किंगमेकर निघाला लबाड ,हडपले करोडोंचे घबाड

किंगमेकर निघाला लबाड ,हडपले करोडोंचे घबाड

युवकांचा नेता, समाजसेवक, दानशूर, गरजवंतांचा मसीहा, यशस्वी उद्योजक आणि विमा क्षेत्रातील किंगमेकर.. अशा एक ना अनेक पदव्या स्वतःला लावून घेत आपले काळे कारनामे झाकत उजळ माथ्याने फिरनारा राजेंद्र बंब नेमका कोण? हे आता सार्‍यांना कळते आहे. वरवर दिसणार्‍या समाजसेवेच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा समोर आला आहे. आता पोलीस प्रशासनाने हातोडा मारलाच आहे तर अवैध सावकारीचे कायम स्वरुपी कंबरडे मोडलेच पाहिजे.

कोरोना काळात केलेल्या (न दिसलेल्या) समाजसेवेबद्दल कोरोना योध्दा स्वतःची पाठ थोपटून घेत थेट राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जावून भेटणारे, नव्हेतर त्यांच्याकडूनही आपण कोरोना योध्दा असल्याचे शिक्कामोर्तब करुन घेणारे धुळ्यातील राजेंद्र जीवनलाल बंब याच्या दानशुरतेचा, समाजसेवेचा मुखवटा आता टराटरा फाटला आहे.

युवकांचा नेता, समाजसेवक, दानशूर, गरजवंतांचा मसीहा, यशस्वी उद्योजक आणि विमा क्षेत्रातील किंगमेकर.. अशा एक ना अनेक पदव्या स्वतःला लावून घेत आपले काळे कारनामे झाकत उजळ माथ्याने फिरनारा राजेंद्र बंब नेमका कोण? हे आता सार्‍यांना कळते आहे. वरवर दिसणार्‍या समाजसेवेच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा समोर आला आहे. विमा क्षेत्रात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पॉलिसी कशा मिळू शकतात? या आधारावर या क्षेत्रातील बडे बडे पुरस्कार कसे मिळविता येवू शकतात, आणि पैशांच्या जोरावर शहरभर भले मोठे बॅनर्स झळकावून आपण कसे ‘किंगमेकर’ आहोत, हे भासविणार्‍या राजेंद्र बंबची चौका चौकात चर्चा होते आहे. उपहासाने, कुचेष्ठेने आणि गोरगरिबांना लुटारुंच्या अनुशंगाने त्याची चर्चा रंगते आहे. एक मात्र खरे, घडा भरेपर्यंत सारेकाही मिरवून घेता येते. एकदा घडा भरला की, कोणतेही छोटेसे निमित्त मात्र हे केलेले पाप उघडे पाडण्यासाठी कारणीभूत ठरते. राजेंद्र बंबच्या बाबतीत देखील असेच घडले, असे म्हणावे लागेल. कारण कुणी दुसर्‍याने नव्हे तर त्याच्याकडे दहा वर्ष काम करणार्‍या आणि यापैकी अनेक घटनांचा साथीदार ठरलेल्या जयेश उमाकांत दुसाने हा तरुण हे बिंग फोडण्यास निमित्तमात्र ठरला आहे. अर्थात यात जिल्हा पोलीस प्रशासनाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

राजेंद्र बंबच्या कामाची पध्दती

धुळे शहरात एकेकाळी गल्लोगल्ली पेपर विकत फिरणारा तरुण आज करोडोंचा मालक आणि अनेकांना करोडो रुपये वाटून दानशूर कसा बनला, हा प्रवास थक्क करणारा आहे. राजेंद्र बंब याने विमा एजंट (एलआयसी) म्हणून कामाला सुरुवात केली. इतरांसारख्याच तोही विमा कंपनीच्या योजना समजून सांगत. मिळेल तेव्हढ्या पॉलिशी काढत असे, जनतेचा विमा कंपनीवर अलेल्या विश्वासामुळे इतरांसारख्या त्यालाही पॉलिशी मिळत होत्या. परंतु झटपट श्रीमंत होण्यासाठी धडपडणार्‍या राजेंद्र बंबच्या डोक्यात वेगळेच काही चालले असावे. यातूनच त्याला मार्ग सापडला, आणि जी.पी. फायन्सा प्रा.लि., कांदिवली मुंबई ही कंपनी त्याने स्थापन केली. आता उघड झालेल्या प्रकरणात ही कंपनी नोंदणीकृत नसल्याचेच समोर आले आहे. मात्र इतकी वर्ष आपण या कंपनीत डायरेक्टर असल्याचे सांगत आपल्याकडे येणार्‍या गरवंताला त्याच्या अपेक्षेपेक्षा कर्ज मिळवून देण्याचा व्यवसाय वजा फंडा त्याने सुरु केला. कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचे म्हटले, तर कागदपत्रांची पुर्तता करणे नाकीनऊ येणारे ठरते. या तुलनेत अवघ्या काही कागदांच्या मोबदल्यात आणि मोजक्या सह्या देवून अवघ्या काही दिवसात सहज कर्ज मिळवून देण्याची ही सुविधा अनेकांना भावली. म्हणतात ना, ‘गरजवंताला अक्कल नसते’ ही म्हण उपहासात्मक असली तरी बर्‍याच अंशी वस्तुस्थिती दर्शविणारी आहे. आपली गरज आपल्याला काहीही करायला भाग पाडते. मग कुणाची दाढी धरणे असो, की कुणाच्या पाया पडणे असो.

