समाज एकत्र राहो!

समाज एकत्र राहो!

करोनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतरच्या 2022 ने आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. पण आता नूतन वर्षामध्ये सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील, अशी आशा वाटते. सध्या व्यक्ती आणि समाजापुढे अनेक संकटे उभी आहेत. मात्र मानवतेचा धर्म पाळत सगळे एक राहिले आणि गरजूंना मदत केली तर हे वर्षच नव्हे तर येणारा संपूर्ण काळ यशदायी ठरेल.

2022 ला निरोप देऊन 2023 चे स्वागत करताना प्रत्येकाच्या मनाची अवस्था कातर आहे. सरते वर्ष माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक होते. मागील वर्षाच्या अखेरीस माझे वडील जग सोडून गेले. त्यांच्याविना जगण्याची कसरत करण्याचा हा काळ होता. त्यामुळेच हे वर्ष कधी एकदा संपतेय असेच वाटत होते. अर्थात, मी एकटीच नव्हे तर असे अनेक जण आहेत ज्यांच्या अशाच भावना असतील. मी स्वत: नवीन वर्षाकडे खूपच आशेने बघत आहे. मग हा आशावाद कामांबाबतचा, वैयक्तिक पातळीवर स्थिरस्थावर होण्याचा, भावनांचा आवेग सावरण्याचा, स्वत:ला नव्याने कामात झोकून देण्याचा अशा सर्व पातळ्यांवरील आहे. त्यादृष्टीने सगळ्यांनाच हे वर्ष समाधानाचे जावे, ही अपेक्षा आहे.

कोविड संपला आहे, असे म्हणत असतानाच जगाच्या काही कोपर्‍यांमध्ये त्याचा उद्रेक वाढत आहे. पण भारताला याची झळ पोहोचू नये, ही माझी पहिली प्रार्थना आहे. त्याचबरोबर नववर्ष मराठी चित्रपटांसाठीही अत्यंत चांगले जावो, ही मनापासून इच्छा आहे. सरत्या वर्षामध्ये नक्कीच काही चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. ही जमेची बाब होती. पण सगळेच चित्रपट चालणे गरजेचे आहे. ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच अन्य ज्वलंत प्रश्नांना हात घालणारे चित्रपटही पाहिले जायला हवेत, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळायला हवा, कारण त्या आशेने निर्माते आणि दिग्दर्शक काम करत असतात. अगदी ‘पैठणी’चे उदाहरण घेतले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. थोडक्यात, चित्रपटगृहामध्ये दोन आठवडे टिकण्यासाठीही मराठी चित्रपटांना बरीच धावपळ करावी लागते. नूतन वर्षी ही धावपळ थांबेल, अशी अपेक्षा करते.

अनेक समस्यांवर मात करून पुढे जात असताना नवीन वर्षातही अगदी मूलभूत स्वरुपाच्या समस्यांवर अथवा त्रुटींवर काम करण्याची गरज आहे, हे खेदाने पण अगत्याने सांगावेसे वाटते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आपण स्वच्छतेपासूनच सुरुवात करायला हवी. समाजाचे देणे देण्याचा एक प्राथमिक भाग म्हणजे कोणीही सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये. आपल्याला सर्दी-खोकल्याचा त्रास असो वा नसो, काळजी म्हणून मास्क वापरणेदेखील सामाजिक बांधिलकीच आहे. रस्त्यावर न थुंकणे, साथरोग पसरणार नाहीत याची काळजी घेणे याप्रती जागरुक असायला हवे. मला काही होणार नाही, या भ्रमातून बाहेर यायला हवे आणि स्वत:ची काळजी घ्यायला हवी, कारण स्वत:ची काळजी घेणे ही समाज हिताचीच बाब आहे.

करोनाकाळाने आपल्याला मदतीची सवय लावली. तो काळ उत्तम प्रकारे सामाजिक बांधिलकी पाळली. पण गरजूंना मदत करण्याची सवय सुटू न देण्याची आणि माणूसकी जपण्याची गरज यावर्षीही लक्षात घ्यायला हवी. अलीकडे जाणवणार्‍या अनेक समस्या त्यामुळेच तयार झाल्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी माणसाचे माणुसकीपूर्ण वर्तन अपेक्षित आहे. दुसर्‍याला त्रास होतोय, म्हणून आपण निवांत आणि निर्धास्त राहण्याचा हा काळ नाही. हा स्वार्थीपणा बाजूला ठेवून पुढे येण्याची शिकवण देणारा हा काळ आहे. केवळ करोनाच नव्हे तर कोणत्याही संकटकाळात सर्वांनी एकत्र राहून त्याचा मुकाबला करायला हवा. सध्या या कारणांसाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेणे आणि जमेल तेवढी मदत करणे हेदेखील नववर्षातले ध्येय असायला हवे. सामाजिक कामाला हातभार लावल्यामुळे या संस्थांनाही प्रोत्साहन मिळेल आणि अनेकांपर्यंत त्यांच्या सेवा पोहोचणे शक्य होईल.

