Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगविद्यार्थ्यांना मानसिक गुलामीतून मुक्त करूया !

विद्यार्थ्यांना मानसिक गुलामीतून मुक्त करूया !

मी जे काही करतो आहे ते चांगले आहे. मी जे शिकतो आहे ते चांगले आहे. माझी पुस्तके चांगली आहेत. माझे शिक्षण चांगले आहे. माझे शिक्षक चांगले आहेत. माझा भवताल संरक्षित व उत्तम आहे असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण झाला, तर शिक्षणात जाणवणारी बेशिस्तीची समस्या, शिस्त नावाची बेशिस्त गोष्टच हददपार होण्याची शक्यता आहे. मी ज्या व्यवस्थेचा घटक आहे त्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या, समाजाच्या व राष्ट्राच्या हिताची आहे हे एकदा मनावर बिंबवले गेले की ती गोष्ट आनंदाने करण्याकडे कल वाढत जातो. ज्या गोष्टीत आनंद असतो तेथे स्वयंप्रेरणा असते आणि त्यात सक्तीचा लवलेशही नसतो. सक्ती केली कीस्वयंप्रेरणा आणि आनंद हरवला जातो. आनंद जेथे नाही ,शक्ती आणि हुकूमशाहीचे दर्शन असते तिथे शिस्तीची गरज पडते. शिकण्यात विद्यार्थ्यांना जेव्हा आंनद मिळत नाही,ते शिकणे त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणते तेव्हा शिक्षकांच्या हाती काठी येते. शिकणे जेव्हा मुलांच्या गळी उतरते आणि त्यात त्यांना आनंदाचे दर्शन घडते तेव्हा स्वयंशिस्तीने पावले चालू लागतात आणि शिक्षण सुयोग्य दिशेने सुरू होते .

