
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
तुम्ही मागचे दोन्ही लेख वाचले असतीलच. मागच्या लेखात सुचवल्याप्रमाणे तुम्ही खेळाचे दोन टप्पे यशस्वीपणे गाठले असणार! आता आपण खेळाच्या तिसर्या टप्प्याकडे जाऊया! खेळाच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही स्वतः तुमच्या आवडी लिहिल्यात. दुसर्या टप्प्यात तुमच्या आईने तुम्हाला आवडणार्या गोष्टी लिहिल्यात. आता तिसर्या टप्प्यात पाहूया.
एका कागदावर सहा सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळात तुमचे नाव लिहा आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीत रुची (आवड) आहे ते वर्तुळाच्या बाहेर लिहायला सांगा. आता मात्र तुमच्या बाबांची मजा येईल, कारण तुमच्या बाबांना तुमच्या आवडींविषयी लिहिताना नक्कीच विचार करावा लागेल. बरे का! कदाचित नेहमी ऑफिस, मीटिंग यात बिझी असणार्या बाबांना, आठ दिवसांत तुम्हाला आवडणार्या गोष्टी लिहायला सांगितल्यावर तुमच्या बाबांची प्रतिक्रिया काय होती! तीही नोंद करून ठेवा. तुमच्या आवडी शोधून लिहिताना तुमच्या बाबांनी तुमचे आठ दिवस कसे निरीक्षण केले किंवा तुमच्याबरोबर कशा पद्धतीने वेळ काढून गप्पा केल्यात किंवा खेळ खेळलेत का? याचे सूक्ष्म निरीक्षणही करून त्याचीही नोंद करून ठेवा आणि हो, तुमचा व तुमच्या आईचा आवड लिहिलेला कागद आपला पूर्ण खेळ खेळून संपेपर्यंत कुणालाही दाखवायचा नाही. तोपर्यंत आपण एका करिअरविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तुमच्यासारख्याच बबलू नावाच्या विद्यार्थ्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पांमधून जाणून घेऊया.
चि. बबलूस, शुभाशीर्वाद.
बबलू, तुला पेंटर व्हावेसे वाटते. तू स्वतःला जे आवडते त्यात करिअर करायचा विचार करत आहेस, या गोष्टीचा आनंद वाटला. पेंटर म्हणजे फक्त चित्र काढणे, भिंतींना किंवा पोस्टर रंगवणे एवढाच सीमित अर्थ नाही. आज पेंटरसाठी अनेक वेगवेगळी क्षेत्रे निर्माण झाली आहेत. पेंटरसाठी पूर्वापर चित्रकार, पोस्टर बनवणे, भिंती रंगवणे, पोट्रेटस् याव्यतिरिक्त क्राफ्ट आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर, आर्ट डायरेक्टर, कॉमिक आर्टिस्ट, इंटिरीयर डिझायनर, टेक्सटाईल डिझायनर, जाहिरात, डिजिटल मीडिया यांसारखी अनेक क्षेत्रे परिश्रम घेणार्यांसाठी खुली आहेत. हात आणि डोळे यांचा समन्वय साधण्याचे कौशल्य या व्यवसायासाठी आवश्यक आहे. एक यशस्वी पेंटर होण्यासाठी रंगसंगतीचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे निसर्गातील विविध प्रकारच्या झाडे, वेली, फुले, पशू-पक्षी, आकाश, नदी, समुद्र अशा सजीव-निर्जीव घटकांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. कोणता रंग, कुठे व कसा शोभून दिसेल याचा विचार करणे. घरांचे, कपड्यांचे, रांगोळीचे व चित्रांचे सूक्ष्म निरीक्षण करत राहिल्यास या क्षेत्रातील बारीकसारीक बाबींचा विचार करण्याची सवय आतापासून लावून घेतल्यास तुझे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल, यात शंकाच नाही!
जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची, राजा रविवर्मा, एम. एफ. हुसेन आदी चित्रकारांची चरित्रे मिळवून वाचण्याचा प्रयत्न करणे. नाशिकमधील प्रसिद्ध चित्रकार शिवाजी तुपे, सावंत बंधू व इतर चित्रकारांच्या कलाकृतींचा अभ्यास करून चित्रातले बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या शाळेतील किंवा ओळखीतील ड्राईंग टीचरची मुलाखत घेऊन या क्षेत्रातील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. बबलू, तू यशस्वी पेंटर म्हणून नावारूपाला यावे याकरता तुला खूप खूप शुभेच्छा!
तुझी,
ताई