प्लॅस्टिकबंदी परिणामकारक करायची तर...

प्लॅस्टिकबंदी परिणामकारक करायची तर...

23 वर्षांपूर्वी देशात पातळ पॉलिथीन पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर प्रयत्न केले गेले. परंतु प्लॅस्टिक उद्योगातल्या प्रचंड रोजगार क्षमतेचे भांडवल करण्यात आल्याने त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण किती वाढते आणि मानवी जीवन तसेच प्राणीमात्रांच्या मृत्यूला प्लॅस्टिक किती आणि कसे कारणीभूत आहे, याचा विचार कधीच करण्यात आला नाही...

देशात पातळ पॉलिथीन पिशव्यांवर बंदीचे पहिले पाऊल 1999 मध्ये उचलण्यात आले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये यादृष्टीने केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर (एसयूपी) देशव्यापी बंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैपासून ही बंदी लागू झाली. त्याला पर्याय शोधण्यासाठी सरकारने वर्षभराचा वेळ दिला होता. परंतु तो सत्कारणी न लावता आता या उद्योगाने पुन्हा ओरड करायला सुरुवात केली आहे. मागच्या वेळी सरकारनेही प्लॅस्टिक बंदीची परिणामकारकता किती आहे, हे पाहिले नव्हते. प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणल्याने कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू झाली. बाहेर पडताना लोक कापडी पिशवी घ्यायला लागले. पण नंतर सरकारने आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली. त्यातही एका राज्यात प्लॅस्टिकबंदी आणि दुसरीकडे मोकळे रान अशी स्थिती बघायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आताची प्लॅस्टिकबंदी मागील बंदीसारखी कुचकामी नसल्याचे सरकारला कृतीतून सिद्ध करावे लागेल. लोकांनीही एकेरी वापराच्या प्लॅस्टिकच्या सवयीतून बाहेर पडण्याची गरज आहे.

एखादे उत्पादन शक्य तितक्या वेळा वापरणे हे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक प्रभावी पाऊल आहे. एकेरी वापराच्या प्लॅस्टिकऐवजी एकेरी वापराच्या पर्यायांचा प्रचार केल्याने समस्येवर कायमस्वरुपी उपाय मिळू शकत नाही. प्लॅस्टिकबंदीच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पर्यायांचा अभाव. लोकांना असा एखादा सोपा आणि स्वस्त पर्याय मिळायला हवा. पण ते झाले नाही. एकूण प्लॅस्टिकपैकी सुमारे एक तृतीयांश ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ (एसयूपी) आहे. एसयूपीचा दरवर्षीचा वापर सुमारे 70 लाख टन इतका आहे. ‘एसयूपी’च्या उत्पादनात अनेक उद्योग आणि हजारो कामगार गुंतले आहेत. त्यामुळेच त्यांचा व्यवसाय बेकायदेशीर ठरवताना पर्यायी उपजीविकेचाही विचार करणे आवश्यक आहे. उपजीविकेच्या पर्यायाचा अभाव असल्यामुळे बाजारपेठ बंदीची तयारी करू शकत नाही. खरे तर हेच प्रयत्न अयशस्वी होण्याचे कारण बनते. ‘एसयूपी’ आणि त्यांचे पर्याय प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेताना जीवनचक्र विश्लेषण (एलसीए-लाईफसायकल अ‍ॅनॅलिसीस) महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरणावर पॉलिथीन पिशव्यांचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी कागदी शॉपिंग बॅग चार ते आठ वेळा वापराव्या लागतील. तसेच लाखो ‘एसयूपी’ कपना पर्याय असू शकत नाही. मातीच्या कपचा पर्याय निवडला तरी त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे मातीचा वरचा थर खराब होईल. ‘बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक’चा वापरही सूक्ष्म प्लॅस्टिकची समस्या सोडवू शकत नाही.