शिक्षणातून कायद्याने शिक्षा हददपार केली आहे. कोणत्याही प्रकारे शिक्षा शिक्षकांना करता येणार नाही असे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा सांगतो आहे. कलम सतरा प्रमाणे प्रतिबंध करण्यात आला आहे. पण तरी सुध्दा शिक्षणातून शिक्षा हददपार झाली असे म्हणता येत नाही. वरवर शिक्षा होत नसली तरी अंतरिक शिक्षेची भावना मात्र संपुष्टात येत नाही. मनातील हिस्त्रंभावना अधूनमधून डोके वर काढत असते.मुळात प्रत्येक व्यक्ती स्वंयशिस्तीची भोक्ती असते. प्रत्येकाला शिस्तीने राहाणे आवडते. किंबहूना तो स्वभाव असतो. मात्र आपण जे काही वागतो आहोत ते असे का वागायचे..? त्या मागील भूमिका काय आहे..? त्यातून स्वतःचे आणि समाजाचे कसे भले आहे हे अधोरेखित झाले की व्यक्ति बेशिस्त वागू शकत नाही. शिक्षणांने शिस्त लावू नये.शिस्त निर्माण करण्याचे कामच मुळतः शिक्षणाचे नाही तर शिक्षणाने विवेक पेरायचा आणि विचार कसा करावा हे शिकवायचे असते. ते शिकविले की शिक्षणात नको असलेल्या गोष्टी आपोआप हददपार होतात. अनेकदा विद्यार्थी श्रध्देने देखील अनेक गोष्टी जीवनभर जोपासत आले आहेत. त्यांना फक्त त्या दिशेने घेऊन जाणारे हात आधाराचे वाटायला हवेत. एका छोटया मुलांचे आईबाबा अपघात मृत पावतात. आता त्याला फक्त वयवृध्द आजीचा आधार उरतो.तो लहान मुलगा आजीला नेहमी विचारायचा ,माझे आई बाबा कोठे आहेत..? त्या बालसुलभ प्रश्नाला आजी उत्तर देतांना आकाशाकडे बोट दाखवायची. आकाशात दिसणारी चांदण्याकडे बोट दाखवत म्हणायची ..ते बघ ते आईबाबा. ते तुझ्याकडे पाहात आहे. त्या चांदण्या म्हणजे आईबाबा आहेत असे ते बालसुलभ मन जाणत होते.त्या चांदण्याना ते बालक आईबाबा समजू लागले. आजी त्याला सांगायची ,तू जे काही करतो आहे ती प्रत्येक गोष्ट आकाशातून आईबाबा पाहाता आहेत.त्यामुळे त्यांना जे आवडणार नाहीत ते तू करू नकोस असे सांगायची.तू वाईट काही केले तर त्यांना खुप वाईट वाटेल. या विचाराचा या बालसुलभ मनावर झालेला परिणाम मोठा होता. मुलगा मोठा झाला तरी तोच परिणाम टिकून राहिला.मुलगा महाविद्यालयात गेला आणि त्याला काही मित्रांनी एकत्रित येत रात्री मद्य प्राशन करण्याचा आग्रह केला.. तेव्हा त्यांने अविचाराने ग्लास हाती घेतला..ओठापर्य़ंत ग्लास गेला आणि नजर वरती गेली आणि आकाशात चांदण्या दिसल्या..आपल्या आईबाबांना हे आवडणार नाही हे लक्षात आले..आजीची आठवण झाली..आणि ग्लास जमिणीवर फेकला आणि पाय काढता घेत घराची वाट धरली. काय पेरले होते तर श्रध्देच्या माध्यमातून विवेकाची पेरणी करण्यात आली होती.मुळतः शिक्षणाचे काम नेमके कार्य काय आहे ? हे कर…आणि ते करू नको हे सांगण्याचे तर मुळीच नाही.शिक्षणाने काय करावे आणि काय करू नये..का करावे आणि का करू नये, चांगले काय आणि वाईट काय हे ठरविण्यासाठी विवेकाचा विचार रूजविण्याचे काम करण्याची गरज आहे. मुळतः जेव्हा मुलांच्या मनात चांगले आणि वाईट या संकल्पनेत विवेक नसतो आणि त्या संकल्पना देखील माणंस पाहून बदलत असतील तर विद्यार्थी देखील माणंस पाहून आपले विचार निश्चित करतात. विवेक मात्र असे ठरू देत नाही. चोरी करण हे वाईटच असते..ती कोणाचाही केली तरी देखील..शत्रूची केली म्हणून ते वाईट ठरत नाही असे होत नाही . सत्याची धारणा देखील त्रिकालीत नैतिकतेच्या धारणेवर कायम असते. त्यामुळे शिक्षणातून केवळ चागंले आणि वाईट ठरविण्याचा विचार पेरला की समाजाला अपेक्षा असलेली विचारधारा निश्चित पुढे घेऊन जाते. शिक्षणाने विवेकाची पेरणी केली तर चुकीच्या विचारधारे विरोधात बंडाची शक्ती येते. विवेकानंद यांचे वडील वकिल होते.घरी अनेक अशिल यायचे.त्यातील काही दलित असायचे काही उच्च वर्णिय असायचे..त्यांच्यासाठी बाहेर हुक्का ठेवलेला होता.त्यातील हुक्का ओढण्याचा विचार मनात आला..मुळतः हुक्का वेगळा का असा प्रश्नही त्यांना पडला..तसे वडिलांना विचारले देखील. ही प्रश्न विचारण्याची शक्ती शिक्षणातून आली आणि त्याला दहशत व जबरदस्तीने दाबले नाही तर ती मुले विवेकांने एका उंचीवर पोहचतात हा इतिहास आहे.पण मनात पडणा-या प्रश्नांला मी मोठा आहे..मी शिक्षक आहे..हे पूर्वीपासून आहे असे सांगत जर आपण चालत राहिलो तर शिक्षणाचे ध्येय कधीच साध्य होणार नाही.मुळात अशी प्रश्न विचारणे हेच अनेकदा हुकूमशाही आणि हिंस्त्र वृत्तीच्या माणंसासाठी अडचणीचे असते.असे प्रश्न कोणी विचारू नये म्हणून समाजात काही वर्ग काम करीत असतो.त्या वर्गाच्या साम,दाम,दंडाच्या उपयोजनाने ही माणंस कधी कधी दबतात पण काही मात्र आपला विवेक अंतिम मानत प्रवास सुरू ठेवतात.जे सॉक्रेटीस सारख्या विचारवंत आणि गोष्टीच्या माध्यमातून शहाणपण पेरायचा म्हणून इसापने मृत्यू पत्करला पण विचाराशी तडजोड केली नाही.ही शक्ती ख-या शिक्षणातून येत असते.

