Blog : लिम्लेटच्या गोळ्या

Blog : लिम्लेटच्या गोळ्या

काही पदार्थ, वस्तूंमध्ये अशी एक प्रकारची जादू असते. तिचा वेग एवढा प्रचंड असतो की प्रकाश, आवाजाच्या वेगालाही मागे टाकून त्या वस्तू वेगाने तुम्हाला आपल्या दुनियेत घेऊन जातात, अगदी क्षणार्धात. शीर्षक वाचून आणि छायाचित्र बघून आपलाही असाच काहीसा प्रवाह सुरु झाला असणार...

परवा असाच एक छानशा ठिकाणी जायचा योग आला. तसेही आजकाल छान या शब्दाबद्दल मुळात फारच कमी अपेक्षा उरल्या आहेत. छानशी जागा, वातावरण, बैठक, कमी कोलाहल किंवा हवा तसा कोलाहल, गोंधळ आणि साजेसे खाऊ पिऊ. बाकी इतर संगीत, स्क्रीन वगैरे दुय्यम, पण फिफा फुटबॉल ज्वर चढला असल्याने  इथे अगदी सिनेमासारख्या मोठ्या स्क्रीनवर वर्ल्ड कपच्या मॅचमुळे वातावरणाची रंगत अधिकच वाढली होती.   पूर्ण सामना बघून बाहेर निघालो काहीसे समाधान घेऊन.

बाहेर आल्यावर अगदी 'चेरी ऑन द आइसिन्ग' म्हणतात ना तसे झाले. भल्यामोठ्या सात काचेच्या बाटल्या रांगेत मांडून ठेवल्या होत्या. त्यावर अगदी टिपिकल आणि ओळखीचे लाल रंगाचे झाकण आणि आतमध्ये भरलेल्या लिमिलेट, एक्सट्रा स्ट्रॉंग, श्रीखंडाच्या गोळ्या, बबल गम, मँगो मूड - रावळगाव सदृश चॉकलेट, किस मीसारखी टॉफी आणि चुईन्ग गम! एका क्षणात प्रवास सुरु झाला आठवणींचा.

कुठलाही मुलाहिजा न ठेवता झाकण उघडून भसकन हात घालून श्रीखंडाच्या गोळ्या घेतल्या. तसेही मी वय आणि 'लोक क्या कहेंगे' याच्या फार पुढे गेलोय किंवा हवं तर काहीही न वाटणारा म्हणा; मला मिळणारा आनंद ही माझी प्रायोरिटी इतरांना त्रास न देता!

शाळेसमोर हमखास फळफळावळ म्हणजेच पेरू, बोरं, चिंचा घेऊन बसणारी आजी, काकू, मावशी आणि गोळ्या, बिस्किटवाला काका, मामा, आजोबा असायचे.  मामी सहजा कोणी म्हणायचे नाही. का देव जाणे. असो. ते नंतर कधी. इकडे फळांचा ढीग तर तिकडे चकचकीत बरणीत गोळ्या, बिस्किटं.

काय अप्रूप महाराजा त्याचे. प्रत्येक पदार्थ आणि त्याची खासियत. श्रीखंडाच्या गोळ्या सुट्या आणि मोकळ्या मिळणार. तोंडात घातली की विरघळणार. या गोळीच्या जनकाला मानावेच लागेल. प्रचंड खुशखुशीत, चव श्रीखंडाची. हातात जास्त वेळ ठेवलाय तर घामाने विरघळणार. एकदा खाल्ली तर परत लागणार. त्याची मोठी बहीण राजमलाई. केळकरांची राजमलाई. या दोन्ही पदार्थांची चव आजतागायत तशीच आहे. श्रीखंडाच्या  गोळ्या तोंडात विरघळत नाही तर लिमलेटच्या गोळ्याच्या बाटलीत हात घातला.

लिमलेटच्या गोळीवर संत्रा, ओरेंज फ्लेवरचे का अधिपत्य असावे हे कधी कळले नाही. चुकून कधी-मधी लेमन आणि इतर फ्लेव्हर दिसतात, पण लिम्लेटची गोळी म्हटली तर संत्र्याच्या छोट्या फोडीसारखी ऑरेंज स्वाद आणि रंगाचीच गोळी डोळ्यासमोर येते. पार्ले पॉपीन्सचा अपवाद वगळता लिम्लेटची गोळी ही ऑरेंजच असावी लागते. तसेही पार्ले पॉपीन्सच्या रंगीबिरंगी पार अगदी टरबूजपर्यंत विविध फ्लेव्हर चाखले तरी लिम्लेट पुढे त्यांचे काही चालले नाही.

पार्ले आणि तत्सम कंपनीच्या रुपेरी कागदामधल्या गोळ्या मिळायच्या, पण  आवडती होती मात्र लिम्लेट ऑरेंजच. या गोळीची अजून एक खासियत. खूप गोळ्या एका वेळेस खाल्ल्या जात नाही. थोडया वेळाने जिभेला चरचर होते. साहजिकच मग मोर्चा वळवला दुसऱ्या बाटलीकडे. एक्सट्रा स्ट्रॉंग. नकळत गोळी खाल्यांनंतर लगेच जीभ बाहेर काढून श्वास घेतला. मस्त वाटले गारेगार... अगदी तसेच!

मँगो मूड होते एका बाटलीत, पण अगदी सोयीस्कररित्या डावलले मी. मँगो मूड, पान पसंद, कच्चा कैरी असे आले आणि गेले, पण शाळेजवळच्या काचेच्या बाटलीत नाही जागा मिळाली त्यांना.

अगली बारी किसकी? काचेतून किस मी टॉफी, चुईन्ग गम आणि बूम बूम बूमर खुणावत होते. 'किस मी टॉफी'सारखे चॉकलेट टाळूला चिकटले की ते जिभेने साफ करण्यात बराच वेळ जायचा. वर्गात शिक्षक मंडळींना कधी हा काय खातोय शंका येऊन शिक्षा पण व्हायची. बूम बूम बूमर, माझा तरी या बबल गमचा फुगा कधी फुगलाच नाही. तोंड मात्र दुखले. सुरवातीला गोड आणि नंतर रबर चघळत राहणे... नाही जमले.

त्यामानाने चुईन्ग गम मात्र बहुउद्देशीय... खाण्यापेक्षा त्याचे नंतरचे उपयोग आणि उद्योगच अधिक. आता मात्र केस, कपडे याविषयी फारच वाईट वाटते. विशेषतः केसातले चिकटलेले गम काढणे एक मोठ्ठा उद्योग. डेस्क, दप्तर, बूट, चप्पल यांनीसुद्धा बऱ्यापैकी वेळा चुईंग गम खाल्ले आहे. दोन मिनिटात चव जाणारे आणि नंतर त्रास देणारे ते चुईंग गम!

कुठेतरी आठवणीत सोपेच्या गोळ्या डोकवत होत्या. आकाराने पिल्लूच, पण आपले वेगळे स्थान होते त्यांचे. रंगींबिरंगी सोपेच्या गोळ्या. काचेच्या बरणीत एका लहानशा पेल्या बरोबर. पाच पैशाला एक ग्लास मिळायचा. सोप खाण्याचा एक राजमार्ग तो.

एवढे झाले तरी सातही बाटल्यांचा मोह सुटत नव्हता, पण आता निघावे म्हणून परत दोन लिम्लेटच्या गोळ्या खिशात घालून तुप्त मनाने निघालो घरी. पोट, जीभ याबरोबर मनाचे पण आठवणींची सैर झाल्यामुळे समाधान झाले होते.

- किरण वैरागकर

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com