Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगस्पंदन : बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले...

स्पंदन : बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले…

डॉ.प्रवीण घोडेस्वार

संगीतकार भास्कर चंदावरकर यांचं नाव घेतलं की आपल्याला पटकन आठवतात सख्या रे घायाळ मी हरिणी…, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे… ही गाणी. आणि आठवतं ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं आगळं-वेगळं संगीत ! चंदावरकरांनी फक्त ह्या एकाच नाटकाचं संगीत केलं असतं तरी त्याचं नाव अजरामर झालं असतं. इतकी अद्भुत नि विलक्षण कामगिरी त्यांनी नाटकाला संगीत देताना केलीये. त्यांचा जगातल्या विविध संगीत प्रवाह नि प्रकारांचा गाढा अभ्यास होता. आधुनिक कलांचा प्रचंड व्यासंग त्यांना होता. पंडीत रविशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडीत उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतार वादनाचे धडे त्यांनी गिरवले होते. चित्रपट कला आणि संगीताचे ते शास्त्रशुद्ध अभ्यासक तथा संशोधक होते. त्यांनी काही पाश्चत्य जाणकारांकडून jaz चं पण शिक्षण घेतलं होतं. पाश्च्यात संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली. अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी संगीतात केले. त्यांनी केलेल्या दोन नृत्य नाटीकांचे संगीतही खूप गाजलं होतं.

‘नक्षत्रांचे देणे’ आविष्कार

घाशीराम शिवाय त्यांनी तीन पैशांचा तमाशा, गिरीबाला, ये रे ये रे पावसा, जेतेगिरी बेन चंदेरी, आषाढ का एक दिन या नाटकांनाही संगीत दिलं होतं. त्याचप्रमाणे जपानी भाषेतलं ‘मीवा’ आणि जर्मन भाषेतलं ‘नागमंडल’ ही नाटकं देखील त्यांनी संगीतबद्ध केली. चंदावरकरांच्या अफलातून सांगीतिक प्रतिभेचा अजून एक आविष्कार म्हणजे ‘नक्षत्रांचे देणे’ हा काव्य-संगीताचा कार्यक्रम. कवी आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित हे रंगमंचीय सादरीकरण म्हणजे त्यांनी शब्द-संगीताला दिलेली अनमोल देणगी म्हटली जाते! त्यांनी ‘स्वप्नकोष’ हा baley, ‘प्रतिमा’ हे नृत्यनाट्य, ‘वोल्गा ते गंगा’, ‘रंगविविधा’ यासारख्या रंगमंचीय सादरीकरणातून आपल्या प्रतिभेचा मनोज्ञ प्रत्यय रसिकांना आणून दिला.

- Advertisement -

अनेक विद्यापीठांमध्ये दिली व्याख्याने

पंडित चंदावरकरांनी ‘वाद्यवेध व भारतीय संगीताची मूलतत्वे’ आणि ‘चित्रभास्कर’ या पुस्तकांमधून अभ्यासपूर्ण सांगीतिक मांडणी केली आहे. त्यांनी पुण्याच्या फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन institute of इंडिया मध्ये सुमारे १५ वर्षे संगीत विषयाचं अध्यापन केलं. या शिवाय अहमदाबादच्या National Institute of Design, बंगळूरू इथल्या Indian Institute of Management, पंजाब-हरियाणा विद्यापीठ आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अशा नामवंत आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणूनही काम केलं. तसेच झेकोस्लोव्हेकिया, जपान, पोलंड या देशात कलाविषयक सल्लागार म्हणून काम केलं. अमेरिकेतही अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

मराठी, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमधले चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. उत्तम सतारवादक असल्याने पंडित चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत. अनेक दिग्गजांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत साज चढवला. वानगीदाखल परोमा (अपर्णा सेन), रावसाहेब ( विजया मेहता), सामना व सिंहासन (जब्बार पटेल ),थोडसा रुमानी हो जाए (अमोल पालेकर ), खंडहर (मृणाल सेन ) ही नावं सांगता येतील. तसेच जय जवान जय किसान, माया दर्पन, जादू का शंख, अरविंद देसाई की अजीब दास्तान, अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यो आता है, हमिदाबाई की कोठी हे हिंदी चित्रपटही त्यांनी केले. शिवाय एक डाव भूताचा, गारंबीचा बापू, आक्रीत, सर्वसाक्षी, मातीमाय, कैरी, बयो, श्वास, सरीवर सारी हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट सांगता येतील. Nine hours to Rama आणि A Lap in the Nish या इंग्रजी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. त्यांना १९८८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ‘चैत्र’ या मराठी लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार २००२ साली मिळाला होता.

विद्यापीठ गीताला दिली चाल

सख्या चला बागामधी रंग खेळू…, मालिक की महोब्बत को…, प्रीतीचिया बोला…, रंगमहाली शेज सुकली…, सांज आली दुरातून…, चांदणं टिपूर हलतो वारा…, बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले…, अजब सोहळा…, गाव असा नि माणसं अशी…, कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगाल काय…, ओंजळीत माझ्या माझे उसासे…, तूच मायबाप बंधू…, हा दैवगतीचा फेरा…, विषवल्ली असून भवती…, डोळ्यात वाकून बघतोस…, कंठ आणि आभाळ दाटून येती… , मायबाप सेवा पवित्र…, चांदोबा चांदोबा भागलास का…, मी फसले ग फसले…, बंद ओठांनी निघाला…, सांज झाली तरी माथ्यावरी…, घेऊन रूप माझे… यासारखी गाण्यांमधून त्यांच्या सांगीतिक प्रतिभेचं दर्शन घडतं. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना…’ या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या विद्यापीठ गीताला पंडीत चंदावरकरांनी सुश्राव्य चालीत गुंफलं आहे. त्यांची ही रचना अप्रतिमच पण याहीपेक्षा त्यांनी एक अद्वितीय कामगिरी केली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य. ह्या दोन शब्दांच्या बोधवाक्याला त्यांनी अतिशय श्रवणीय, अर्थवाही नि सुंदर असा स्वरसाज चढवला आहे ! त्यांनी खूप सहज, सोपी आणि कोणालाही गुणगुणता येईल अशी चाल लावण्याची अफलातून किमया केली आहे,यास खरोखरच तोड नाहीये! हे काम केवळ एखादा ‘जिनिअस’च करू जाणे! पंडित भास्कर चंदावरकर हे मराठीतले अभिजात संगीतकार होते पण त्यांची म्हणावी तशी दखल मराठी समाजाने घेतली नाही, असं खेदाने म्हणावे लागते. सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांचाच उदो-उदो करणाऱ्या मराठी रसिकांना चंदावरकरांची महती समजलीच नाही. १६ मार्चला त्यांची ८५वी जयंती. या निमित्त भास्कर चंदावरकर नामक प्रतिभावंत संगीतकारला विनम्र अभिवादन !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या