वाढणारे मुल... हरवणार्‍या आनंदवाटा !

मुल जेव्हा भिंतीवर चित्र काढते, तेव्हा त्याच्या मनात असलेला विचार व्यक्त करीत असते. त्याचे चित्रातील रंग भरणे, रेखाटणे, आकार काढणे म्हणजे मनातील भावभावनाचे दर्शन असते. त्यात लपलेल्या भावना आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही?...... संदीप वाकचौरे यांच्या ‘शिक्षण भवताल’ या ब्लॉग मालिकेतील तिसरा भाग.
वाढणारे मुल... हरवणार्‍या आनंदवाटा !

त्या दिवशी मित्राच्या घराच्या भिंतीवर लहान बाळ चित्र काढत होते. त्याने त्या भिंतीवर त्यांच्या मनात लपलेल्या भावनांचे सुंदर चित्र ऱेखाटले होते. त्याचे मनातील ते प्रतिबिंब होते. त्या चित्राकडे पाहाण्याचे सौंदर्य त्याच्या नजरेत होते आणि मोठ्यांंच्या नजरेत मात्र त्यातील सौंदर्यच अधोरेखित झाले नव्हते. कारण त्यात काय गोलगोल, रेषा, आडवे तिडवे असे काही तरी होते. त्यामुळे त्या चित्राने भिंती खराब होतात. भिंती खराब होतात म्हणून पप्पांनी जोरदार फटका दिला आणि भिंत परत पुन्हा खराब करायची नाही, असे रागावून सांगितले. मुल चित्र काढते हा आऩंद.

चित्र म्हणजे अभिव्यक्ती असते. मुलांचे चित्र म्हणजे सर्जनशीलतेसाठी मोकळे आकाश असते. चित्रातून ते अक्षऱ आणि शब्दाशिवाय व्यक्त होत असते. ते व्यक्त होणे शब्दांच्या सोबतीने व्यवहारात रमलेल्या मोठ्यांना नाही कळणार. बालपण विसरून लहानांना समजावून न घेता, मोठ्यांच्या नजरेने पाहाण्याचा प्रयत्न केला तर भिंती खराब होणारच आणि त्या चित्रातील मुलांच्या दृष्टीने दडलेले सौंदर्य दिसणार नाही. त्यासाठी स्वतःतील बालपण जोपासायला हवे.

मुल जेव्हा काही करत असते तेव्हा ते समाजवून घ्यावे लागते.अगदी लहान वयात मुल जे काही गिरवत असते ती देखील अभिव्यक्ती असते. ते त्याचे लिहिणेच असते. आपल्यात लपलेल्या मोठ्या व्यक्तीसाठी ते कागद खराब करणे असते, भिंती खराब करणे असते. कधीतरी त्या मुलांशी संवाद करून पाहायला हवा. त्यांने जे गिरगिटले आहे ते त्याला वाचायला लावले तरी ते वाचत असते. आपण मोठे होऊन आणि पुस्तकेच्या पुस्तके शिकूनही आपण ते वाचू शकत नाही ते मुल मात्र शाळेत न जाता देखील वाचत असते. कारण ते गिरगिटणे ही त्याची अभिव्यक्ती असते. तेथूनच त्याचे शिकणे सुरू झालेले असते. मुले जे काही करीत असते ते शिकणेच असते.

मुल जेव्हा भिंतीवर चित्र काढते, तेव्हा त्याच्या मनात असलेला विचार व्यक्त करीत असते. त्याचे चित्रातील रंग भरणे, रेखाटणे, आकार काढणे म्हणजे मनातील भावभावनाचे दर्शन असते. त्यात लपलेल्या भावना आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही? मुळता त्या चित्रात लपलेल्या भावना वाचता आल्या, तर मुलांच्या कल्पनाशक्तीला बहर येतो.त्या चित्रासंबंधी मुलांशी गप्पा मारल्या, तर सर्जनशीलता बहरत जाते.