- Advertisement -

जेव्हा विद्यार्थ्यांच्या हदयात विचाराची पेरणी होते, तेव्हा विद्यार्थी स्वतंत्र्य विचारधारेने जगण्याचा मार्ग अनुसरतात.त्यात अनुकरणाचा,कोणी सांगितले म्हणून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत नाही. त्या स्वतंत्र्याने भावनेत स्वयंशिस्तीचा भाव दडलेला असतो.स्वतंत्र्याचा भाव जेव्हा असतो..किंवा कोणत्याही व्यक्तिला घरात स्वतंत्र्यता दिले जाते तेव्हा ती व्यक्ती देखील अधिक जबाबदारीने वागते. मात्र स्वातंत्र्य नसेल तर जबाबदारी संपुष्टात येते.त्यातून गुलामीमुळे बेजबाबदार वाढतो. तेथे केवळ कायदा, भिती, दहशत यामुळे मनात असलेला हिंस्त्र विचार बाहेर पडत नाही..पण ती भिती दूर झाली की पुन्हा ती हिंस्त्रता डोक वर काढते. त्यामुळे कधीतरी चांगला असणारा विद्यार्थी गैरमार्गाची पावले चालू लागतो. याचा अर्थ तो चांगला वागतो ते शिक्षणाने घडलेले परिवर्तन नसते तर ते केवळ तात्पुरत्या भितीने झालेला बदल असतो. अनेकदा तुंरूगात गेलेला आरोपी शिक्षा भोगून आल्यावरती त्याच्या सुधारणा होण्याची गरज असते मात्र कोणतेही परिवर्तन घडतांना दिसत नाही.अनेकदा त्या मार्गाने गेलेला माणूस पुन्हा त्याच दिशेने प्रवास सुरू ठेवतो याचे कारण तेथे आंतरिक बदलाचा प्रयत्न न होता..दबावाने प्रयत्न होत असेल तर बाहय परिवर्तन घडण्याचीच शक्यता अधिक आहे.त्यामुळे शाळेत शिक्षकांच्या माराने विद्यार्थी बदलतात का..? त्याचे उत्तर बदलतात..पण ते परिवर्तन नाही तर केवळ बदल असतो. त्यातही अनेकदा तो आभास असतो हे लक्षात घ्यायला हवे.

मग परिवर्तनाची पाऊलवाट शिक्षणातून निर्माण करायची असते. मात्र त्या परिवर्तनासाठी शिक्षणाने ध्येयाच्या दिशेने प्रवास तर करायला हवा ना. मात्र तसे घडत नसेल तर शिक्षणाचा प्रवास चूकिच्या दिशेने सुरू आहे असे समजावे. त्यामुळे शिक्षणातून भितीचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर प्रेमाचा विचार पेरायला हवा. प्रेम आले की आनंद येतो. शिक्षणासाठी जितके स्वातंत्र्य असेल तितकी निकोप मानवीवृत्ती विकासाची प्रक्रिया घडेल. त्यामुळे कायद्याने गेलेली शिक्षा आता विद्यार्थ्यांना मुक्त विचाराचे स्वातंत्र्य देऊन मानसिक गुलामीतून मुक्त करूया. काठीने सरळ रेषेने चालणे होईल पण तेथे मस्तकाचा पराभव असेल आणि जेव्हा स्वांतत्र्याचा विचार घेऊन प्रवास सुरू राहील तेव्हा मस्तके माणूसकीच्या भिंती भक्कमपण उभ्या करून विषमतेवर मात करू शकेल. त्यातून हिंसा, अविचार, व्देष, मत्सर, अंहकार यांचा समूळ नाश करेल. त्यातून नव्या स्वप्नाचा प्रवास घडेल आणि माणूसपणाच्या सावल्या अधिक गडद होतील. त्यात अनेकांना जगण्यसाठी आधार आणि आसरा लाभेल..गरज शिक्षण समजून घेण्याची.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या