पोरखेळ

 पोरखेळ

परवाच्या दिवशी संध्याकाळी घरी येतांना कोपर्‍यावर असलेल्या मैदानापाशी क्षणभर थबकले! 2-2॥ वर्षे करोना व नंतर अतिवृष्टीमुळे गेले अनेक महिने मैदान मोकळे, निर्मनुष्य, ओसाड असायचे. पण आज मैदानात गल्लीतील क्रिकेट जोशात, जोरात सुरू होते.

मैथिली गोखले

13-14 वर्षांची मुले बॅट व रबरी बॉलसह खेळत होते. एका फळीची यष्टी होती. पलिकडे मोठे दगड ठेवले होते. फलंदाज सचिनच्या आवेशात बॅट फिरवत होता. लांब बॉल गेल्यावर, चौकाराचा जल्लोष होता. इतर मुले ओरडत होती. आनंदात खेळ चालला होता. हे काही विशेष नाही, विशेष गोष्ट पुढेच होती. मैदानाच्या एका बाजूला असलेल्या दगडी कठड्याजवळ 2-3 वृद्ध पुरुष, 65-70चे असावे. वेशभूषेवरून सुशिक्षित. असे उभे होते. ते तिघेही मन लावून मुलांचा खेळ पहात होते. एखादी आनंदाची घटना घडली, कोणी आऊट झाला किंवा चौकार गेला की, मुलांच्या बरोबरीने ते देखील ओरडत होते. हात वर करून टाळ्या वाजवत होते. एकमेकांशी आनंद शेअर करत होते.

हे पाहून मला आंनंदमिश्रीत आश्चर्य वाटले. अगदी खरं सांगायचे तर त्या खेळाला ‘क्रिकेट’ म्हणणे धाडसाचे ठरले असते. निव्वळ पोरखेड होता तो!

हा प्रसंग मला भूतकाळात घेऊन गेला. फार जुनी गोष्ट नाही सांगत. 1/2 वर्षे झाली असतील. पुण्याला आमचे सर्व कुटुंबिय एका समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो. 20-25 जण होते. फॅमिली गेटटुगेदर जेवणखाण झाल्यानंतर गप्पा टप्पा झाल्या. तेवढ्यात कुणीतरी टूम काढली, ‘ए, वाजव रे गाणी....’ डीजे लावून तरुण मंडळींचा डान्स सुरू झाला. मस्त सगळी मंडळी नाचत होती, खिदळत होती. तेवढ्यात कुणीतरी जुने मराठी गाणे लावले. ‘येऊ कशी कशी मी नांदायला?’ काकू-मामी, आत्या यांना आग्रह झाला की तुम्ही पण नाचायला या. सगळ्या एकमेकींना आग्रह करत होत्या. सर्वच मध्यमवयीन जाड्या-जुड्या!. पण अचानक आमच्या कमलाकाकू उठल्या. वय वर्षे 70, आणि मस्त साडी वर खोचून आपल्या जाडेपणाकडे दुर्लक्ष करून तालावर थिरकू लागल्या. सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली. काही जण हसत होते. काही स्त्रिया उपहासाने देखील हसत असाव्यात! पण काकू आनंदाने ताल धरून नाचत होत्या. आनंदात होत्या.

क्रिकेट बघणार्‍या काकांनी व आमच्या कमलाकाकूंनी आपापला आनंद शोधला होता. काय हरकत आहे. कधीतरी ‘लहान मूल’व्हायला!

बी.ए. ला असतांना मानसशास्त्र ह्या विषयात लहान मूल कसे शिकते? हे अभ्यासात असते.

‘एखादी वस्तू दिसल्यावर मेंदूतील जोडण्या एकमेकांना जोडल्या जातात व पूर्व अनुभवावरून कल्पना चित्र तयार होते’ ... अशा शास्त्रीय माहितीच्या खोलात मी जाणार नाही. पण हे मात्र नक्की, की मूल अनुकरणातून शिकते. सभोवताली घडणार्‍या गोष्टीतून शिकते. आपल्या भावना गरजा नि संकोच व्यक्त करते.

‘भूक लागली की रडते’.... ‘आनंद झाला की हसते, टाळ्या वाजवते’ ‘एखादी गोष्ट आवडली की ओढून घेते’ आपली आहे का दुसर्‍याची ह्याची जाणीव त्याला नसते. शिस्त-आपपर भाव- संकोच, संकेत.... ह्या गोष्टी त्याला लहानपणी माहिती नसतात.

पुढे हळूहळू व्यक्ती मोठी झाली की, शाळा-कॉलेजमध्ये गेल्यावर अनेक गोष्टी समजायला लागतात. असे करायचे नसते, हे चांगले नाही. समाज भान, कायदा ह्या सर्वांची ओळख होते व हळूहळू ‘लहान मूल’ कुठेतरी आत लपून बसते. प्रतिष्ठेची, शिक्षणाची झूल अंगावर चढते.

‘मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे मी कसा नाचू?’

‘मी कंपनीचा मॅनेजर आहे, मी मोठ्याने टाळ्या वाजवून टिळा लावून आरत्या कशा म्हणू?’

‘मी मुख्याध्यापिका आहे, मी त्यांच्याबरोबर कशी जाऊ?

असे प्रश्न त्रास देऊ लागतात. लोकलज्जेचा देखील पगडा असतोच. पण, म्हणूनच आपण ह्या नेहमीच्या कामाच्या, पदाच्या ओझ्यातून बाहेर पडून, लहानपण अनुभवले पाहिजे. पूर्वीच्या काळी सणवार, समारंभ, उत्सव ह्या साठीच साजरे करण्याची पद्धत रुढ झाली असावी. देवदेवतांच्या मिरवणुका, पालखी, वारी, मंगळागौरीचे खेळ ही त्याचीच रुपे आहेत. शारीरिक ऊर्जा, खर्च करून मन आनंदाने भरून घेणे!

लहान वयात ताण, तणाव, ब्लडप्रेशर ह्यांचा त्रास नसतो. कारण रोजच्या रोज खेळणे, हुंदडणे, बागडणे, हसणे, धावणे, पळणे सुरू असते. पण नोकरी, उद्योगधंदे सुरू झाले की, हे सर्व थांबते. मग डॉक्टरांना,

‘1 तास निसर्गाच्या सान्निध्यात जा’

‘हास्य क्लब नियमित सुरू ठेवा’

‘अर्धा तास माशांचे निरीक्षण करा. प्राण्यांशी खेळा’

असे सल्ले द्यावे लागतात. असं निरीक्षणाअंती सिद्ध झाले आहे की, ज्या घरातील आजी-आजोबा नातवंडासमवेत असतात त्यांना बी.पी. मानसिक आजार कमी होतात. कारण ‘बालपण’ आपल्या अवती भवती असते ना!

तेव्हा आज बालदिनाच्या निमित्ताने असाच छान निश्चय करू या. एखाद्या पी.जे. जोकवर हसावेसे वाटले तर जरूर हसा.एखादी छान साडी नेसल्यावर आरशासमोर पाहून मस्त गिरकी घ्यावी वाटली तरी आपल्या आवडत्या गाण्याची तान भसाड्या आवाजात बिनधास्त टी.व्ही. स्टार नाहीतर बाथरूम सिंगर बना.

छोट्या दोस्तांबरोबर छोटे व्हा..

बालदिनाच्या शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com