Thursday, April 25, 2024
Homeब्लॉग‘आयटी‘चे प्रश्न

‘आयटी‘चे प्रश्न

एकीकडे कामधंदे बंद असल्यामुळे लोकांचा रोजगार जात होता तर दुसरीकडे आयटी क्षेत्रात रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या. मात्र आज फासे उलटे पडत आहेत. अन्य क्षेत्रे स्थिरस्थावर होत असताना आयटी क्षेत्राला गळती लागली आहे. आयटी क्षेत्राने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. पण येत्या काळात आणखी हजारो नोकर्‍या जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा वेध.

योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक-स्तंभलेखक

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू खूपच आकर्षक, रंगबिरंगी असते, तर दुसरी बाजू फारशी आकर्षक नसते. आयटी क्षेत्राचीही एक बाजू खूपच आकर्षित आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा अशा चकाकणार्‍या गोष्टी या बाजूला आहेत. पण दुसरी बाजू मात्र धक्कादायक आहे. औद्योगिकरणाची लाट आली आणि भारतीय मध्यमवर्गाने त्या लाटेत प्रवाही होऊन नवनवे क्षितिज गाठले, ही आयटी क्षेत्रातून मिळालेली उपलब्धी म्हणावी लागेल. आयटी क्षेत्रामुळे भारतच नाही तर जगभरात एका समृद्ध मध्यमवर्गाचा उदय झाला, हे वास्तव आहे. करोना आयटी क्षेत्रासाठी एक संकट नव्हे तर संधी बनून आला होता. एकीकडे सर्वच क्षेत्रे डबघाईला आली होती, पण दुसरीकडे आयटी क्षेत्र मोठी झेप घेत होते. एकीकडे कामधंदे बंद असल्यामुळे लोकांचा रोजगार जात होता तर दुसरीकडे आयटी क्षेत्रात रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या.

- Advertisement -

मात्र आज फासे उलटे पडताना दिसत आहेत. अन्य क्षेत्रे स्थिरस्थावर होत असताना आयटी क्षेत्राला गळती लागली आहे. आयटी क्षेत्राने लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. मात्र आता यातील कर्मचार्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यानिमित्त या क्षेत्राचा दुसरा चेहराही समोर आला आहे.

आयटी क्षेत्रातील रोजगारकपातीचे काही परिणामही समोर यऊ लागले आहेत. बंगळुरूतील एक आयटी प्रोफेशनलने आपल्या मुलीचाच खून केला आणि नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 45 वर्षीय राहुल परमार कधीकाळी या क्षेत्रात गलेलठ्ठ पगार कमावत होते आणि राजेशाही थाटात जीवन जगत होते. मात्र मंदीच्या शक्यतेने एका झटक्यात त्यांची नोकरी गेली आणि ते बेरोजगार झाले. त्यांनी आपल्या बचतीतून आणि कर्ज काढून बिटकॉईनचा उद्योग सुरू केला. मात्र तो चालला नाही. कर्जात बुडाल्यामुळे त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले. लाखोंचे पॅकेज घेणार्‍या या आयटी प्रोफेशनलची ही कहाणी अंगावर काटा आणणारी असून या क्षेत्रात निर्माण झालेल्या आव्हानांकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे.

जगभरातील टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये आलेल्या कर्मचारी कपातीच्या लाटेची सुरुवात ट्विटर या सोशल मीडियातील दिग्गज कंपनीने केली. एलन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेताच सर्वप्रथम 50 टक्के कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. काही दिवसांनंतर फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पेरेंट कंपनी असणार्‍या ‘मेटा’नेसुद्धा प्रथमच सर्वात मोठी कर्मचारी कपात करून 11 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकले. सिक्कोने पुनर्गठन योजनेनुसार चार हजारपेक्षा अधिक म्हणजे एकूण कर्मचार्‍यांपैकी पाच टक्के कर्मचारी कपात केली आहे. यानंतर दिग्गज इ-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननेही आपल्या 10 हजार कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे. याच यादीत गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने प्रवेश केला आहे. अल्फाबेट डबघाईला आलेल्या मार्केटचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. याच यादीत मायक्रोसॉफ्ट, इंटेल, सी-गेट, स्नॅप, क्वाईनबेस, लिफ्टसहीत अशा अनेक मोठ्या, छोट्या आणि मध्यम कंपन्या आहेत ज्यांनी कर्मचारी कपात केली आहे किंवा करण्याच्या विचारात आहेत. बायजू, अ‍ॅनअ‍ॅकेडमी, झोमॅटो यांनीही नुकतीच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीमागे फंडिंगची कमतरता आणि पुनर्गठन अशी कारणे पुढे केली आहेत. 850 टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये 1 लाख 37 हजारांपेक्षा अधिक नोकर्‍या गेल्या आहेत आणि हजारो नोकर्‍या जाण्याच्या स्थितीत आहेत, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

