Blog : कीर्तनसम्राट श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज

Blog : कीर्तनसम्राट श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज

अवघाची संसार सुखाचा करीन |
आनंदे भरीन तिन्ही लोक |

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचा हाच विचार हाती घेऊन ज्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले, 'ज्ञानेश्वर माऊली' या शब्दाशिवाय ज्यांची बोलण्यास सुरुवात होत नसे, ते च पूर्वाश्रमीचे डॉ. प्रा. राष्ट्रीय कीर्तनसम्राट श्रीकृष्ण वामनराव सिन्नरकर महाराज! सुरू झालेली ही जीवनयात्रा अलीकडे श्रीकृष्णानंद भारती स्वामी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. अशा व्यक्तिमत्त्वाचा 'ज्ञानेश्वर माऊली' ते 'नमो नारायण' हा प्रवास 30 ऑक्टोबर 2021 ला शांत झाला....

सिन्नर येथील नामवंत कीर्तनकार वामनराव सिन्नरकर महाराज यांच्या घरी 28 फेब्रुवारी (तुकाराम बीज) या दिवशी पुत्ररत्न जन्माला आले. आपल्या घराण्याचा कीर्तनाचा प्रकाशित वारसा त्यांनी समाज प्रबोधनाने प्रज्वलित केला. बारागाव पिंप्री येथे जन्माला आलेले, बारागाव पिंप्री-सिन्नर-नाशिक असा शिक्षणाचा भाग पूर्ण करीत ज्यांचे तरुणवयातच कीर्तन रोमरोमात जागे झाले, त्यांनी अनेक नोकऱ्यांना नकार देत कीर्तनातून जनजागृतीचे कार्य करण्याचे ठरवले.

समाजप्रबोधन करताना त्यांना जीवनभर संघर्ष करावा लागला. मात्र त्यामुळे या महात्म्याचे हास्य कणभरही कमी झाले नाही. त्यांच्या ज्ञानाचा वाहता झरा त्यांना अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्राशी जोडत होता. म्हणूनच राजकीय अथवा समाजहिताचा उपदेश ते अध्यात्मिक माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत होते. हे कार्य करताना अनेक संस्थांशी ते जोडले गेले.

शैक्षणिक संस्थाही त्यांचे विचार त्यांच्याकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होत्या. ज्ञानाचा हाच झरा नदीतून सागरात रूपांतरित होत होता. अफाट वाचन, पुस्तक संकलन ते जसेच्या तसे मेंदूपर्यंत परावर्तित होत होते. म्हणून कीर्तनात अनेक तारखा-दाखले ते जसेच्या तसे देत.


समाजाला घडवत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी शिक्षण चालू ठेवले. मराठी-संस्कृत एम.ए., संत ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांवर पीएच.डी., शिवाय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात डिलीट पदवीचा अभ्यासही करीत होते. त्यासाठी त्यांनी १५ पुस्तके लिहिली. एम. एस. गोसावीसर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा श्री दत्तात्रयांचा ओवीबद्ध केलेला सरळ सुफल ग्रंथ, चांगदेव-पासष्टी, उपनिषदांचे सार, पंच संत चरित्र, वेद विवरण, 1957 ची आठवण (दलितमित्र सहवास) नरोत्तम पार्थ (अर्जुनावरील नाटक) काव्य खंड, काव्य पायरी, रामायण भाग 1 व भाग 2 ही आणि अशी पुस्तके त्यांनी लिहिली.

देश-विदेशात 11 हजारांपेक्षा अधिक कीर्तने त्यांनी केली. 11,000 कीर्तनांचा विक्रम करून गिनिज बुक रेकॉर्ड करणारे ते पहिले कीर्तनकार ठरले. राष्ट्रीय कीर्तनसम्राट, कीर्तन सार्वभौम, कीर्तन साम्राज्य चक्रवर्ती अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या. सिन्नरकर महाराज यांच्या कीर्तनातून अबालवृद्धांना ज्ञानाची पर्वणी मिळत होती.

तरुणवर्ग अधिक प्रमाणात त्यांच्या कीर्तनात उपस्थित असे. राष्ट्र, धर्म, देश यांच्या कार्यासाठी त्यांच्यामुळे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारी विचारांचे बीज पेरताना छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाजरचनेचे रोप गावागावात लावताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचे सामाजिक विचार सर्वत्र पेरीत, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे देशहिताचे विचार त्यांनी समाजापर्यंत पसरवले.

विविध संतांच्या विचारांतून समाजाला जीवन जगण्याचा मार्ग ते दाखवत. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांतून कीर्तन करीत. निरपेक्षपणे समाजप्रबोधन करताना त्यांनी आम्हा मुलांवर उत्तम संस्कार केले.

हे सर्व करताना जीवनाच्या अंतिम टप्प्यात म्हणजे वृद्धापकाळात जाताना संन्यस्थ मार्ग स्वीकारला. यातूनच त्यांच्या अंगी असलेली त्यागाची वृत्ती स्पष्ट दिसते. ते जितके कणखर होते तितकीच कणखर त्यांची पत्नी म्हणजे माझी आई वॄषाली श्रीकृष्ण सिन्नरकर होय.

आज त्यांच्या संन्यासामुळे तिलाही दैवीरूप प्राप्त झाले आहे. कारण तितक्याच संघर्षाला तोंड देत ती कायम त्यांच्या पाठीशी उभी होती. त्यांचा संन्यासाश्रमात तिचा मोठा वाटा आहे. त्यांचा वारसा येण्याचे भाग्य मला लाभले आहे. अर्थात त्यांच्या कीर्तनाचे पसायदानच मिळाले आहे.

वाणोत निंदोत सुनीती मंत
चळो असो वा कमला गृहात
हो मृत्यू आजची घडो युगांती
सन्मार्ग टाकूनी भले न जाती

याप्रमाणे ते कायम निंदा-स्तुतीच्या पलीकडे जाऊन संतांच्या मार्गाने चालत होते. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा संतांचा मार्ग त्यांनी अवलंबला. ते या मार्गावर जाताना नेहमी स्वतःला 'संतचरणरज' म्हणत. तसे वागण्याचा त्यांचा प्रयत्नही असायचा.

यातूनच ते संतपदापर्यंत पोहोचले. त्यांचा अप्रतीम, डोळे दीपवणारा समाधी सोहळा झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 'अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' या अभंगाप्रमाणे सुखाचा संसार करून त्यांनी खरोखरच तिन्ही लोकात आनंद भरला आहे.


- वैजयंती वृषाली श्रीकृष्ण सिन्नरकर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com