ब्लॉग : जखमी वाघिणीने धूळ चारली!

- एन. व्ही. निकाळे
ब्लॉग : जखमी वाघिणीने धूळ चारली!
ANI

दुखापत होऊनही दिदी डगमगल्या नाहीत. प्रतिस्पर्ध्यांना अद्दल घडवण्यासाठी त्या अधिक आक्रमक बनल्या. लंगड्या पायाने व्हिल चेअरवर बसून त्यांनी जमेल तसा प्रचार केला. ‘एका पायावर बंगाल जिंकेन आणि दोन्ही पायांवर दिल्ली!’ अशी डरकाळी त्यांनी फोडली. जखमी वाघीण जास्त घातक असते, असा इशाराही विरोधकांना दिला. तिसर्‍यांदा बंगालची सत्ता काबीज करून दिदींनी सर्वांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवली आहे.

----

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीने पार पडली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसने मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज फोल ठरवले व निवडणुकीत महाविजय मिळवला. महाबलवान प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली. बुधवारी ममतादिदींनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथविधीनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत वडिलकीचा सल्ला राज्यपालांनी ममतादिदींना दिला. ‘लहान बहीण’ संबोधून पुढे येऊ घातलेल्या भाऊबंदकी नाट्याचे पुन्याहवाचनच जणू सादर केले. राज्यपालांचा हा सल्ला अशाप्रसंगी अनाठायी व अप्रस्तुतच वाटला असल्यास नवल नाही. मुख्यमंत्री ममतादिदी आणि राज्यपाल यांच्यात यापूर्वी बराच काळ उडालेले खटके पाहता राज्यपालांचा आताचा सल्ला अनपेक्षित वाटू नये.

अर्थात ममतादिदींनीसुद्धा उधारी न ठेवता रोखठोक उत्तर देऊन लगेचच त्या सल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली असावी. राज्याची कायदा-सुव्यवस्था आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या हाती होती. मी आताच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था सुरळीत करण्यासोबतच करोना नियंत्रणाला माझे सरकार प्राधान्य देईल, असे दिदींनी ठासून सांगितले. शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यातील शाब्दिक चकमक सरकार आणि राजभवन यांचे संबंध पुढील काळात कसे असतील याची चुणूकच आहे.

पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी आणि ममतादिदींचे साम्राज्य उलथवून तेथे सत्ताकमळे फुलवण्याकरता निवडणुकीच्या कुरूक्षेत्रावर पंतप्रधान, अनेक मातब्बर केंद्रीयमंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अखिल भारतीय अध्यक्ष नड्डा तसेच इतर नेत्यांपुढे ममतादिदी एकट्या उभ्या ठाकल्या. बंगालच्या सत्तेची लढाई त्यांनी निकराने लढवली. कंबर कसून निवडणूक रणांगणात उतरलेल्या रथी-महारथींची विजयाची समीकरणे ममतादिदींपुढे फसली.

मोठश फौजफाटा बंगालच्या भूमीत उतरवूनसुद्धा सेनापतींची पुरती दमछाक झाली. 200 जागा मिळवण्याची ग्वाही लाखोंच्या जाहीर सभांमधून आत्मविश्वासपूर्वक देणार्‍या भाजपची झेप आखूड ठरली. ‘बंगालमधून दिदींचे साम्राज्य खालसा होणार’, ‘दो मै, दिद गई’, ‘तृणमूलचा सफाया होणार’, ‘बंगभूमीत सत्ताकमळ फुलणार’ अशा वल्गनांसोबत आक्रमक प्रचारातून निर्माण केलेली ‘विजयी हवा’ पोकळ ठरली. मोठ्या हिमतीने निवडणूक लढवून तृणमूल काँग्रेसने बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला भुईसपाट केले.

200 हून अधिक जागा स्वबळावर जिंकल्या. घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्ता मिळवणार्‍या ममतादिदी मात्र नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत जाहीर केल्या गेल्या. शेवटच्या क्षणी मतमोजणीत गडबड झाल्याचा दावा करून तृणमूल काँग्रेसने फेरमतमोजणीची मागणी केली. ती निवडणूक आयोगाने फेटाळली. आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा निर्धार ममतादिदींनी केला आहे.

