मैत्री दिन
मैत्री दिन
ब्लॉग

मैत्रीदिन विशेष : ‘शाश्वत मैत्रीच्या शोधात’

- अ‍ॅड. अश्विनी काणे-देशपांडे

Gokul Pawar

Gokul Pawar

‘आज तुमच्याकडे जेवायला येतो. आज जरा बोलायचं आहे. ऑफिसला सुट्टी घे’ असं आपण किती जणांना म्हणू शकतो? ज्याच्या घरात आपलं नेहमी हसतमुखाने स्वागत होईल, जो काहीही प्रश्न न विचारता ऑफिसला सुट्टी देईल, असा मित्र ‘खरा मित्र’ असतो. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण ती टिकवता येणं ही खरी कसोटी असते.

म्हणायला लोकांचे बरेच ग्रुप्स आहेत. त्या ग्रुप्सबरोबर बाहेर फिरताना, एन्जॉय करताना पहिल्यावर किती छान मैत्री आहे यांची, असं वाटतं, पण बर्‍याच ठिकाणी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते. ग्रुप आहे, पण अडचण सांगण्यासाठी कुणीच नाही. आम्ही अमूक एका ठिकाणी भेटलो. आमची चांगली मैत्री झाली, असं वाटलं म्हणून मी माझा प्रॉब्लेम सांगितला. मात्र त्याचं गॉसिपमध्ये रूपांतर झालं. आता लोक मला विनाकारण जज करतात. कंटाळा आला आहे या खोटारड्या फ्रेन्डशिपचा, असे शेरे मैत्रीबद्दल ऐकायला मिळतात. गंमत वाटते मैत्रीबद्दलची लोकांची परिभाषा ऐकून!

एकदा एका केसमध्ये मला एक जण दुसरीबद्दल खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिला मदत पाहिजे, असं सांगत होती. पुढे चौकशीत तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा काय करतो? मुलं काय करतात? असे विचारल्यावर म्हणाली, मला माहीत नाही. काहीतरी व्यवसाय आहे वाटतं. दुसर्‍या एका केसमध्ये मी एका शहराबाहेरील व्यक्तीशी बोलत होते. बोलता-बोलता दोन-तीन लोकांचा विषय निघाला तर त्यांनी कौतुकाने सांगितलं की, अमूक-अमूक व्यक्ती आणि त्याची बायको माझे चांगले मित्र आहेत.

ज्या व्यक्तीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे, ज्याच्यावर फसवणुकीचे अनेक खटले चालू आहेत आणि कोणीही त्याच्याशी मैत्री करीत नाही. फक्त स्वार्थापोटी त्याच्याशी मैत्री ठेेवली जाते. असा माणूस मित्र आहे असंही ती व्यक्ती सांगते तेव्हा आश्चर्य वाटतं. हे सगळं मैत्रीच्या व्याख्येत कुठेच बसत नाही. आम्हाला कळतं, ज्यांच्यासोबत राहतो-फिरतो ते खरे मित्र नाहीत. आम्हाला त्यांच्याबरोबर कम्फर्टेेबल वाटत नाही, पण काय करणार? ग्रुपमध्ये राहावं लागतं, असंही काही केसेसमध्ये लोक बोलतात. असं सांगणारे आणि यासारखं प्रेम, त्याग, संवेदनशीलता असणारी मैत्री, अशी मैत्री जिथं स्पर्धा, मत्सर, हेवा, स्टेटस असं काहीच नसूनही न बोलता मनं समजणारी, मनमोकळं हितगुज करता येणार्‍या शाश्वत मैत्रीच्या शोधात प्रत्येक जण आहे.

मैत्रीदिनी मैत्रीचे अनेक मेसेजेस सगळ्यांना सतत येतात. ‘तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा’. भरपूर मेसेजेस येतात, पण मेसेज पाठवणार्‍या आणि मिळणार्‍यांमध्ये खूप कमी लोकांच्या नशिबात असे डोळे पुसणारे मित्र असतात. त्यामुळे आजकालच्या सोशल युगातसुद्धा बरेच लोक एकटेच दिसतात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com