मोठ्या टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपातीला जागतिक मंदीशी जोडले जात आहे. 2021 शी तुलना करता 2022 मध्ये आयटी कंपन्यांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिरातींमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे. कर्मचारी कपातीत केवळ दिग्गज अमेरिकन कंपन्याच नाहीत तर भारतीय मोठमोठ्या कंपन्याही सहभागी आहेत. विप्रोच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत 6.5 टक्के घट झाली आहे. एल अ‍ॅण्ड टीने पाच टक्के आणि टेक महिंद्राने जवळपास दीड टक्के कर्मचार्‍यांना कमी केले आहे. खरे तर आयटी कंपन्यांच्या उत्पन्नातील 55 ते 65 टक्के एवढा मोठा हिस्सा कर्मचार्‍यांवरच खर्च होता. कदाचित यामुळेच आर्थिक परिस्थिती मंदावल्याचे लक्षात येताच या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची कुर्‍हाड चालवली.

जगभरात सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणार्‍या क्षेत्रात आयटी क्षेत्राचा समावेश होतो. एकट्या भारतातच 50 लाखांहून अधिक लोक या क्षेत्रात काम करत आहेत. या क्षेत्रातील उलाढाल 227 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. मात्र सध्या जगभरातील मोठमोठ्या आयटी कंपन्या आणि स्टार्टअप्स मागणी घटल्याने चिंताग्रस्त आहेत. त्या आपला खर्च वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. यातूनच कर्मचारी कपातीचा पर्याय पुढे आला आहे.

अमेरिकेत सध्या वाईट परिस्थिती आहे. अनेक भारतीय कर्मचार्‍यांची अचानक कपात केली गेली असून ते अमेरिकेत फारकाळ राहू शकणार नाहीत. कारण ते एच1बी व्हिसावरच अमेरिकेत राहत आहेत. दहा-पंधरा वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करणार्‍या लोकांना आता देश सोडावा लागत आहे किंवा दुसरी नोकरी करणे भाग पडत आहे.

इतर देशांच्या सरासरी वेतनाच्या तुलनेत भारतातील सरासरी वेतन खूपच कमी आहे. सध्या भारतात सरासरी वेतन 29,400 प्रतिमहिना आहे. परंतु यामध्ये कोणताही सामायिकपणा नाही. काही उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वेतन अदा करतात, तर काही उद्येागांमध्ये वेतनमान खूपच कमी आहे. अमेरिकेचा विचार करता तेथे सरासरी वेतन 53490 डॉलर प्रतिवर्ष इतके आहे तर रशियात ते जवळपास 16616 डॉलर आहे. भारतात हा आकडा अवघा 4400 डॉलर आहे. यामुळेच अनेक लोक विदेशात नोकरी करण्यास जातात आणि भारतीय प्रतिभावंतांना, कौशल्यवान कर्मचार्‍यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देतात.

करोनाकाळात ऑनलाईन जगताचे भविष्य पाहता आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली होती. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, अनिवार्य ऑनलाईन शिक्षणामळे बायजूसारख्या शैक्षणिक कंपनीची किंवा झूम मीटिंगची करोनाकाळात गरज होती. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली गेली. मात्र आता परिस्थिती बदलल्यामुळे या कंपन्या डोईजड होत असलेले कर्मचारी कमी करताना दिसत आहेत. काही कंपन्या काहीही धोका नसतानाही कर्मचारी कपात करत आहेत.

ही आर्थिक बाजू समजून घेताना सामाजिक बाजूही पाहायला हवी. जॉब, करिअर आणि पॅकेजने नोकरी करणार्‍यांना कुटुंब, समाज आणि गावापासून दूर नेले. ज्या समाजात ते जीवन जगण्याचा विचार करतात तो केवळ आर्थिक पायावर उभा आहे. तो भावनिक, पारंपरिक किंवा पिढीजात नाहीत. साहजिकच, नोकरी गेली की त्यांचा संयम तुटतो. कारण आधीच गाव तुटलेले असते. त्यामुळे गावाकडे परतणेही त्यांच्यासाठी अवघड असते. मोबाईलपासून घर, गाडी सर्व काही ईएमआयवर चाललेले असते. या सुविधांशिवाय ते जगूच शकत नाहीत. खरेतर आपण पाश्चात्यांचे अनुकरण करायला जातो आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. याचेच ताजे उदाहरण म्हणजे आयटी क्षेत्रातील गेलेली नोकरी आहे. आपल्या मुलांना आणि तरुणांना याबाबत अगोदरच योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे. अन्यथा पुढे आपल्यालाही परिणाम भोगावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या