आताच्या निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या आहेत. 2016 साली अवघ्या 3 जागा पदरी पडलेल्या भाजपची या निवडणुकीतील प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा पटकावून बंगालमध्ये मोठे यश मिळवले होते. या यशाने भाजपचे मनोबल उंचावले होते. तेव्हापासून बंगाल जवळपास खिशातच पडल्यासारखे भाजप नेते बोलून दाखवत.

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत वापरलेले फोडाफोडीचे फंडे बंगालातही वापरले गेले. विधानसभा निवडणूक घोषित होण्याच्या अनेक महिने आधीपासून बंगालमधील भाजप मजबूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला सुरूंग लावला गेला. त्या पक्षातील मातब्बर नेत्यांचे नेत्रदीपक प्रवेश सोहळे झाले. नंदीग्राममधून ममतादिदींना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी त्यापैकीच एक वल्ली!

निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांना हात घालण्यापेक्षा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूलवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यावरच भर दिला गेला. बंगाली जनतेच्या नजरेतून त्यांना उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले.

ममतादिदींना घरी पाठवण्याची आणि बंगालवर राज्य करण्याची रंजक स्वप्ने पाहणार्‍यांच्या डोळ्यांपुढे दिदींनी भरदिवसा पराभवाचे तारे चमकावले. तृणमूल काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाल्याने तरी सारे भानावर आले असतील का? दिल्लीनंतर बंगालमध्ये दुसरा दणदणीत पराभव भाजपच्या पदरी आला आहे. ‘दिदी ओ दिदी’ संबोधून प्रचारसभांमध्ये ममतादिदींची खिल्ली उडवणार्‍या पंतप्रधानांनीसुद्धा ‘ट्विटर’वर जाहीरपणे पराभव मान्य केला आहे.

दिदींना शुभेच्छाही दिल्या. राज्य सरकारला केंद्र सरकारचे सहकार्य चालूच राहील, असा शब्दही दिला. यातच सर्वकाही आले. मात्र बंगालमधील पराजय त्यांचे स्वपक्षीय नेते सहजासहजी विसरतील का? पराभवाची भळभळती जखम त्यांना स्वस्थ बसू देईल का? केंद्रसत्ता मिळाली म्हणजे आपण सर्वशक्तीमान झालो, या भ्रमातून बाहेर पडायला दिल्लीतील सत्तापतींना बंगालमधील पराभवाचा धडा पुरेसा ठरेल का?

स्वातंत्र्यसैनिकाची कन्या असलेल्या ममतादिदींच्या ठायी उपजतच लढाऊबाणा आहे. तोच बाणा त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन गेला. उच्चविद्याविभूषित ममतादिदींचे नेतृत्व त्यांना ‘थोरली बहीण’ मानणार्‍या व म्हणणार्‍या बंगाली जनतेने मान्य केले आहे. त्यांच्याखेरीज समाजाच्या दुफळीवर उभारलेले भाजपचे नेतृत्व बंगभूमीवासियांना सध्या तरी मान्य नाही. निवडणूक निकालांतून ते पुन्हा सिद्ध झाले.

77 जागा जिंकणारा भाजप बंगालमधील विरोधी पक्ष बनला आहे. बंगाली जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून जनहितासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प त्या पक्षाचे स्थानिक नेते कदाचित घेतीलसुद्धा! पण तो पूर्ण करण्याइतके उमदेपण त्यांचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी दाखवतील का? हाच आता बंगाली जनतेला पडलेला प्रश्न असेल.

