Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगकलगीतुरा

कलगीतुरा

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

डफावरती थाप माझा हा

झांज तुणतुण्याचा

- Advertisement -

महाराष्ट्रातल्या मानकर्‍या

घेई मुजरा शाहिराचा

हा आवाज ऐकला आणि श्रद्धा म्हणाली, हा शाहिराचा आवाज. संजय म्हणाला हो, पण हा लोककलेचा कलगीतुरा आहे. चला तिथे जाऊन ऐकूया. ते आले तेव्हा शाहीर म्हणत होते…

ओम नमो शिवा शिवा

आदि गण गणपती देवा

नाचत यावा रणी

या अंगणा

संजय मुलांना सांगू लागला कलगीतुर्‍यात प्रथम असे वंदन केले जाते.

महाराष्ट्रातील तमाशा सादर करणार्‍यांचे दोन संप्रदाय म्हणजे कलगीवाले आणि तुरेवाले. कलगी शब्द हा तुर्की तर तुरा हा अरबी भाषेचा आणि दोन्ही पारसी भाषेत जसेच्या तसे आढळतात. तिथूनच हे मराठीत आले. कलगी म्हणजे माया किंवा प्रकृती आणि तुरा म्हणजे ब्रह्म किंवा पुरुष असा त्यांचा आध्यात्मक अर्थ. कलगी (गजरा) व तुरा ही या दोन संप्रदायांची बोधचिन्हे ठरली आहेत. कलगीवाल्यांना ‘नागेश’ तर तुरेवाल्यांना ‘हरदास’ म्हणतात.

सन्मानाने पागोट्यात लावण्याचा एक अलंकार म्हणजे कलगी आणि तुरा होय. शाहिरी प्रकारात कलगी तुरा या परंपरेला वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. लोककलांच्या माध्यमातून हे लोकाभिमुख झाले आहे. अध्यात्म आणि लोकतत्त्व समजून घेणे, परंपरेचा विकास करणे आणि त्याचे शास्त्रीय सादरीकरण करणे म्हणजे कलगी-तुरा. लोकसाहित्य कलगी-तुरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिकांचा, रूपकांचा, मिथकांचा समावेश यात करण्यात येतो.

या लोककला प्रकारांमध्ये साथीदार, डफ, हार्मोनियम, टाळ याबरोबरच तुणतुणे हे तंतुवाद्य वापरले जाते. हातात धरणेइतक्या जाड असलेले दोन-अडीच फूट लांबीच्या बांबूची काठी हातात घेऊन तिच्या तळाशी एक पोकळ लाकडी नळकांडे बसवलेले असते. कातड्याच्या मध्यापासून ते बांबूच्या काठीच्या वरच्या टोकापर्यंत एक तार खेचून बसवतात आणि बांबूत खोचलेल्या छोट्याशा खुंटीत ती बांधतात. हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हातातील एक बारीक पातळ पण टणक अशा लाकडी काटकीने तार छेडून वाजवले जाते.

कलगीतुरा हा दोन पक्षातील झगडा असतो. कलगी म्हणजे तुळशीच्या मंजिरीसारखा किंवा मोराच्या तुर्‍यासारखा ताठ उभा राहणारा तुरा आणि तुरा म्हणजे मक्याच्या कणसातील केसासारखा किंवा पगडीच्या झिरमिळ्यासारखा खाली लोंबणारा तुरा. कलगीवाल्यांचे निशाण भगवे आणि जरीपटक्याचे असते, तुरेवाल्यांचे पांढरे वा हिरवे. कलगीवाले हे प्रकृतीवादी वा शक्तीवादी आणि तुरेवाले हे पुरुषवादी आणि शिववादी म्हणून समजले जाताि. म्हणजेच कलगीवाले शक्तीचे उपासक असतात तर तुरेवाले शिवाचे उपासक असतात. कलगीतुर्‍याचा झगडा कित्येकदा पाच-सहा रात्री चालतो, यातील सवाल-जवाब अध्यात्मिक विषयावरच असतात असे नाही. सवाल-जवाब, लावण्या भेदतच जातात या प्रकारच्या अगणित लावण्या महाराष्ट्राच्या खेडोपाडी रचल्या गेल्या आहेत असे म्हणतात. यातील केवळ पाच-पंचवीस पट्ठे बापूराव आणि शाहीर हैबती यांच्या संग्रहात प्रकाशित झाल्या आहेत.