या माध्यमातून व्यक्त होणे मुक्त असते. मात्र त्याचवेळी शाळेत, घरी सांगून काढलेले चित्रात त्याचा आऩंद असेलच असे नाही. त्यामुळे मुक्त रेखाटणे आणि शाळेतून सांगितलेले रेखाटणे यात कितीतरी फरक असतो. दोन्ही चित्र सारखी असली तरी त्यातील भावनाचे दर्शन मात्र भिन्न असणार हे निश्चित.

या वयात मुल ज्या पध्दतीने शिकत जाते तेथे आपण त्याच्या प्रेरणा मारत जातो.त्याला एका चौकटीत बांधायचा प्रयत्न करतो.फुल, सूर्य, झाड, पक्षी असे नाही असे काढायचे असते, असे सांगून त्याच्या विचारांच्या भरारीला प्रतिबंध घातला जातो. त्यामुळे पक्षी म्हणजे गणितातील चारचा अंक असतो.

सरस्वतती काढणे म्हणजे चार अंक एकमेकाला जोडणे असते. त्यापेक्षा वेगळी सरस्वती असत नाही का? पण त्याच त्याच पध्दतीने पुढे जावे म्हणून केलेला प्रयत्न मुलांच्या नव विचारप्रक्रिया धक्का देणारे ठरते. त्यामुळे त्यातील भरारी मारण्याचे बळ थांबते.

मुलांनी काढलेले चित्रात त्यांच्या मनातील विचार डोकावत असतात. एकदा एका मुलांने काढलेल्या चित्रात आई आणि बाबांना कान काढले नव्हते. खरच असे बिना कानाचे आईबाबा असतात का..? पण मुलांने चित्र काढले होते. बहुतेक कान काढण्याचे विसरला असावा असे सरांना वाटले. म्हणून सरांनी त्या चित्राला कान काढले तर मुल म्हणाले सर,कान नका काढू. त्यांना कानच नाही . अरे मी पाहिले आहे, त्यांना कान आहे...पण सर त्यांना दिसायला कान आहेत पण ते त्या कानाचा उपयोग करीत नाही ना! मग ते कशाला काढायचे त्यांना कान? मुलं किती विचार करतात? मात्र ते त्यांना सांगता येत नसले, तरी ते वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतात. आता त्या न काढलेल्या कानामागे त्याने पालकांना दिलेला संदेश होता.

विद्यार्थी वर्गात जेव्हा शाळेचे चित्र काढतात तेव्हा छडी असलेले शिक्षक काढतात. तेव्हा त्यांच्या मनात शिक्षकाची असलेली प्रतिमा अधोरेखित झालेली असते. त्यामुळे मुलांना व्यक्त होऊ दे. त्यांचे व्यक्त होणे अवतीभोवती घडणार्‍या घटनांचा विचार प्रतिबिंबीत झालेला असतो. भिंती खराब झाल्या तरी चालतील पण त्यांच्यात लपलेल्या भावनांना मुक्त वाट मिळू दे. वर्तमानात मुल खराब झाले तरी चालेल, पण भिंत खराब होण्यापासून वाचवत भिंतीना वाचवत असतो. आपल्याला काय हवे आहे हे एकदा ठरवायला हवे.

पालक होणे म्हणजे केवळ मम्मी पप्पा होणे नसते, तर मुलांच्या प्रत्येक कृतीतील असणारा संदेश, लपलेला विचार जाणणे असते.त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी चार भिंतीच्या आत धाडतांना त्यांना अवतीभोवतीची शिक्षणांची दारे मुक्त ठेवण्याचा विचार करायला हवा. कोरोनाने ती संधी मुलांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांना त्या संधीचे सोने करता येईल असे वातावरण निर्माण करायला हवे. अन्यथा मुल वाढत जाते आणि सर्जनशीलता हरवत जाते. त्यामुळे भविष्यातील आनंदाच्या वाटा हरवून बसतो...काय करायचे ते एकदा ठरवूया !

- संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षक तथा शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com