राजेंद्र बंबचा सोपा फंड होता. त्याच्याकडे कुणीही कर्ज घेण्यासाठी आले की, तो समार एक यादी ठेवत असे. यापैकी कोण तुम्हाला जामीनदार म्हणून स्वाक्षरी देवू शकते, असे तो सांगत असे. मात्र या यादीत अशा बड्या हस्तींची नावे होती की, सर्वसामान्य व्यक्ती सहज त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड होते. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून कर्जाला तारण, गहाण ठेवण्यासाठी मालमत्तेची कागदपत्रे, स्वाक्षरी केलेले चार कोरे चेक, 500 रूपयक मुल्याचा कोरा स्टॅम्प पेपर, रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो, पॅनकार्ड आणि कर्जदाराच्या धर्मपत्नीचे नावे चेक, एव्हढ्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज उपलब्ध होत असे. हे करतांना त्याने अनेकांचे घर, प्लॉट, शेती, मालमत्ता गहाण ठेवून त्यांच्या सौदापावत्या, गहाण खत, मुळ खरेदी कागदपत्रे, मुक्त्यारपत्र करुन आपल्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांच्या नावे या मालमत्ता करुन ठेवल्या आहेत. अशी 600 हून अधिक प्रकरणे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्राराचे म्हणणे ग्राह्य धरायचे म्हटल्यास, या सार्‍या मालमत्ताचा आकडा सुमारे 500 कोटींच्या पुढे जातो. एव्हढ्या मालमत्तांची कागदपत्रे डांबून ठेवणे आणि या बळावर सक्तीची वसुली करणे हा राजेंद्र बंब यांचा गंभीर गुन्हाच आहे.

असा बनला विमा क्षेत्रातील किंगमेकर

एकट्या धुळे शहरात किमान 50 हून अधिक एलआयसी विमा एजन्ट आपल्याला माहिती आहेत. गेली अनेकवर्ष ते आपल्यासमोर वावरत आहेत. इमाने-इतबारे काम करतांना आणि दरवर्षी विमा कंपनीच्या बदललेल्या योजना समजावून सांगत लाभार्थी शोधतांना त्यांची होणारी दमछाक आपण जवळून पाहतो आहोत. त्यापैकी कुणालाही राजेंद्र बंबसारखे अल्प कालावधीत किंकमेकर का होता आले नाही? तर त्यांच्याकडे राजेंद्र बंबसारखी वाकडी वाट नाही. बंब याने आपल्या जी.पी. फायनान्स कंपनीतून कर्ज देतांनाच कर्ज रकमेच्या दीड पट रक्कमेऐव्हढी पॉलिसी काढावी लागेल ही अट टाकलेली असे. पॉलिसीच्या हप्त्यांची रक्कम वजा करुनच कर्जदाराच्या हातात उरलेली रक्कम दिली जात असे. यातून बंब याला आयताच घरबसल्या पॉलिसी धारक मिळत असे, तेही लाखोंच्या पॉलीसी घेणारा. (अर्थात जबरदस्तीने दिलेल्या) म्हणजेच दिलेल्या कर्जातून व्याजही कमवायचे आणि हक्काचे पॉलीसीधारकही मिळवायचे. अशा प्रकारे मिळविलेल्या लाखो-करोडोंच्या पॉलिसीमुळे विमा क्षेत्रात त्याचा दबदबा वाढला. विमा अधिकार्‍यांच्या नजरेत तो हिरो ठरला. अन्य विमा एजंटच्या तुलनेत किंगमेकर बनला. राज्यात सर्वाधिक मोठ्या रकमेच्या पॉलिसी काढणार्‍या एजंट म्हणून त्याला विमा कंपनीनेच अनेक पुरस्कारांनी गौरविले. या सार्‍या बाबींचा आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पुरेपुर वापर करीत त्याने या फोटोंचे वेळोवेळी शहरभर बॅनर्स झळकवलेत. या क्षेत्रातील यशस्वी व्यावसायीक म्हणून त्याची प्रतिमा उंचावली. मात्र या मागील काळे कारनामे झाकण्यासाठी त्याला बड्या व्यक्तींची, नेत्यांची, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस अधिकारी यांची ढाल असणे आवश्यक होते. त्यातही तो यशस्वी ठरला आणि यापुर्वी शहरातील अन्य नेत्यांशी, जिल्हाभरातील नेत्यांशी सलगी वाढवत थेट राज्यपालांपर्यंत पोहचला.