‘शाहीरश्रेष्ठ’ व ‘कलगीसम्राट’ या नावाने परिचित असलेले हैबती बुवा 1794 ते 1854 याकाळात म्हणजे पेशवाईच्या उत्तरकाळातील होते. पंढरपूरच्या वारीस जाताना तमाशातील स्त्री जातीची विटंबना पाहून त्यांनी तमाशाचे शृंगारिक रूप बदलून तमाशा अध्यात्मिक करमणुकीचा प्रकार करावा असे ठरवले आणि तमाशाचा परंपरागत ढाचा कायम ठेवून तमाशाचे स्वरूप बदलले. अध्यात्म, शृंगार आणि त्यातून लोकरंजन हे या नव्या तमाशाचे विशेष होते.

तमाशात पदे, गण, लावण्या, कटाव, फटके, साक्या, चित्रपटातील आख्याने अशी विविध प्रकारची काव्यरचना दिसून येते. सवाल-जवाबाचे तंत्र तसेच त्यातील गूढ व त्यांची उकल करण्याची पद्धत प्रामुख्याने शाहिरांमध्ये दिसून येते.

लोकरंजन करताना कलावंतांनी उच्च नैतिक मूल्ये पाळली पाहिजे. अध्यात्म शाहिरांचा पाया आहे. शाहिरांनी शृंगार रसपूर्ण वाङ्मयाची निर्मिती तर केलीच पण तरीही गूढ अशा ओढीने शाहीरही झपाटले गेले आणि शाहिरी रचायला सुरुवात केली.

मराठी संत कवींच्या काव्यातदेखील अशी वर्णने खूप सापडतात. अध्यात्मिक, मराठी शाहिरी, कविता, भेदिक कविता कलगी-तुरा, डफगाणे अशा नावांनी हा रचना प्रकार ओळखला जातो. अध्यात्मातील अनेक गुढांची, कुटांची उकल करून त्यातील भेद उलगडून दाखवणारी ती भेदिक कविता असे म्हणता येईल. डफगाणे हे संबोधन या कवितेचे बाह्यस्वरूप, प्रायोगिक स्वरूप स्पष्ट करणारे आहे.

तमाशाच्या फडावर दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकतात व रात्रभर त्यांचे सवाल-जवाब होतात. कलगीवाल्यांनी सवालाची लावणी म्हणायची तर तुरेवाल्यांनी जवाबाची लावणी म्हणून शेवटी कलगीवाल्यांना प्रतिसवाल करायचा. या स्पर्धेत जो हारेल त्याचे निशाण व डफ दुसर्‍या पक्षाने हिसकावून घ्यायचे.

सवाल-जवाबाच्या या कवणाला ‘भेदिक’ म्हणतात. भेद म्हणजे रहस्य किंवा प्रतिपक्षाचा भेद करणारी अशी कवने असल्याने त्यांना भेदिक कवने अशी संज्ञा आहे. अर्थात, प्रकृती पुरुषांच्या रहस्यविषयी ज्यात प्रश्न-उत्तरे असतात ते ‘भेदिक’ होय. ‘प्रकृती श्रेष्ठ’ की ‘पुरुष श्रेष्ठ’ किंवा ‘शक्ती श्रेष्ठ’ की ‘शिव श्रेष्ठ’ अशा भेदकांची कवने निर्माण झालेली असतात. कलगीवाले शक्तीला श्रेष्ठत्व देतात तर तुरेवाले शिवाचे श्रेष्ठत्व प्रतिपादितात.

जीवनमूल्य हरवले की लोक अस्वस्थ होतात. तसेच मूल्य जपण्याचे काम पूर्वी लोककलेतून होत होते. लोककला जगण्याचे मूल्य शिकवतात. कलगी-तुरा समाजप्रबोधनाचे काम करते.

गावोगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रांमधील कलगी-तुर्‍यांकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पारंपरिक शाहिरी कला संकटात सापडली आहे. मुलांनो, तिला आपण जोपासून जीवनदान देण्याचे काम केले पाहिजे. म्हणूनच सर्व कलांबरोबर हीसुद्धा कला तुम्ही जोपासली पाहिजे.

आता चला मुलांनो पुढच्या कलेकडे.

- Advertisment -

ताज्या बातम्या