Blog : शाई पेनची ‘शाही’ कथा

नोव्हेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार हा जागतिक शाईचा पेन दिवस (फाऊंटन पेन डे ) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शाई पेनची ही ‘शाही’ आणि रंजक कथा खास ‘देशदूत’ वाचकांसाठी!

शाई आणि शाईचा पेन हेच मुळात आता ऐतिहासिक झाले आहेत. सध्याच्या डिजिटल (अंकात्मक युगात लिहिण्यापेक्षा हेच बरे!) युगात पासवर्ड आणि ओटीपीमुळे सहीसुद्धा करणे कालबाह्य होणार की काय असे वाटते.

असो, पण शाईचा पेन माझ्याकरता अगदी विशेष आणि अनन्य (एक्सक्लुजिव्ह)! त्याची संगत पार अगदी ‘जबसे होश संभाला’पासून आतापर्यंत अजूनही आहे अगदी हृदयाजवळ, शर्टच्या खिशाला! अगदी पुरातन काळापासून लेखन आणि लेखन साहित्य म्हटले की, डोळ्यांसमोर व्यास ऋषी आणि गणपतीचे चित्र उभे राहते. व्यास सांगताहेत आणि गणपती लिहितोय. हातात लेखणी म्हणून पीस आहे. हेच ते क्विल! तर ‘जागतिक शाई पेन दिना’निमित्त थोडे काही!

लेखणीचा फार पुरातन इतिहास आहे; अगदी रंगकामाएवढाच! त्यापूर्वी इतर लेखन, नोंदी शिलालेखात असाव्यात. मात्र बोरू, क्विल असा प्रवास करता-करता शाईच्या पेनची निर्मिती झाली. अगदी थोडक्यात असे, बोरू: ताडपत्र, भूर्जपत्र, कागद, कापड आदींवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून बोरुचा वापर करीत.

बांबूपासून अथवा लाकडापासून बोरु बनवत. पेनपेक्षा थोडे मोठे किंवा तेवढेच आणि करंगळीसारखे किंवा त्यापेक्षाही बारीक असणारे मजबूत असे लाकडाचे एकेक कांडे! आतून ते पोकळ. त्याला तिरप्या दिशेने तासून नंतर त्याला हवे तसे बारीक टोक आणून ते टोक एका विशिष्ट तिरप्या रेषेत तोडले की लेखणी तयार होत असे.

बोरू आणि शाईची दौत: माझी आठवण म्हणजे अगदी तिसरी-चौथीत आम्हाला कार्यानुभवाच्या (वर्क एक्सपेरियन्स) वर्गात यामुळे आमच्या सरांनी अट्टाहासाने हे करवून घेतले होते.

‘क्विल’ (पीस) हा प्रकार त्याही पूर्वीचा! अगदी महाभारत लिहिलेल्या आपल्या गणपतीबाप्पा एवढा, पण इतिहासात उल्लेख आहेत रोमन ते युगातले! रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर (इ.स.पाचवे शतक) युरोपातील ख्रिश्चन मठवासीयांना चर्चमधील लेखांच्या प्रती काढण्याकरता अतिटोकदार, सुबक, पण मुलायम टोकाच्या लेखणीची गरज निर्माण झाली आणि ऐतिहासिक क्विल (पीस) लेखणीचा शोध लागला.

ही लेखणी राजहंस, हंस, टर्की अथवा अन्य पक्ष्यांच्या पिसापासून तयार करीत असत. मोठ्या पिसाच्या पोकळ टोकाला योग्य आकार देऊन व मध्यभागी कापून फट पडल्याने त्यात लिहिण्यासाठी पुरेशी शाई राहू शकते. क्विल, बोरू आणि नंतर आले टाक! टाक आणि दौत ही जोडगोळीच! गरज ही शोधाची जननी असते.

त्याप्रमाणे ‘क्विल’ची दुर्लभता म्हणून बोरू आणि बोरू अथवा क्विल पण लवकर झिजतात म्हणून अधिक टिकावू म्हणून निब आली. निबपूर्वी धातूच्या लेखणी होत्या, पण मर्यादित; कदाचित शाई धरण्याची क्षमता नसल्याने जास्त प्रचलित नाही झाल्या.

