ब्लॉग : महाराष्ट्र जयतु ! आयुष्यमान भवतु..!

-डॉ. अभिजीत कारेगांवकर (नाशिक)
करोना महाराष्ट्र
करोना महाराष्ट्र

करोना महामारीने धारण केलेले आजचे भयंकर रूप पाहता, ६१ वर्षांपूर्वी जशी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली तशी आज जिवंत महाराष्ट्र चळवळ उभी करावी का... किंबहुना करावीच, अशी वेळ आली आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी त्यावेळची घोषणा होती. आज ऑक्सिजन सह महाराष्ट्र जिवंत राहिलाच पाहिजे अशी घोषणा द्यावी लागणार आहे. केंद्र की राज्य या वादात मला पडायचे नाही. मला माझा मराठा मरतांना दिसत आहे, (इथे मराठा म्हणजे मराठी माणूस! माऊलींच्या ओवीत जात अभिप्रेत नव्हती.), तो वाचला पाहिजे, जगला पाहिजे!

सामान्य महाराष्ट्रीय माणसाने काय करावे?

तशी गेल्या वर्षभरापासून चालू असलेली ही चळवळ आता अधिक तीव्र व उग्र करायला हवी. त्यात सहभागी होणाऱ्या सामान्य महाराष्ट्रीयाने काय करावे?

१) ध्येय: करोना मुक्त महराष्ट्र करणे हे आपले ध्येय आहे.

२) लक्ष्य: करोना संक्रमण करणाऱ्या कृती व प्रवृत्ती यांना आपण आपले लक्ष्य करायचे आहे.

३) आयुधे: मास्क, sanitiser, व लस (उपलब्ध होईल तशी) ही आपली मुख्य आयुधे आहेत.

४) रणनीती: घरात राहणे, विनाकारण बाहेर न पडणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, घरातील वृद्धांपासून लांब राहणे, काहीही लक्षणे वाटल्यास घाबरून न जाता, आधी घरातल्या घरात विलगीकरण करून घेऊन मग डॉक्टरांचा सल्ला घेणे, वेळीच निदान व योग्य उपचार करून घेणे अशी आपली रणनीती आहे.

५) सूत्र: नात्यांची व माणुसकीची सगळी कर्तव्ये पार पडतानाच भावनांना कडक बंधन घालणे आणि पदोपदी विज्ञानोक्त पद्धतींचाच वापर करणे हे आपले सूत्र आहे. कितीही वाटले तरी शक्यतो फोन वर, लांबून, किंवा कमीतकमी वेळा प्रत्यक्ष संपर्कात येऊन हवी ती सगळी मदत, सहकार्य, काळजी करावी.

आपल्याकडे कुणी दुर्दैवाने मृत पावले तर त्याघरी त्यादिवशी तरी चूल पेटत नाही. काही घरी पूर्ण दहा दिवस हा रिवाज पाळला जातो. हा रिवाज या काळात मोडावा. तुमच्या घरी शिजवलेले अन्न तुमच्यासाठी जितके सुरक्षित असेल तितके इतर कुणाच्याही घरी किंवा बाहेर तयार झालेले अन्न सुरक्षित नसणार. तुमच्यासाठी जितक्या वेळा इतरांना त्यांच्या घराबाहेर पडावे लागेल तितक्या वेळा तुम्ही त्यांना संसर्गाच्या धोक्यात टाकत आहात.

६) प्राधान्यक्रम: मी सुरक्षित राहिलो तर इतरांना अधिक चांगली व अधिक काळ मदत करू शकेल हा विचार करून, आजार होऊ नये म्हणून काळजी घेताना साधारणतः आधी मी, मग माझे कुटुंब, माझे नातेवाईक, माझ्या आसपासचे लोक आणि इतर सारे असा, नेहमीपेक्षा उलटा, आपला प्राधान्यक्रम आहे.

७) आद्य कर्तव्य: चळवळीत अग्ररेषेवर लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी, औषध निर्मिती, वितरण व विक्री व्यवसायातील बांधव, यांना सहकार्य करणे, तसेच त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे चळवळी प्रति असलेले आपले आद्य कर्तव्य आहे. ती लोक त्यांचे काम करीतच आहेत. तिथे आपल्या रुग्णाकडे विशेष व वैयक्तिक लक्ष देण्याची अपेक्षा करणे हे स्वार्थीपणाचे आणि समाजात विषमता निर्माण करणाऱ्या विचारसरणीचे द्योतकच असेल हे ध्यानी असू द्यावे.

आज करोना महामारीचा विळखा आहे. यातून महाराष्ट्राला सोडवत असताना, साथीदार मृत पावले, घरची मंडळी दगावली, अनेक बरे होत आलेले रुग्ण डोळ्यासमोर मृत्युने गिळंकृत केले, तरीही खचून न जाता, मनावर दगड ठेऊन, पुन्हा त्याच कार्यात आपले फ्रंटलाईन वर्कर्स स्वतःला झोकून देत आहेत..... शासन स्तरावर योग्य आरोग्य व्यवस्था, पुरवठा व तयारी इत्यादी होऊन त्याचा परिणाम दिसू लागेल या आशेवर !

मराठा तितुका वाचवावा, महाराष्ट्र धर्म तेववावा..!

राज्य- आणि राजकारणकर्त्यांना विनंती.. ! सामान्य नागरीक घरात बसून चळवळीत सहभाग घेईल. पण परिस्थिती सुधारली नाही तर त्याला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. अजून किती जीव जायला हवे आहेत. महामारीचे बळी असणारच. पण त्यांची संख्या कमी करणे हे शासन व्यवस्थेला अधिक प्रभावीपणे करता आले असते.

गोंधळ उडाला असताना केली जाणारी कामे, अधिक काळजीपूर्वक, चार-चार वेळा तपासून करावी अशी शिकवण मला माझ्या शिक्षकांनी दिली होती. कारण अशावेळीच चुका अधिक घडतात. आणि त्यामुळे जर प्राण गेले तर ते निर्विवाद टाळता येऊ शकणारे असल्याने, अक्षम्य अपराध ठरतात. तशी शिकवण आपण सगळे पाळूयात का..

ज्या 'जाणता राजा' ला महाराष्ट्रातील सर्वानीच आदर्श मानले, त्यांच्या तसूभरही जाण नेते, सरकार, शासन व व्यवस्थेला येणार आहे का.. नव्हे येईल,.. कधीतरी येईल... या आशेवरच.. जय महाराष्ट्र !

-डॉ. अभिजीत कारेगांवकर (नाशिक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com