आहे. पहिल्या सारखी पळापळ करण्याची वेळ आता राहिली नाही. सर्वच कामासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्यामुळे लोकांच्या शारीरिक हालचाली कमी होवू लागल्या आणि छोटे- छोटे काम करण्यासाठीही लोक साधनांचा उपयोग करू लागले. त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची प्रवृत्ती राहिली नाही.

शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण झाल्या. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थुलत्व,सांधेदुखी व मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला आहे.बदलत्या जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करायची असेल तर प्रत्येकाने शारीरिक हालचाली व नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रियाशील जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे व दिवसभर क्रियाशीलता टिकावी यासाठी कोणत्याही कामात किंवा अभ्यासात सतत बदल करीत राहिले पाहिजे. सतत एकाच पद्धतीने काम केले तर ते कंटाळवाणे होते.त्यामुळे व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अन्नातील अधिक उष्मांक वापरले जात नाहीत व शरीरात शिल्लक राहिलेल्या उष्मांकाचे, ऊर्जेचे चरबीमध्ये रूपांतर होते. त्यामुळे वजन वाढते. जीवन चांगल्या प्रकारे जगायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने सतत प्रयत्नशील व कार्यमग्न राहिले पाहिजे.अन्नासाठी व पोषणाची गरज व्यक्ती परत्वे भिन्न असते व शारीरिक हालचाली नुसार बदलते. साधारणपणे जास्त शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींना जास्त ऊर्जेची गरज असते तर गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना विशिष्ट आहाराची गरज असते. आजकाल सर्वच लोक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग,जागरूक आहेत.त्यामुळे कॅलरीज हा शब्द सर्वांना परिचित आहे. रोजच्या कामासाठी किंवा आपण जेवढे श्रम करू त्यानुसार आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. व ही कॅलरीज(उष्मांक) मध्ये मोजली जाते. साधारणता १० ते १२ वर्ष वयोगटासाठी २१०० कॅलरीज, १३ ते १५ वयोगटासाठी २५०० तर १६ ते १९ वर्षे मुले ३००० व १६ ते १९ वर्षे मुली २७०० कॅलरीज आवश्यक असतात. शारीरिक क्रियाशीलतेचे फायदेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात शिस्त येते आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते. स्नायू व सांध्यांची कार्यक्षमता वाढते. सतत सक्रिय राहिल्यामुळे शरीर लवचिक व चपळ बनते. नियमित भूक लागते. निद्रानाश टळतो.

- Advertisement -

व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते. प्रत्येक कामात आत्मविश्वास वाढतो. संघर्ष, चिंता, ताणतणाव यावर मात करता येते व दीर्घकाळ व्यक्ती कार्यरत राहतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रित राहतो. शरीरातील चरबीचे प्रमाण मर्यादित राहते. हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, कर्करोग इत्यादींचा धोका कमी होतो. निरामय आयुष्य प्राप्त होते. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास तरी चालले पाहिजे किंवा किमान ६० मिनिट तीव्र स्वरूपाच्या शारीरिक हालचाली,कसरत,सूर्यनमस्कार, योगासने,शक्य असल्यास एखादा मैदानी खेळ खेळला पाहिजे.त्यामुळे सांध्यांना, स्नायूंना व्यायाम होवून ते मजबूत बनतात. आपले शरीर सुदृढ राहते.मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थीत होतो. मेंदू ताजातवाना राहतो. मन प्रसन्न व आनंदी राहते. कारण व्यायामामुळे आपल्या मेंदूतील सेराॅटोनिन नावाचे रसायन उत्तेजित होते आणि श्रवते त्यामुळे आपल्याला उल्हासित वाटते. स्नायूंवरचा ताण कमी होतो व मानसिक थकवा दूर होतो. पूर्वी घरात टीव्ही, मोबाईल नसल्यामुळे लोक गप्पाटप्पा करत. फिरत व वाचन करत. छोट्या- छोट्या कामांसाठी लोक पायी चालत. बाजार, भाजीपाला किंवा जवळील नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे सायकलवरून प्रवास होई. आता नोकरी,व्यवसायासाठी लोकांचा बराच वेळ निघून जातो. त्यामुळे त्यांना जास्त स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यातल्या त्यात स्त्रियांची नोकरी आणि घर सांभाळने यात तारेवरची कसरत होते.त्यामुळे अधुनिक यंत्रांचा वापर त्या जास्त प्रमाणात करतात.नोकरीवरून आल्या नंतर स्वयंपाक करण्याचा कंटाळा करतात.शिवाय व्यायाम किंवा फिरणे यासाठी वेळ मिळत नाही.त्यामुळे सर्वांचेच जास्त चालणे होत नाही. शिवाय बऱ्याचदा बाहेरचे जेवण, जंक फूड खाणे , काहींना कामाचा कंटाळा यामुळे स्थूलपणा वाढला आहे. आजकाल बाहेरचे खाणे ही फॅशन जरी झाली तरी रोज बाहेर खाण्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होणारच. तसेच घरातही मुले आता बाहेर खेळत नाही. सर्वजण आज मोबाईल, टीव्ही मध्ये व्यस्त झालेले आहेत.भाजी,पोळी खाण्यापेक्षा त्यांना पिझ्झा,बर्गर मॅगी खायला आवडते. सतत बाहेरचे खाणे आवडते त्यामुळे मुलांची तब्येत स्थुल होत आहे व लहान वयातचं विविध आजारांनी ग्रस्त होत आहे.सतत बसून राहणं व खाणं यामुळे अटॅकचे प्रमाणही वाढले आहे. मधुमेहासारखे आजार होत आहे. वाढत्या वजनामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी वाढली आहे. वाढलेल्या स्पर्धा, नको इतक्या अपेक्षा,बदलती ड्युटी,तणावाखाली काम यामुळे लोकांची घुसमट होते. जेवणाची वेळ पाळली जात नाही. ज्यावेळी जे मिळेल ते खावून मोकळे व्हायचे त्यामुळे बाहेरचे खाणे वाढले. त्याने पचनाचा त्रास किंवा उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग होऊन टायफाईड, कावीळ सारखे आजार उद्भवू लागले. म्हणून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम वाढवायचे नसतील तर आपण नेहमीच समतोल आहार घ्यावा. आहारात फळे, सॅलॅड, पालेभाज्या असाव्यात. जेवणानंतर लगेच झोपू नये. शतपावली करावी. नंतर प्रत्येकाने दरवर्षी पूर्ण तपासणी करावी.प्रत्येकाने काळानुसार बदलले पाहिजे पण काय बदल केल्याने आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या