मग आली निब. ज्या माझ्या जमान्यातल्या मंडळींनी पेन अगदी माऊथ, जीभ, काढून धुतला त्यांना निब माहीत असेल . त्या एवढ्याशा निबमध्ये खूप काही तंत्रज्ञान सामावले आहे. त्याचा इतिहास पुढे उद्धृत केलेल्या परिच्छेदातून मिळेल.

1780 मध्ये सॅम्युएल हॅरीसन या बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथील अभियंत्यांनी जोसेफ प्रीस्टली यांच्यासाठी पोलादी लेखणी हाताने तयार केली. या लेखणीच्या टोकाला मधोमध उभी फट पाडलेली होती. लंडनमध्ये 1803 साली वाइज यांनी नलिकाकार लेखणी तयार केली.

हिच्या कडा मिळून एक फट तयार होई व बाजू क्विल लेखणीप्रमाणे कापलेल्या असत. 1828 मध्ये पोलादी लेखणीचे यंत्राच्या साह्याने उत्पादन केल्याचे श्रेय बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथील जॉन मिचेल यांना दिले जाते. इंग्रज संशोधक जेम्स पेरी यांनी लवचिकता असलेली पोलादी टोके तयार करण्याकरिता अनेक प्रयोग केले.

त्यांनी निबाच्या मधोमध फट असलेल्या वरील बाजूला एक छिद्र पाडून व त्याच्या दोन्ही बाजूंना उपफटी पाडून टोकाची लवचिकता वाढवली. 1830 मध्ये त्यांना या लेखणीचे एकस्व-पेटंट मिळाले. 1831 मध्ये जोझेफ झीलो यांनी निबावर लंबाकृती पॉइंट बसवून दाखवले. पोलादी निबांची किंमत कमी झाली.

त्यांच्या टोकांच्या रुंदीचे व लवचिकतेचे विविध प्रकार उपलब्ध झाल्याने क्विल निबांपेक्षा त्यांची लोकप्रियता वाढली आणि निब सगळीकडे टाकाबरोबर रूढ झाली. टाक-दौत हे समीकरण आणि बरोबर टीप कागद! टाक बुडवण्यापासून ते टाकातील निबेनी घेतलेली शाई संपेपर्यंत अक्षरांचा प्रवास त्यांच्या जाडीवरून ओळखू यायचा. त्याने एकसारखे अक्षर लिहिणे हेसुद्धा एक नैपुण्यच असायचे.

निबचे पहिले एकस्व (पेटंट) 1809 साली देण्यात आले. ते क्विलकरता होते. त्यानंतर 1822 साली शिंग व कासवाच्या पाठीपासून हिर्‍यासारखे तत्सम कठीण पदार्थ वापरून निब बनवली. त्याचेही एकस्व देण्यात आले. 1830च्या पुढे मात्र लोखंडी म्हणण्यापेक्षा धातूच्या निबेचा प्रवास सुरू झाला. निब आली तरी शाईचा प्रश्न पूर्ण सुटला नव्हता. टाक सुटसुटीत असला तरी त्यालाही निब सुरक्षित ठेवायला आवरण नव्हते.

शाई सहज नेता येत नव्हती. टाक, दौत आणि टीप कागद याला पर्याय हवा होता. तो मिळाला फाऊटन पेनच्या रूपाने. शाई पेनाच्या शोधाने. पहिले एकस्व (पेटंट) फ्रेंच सरकारने रुमानियन पेत्राचे पोयनारु (झशीींरलहश झेशपर्रीी) यांना 1827 मध्ये दिले असले तरी त्या आधीपासूनच दोन क्विलच्या पेनला फाऊंटन पेन म्हणायला सुरूवात झाली होती. मात्र टिकाऊ आणि दीर्घकाळ राहणारी शाई 1839 मध्ये व्हल्कनायझशनचा शोध लागल्यावर टिकू लागली.

मात्र पूर्ण व्यावसायिक व घाऊक प्रमाणात सुरुवात केली ती न्यूयॉर्कच्या एल. ई. वॉटरमन यांनी. 1890 मध्ये फाऊंटन पेनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. ‘वॉटरमन’ हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे.

मात्र तेव्हापासून आतापर्यंत पेनच्या रचनेंत फार फरक पडला नाही. निब, जीभ,माऊथ, टोपण आणि धड म्हणजे धारक, शाई करता टाकी. टाकीत थोडे प्रकार झाले. पंप, रबरी ओढक, पण कार्य तसेच. मुळात फाऊंटन पेन हा गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) आणि केशिका क्रिया (कॅपिलॅरी अ‍ॅक्शन) यावर काम करतो.