असे असले तरी दुसरीकडे यासंबंधी कडक कायदे करून आणि नागरिकांना जागरुक करून जगातले अनेक देश प्लॅस्टिकच्या कचर्‍यापासून मुक्त होत आहेत. फ्रान्सने 2016 मध्ये प्लॅस्टिकबंदीचा कायदा केला. 2020 पर्यंत प्लॅस्टिक प्लेटस्, कप आणि सर्व प्रकारची भांडी यावर टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंदी घालण्यात आली. प्लॅस्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन गरजेच्या सर्व उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. आता तिथे प्लॅस्टिकला पर्याय म्हणून सेंद्रीय पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जात आहे. आयर्लंडने 2002 मध्ये प्लॅस्टिक पिशवी कर लागू केला. त्याअंतर्गत लोकांना प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यासाठी जास्त कर भरावा लागला. त्यामुळे काही दिवसांनी तिथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर 94 टक्क्यांनी कमी झाला

. इतर विकसनशील देशांप्रमाणेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे रवांडात ड्रेनेजचा मार्ग रोखला गेला होता. याच कारणामुळे तिथल्या परिसंस्थेचे प्रचंड नुकसानही झाले. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिथल्या सरकारने नैसर्गिकरीत्या खराब न होणार्‍या सर्व उत्पादनांवर बंदी घातली. हा आफ्रिकन देश 2008 पासून प्लॅस्टिकमुक्त आहे. स्वीडनमध्ये प्लॅस्टिकवर बंदी नाही. तिथे प्लॅस्टिकचा अधिकाधिक पुनर्वापर केला जातो. तिथे सर्व प्रकारच्या कचर्‍याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी शेजारील देशांकडून कचरा विकत घेतला जातो.

धातूशास्त्रज्ञ अलेक्झांडर पार्केस यांनी प्रथम प्लॅस्टिक तयार केले. 1862 मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा ‘पॅरोक्सेटीन’ नावाचे प्लॅस्टिक बनवण्यात आले. जगात पहिल्यांदा प्लॅस्टिक दिसले तेव्हा त्याच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले गेले. एकेकाळी पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून राहावे लागत होते. तशा अनेक उत्पादनांची जागा प्लॅस्टिकने घेतली पण शतकापेक्षा कमी कालावधीतच लोकांना त्याचा धोका समजू लागला. आज विसाव्या शतकातली ही क्रांती एकविसाव्या शतकापुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. डोंगरापासून समुद्रापर्यंत आणि शेतीपासून आपल्या पोटापर्यंत सगळीकडे प्लॅस्टिक पोहोचले आहे. आतापर्यंत 16 देशांनी त्यावर बंदी घातली असून शंभरहून अधिक देश याविरोधात कडक कायदे करत आहेत. आता आपला देशही त्यांच्या पंक्तीमध्ये बसला आहे.

अर्थातच प्लॅस्टिकवर बंदी आल्यानंतर पर्याय म्हणून काय अंगीकारायचे आणि या बिकट प्रश्नातून सुटका कशी करून घ्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकच्या विरोधात मोहिमा राबवल्या गेल्या असल्या तरी आपण आवश्यक तेवढ्या प्रमाणात सुधारणा करण्यास तयार नाही, हे सत्य आहे. म्हणूनच प्लॅस्टिकला पर्याय शोधायचा असेल तर इतिहासात थोडे मागे जावे लागेल. बाजारातून कोणती उत्पादने काढून प्लॅस्टिकने स्थान निर्माण केले याचा विचार करावा लागेल. त्यातूनच प्लॅस्टिक हटवण्याचा मार्ग निघेल. प्रत्येक उत्पादनासाठी पर्याय शोधले जाऊ शकतात. कटलरी उत्पादने असो वा इतर जीवनावश्यक वस्तू, सर्व स्थानिक पातळीवरच मिळू शकतात. गरज आहे मागे वळून पाहण्याची... प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण शरीरात पोहोचतात आणि अनेक असाध्य रोगांना जन्म देतात. त्यामुळेच प्लॅस्टिकपासून लवकरात लवकर सुटका करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्लॅस्टिक वापराचा अन्नाशी थेट संबंध आहे. त्यामुळेच सर्वप्रथम आपण बाजारातून नानाविध वस्तू पॉलिथीनच्या पिशवीत आणण्याची सवय सोडली पाहिजे. याऐवजी ज्यूटच्या पिशव्या हा सोपा पर्याय असू शकतो. प्लॅस्टिकच्या काड्या वापरल्या जातात, तिथे लाकडी काड्यांचा अवलंब करता येतो. सध्याच्या युगात ‘बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक’चा पर्यायही आपल्यासमोर आहे. खराब होत चाललेली हवा, वाढते प्रदूषण, पाण्याचा खालावणारा दर्जा आणि मातीचा कस टिकवण्याचे आव्हान हे केवळ हिरव्या उत्पादनांनीच पेलता येऊ शकते. प्लॅस्टिकचा अमर्याद वापर ही आपत्ती असेल तर या आपत्तीत आपल्याला संधी शोधावी लागेल. त्यामुळेच निसर्ग प्लॅस्टिकमुक्त करणे शक्य होईल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होऊ शकतात.

