जेम्स टाऊन व्हाया मार्टिन लूथर...

जेम्स टाऊन ही वसाहत अमेरिकेच्या निर्मितीची नांदी होती. जेम्स टाऊनपर्यंतचा इंग्लंडचा प्रवासाचा आरंभबिंदू हा मार्टिन लूथरप्रणित धर्मक्रांतीत होता. प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
जेम्स टाऊन व्हाया मार्टिन लूथर...

मार्टिन लूथर या जर्मन प्राध्यापक व धर्मगुरूने युरोपिअन धर्मक्रांतीचा उद्घोष केला. सन १५१७ मध्ये लूथरने धर्मसुधारणांचा जाहिरनामा प्रसिद्ध करून,युरोपातील प्रबोधन कालखंडाचा नारळ फोडला. पोप व चर्च यांच्या दमनकारी सत्तेला त्यानं दिलेल्या आव्हानामुळे युरोपचे भाग्य सर्वाथानं बदलेले.

मार्टिन लूथर ना तत्त्वज्ञ होता ,ना धर्मपंडित, तरी त्याच्या धर्मसुधारणांच्या विचारांचा प्रभाव अखंड युरोपवर पडला. कॉल्विनसारख्या अनेक धर्मसुधारकांनी लूथरकडून प्रेरणा घेतली. प्रोटेस्टेंट ख्रिश्चन या नव्या ख्रिश्चन पंथाचे जनकत्व लूथरकडेच जाते. सनातनी व सुधारक ख्रिश्चनांची विभागणी अनक्रमे कॅथोलीक व प्रोटेस्टेंट अशी झाली. मार्टिन लूथरची ही धर्मक्रांती आजच्या अमेरिकेच्या निर्मितीतील एक प्रमुख कारणांपैकी एक आहे. युरोपातील ईतर राजसत्तांपेक्षा इंग्लंडच्या राजसत्तेने धर्मक्रांतीचा नेमका लाभ उठवला. इंग्लंडमधील धर्मक्रांतीला पेटवण्याचे काम धार्मिक नेत्यांपेक्षा तेथील सम्राटांनीच केले. सन १४८५ मध्ये हेन्री सप्तमच्या रूपाने टयुडोर वंशांची सत्ता इंग्लंडवर स्थापन झाली. हेन्रीसारख्या अत्यंत धोरणी राजाने धर्मक्रांतीत पोप आणि चर्च यांच्या कब्जातून राजसत्तेला कायमचे मुक्त करण्याची संधी शोधली. इंग्लंडमध्ये सुव्यवस्थित शासन व सुख-शांती प्रस्थापित करण्याचे श्रेय हेन्रीच्या टयुडोर राजवंशालाच जाते.

पोप-चर्च यांच्या अमर्याद सत्तेसमोर युरोपातील सर्वच राजसत्ता नाममात्र होत्या. मध्ययुगीन काळात युरोपच्या साठ टक्कांपेक्षा अधिक भूमी व संपत्ती चर्चच्या मालकीची होती. हेन्रीपासून एलिझाबेथ प्रथमच्या कार्यकाळापर्यंत इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी पोप व चर्च यांच्या सत्तेला अत्यंत सफाईने निष्प्रभ केले. सन १५५८ मध्ये प्रारंभ एलिझाबेथ प्रथमच्या शासनकाळात इंग्लंडसाठी स्वतंत्र चर्चच्या स्थापनेचे काम पूर्णत्वास गेले. यामुळे व्हॅटिकनच्या सार्वभौम सत्तेतून इंग्लंडची धर्मव्यवस्था मुक्त करण्यात आली. तसेच ती राजसत्तेच्या अंकित झाली. व्हॅटिकनशी इंग्लंडच्या राजसत्तेचा संबंध आता नाममात्र झाला होता. इंग्लंड एका अर्थाने प्रोटेस्टेंट पंथाचे व्हॅटिकन बनले.