सध्या ग्लोबल वॉर्मिंगची समस्या उग्र रूप धारण करत आहे. वेब सीरिज, डॉक्युमेंट्रीज वा अशा अन्य माध्यमातून याप्रती जागरुकता निर्माण केली जात आहे. मात्र या विषयांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात का होईना, बदलणे गरजेचे आहे. खरे सांगायचे तर गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने स्वार्थापोटी निसर्गाचे अपार नुकसान केले आहे. आपल्या कोणत्याही उपायाने ती हानी भरून निघणारी नाही. मात्र तरीदेखील प्लॅस्टिकचा कचरा टाळणे, वृक्षतोड थांबवणे, सिमेंटचे जंगल तयार करण्याच्या विचारांपासून दूर होणे गरजेचे आहे. आपण दहा झाडे तोडली तर दहा नवी झाडे लावणे, हा उपाय असू शकत नाही. कारण जैवविविधता जपण्याच्या दृष्टीने ही बाब उपयुक्त नाही. एखाद्या रोपट्याचा वृक्ष होण्यास 15 ते 20 वर्षांचा काळ लागतो, हे विसरता कामा नये. पाण्याचा अपव्यय टाळणे, नैसर्गिक घटकांचे जतन करणे, पावसाचे पाणी साठवणे या महत्त्वपूर्ण विषयांकडे समाजाचे लक्ष वळायला हवे. आपण आता एका दिवसातच तीन ऋतू अनुभवतो. ऋतुचक्र बदलत आहे. त्याची जाण ठेवून आतापासून नवीन पिढीला शिस्त लावणे आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे बीज पेरणे ही येणार्‍या प्रत्येक वर्षात आपली जबाबदारी असणार आहे. हे जाणले तरच ही पिढी मोठी होईपर्यंत निसर्गाची अनुकूल साथ मिळण्याची अपेक्षा आपण गृहीत धरू शकतो. यादृष्टीने शाळेतच या विषयाप्रती मुलांना सजग करण्याची गरज लक्षात घ्यायला हवी.

सध्याच्या धकाधकीच्या दिनचर्येमुळे मानसिक ताणतणाव वाढले आहेत. विमनस्कता, भीती, अस्थिरतेची भावना बळावते आहे. केवळ मनोरंजन विश्वातीलच नव्हे तर विविध वर्गातील आणि वयातील लोक आत्महत्येपर्यंत टोकाची पावले उचलत आहेत. हे सगळे लक्षात घेता आता तरी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घेण्याचा विचार मान्य करायला हवा. नववर्षात मनोरोगांचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक मनोकायिक आजारावर औषधोपचार गरजेचे नसतात, तर विचारांची कोंडी फुटल्यामुळे आणि व्यक्त झाल्यामुळेही बराच त्रास कमी होतो. मनातून नकारात्मकता बाहेर टाकणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणी आपले ऐकून घेतोय, ही भावनाच आपल्याला तणावमुक्त करते. म्हणूनच नववर्षात ही जाणीवही वृद्धिंगत व्हायला हवी. सर्वांनीच आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण ते नसेल तर आपण अनेक नकारात्मक विचारांना बळी पडतो आणि यातून संपूर्ण कुटुंब नैराश्येच्या गर्तेत सापडू शकते.

वैयक्तिक पातळीवर बोलायचे तर मनाला आनंद देणारे काम मिळावे, अशीच माझी इच्छा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नववर्षात मला खंडित झालेले एक काम नव्याने सुरू करायचे आहे. मी मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील अनेक समस्यांच्या निराकरणासाठी व्याख्याने देते. मात्र करोनामुळे गेली दोन वर्षे मी ते करू शकले नाही. आता पुन्हा त्याची सुरुवात करायची आहे. जग पुढे गेले असले तरी आजही आपण मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे मी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही याप्रती जागृती निर्माण करण्याचे काम करते. त्यासंदर्भातील प्राथमिक प्रश्नांनाही उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. एखादीला डॉक्टरांची गरज असल्याचे लक्षात येताच तसा सल्ला देते. अनेक कार्यक्रमात केवळ मुली, महिलाच नव्हे तर पुरुषही असतात. तेही खूप प्रश्न विचारतात आणि आईला, बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला त्रास होत असेल तर आपण काय करू शकतो, हे जाणून घेतात. थोडक्यात, आम्ही त्यांची कशी मदत करू शकतो, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. त्यादरम्यानच्या भावनात्मक आणि संवेदनात्मक बदलांमुळे महिलांनाही घरातल्या पुरुषांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे असते. हे काम मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच त्यात पडलेला खंड नूतन वर्षात दूर व्हावा आणि या कामात पूर्ण जोमाने उतरावे हीच इच्छा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com