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार केंद्रसत्तेची कायमच डोकेदुखी ठरली आहे. तेथील नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचढ अधिकार बहाल करणारे विधेयक केंद्र सरकारने नुकतेच मंजूर करून घेतले. सनदी नोकर असणार्‍या नायब राज्यपालांच्या परवानगीविना दिल्ली सरकारला कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत, अशी तरतूद करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यातून झाला आहे. बंगालच्या बाबतीत आता कोणती चाल खेळली जाते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

करोनाच्या त्सुनामीकडे पाठ फिरवून देशाच्या कारभार्‍यांनी बंगाल निवडणुकीला प्राधान्य दिले. मग प्राणवायू, औषधे, खाटाटंचाई दूर करायला त्यांना सवड कशी मिळणार? बंगालच्या मतदारांनी पराभवाचा दणका दिल्यावर तरी देशातील करोनास्थितीचे भान त्यांना आले असेल का? सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दलचे असमाधान व्यक्त करणार्‍या प्रश्नांची सरबत्ती भर न्यायालयात ऐकवली आहे.

निवडणूक निकालानंतर बैठकांची लगीनघाई सुरू झाली आहे. समाज माध्यमांवर बर्‍याच तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. एक ध्वनिचित्रफित बरीच गाजत आहे. त्या ध्वनिफितीत पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीकेची झोड उठवली आहे. ‘नेतृत्व दिशाहीन, असहाय्य आणि निराश असेल तर संकट अधिकच गडद होते.

दिल्लीतील शहेनशहांकडून मात्र काही आशा जागेल, असा विचार होताना दिसत नाही; ना तशी पावले उचलली जात आहेत’ असे ते म्हणाले. मोदीजी किती खरे-खरे बोलले आहेत. करोना काळात देशाची स्थिती पाहता केंद्र सरकारवर त्यांनी ओढलेले आसूड योग्यच आहेत, पण त्यांची ही टीका आताची नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन केंद्र सरकारच्या कारभाराबाबत जवळपास दशकभरानंतर त्यांची बत्तीशी खरी ठरत आहे.

नंदीग्राममध्ये प्रचारावेळी झालेल्या धक्काबुक्कीत ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. जायबंदी झाल्याने ममतादिदी तृणमूलचा प्रचार करू शकणार नाहीत, आपला विजय सहजसोपा होईल, अशा भ्रमात वावरणार्‍या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी मुहतोड जवाब दिला. दुखापत होऊनही दिदी डगमगल्या नाहीत. प्रतिस्पर्ध्यांना अद्दल घडवण्यासाठी त्या अधिक आक्रमक बनल्या.

लंगड्या पायाने व्हिल चेअरवर बसून त्यांनी जमेल तसा प्रचार केला. ‘एका पायावर बंगाल जिंकेन आणि दोन्ही पायांवर दिल्ली!’ अशी डरकाळी त्यांनी फोडली. जखमी वाघीण जास्त घातक असते, असा इशाराही विरोधकांना दिला. तिसर्‍यांदा बंगालची सत्ता काबीज करून दिदींनी सर्वांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवली आहे.

बंगाल निवडणुकीत ‘खेला होबे’ हा शब्द चांगलाच गाजला. चर्चेतही राहिला. ‘खेला होबे. अमी गोलकिपर. देखी के जेते’ (खेळ सुरू आहे. मी गोलकिपर आहे. पाहूया कोण जिंकते ते!) असे म्हणत ममतादिदींनी प्रचारसभेत प्रतिस्पर्ध्यांना आव्हानच दिले होते.

‘खेला खतम, विकास शुरू!’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्या आव्हानाची खिल्ली उडवली होती. इतरही नेत्यांनी ‘खेला होबे’चा उल्लेख केला होता. तथापि बंगालच्या निवडणूक खेळात ममतादिदीच वरचढ ठरल्या. निर्णायक गोल करून त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. बंगालच्या जनतेला केंद्र सरकारच्या ‘विकासा’पेक्षा ‘बंगालची कन्या’ जास्त जवळची आणि महत्त्वाची वाटली. पुढील पाच वर्षे ममतादिदींच्या सरकारचा कारभार सुरळीत चालू दिला जाईल का? या शंकेने सध्या बंगाली जनता धास्तावलेली असेल का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com