मानवी जीवन सुसह्य करणारे प्लॅस्टिक अल्पावधीत मानवतेसाठी मोठ्या चिंतेचे कारण बनले. शेकडो वर्षे विघटीत होऊ न शकणारे हे रासायनिक संयुग आज विषबीज बनले आहे. सूक्ष्म प्लॅस्टिकच्या रूपात असंख्य भाग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. या भस्मासुराचे सूक्ष्म रूप अंटार्क्टिका या निर्जन खंडापर्यंत पोहोचले आहे. या विषबीजाने आता आमच्या घराच्या पाणीपुरवठ्यातही शिरकाव केला आहे. प्रकरण इथेच संपत नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की हे विषबीज रक्तासोबत मानवी नसांमध्येदेखील फिरू लागले आहे.

प्लॅस्टिकवरील आपले वाढते अवलंबित्व आज असे विदारक चित्र निर्माण करत आहे. म्हणूनच सर्वजण आपले दैनंदिन जीवन प्लॅस्टिकवरील अतिअवलंबितेपासून मुक्त करत नाहीत तोपर्यंत कोणताच उपाय प्रभावी ठरणार नाही. म्हणूनच आता प्रत्येक पाऊल पूर्ण ताकदीने आणि निर्धाराने उचलले जायला हवे. प्लॅस्टिकयुक्त शिसे, कॅडमियम आणि पारा यांचा थेट मानवाशी संपर्क येतो तेव्हा रोगप्रतिकार शक्ती कमी होतेच, खेरीज कर्करोगाचा धोकाही वाढतो. मानवच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीसाठी पॉलिथीनचा वापर घातक आहे. त्यामुळेच त्यावर बंदी घालणे सर्वांच्या हिताचे आहे.

या पार्श्वभूमीवर इंदूर महापालिकेकडून बचतगटांच्या माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातला तरुणवर्गही यादिशेने पुढाकार घेत आहे. प्लॅस्टिकवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरात अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक लाखाहून अधिक कागदी पिशव्या तयार करून फळे, भाजी मंडई आणि अन्य वस्तूंच्या बाजारात वितरीत करण्यात आल्या. त्यामुळे सर्वच विक्रेते कापडी पिशव्यांचा वापर वाढवतील, अशी आशा आहे. त्याचवेळी शहरातली बहुतांश हॉटेल्स आणि काही रेस्टॉरंटमध्येही प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या जागी उसाच्या चोथ्यापासून आणि कॉर्न स्टार्चपासून बनवलेल्या कप, ताटल्या आणि ग्लासेसचा वापर सुरू झाला आहे. असे स्तुत्य प्रयोग देशाच्या प्रत्येक भागात केले गेले तर परिस्थिती बदलण्यास फार वेळ लागणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com