ब्लॉग : भाग-2 माहितीचा आणि मेंदूचा भुलभुलैय्या

- डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, एनआयएमएस हॉस्पिटल, नाशिक
ब्लॉग : भाग-2 माहितीचा आणि मेंदूचा भुलभुलैय्या


लोकांना वाटते, त्यांना आता सोशल मीडियातून करोनाची औषधे माहीत झाली आहेत. ते स्वतःच स्वतःचा इलाज करीत आहेत. डॉक्टर तरी यापेक्षा काय वेगळे करतात? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, पण यातून उद्भवणारे गुंते आणि अगदी कधी-कधी जाणारे जीव याचा हिशोब कोण ठेवणार?

झालेले गुंते आणि वाया गेलेला वेळ कसा निस्तरायचा याच्या पोस्ट पाहिल्यात का हो कधी? हे सगळे थोर कर्म डॉक्टर मंडळी रोज नीट करीत आहेत. बर्‍याच वेळा यशस्वी होतात. काही वेळा अपयशी! काय? कुठे? कधी? कसे? किती प्रमाणात? कशा बरोबर द्यायचे? आणि गुंता झाला तर कसे निस्तरायचे? हेच खरे डॉक्टरकीचे शिक्षण असते.

जिथे सामान्य लोकांची माहिती संपते तिथे डॉक्टरांचे क्षेत्र सुरू होते. दोन योग्य औषधांमधील कुठले औषध द्यायचे? इथे त्यांच्या मेंदूचा कीस पडत असतो. यात डॉक्टरांनी केलेले सरासरी 12 वर्षांचे कष्ट त्यांना रोज मदत करतात.

हा गुंता समजणे सामान्यांच्या समजण्याबाहेरचे आहे आणि माझ्या समजावण्याच्या बाहेरचे आहे. हे सांगण्याचे कारण जे दाखवले व समजवले जाते त्यापेक्षा सत्य वेगळे असू शकते हे सांगण्याचा हा प्रयत्न! गैरसमज करून घेण्यापेक्षा शांत आणि तटस्थपणे विचार करा.

हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झालेला तुम्हांला चालत असेल तर एखाद्या रुग्णाचा मृत्यू का नको? आजकालची हॉस्पिटल ही रुग्णांचे त्रास कमी करण्याची ठिकाणे आहेत; ना की जीवनाची गॅरंटी-वॉरंटी देण्याची! जुन्या काळी डॉक्टर खूप चांगले होते.

आताचे खूप व्यावसायिक आहेत हे लोकांचे म्हणणे नेहमीचे आणि अवघड जागेचे दुखणे झाले आहे. जुन्या काळी सांधे बदलले जायचे का हो? हृदयाच्या झडपा बदलल्याचे कधी ऐकले होते? 20 फ्रॅक्चर झालेला माणूस जगलेला पाहिला होता का? कमी वजनाचे बाळ जगलेले ऐकले होते का?

बाळंतपणाला पुनर्जन्म मानणारे आपण आज किती यशस्वी बाळंतपणे करतोय याचा विचार कधी केलात का हो? जिथे भारतीय माणूस सरासरी 40 वर्षे जगायचा, तो आता 70 वर्षांपेक्षा जास्त जगतो ही जादू कशी झाली? हे असे होत असेल तर तुम्हांला खरंच वाटते का हो, डॉक्टर मंडळी कोणाला मुद्दामहून मारत असतील?


याचे श्रेय द्या अगर नका देऊ; हे फक्त मी शास्रीय मुद्दे मांडतोय. हे आपल्या लक्षात नाही राहणार एवढे आकडे आपला मेंदू लक्षात ठेवत नाही, पण तो गोष्टी छान लक्षात ठेवतो. उदा. 20 सीटी स्कोअर असूनसुद्धा घरी राहून औषधे घेऊन, ऑक्सिजन न घेणारा आणि बरा होणारा आपल्या लक्षात राहील; कदाचित आयुष्यभरही!