गरजवंतांना कर्ज देतादेता शहरातील अनेक व्यापार्‍यांशीही त्याचे आर्थिक व्यवहार सुरु झालेत. नंबर एक, नंबर दोन वाले त्याच्या अवतीभवती फिरु लागलेत. लाखोंच्या भिशींचा व्यवसाय सुरु झाला. व्याजबट्ट्याचेही धंदे तेजीत आलेत. शहरातील ‘मसल पॉवर’ आपल्या हाती आली असून दरम्यान अनेक अधिकार्‍यांशी त्याची घट्ट मैत्री झाली. यामुळे आता आपले कोणीही काही बिघडवून शकत नाही, अशा आविर्भावात वावरु लागला. बड्या व्यक्तींमध्ये उठ-बस करतांनाच देशविदेशातील वार्‍या सुरु झाल्यात. ऐरव्ही जमीनीवर चालणारा राजेंद्र बंब मग समुद्रकिनारी जावून हवेत उडू लागला. हीच हवा त्याच्या डोक्यात गेल्याने त्याची भाषा बदलली, डोक्यातील उपद्रवमूल्य आणखी वाढले आणि आपण आपल्या जवळच्यांच गेम करतो आहोत हे त्याच्या लक्षातच आले नाही म्हणा की, की त्याच्या मगु्ररीने त्याला असे करायला भाग पाडले. आपल्याकडे दहा वर्ष काम करणार्‍या जयेश दुसानेच्या मजबुरीचा फायदा घेवून त्याच्या वडिलांच्या नावावर असलेल्या तीन मजली इमारतीची कागदपत्रे सहा वर्षांपूसन डांबून ठेवणार्‍या राजेंद्र बंब विरुध्दचा त्याच्या संयमाचा अंत झाला. आणि दिवसेंदिवस फुगून गब्बर होणारा हा फुगा एकदाचा फुटला.

अन् पैसे मोजून मोजून थकलेत

अवैध सावकारी करणार्‍या राजेंद्र बंबच्या घरासह पाच ठिकाणी एकाचवेळी वेगवेगळ्या पथकांनी छापे घातले. पहिल्याच दिवशी तब्बल दीड कोटीची रक्कम आणि काही लाखांचे सोने व कागदपत्रे हाती लागलेत. मात्र ही तर केवळ सुरुवात होती. योगेश नागरी पतपेढी, शिरपूर पिपल्स बँक, जळगाव पिपल्स बँक यांच्या लॉकर्ससह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली रक्कम आणि कागदपत्रे शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते. टप्प्या टप्प्याने लॉकर फोडायला सुरुवात झाली आणि तपास यंत्रणेच्या हाती लागलेले घबाड पाहता हा किंगमेकर किती लबाड आहे हे सिध्द होवू लागले. तीन दिवसात सुमारे 20 कोटीहून अधिक रक्कम, किलोच्या वजनाचे सोने, दागिने, चांदीचे लगदे, काही महत्वपूर्ण दस्तऐवज, उतारे, महत्वाच्या नोंदी असलेल्या डायर्‍या पोलिसांना सापडल्या. पाचशे, दोन हजाराच्या नोटा मोजत मोजत बिचारे पोलीस कर्मचारी थकलेत. मात्र आजुनही घबाड सापडतेच आहे.

