दिवाळीपूर्वीच दिवाळं!

दिवाळीपूर्वीच दिवाळं!

डॉ. अरुण स्वादी

विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) फक्त 7 दिवसांच्या फरकाने आलेले दोन रविवार भारतीय क्रिकेटच्या (Cricket) दृष्टीने घातवार ठरले. कारण आमच्या संघाने फक्त दोन सामने खेळून व ते गमावून दम तोडला आहे. आता उपांत्यफेरी गाठणे, मंगळावर जाण्याएवढे अशक्यप्राय दिसत आहे. आमची तज्ञ मंडळी भारताला (India) अजूनही संधी आहे, ते स्पर्धेबाहेर फेकले गेलेले नाहीत, असा आक्रोश करीत असले तरी सत्य हेच आहे की, आम्ही आता गाशा गुंडाळलेला बरा! तसेही बायोबबलमध्ये राहून आमचे खेळाडू कंटाळले होतेच.

त्यांची त्यातून होणारी सुटका आता फार दूर नाही. मान्य आहे, भारत कमनशिबी होता. मान्य आहे आम्ही दोन्ही वेळा नाणेफेक हरलो. मान्य आहे पडलेल्या दंवाने आमचे काम आणखी अवघड करून ठेवले, पण आम्ही फाईटच दिली नाही त्याचे काय? न्यूझीलंडविरुद्ध आम्ही मोजून 120 धावा केल्या. चेंडू खूप स्विंग होत होता, अशी थापही आम्हाला मारता येणार नाही.

गोलंदाजीचा दर्जा फार उच्च होता, असेही नाही, पण आम्हाला काहीच जमले नाही. उंच-उंच शॉट मारत आम्ही विल्यमसनच्या सहकार्‍यांना फिल्डिंग प्रॅक्टिस दिली. योगायोग पाहा! आमचे दोन्ही प्रमुख फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) टी-20 मध्ये फिरकीसमोर आंधळी कोशिंबीर खेळतात. दोघांनाही या ईशने सद्गती दिली. तो ‘सामनावीर’ झाला. वर राहुल आणि खाली रवींद्र सोडले तर आपले कोणतेही फलंदाज सातत्याने खेळत नव्हते.

त्यांचा गेलेला फॉर्म आणि आता राहुलचे अपयश हे आमच्या पराभवाचे खरे कारण आहे. त्यातच रिषभ पंत जबाबदारीने खेळायला लागल्यापासून त्याच्या धावा होत नाहीत, हा योगायोग आहे? भांगडा करणार्‍याला यक्षगान करायला सांगण्यासारखे आहे हे! आणि गोलंदाजीचे काय?

एक जसप्रीत बुमराह सोडला तर आमचा एक तरी गोलंदाज पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाच्या संघात बसेल? वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज आमच्या गल्ली गल्लीत सापडतील, म्हटल्यावर आमच्या नाकाचा शेंडा लाल झाला, पण हे आजतरी सत्य आहे. जाड भिंगाचा चष्मा घालून पाहा! त्याचा चेंडू एक इंचही फिरत नाही. कदाचित हीच मिस्ट्री असेल आणि आम्ही कोणाला काढले? युझवेंद्र चहलला! कुलदीप यादवच्याही आत्मविश्वासाचा फज्जा उडवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com