सन १५५८ ते १६०३ हा इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ प्रथमचा शासनकाळ या देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण पानच म्हणता येईल. योग्यता,निर्भयता आणि राजकीय कुटनीती यात ही महाराणी अद्वितीय होती. अशा महत्वाकांक्षी महाराणीला स्पेनचे सागरी साम्राज्य मान्य करणे अशक्य होते. अतिशय नियोजनपूर्वक व मंदगतीने पावलं उचलत, तीने इंग्लंडची नावीक शक्ती वाढवली. सन १५८८ मध्ये इंग्लंडच्या आरमाराने स्पेनच्या जहाजांचा ताफा नष्ट केला. अमेरिकेच्या दक्षिण खंडावर तोपर्यंत दोनशे स्पॅनिश वसाहती स्थापन करणा-या आणि महासागरावर अर्निबंध सत्ता प्रस्थापित केलेल्या स्पेनसाठी हा मोठा झटका होता. इंग्लंडच्या आरमारानं स्पेनचा अहंकार आणि एकछत्री सागरी अंमल यामुळे संपुष्टात आणला. जगातील सर्व सागरी मार्ग या विजयाने इंग्लंडसाठी खुले झाले. इंग्लंडच्या नौका निर्भयपणे महासागरांवर विहार करू लागल्या. या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेच्या सोळा वर्ष आधीपासून हॉकिन्स आणि ड्रेक यांच्यासारख्या इंग्रज दर्यावर्दीनीं स्पेनला आव्हान देण्यास प्रारंभ केला होता.

हॉकिन्स याने स्पेनच्या व्यापारी नियमांना धाब्यावर बसवले. त्याने अफ्रिकेतून नीग्रो गुलाम आणून दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमध्ये खुलेआम विकी सुरू केली. हॉकिन्सच्या या धंदयाने स्पॅनिश अधिकारी संतप्त झालेले होते. फ्रांसिस ड्रेक त्याच्याही पुढचा निघाला. तो इंग्लंडच्या महाराणीचा अधिकृत समुद्री चाचा आणि खंडणी वसूल करणाराच होता. तो स्पेनच्या जहाजांना लूटायचा आणि दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमधून कर वसूल करायचा. अशा सर्व कमाईत महाराणीचा हिस्सा ठरलेला होता. यामुळे तिचा वरदहस्त ड्रेकला लाभलेला होता. सन १५७८ मध्ये हया ड्रेकने समुद्रवरŠन पृथ्वी प्रदक्षिणा घातली आणि सोनं-चांदी वाहून नेणा-या अनेक स्पॅनिश जहाजं लूटली. हॉकिन्स करत असलेला नीग्रो गुलामांचा अमानुष व्यापार आणि ड्रेकची दरोडेखोरी कदापि समर्थनीय नाही. मात्र सन्मान्य अपवाद वगळता, विविध स्वरूपाचे अपराध हे संपन्नता व समृद्धीचे शॉर्टकट असतात. त्यामुळे हॉकिन्स किंवा ड्रेक यांच्यासारखे अपराधी तत्कालिन इंग्लंडचे रॉबिन हूडच होते.

१५७८ मध्येच अमेरिका देशाची पायाभरणी करणारी एक अत्यंत महत्वाची घटना घडली. सर हॅम्फ्रे गिलबर्ट याला महाराणीने एक आज्ञापत्र प्रदान केले. त्यानुसार त्याने अमेरिकेच्या अशा भूभागाचा शोध लावायचा होता, जेथे कोणतीही ख्रिश्चन राजसत्ता किंवा ख्रिस्ती जमात पोहचलेली नसेल. आज्ञपत्रानुसार १५८३ मध्ये गिलबर्टने न्यू फौंडलंडमध्ये वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले,एवढेच काय तर स्वतःचा प्राणही गमवावा लागला. त्याच्या पश्चात आज्ञापत्राचा अधिकार त्याचा सावत्र भाऊ वॉल्टर रॅले याला प्राप्त झाले.

वॉल्टर रॅले हा साहित्यिक, राजकारणी व दर्यावर्दी म्हणून जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. इंग्लंडमधील तंबाखू वापराचे प्रमाण वाढविण्याचे श्रेय देखील या वॉल्टरलाच जाते. दक्षिण व मध्य अमेरिकेच्या त्याने अनेक सफरी केल्या होत्या. १५८४ मध्ये तो उत्तर अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना किनारपट्टीपर्यत पोहचून माघारी आला. परतल्यावर या भूमीचे अत्यंत रसभरीत वर्णन केले. ही भूमी महाराणीच्या आदेशानुसार ख्रिश्चन धर्मापासून अस्पर्श अशी आहे. अशी माहिती देखील दिली. म्हणून तिचे नामकरण व्हर्जिनीया असे करण्यात आले. भविष्यात व्हर्जिनीयाची भूमी अमेरिका या राष्ट्राची जन्मभूमी ठरली. वॉल्टर रॅलेमुळे इंग्लंडवासीयांची या भूमीविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सुख-समृद्धी प्राप्तीसाठी ही भूमी त्यांना ड्रिम लँड वाटू लागली.