तुम्ही असे एक उदाहरण ऐकले असेल. आम्ही डॉक्टर मंडळी 20 सीटी स्कोअर असणारी आणि रोज या जगातून जाणारी कितीतरी उदाहरणे तुम्हांला देऊ, पण प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमे हे नाही सांगणार! कारण यात स्टोरी नाही ना! अपवाद असतात,

पण अपवादाला नियम बनवू नये. माध्यमे आणि लोकांचा मेंदू चुकतोय तो इथे. पॉझिटिव्ह मेसेज पाठवा, असे मेसेज येत आहेत आजकाल! मग आपण पाठवतो इतके रुग्ण बरे झाले. इतक्यांनी लस घेतली. इतके घरी बरे झाले, पण या सगळ्यांच्या मागे डॉक्टरांचे अदृश्य हात असतात बरं का!

प्राचीन आणि प्रगत संस्कृती हे वाक्य अशी अफूची गोळी आहे की लोक वर्तमानातला त्रास विसरून रम्य भूतकाळात रममाण होतात. सोन्याचा धूर निघायचा मान्य आहे हो, पण आता भारतातल्या शहरा-शहरांतून जो धूर निघतोय त्याचे काय? आपल्या सध्याच्या रूढ जीवनशैलींवर निसर्गाने करोनारूपी मारलेली ही खणखणीत चपराक आहे.

स्वतःला बदला, लोकांनी आणि डॉक्टरांनीसुद्धा! करोनाने बर्‍याच लोकांना आतून-बाहेरून बदलले आहे. तर मेंदूचा हा भुलभुलैय्या समजून घ्यावा एवढीच अपेक्षा! आपण पाहतोय किंवा दाखवले जाते त्यापेक्षा सत्य वेगळे असू शकते याची जाणीव ठेवा एवढीच माफक अपेक्षा! चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायलाच हवे.

मेंदू हलका राहतो आपला. मेंदू चांगला तर शरीर आणि मनही चांगले! आणि हे दोन्ही चांगले तर आपले आयुष्य चांगले! करोनाला एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. वैद्यकीय क्षेत्र थकले आहे, पण पळून नाही चालले. कित्येक डॉक्टर्सनी आणि सिस्टर्सनी आपले प्राण गमावले आहेत. (तुम्ही म्हणाल यात काय विशेष? बाकीचे लोकसुद्धा मरतच आहेत.) हेल्थ केअर वर्कर्सचा यासाठी विशेष उल्लेख; कारण आपला जीव जाऊ शकतो,

आपल्यामुळे आपली प्रिय मंडळी मृत्यूच्या खाईत जाऊ शकतात हे माहीत असूनसुद्धा ही मंडळी मागे हटली नाहीत. त्यांनी जबाबदारी सोडलेली नाही. ज्याच्यासाठी शिक्षण घेतले त्याची माझ्या देशाला गरज आहे याची जाणीव असल्याने कोणीच मैदान सोडलेले नाही. सोडणार नाहीत. देशभक्ती यापेक्षा काय वेगळी असते हो? अशी परमोच्च देशभक्ती करताना आज आपल्यात नसलेल्या कित्येक अनाम वीरांना माझा प्रणाम!

ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यावी, अशी माझी मुळीच इच्छा नाही, पण एक माणूस म्हणून ही माणसे थकू शकतात, त्यांना कधीतरी बोललेले कौतुकाचे शब्द त्यांची प्रेरणा बनतात हे तरी समजून घ्या. नाही तर रुग्णांना वाचवता येत नाही म्हणून असहाय्य झालेल्या एका तरुण डॉक्टरची आत्महत्या? ही एक सुरुवात असेल.

आपले आरोग्य क्षेत्र प्रचंड ताणाखाली आहे. अशी घटना हिमनगाचे टोक आहे हे कृपया समजून घ्या. आपल्या मेंदूला या माहितीच्या आणि भावनेच्या भूलभूलैयातून बाहेर यायला शिकवा. एवढेच काय ते मागणे! (पूर्ण)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com