भाषा मरता देशही कसा मरे?

भाषा मरता देशही कसा मरे?

भाषा मेली तर ‘राष्ट्र’ मरते हे लक्षात घ्यायला हवे. भाषेचे महत्त्व केवळ संवादापुरते नाही तर भाषा समाज एकसंघ ठेवण्याचे काम करते. समाज एकसंघ आणि एकात्म राहिला की राष्ट्र एकसंघ ठेवण्यास त्यामुळे प्रयत्न होतो. त्यातून माणसे जोडली जातात, हे लक्षात घ्यायला हवे.

जगाच्या पाठीवर भाषा हे माणसांच्या संवादाचे माध्यम राहिले आहे. भाषा आहे म्हणून माणसे एकत्रित येतात आणि राहतात. भाषेमुळे माणसांची नाती अधिक घट्ट होत जातात. समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम भाषेतून होत असते. भाषेच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी विचारांची पेरणी होते. तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भाषा हे महत्त्वाचे साधन आहे. विचारांची देवाणघेवाण झाली की व्यक्ती आणि समाजाची प्रगती होत असते. समाज प्रगत झाला की राष्ट्र विकासाची झेप उंचावते. त्यामुळे एकूणच विकासाच्या केंद्रस्थानी भाषाच असते. भाषा हे समाज व राष्ट्र विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे जेथे भाषा विकासाचे प्रयत्न होतात ते देश प्रगती करतात, हे लक्षात घ्यायला हवे. जगाच्या पाठीवर कोणतीही भाषा जगवणे ही राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे म्हणून जग त्या भाषेत संवाद साधते. मात्र ती भाषा समृद्ध व्हावी म्हणून इंग्रजीचे भाषा अभ्यासक त्या देशात किती प्रयत्न करतात याचादेखील विचार करायला हवा. कोणतीही भाषा आपोआप समृद्ध होत नाही तर तिच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते. आपण मातृभाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी किती प्रयत्न करतो, हा खरा प्रश्न आहे.

भाषेशिवाय जगणे ही कल्पना करणे अवघड आहे. अभिव्यक्ती ही माणसांची नितांत गरज आहे. अभिव्यक्तीशिवाय माणूस जगू शकत नाही. अभिव्यक्तीचे अनेक मार्ग असले तरी भाषा हे अधिक महत्त्वाचे साधन आहे. भाषा संवादाचे काम करत असते. भाषेद्वारे होणारी देवाणघेवाण व्यक्तीला ज्ञानाच्या उंचीवर घेऊन जात असते. भाषेतून व्यक्तीची अभिव्यक्ती, संशोधने, विविध स्वरुपातील तत्त्वज्ञान, साहित्य प्रसुत होत असते. या विविध प्रकारे होणार्‍या अभिव्यक्तीने समाजात शहाणपणाची पेरणी होत जाते. त्यामुळे भाषा जिवंत राहण्याची गरज सातत्याने व्यक्त करण्यात येते. भाषा मेली की स्वातंत्र्याची प्रेरणा मरत असते. भाषेने समाजात एकात्मता साधली जात असते. त्यामुळे भाषा जगवण्याचे सर्वांपुढे आव्हान आहे. आपल्याकडे आजही विविध भाषा बोलल्या जातात. घरची भाषा, परिसर भाषा, शिक्षणाची भाषा अशा स्वरुपात भाषेचा व्यवहार सुरू असतो. भाषा कोणतीही असली तरी ती मुळात हृदयाशी नाते सांगणारी असते. आपण कोठेही गेलो तरी आपल्या भाषेत संवाद साधणारी व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण कोणत्याही भेदाशिवाय तिच्याशी नाते सांगतो. माणसे जोडण्याकरता भाषा हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या भाषेपासून तुटतो तेव्हा ते आपल्या संस्कृती, परंपरांपासून आणि आपल्या भाषेच्या नात्यातील हृदयापासून तुटणे असते हे लक्षात घ्यायला हवे. येत्या शतकाअखेरीस जगभरातील सहा हजार भाषांपैकी अनेक भाषा मृत्युपंथाला लागतील, असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे युनोस्कोच्या वतीने आपल्या बोलीभाषा संभाळा, असे आवाहन केले गेले आहे.