वॉल्टरकडून अमेरिकेच्या भूभागावर वसाहत करण्याची जबाबदारी, त्याचा आत्येभाऊ सर रिचर्ड ग्रॅनवील याच्याकडे आली. ग्रॅनवीलच्या नेतृत्वात १५८५ मध्ये सात जहाजांचा ताफा सुमारे शंभर लोकांसमवेत अमेरिकच्या दिशेने मार्गस्थ झाला. उत्तर कॅरोलीनाच्या बाहय तटावरील रोएनॉक बेटांवर पोहचल्यावर ग्रॅनवीलने आपल्या सोबतच्या सुमारे साठ लोकांना या बेटावरच सोडले. तेथील आदिवासी जमातींचे भय आणि उपासमार यांनी या लोकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. अखेर सुमद्री चाचा फ्रांसिस ड्रेक या लोकांच्या मदतीला पोहचला आणि त्याने त्यांची सुटका केली. १५८७ मध्ये व्हर्जिनीयाला काही लोकांचा समूह पाठविण्यात आला. परंतु व्हर्जिनीयाच्या भूमीवर स्थायी अशी वसाहत निर्माण करण्यात यश आले नाही. १६०३ मध्ये महाराणी ऐलिझाबेथ प्रथमचे निधन झाले. तिच्या निधनामुळे इंग्लंडची राजकीय परिस्थिती बदलली.

राजसत्ता टयुडोर घराण्याकडून स्टुअर्ट घराण्याकडे आली. सतराव्या शतकाचा हा पूर्वाध इंग्लंडमध्ये यादवीचा ठरला. स्टुअर्ट घराण्यातील राजे स्वच्छंद, स्वैराचारी आणि निरकुंश होऊ ईच्छित होते. परंतु टयुडोर घराण्याकडे असलेली योग्यता आणि राज्य कारभारातील कौशल्याचा त्यांच्याकडे पूर्ण अभाव होता. स्टुअर्ट घराण्यातील दोन अशाच नाकर्त्या राजांमुळे ऑलिव्हर क्रॉमवेलसारख्या हुकूमशहाचा उदय इंग्लंडच्या राजकीय क्षितीजावर अल्पकाळासाठी का होईना झाला. स्वतःचा कमकुवतपणा लपवण्यासाठी त्यांनी राजा म्हणजे दैवी शक्तीप्राप्त महान व्यक्ती असे थोतांड पसरविण्याचे काम केले. असे करण्यापेक्षा आपल्या संयमाचे व न्यायप्रियतेचे दर्शन घडवत जनता व पार्लमेंट यांना आपल्याला अनुकुल करणे अधिक उपयुक्त ठरले असते. मात्र स्टुअर्ट घरण्याच्या प्रारंभीच्या दोन्ही राजांकडे अशी योग्यता नव्हती. त्यांच्या नादानपणामुळे देश विविध दलांमध्ये व गटांमध्ये विभागला गेला. याची परिणिती अखेर गृहयुद्धात आणि अल्पकाळाच्या हुकूमशाहीत झाली. स्टुअर्ट राजे देशातंर्गत आघाडीवर अयशस्वी असले,तरी त्यांच्या काळात अमेरिकेतील ब्रिटिशांची पहिली वसाहत स्थापन झाली आणि त्यांची संख्या ही वाढत राहिली. सन १६०७ मध्ये व्हर्जिनीयामध्ये जेम्स टाऊन ही पहिली ब्रिटिश वसाहत उभी राहिली. जेम्स टाऊन ही वसाहत अमेरिकेच्या निर्मितीची नांदी होती. जेम्स टाऊनपर्यंतचा इंग्लंडचा प्रवासाचा आरंभबिंदू हा मार्टिन लूथरप्रणित धर्मक्रांतीत होता. अशा जेम्स टाऊनच्या वाताहतीचा इतिहास अत्यंत भयाण व विदारक ठरला.

_प्रा.डॉ.राहुल हांडे,

भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्य अभ्यासक आहेत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com