सन 2011 मध्ये देशातील पद्मनाभ स्वामींच्या मंदिरात खजाना सापडला. तळघरातील अवघ्या काही खोल्या उघडल्या तरी एक लाख करोड पेक्षा जास्तीची रक्कम यात सापडली. मात्र हा खजाना त्रावणकोर महाराजांचा असल्याचा ऐतिहासिक संदर्भ समोर आला. धुळ्यात वेगवेगळे लॉकर व घरात दडलेला हा खजाना या महाशयांचा नसून तो त्याने सर्वसामान्य जनतेकडून, गरजवंताकडून सक्तीने वसुल केलेल्या व्याजाचा आहे. अर्थात हा खजाना सामान्य जनतेचा आहे. हे एका पाठोपाठ कोटीच्या तुलनेत सापडणारी रक्कम पाहता चेकवर शुन्याच्या पुढे शुन्य वाढवून करोडो रुपये लाटणारा याच धुळ्यातील भास्कर वाघ आठवल्याशिवाय राहत नाही. जि.प.च्या लघुसिंचन विभागात एक टेबल सांभाळणारा सामान्य कर्मचारी कोट्यवधींचा मालक होतो. सार्‍यांच्या नजरेत ‘धर्म भास्कर’ ठरतो. मात्र त्याच्याही पापाचा घडा भरल्यावर हा कुठल्या देवीचा चमत्कार नाही तर, सामान्य जनेतचा लाटलेला पैसा आणि भ्रष्टाचार आहे हे सार्‍या देशाला कळाले.

याच धुळे शहरात गल्लो गल्ली पेपर विकणारा राजेंद्र बंब अवघ्या काही वर्षात करोडोंचा मालक होेतो, हा देखील कुठल्या देवादिकांचा मालक होते. चमत्कार नाही तर सामान्य जनतेकडून वसुल केलेला जास्तीचा पैसा अर्थात गैरव्यवहार, भ्रष्टाचारच आहे, असे म्हटलेतर वावगे ठरणारे नाही.

मुखवटा फाटला, पुढे काय?

धुळ्यातील धर्मभास्करच्या प्रकरणात अनेक रथी महारथी त्याचे लाभार्थी होते. मात्र आजही एकटा भास्कर वाघ शिक्षा भोगतो आहे. राजेंद्र बंबच्या या करोडोच्या प्रकरणात एक चेहरा समोर आला, त्याचा मुखवटा फाटला म्हणून हे प्रकरण ऐव्हढ्यावर संपणारे नाही. तर ज्या जी.पी. फायनान्स कंपनीतून तो कर्जपुरवठा करीत होता. ती कंपनी खरच नोंदणीकृत आहे काय? नसेल तर करोडोचा व्यवहार करणारा या कंपनीवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही? समजलेल्या माहितीनुसार ही कंपनी एलआयसी सोबत सलग्न करण्यात आली होती. सामान्य माणसाला किरकोळ आर्थिक व्यवहार करतांना देखील आधारकार्ड, पॅनकार्ड विचारले जाते. मग एलआयसीने या कंपनीची कोणती कायदेशीर बाजू तपासली असावी?

आपले शेकडोच्या संख्येने एजंट असतांना एकाच एजंटला लाखोच्या रक्कमेच्या पॉलिसी कशा मिळतात, यात काही गडबड तर नाही ना? अशी शंका एलआयसीला का आली नाही? किंवा एलआयसी कंपनीतील कोणी अधिकारी व यंत्रणा राजेंद्र बंब यांच्या कारनाम्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहे काय? याचाही तपास व्हायला हवा. राजेंद्र बंब हा आपल्याकडील गडगंज पैशांचा उपयोग भीशीच्या व्यवसायासाठी करीत असल्याचे उघडपणे बोलले जाते. मग त्याच्यासोबत भिशी लावणारे हे महाभाग कोण? कुणाच्या काळ्या पैशांना ‘व्हाईट’ करुन देण्याचाही प्रकार होतोय का? बंबच्या मागे आणखी कोणी शक्ती कार्यरत आहे काय? अशा वेगवेगळ्या बाजूंनी तपास होणे आवश्यक आहे.