खरेतर कोणत्याही समाजाचे वैभव हे भाषा असते. त्यामुळे आपल्या भाषेत ज्ञान नाही असे म्हणून स्वतःच्या भाषेकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचे मोठे नुकसान होत असते. आज मराठी भाषा टिकवण्याचे काम अशिक्षित, ग्रामीण क्षेत्रात कष्टकरी असलेल्या वर्गाने अधिक केले आहे. शिकलेल्या माणसांना इंग्रजीची अधिक भूक आहे. दोन मराठी माणसे भेटली तरी ते मराठीत बोलण्याऐवजी इंग्रजीत बोलणे का पसंत करतात, हे कळत नाही. आपल्याला ज्ञानाची ओढ आहे म्हणून परकीय भाषा शिकण्यास विरोध नाही, पण आपली स्वभाषा मरणार नाही यासाठी मात्र प्रयत्न करण्याची गरज आहे. भाषा मेली तर काय होते? कदाचित ‘देश’ राहतो पण ‘राष्ट्र’ मरते हे लक्षात घ्यायला हवे. जागतिकीकरणानंतर जगातील अनेक स्थानिक बोलीभाषांची प्रतिष्ठा हरवली. इंग्रजी ही ज्ञानाची भाषा ठरवून काही लोक मोकळे झालेत. मात्र ती एकमेव ज्ञानभाषा आहे असे समजून आपण आपले व्यवहार सुरू ठेवले. जगातील अनेक भाषा या इंग्रजी भाषेमुळे लोप पावल्या आहेत. आपल्या देशात इंग्रज आले तरी पण मराठी भाषा मेली नाही. तिच्यातील असलेल्या सत्वामुळे टिकून राहिली. ती भाषा बोलणारी माणसे देखील या प्रक्रियेत महत्त्वाची ठरतात.

पोलडंवर आक्रमण झाले तेव्हा तो देश आक्रमणवाद्यांनी ताब्यात घेतला होता. त्यांनी आपला राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पोलंडच्या लोकांनी आक्रमणवाद्यांचे सर्व नियम, कायदे स्वीकारले मात्र लोकांनी सांगितले की, फक्त आमच्या भाषेतून आपला कारभार. ठेवा. लोक व्यवहारात भाषा आली की तिच्या मृत्यूची शक्यता मावळते. शिक्षणात व प्रशासनात भाषा राहिली तर त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्याची प्रेरणा जिवंत राहते. त्यामुळे पोलंडमध्ये पुन्हा स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली.

भारतीय स्वातंत्र्य समराचा विचार करता सामान्य माणसांना एकत्रित करण्यासाठी, लोकांची मने प्रज्वलित करण्यासाठी मराठी भाषेचे योगदान मोठे राहिले आहे. टिळकांनी त्याकाळात केसरीत जाज्वल्य मराठी भाषेत अग्रलेख लिहून इंग्रजावर हल्ले चढवले. त्या हल्ल्याने सामान्य माणसांच्या मनात स्वातंत्र्याचा विचार पेरला गेला. त्याचवेळी येथील माणसांच्या मनात स्वातंत्र्याची भावना प्रेरित व्हावी याकरता अनेक नाटककार, कलावंतांनी नाटके लिहून सादर केली. त्या नाटककारांनी विविध विषय घेऊन त्यातून स्वातंत्र्याची गरज आणि त्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित केले. त्यातून समाजमन प्रज्वलित करण्याचा प्रयत्न झाला. ती नाटके जर मराठी भाषेत नसती तर सामान्य मराठी माणसांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे शक्य झाले नसते. त्या अर्थाने समाजाला एकाच विचाराने एकत्रित बांधून ठेवणे आणि समाज म्हणून एकाच दिशेचा प्रवास करणे यासाठी भाषा कारणीभूत होत असते. त्यामुळे भाषेचे महत्त्व केवळ संवादापुरते नाही तर भाषा समाज एकसंघ ठेवण्याचे काम करत असते. समाज एकसंघ आणि एकात्म राहिला की राष्ट्र एकसंघ ठेवण्यास त्यामुळे प्रयत्न होतो. त्यातून माणसे जोडली जातात, हे लक्षात घ्यायला हवे. त्यातून प्रगत राष्ट्र म्हणून प्रगतीची झेप भाषेमुळे घेणे शक्य आहे. त्यामुळे आपल्याला समाज व राष्ट्राच्या विकासाकरता आपली भाषा जतन करण्याबरोबर ज्ञानभाषा बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

( लेखक शिक्षण अभ्यासक आणि राज्य प्राथमिक अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com