याचा सुंदर समतोल साधला गेल्याने जोपर्यंत कागदावर किंवा कुठल्याही पृष्ठभागावर निब टेकवली जात नाही तोपर्यंत शाई बाहेर येत नाही.शाई बाहेर येते तेव्हा हवा आत जाऊन वायूविजन होते. असे भन्नाट अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र आहे. निब तयार करणे आणि त्यावर तर एक ग्रंथ होईल.

आपण गोल्ड प्लेटेड, डायमंड टीप वगैरे वाचतो तेव्हा गोल्ड हे वंगण/लुब्रिकंट आणि हिरा हा कठीण म्हणजे जास्त आयुष्य1 या अभियांत्रिकीची कमाल म्हणजे माझ्याजवळील काही शाईचे पेन कितीही दिवस राहिले तरी लगेच ना झटकता, जिभेला निब न लावता सहज चालतात. कधीही शाई गळत नाही की हात खराब होत नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे माझा बोरू, शाई, टाक, फाऊंटन पेन प्रवास सुरु झाला तिसरी इयत्तेपासून! अजूनही खोब्रागडे शिक्षक आणि बोरू लख्ख आठवतो. खूप ओळींची वही, बोरू आणि छोटीशी दौत! सरांचे दौतीत बुडवून लिहिणे एवढे सोपे वाटायचे की तेवढ्याच सहजतेने आम्ही पूर्ण, पण शाईने भरवून द्यायचो.

मग सर न कंटाळता शाई कशी निथळवायची हे शिकवत. संयम प्रकारची शिकवणी. शाई दप्तरात हमखास सांडणे, कपडे, हात रंगणे आणि मग घरी गेल्यावर थोडेसे तोंडसुद्धा रंगणे हे अगदी पाचवीपर्यंत सुरु होते.

शाईची बाटली विसरले की कोणी पाच पैशाला मिळणारी शाईची वडी, गोळी आणायचे. ती पण मिळायची कागदी पुडीत. तेव्हा प्लास्टिक नव्हते. ती वडी घेऊन पाण्यात विरघळवायची शाई करायला. मग घट्ट-पातळ होणे. क्लायमॅक्स, कळस म्हणजे ती गोळी चुकून शर्ट किंवा चड्डीच्या खिशात राहणे आणि धुण्यात सर्वच कापड्यांना शाई लागणे आणि मग आमची पण धुलाई! चौथीत फाऊंटन पेन मिळायचे काय अप्रूप महाराजा!

कॅम्लिन, विलसनचा पेन म्हणजे एकदम भारी! कोणी आपले पेन द्यायचा नाही. कारण हात जाड-हलका म्हणजे पेनवर लिहिताना भर देऊन निब खराब व्हायची भीती वाटायची. पोटात गोळाच यायचा म्हणा ना! हा एक अभियांत्रिकीचाच एक भाग असावा. मोंन्टे ब्ला कंपनीच्या पेनच्या निबावर कसेही लिहा, कोणीही लिहा; काही फरक पडत नाही.

कॅम्लिन, रिको, एयेरमेल, विलसन लहान मोठे, पारदर्शी शाई दिसणारे, विविध रंगाचे ढंगाचे पेन वापरू लागलो. ढब्बू पेन, एबोनाईटचे भले लांब दोन-तीन एकात असलेले पेन असे अनेक प्रकार! शाईच्या पेनचा लागलेला लळा आजतागायत आहे. एक मात्र खरे, तेंव्हासुद्धा लाल शाईची भीती वाटायची; ती आजही कायम आहे.

शाळेप्रमाणे आणि वाढत्या इयत्तेप्रमाणे पेनाचे विविध उपयोग झाले. शाई शिंपडणे, मिनी रंगपंचमी खेळणे, एवढेच काय तर त्याचे स्टम्प करून काचेच्या कंच्यानी क्रिकेट खेळणे अशा विविध करामती! त्यातील एक म्हणजे पेनचा रंग बदलणे. हळदीने पेन घासल्यावर रंग बदलतो. मग हळद ओली केली म्हणून आईचे धपाटे!