अर्ध्याहून अधिक धुळे राजेंद्र बंबकडून कर्जाचे लाभार्थी आहेत, निवडणुकीतही तो पैसा पुरवितो. अशी उघड चर्चा होत असतांना वास्तविक पोलिसांच्या गोपनीय शाखेला कधीच शंका यायला हवी होती, असो.. कदाचित ते तक्रारदाराची वाट बघत असावेत. पण आता तक्रारदारही मिळालाय् आणि पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्यासह खमक्या अधिकार्‍यांची टिमही जुळून आली. हातोडा घातलाच आहे तर आता माघार नसावी. यानिमित्ताने अवैध सावकारीचे कायमचे कंबरडे मोडले जावे. कारण यामुळे असंख्य कुटुंबांची वाताहत झाली आहे. अनेकांनी आत्महत्या केल्यात, तर काही हे शहर सोडून निघून गेलेत. या शहराला दुरुस्त करायचे असेल तर केवळ प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. आता नागरिकांनाही समोर यावे लागले. आपल्याला लुटणारे, धमकावणारे, मजबुरीचा फायदा घेणारे, आयाबहिणींनवर वाईट नजर ठेवणारे आणि अवैध व अनैतीक कृत्यांनी या शहराला बदनाम करणार्‍यांची नावे सांगावीच लागेल, त्याशिवाय धुळ्यावर लागलेला बदनामीचा धब्बा फुसला जाणार नाही. पुन्हा या शहरात येवून कुणी रामा स्वामी धुळेकरांना लुटणार नाही, पुन्हा भास्कर वाघ जन्माला येणार नाही पुन्हा कुठला राजेंद्र बंब गरजवंतांचा दाता म्हणून अवैध मार्गाने गब्बर होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. या प्रकरणाचे बिंग फुटल्यामुळे लॉकरमध्ये दडलेल्या अनेक मालमत्तांच्या कागदपत्रांना आता मोकळा श्वास घेता येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

पेपर विक्रेत्याचा थक्क करणारा प्रवास

जुने धुळ्यात राहणारा आणि शहरातील गल्लीबोळात पेपर विक्रीचे काम करणारा राजेंद्र बंब अनेकांनी पाहिला आहे. या गोष्टीला फार वर्षे उलटलेली नाहीत. ही काही इतिहासकालीन घटना नाही, तर अवघ्या दहा वर्षापुर्वीचा राजेंद्र बंब कोट्याधीश झाला कसा? विमा एजंट शेकडोच्या संख्येने आहेत, मग हाच एकटा इतका गब्बर झाला कसा? हा प्रवास थक्क करणारा आहे.

यासाठीच खटाटोप..

धुळ्यात काही घडू शकते असे म्हटले जाते, दुर्दैवाने अनेक वाईट घटनांबाबत धुळे राज्यासाठी पायलट ठरले. या चुकीच्या गोष्ठी या शहराची सर्वदूर बदनामी करणार्‍या ठरत आहेत. धुळ्यात गुन्हेगारी, गुंडगीरी जास्त आहे. चांगले व्यवसाय, उद्योग टिकू देत नाहीत, चांगल्या अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी अथवा काही मंडळी मुक्तपणे काम करु देत नाही, पोलीस कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असतो अशा एक ना अनेक गोष्टी पसरविल्या गेल्यामुळे धुळे बदनाम झाले आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. बदलून जाणारा अधिकारी या शहराचे चांगल्या अर्थाने नाव घेवून जातो इतकी इथली सामान्य जनता खरोखर चांगली आहे. आपण व्यक्तीगत कुणाच्या विरोधात नाही, कुणाशी वैर असण्याचे कारण नाही. मात्र वर्षान वर्ष धुळे शहराची खुंटलेली प्रगती, गुन्हेगारी व बेरोजगारीचा शहरावर लागलेला कलंक धुतला जावा, चांगले अधिकारी या जिल्ह्यात यावेत, व्यावसायीक, उद्योजकांना धुळ्याची वाट सापडावी, धुळेकर वाईट नाहीत हा विश्वास निर्माण व्हावा यासाठीच हा सारा लिखाणाचा खटाटोप.

पोलीस प्रशासनाच्या कामगिरीला सॅल्यूट

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.बी.जी. शेखरपाटील यांनी जिल्हा पोलीस यंत्रणेचे धुळ्यात येवून विशेष कौतुक केले. अर्थात ही कामगीरी कौतुक करण्यासारखीच आहे. पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे व ईश्वर कातकाडे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरिक्षक हेमंत पाटील, आर्थिक गुन्हे शाखेचे हेमंत बेंडाळे, उपनिरिक्षक हर्षवर्धन यांच्यासह सहकारी संस्था उपनिबंधक मनोज चौधरी, सहकार अधिकारी राजेंद्र विरकर आणि या कारवाईत सहभागी झालेल्या सगळ्याच पथकांचे करावे तेव्हढे कौतुक थोडे आहे. पोलीस प्रशासनाने यानिमित्ताने खाकीचा विश्वास वाढविला असून त्यांच्या या कामगिरीला सॅल्यूट केलाच पाहिजे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com