या पेनमुळे बराच मार खाल्लाय, पण प्रेम जराही कमी झाले नाही. पेन हरवणे हा माझ्याकरता अगदी आता-आतापर्यंत विषय होता. पेन आणि पेेेनचे व्यवस्थापन हा एक आवडीचा विषय! पेन साफ करणे, पूर्ण सुट्टा करून पेन साफ करायला आंघोळीचा तांब्याच मिळायचा. आज मग्गा घेतो. टोपण, निब, जिब, माऊथ साफ केल्यावर टॉवेल किंवा चांगले कपडे खराब करणे हे ओघाने आलेच.

मग माऊथमध्ये, जीभ-निब एकत्रित बसवणे हेही शास्त्रच आहे. जास्त बाहेर तर मोडणार आणि निब आत राहिली तर उमटणार नाही, असा प्रकार असे. घट्ट बसलेल्या माऊथवर कधी-कधी दातानेसुद्धा प्रयोग व्हायचे ते उघडण्याकरता. साफ सफाई करून पेनात शाई भरल्यावर पाण्याचा फिकटपणा शाईचा रंग घेईपर्यंत गिरवायचे. अशा अनेक पेन शाईने आयुष्यात खरा रंग भरला आहे.

अशा या अनन्य – एक्सक्लुसिव्ह पेनमुळे त्याहून अधिक एक्सक्लुसिव्ह मित्रसुद्धा दिले आहेत. त्यातील काही मंडळी आठवणीतच उरली आहेत. त्यांनी भेट दिलेल्या पेन रूपाने!

शाई भरणे हा एक मोठा कार्यक्रम! न सांडता, न हाताला शाई लागता, कपडे खराब न करता शाई भरणे हा एक मोठाच पराक्रम वाटायचा. पेनची शाई वाळल्यावर ‘हळूच’ जिभेवर लावायचो. कुणी हसू नाही म्हणून, पण निळी झालेली जिभ बोलायचीच.

शाईच्या पेनाने शिस्त पण शिकवली; प्रत्येक तुटलेल्या निब आणि हरवलेल्या पेनबरोबर! नवीन पुस्तके, युनिफॉर्मबरोबर नवीन पेनदेखील. कितीतरी दिवस प्लॅस्टिक कव्हर जपायचो. आनंदाच्या कल्पना फारच मर्यादित होत्या पेनसारख्याच.

असे आंतरबाह्य रंगाच्या उधळणीत वयाबरोबर हळूच हिरो, रिको पंपवाले पेन आले. भारी पेनसोबत भारी मार्क नाही मिळाले. अक्षरही नाही सुधारले कधी. अशा शाईच्या पेनांच्या मोठ्ठ्या आणि स्वतंत्र दुकानात जायला खूप आवडायचे.

असंख्य पेन बघून हरळून जायचो. आज पण मोंन्टे ब्लॉ, कॅरन डी अ‍ॅचे या मंडळींच्या शोरूममध्ये जायला मजा येते. पेनचे नको तिथे गळणे, मग खडू, टीप कागद वापरणे, बारीक-जाड अक्षराकारात निबला पाटीवर घासणे, वाकवणे आणि मग हाताबाहेर उपद्व्याप झाले की दवाखान्यात जाणे! मुबलक शाई पेनच्या वापरामुळे चक्क पेन हॉस्पिटल नावाचे दुरूस्ती दुकानदेखील होते.

खूप मन लावून ते काका पेन व्यवस्थित करून देत. पुढे शाई भरण्याकरता बरेच सुकर प्रयत्न झाले. पंप, छोटे सॅशे तसेच निबऐवजी फायबर टीप, पायलटचे मेटल फ्लो, पण खरी चढाई केली ती प्लास्टिक आणि बॉलपॉईंट पेनने. अधिक सुकर, स्वच्छ, सोपे आणि स्वस्त; त्यामुळे त्याने अगदी सहज शाईच्या पेनवर कुरघोडी करून शाईच्या पेनला एक्सक्लुसिव्ह – अनन्य करून टाकले.

अंकीय – डिजिटल युगात, पासवर्ड, ओटीपीच्या दुनियेत माणसेच अंक, डिजिटल ओळख झाली आहेत स्वतःची ओळख विसरून. मग बिचार्‍या शाई पेनचे काय? जागतिक शाई पेन दिवसनिमित्त बरीच संकेतस्थळे, व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतील ज्ञान आणि त्याला आमच्या आठवणींचा दिलेला हा थोडासा उजाळा!

– किरण वैरागकर


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *