आद्य नीग्रो क्रांतीकारक

'अंकल टॉम्स केबिन' कादंबरीनंतर नीग्रोंच्या दास्यमुक्तीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला. त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणा-या मुठभर गो-या लोकांच्या प्रयत्नांना ही कादंबरी बळ देऊन गेली. अंकल टॉमने नीग्रो गुलामांच्या मनात आपल्या हातापायातील बेडया आणि मानेवरील जोखडाबद्दल अस्वस्थता निर्माण केली. तोपर्यंत ही अस्वस्थता प्रत्येकच गुलामाच्या मनाने अनुभवली असले; परंतु... धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
आद्य नीग्रो क्रांतीकारक

"माझ्या आईच्या वेदना माझ्या मनात प्रतिमा होऊन राहिल्या होत्या. त्यात सामावले होते सारे दारिद्रय, सारे अज्ञान, असहायता, वेदनामयता, भांबावलेपण, भुकेने व्याकुळलेले दिवस आणि रात्री, अस्वस्थ भ्रंमती, निष्फळ प्रतीक्षा, अनिश्चितता, भीती, भयानकता, निरर्थक यातना आणि अपार दुःख." प्रख्यात नीग्रो लेखक रिचर्ड राइट यांनी केलेले हे विधान एका अर्थाने नीग्रो साहित्याचा गाभा व्यक्त करणारे आहे.

हा परिच्छेद वाचतांना वामन निंबाळकर यांच्या आई हया कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. याचाच अर्थ नीग्रो आणि दलित साहित्याची नाळ जोडलेली दिसते. कारण रिचर्ड राइटची 'आई' असो की वामन निंबाळकरांची 'आई' यांच्या जीवनसंघर्षात असलेले अद्वैत. 'अंकल टॉम्स केबिन' कादंबरीनंतर नीग्रोंच्या दास्यमुक्तीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला. त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणा-या मुठभर गो-या लोकांच्या प्रयत्नांना ही कादंबरी बळ देऊन गेली.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
नीग्रो चोखामेळा

अंकल टॉमने नीग्रो गुलामांच्या मनात आपल्या हातापायातील बेडया आणि मानेवरील जोखडाबद्दल अस्वस्थता निर्माण केली. तोपर्यंत ही अस्वस्थता प्रत्येकच गुलामाच्या मनाने अनुभवली असले; परंतु तिला अंकल टॉमने शब्दात व्यक्त होता आले. अंकल टॉम एक पूर्णपणे परमेश्वर शरण व्यक्तिमत्व दाखवण्यात आले. त्यामागे एक मोठे कारण होते. अमर्याद अमानुष यातनांनी खचलेला नीग्रो मालकांच्या देवाला शरण जातो. हयाचा शोध घेतांना आपल्याला समजते की मी कोण आहे? हयाचेच विस्मरण होण्यापर्यंत त्यांची गुलामी भयाण होती. आपल्याकडे विविध महानगरांमध्ये असलेल्या रेडलाईट एरियांबद्दल आपण ऐकतो, वाचतो आणि बोलतो. त्यावेळी अनेक सामान्य लोक हया वस्तीत वैश्या व्यवसाय करणा-या महिला याविरोधात बंड का करत नाहीत? अथवा त्या तेथून पळून का जात नाहीत? असे प्रश्न वा विचार व्यक्त करतांना दिसतात.

हे लोक असा विचार करतात यामध्ये त्यांना वास्तवाची माहिती नसणे, हा भाग अधिक असतो. एका चाकोरीतील सामान्य जीवन जगणा-या माणसाला असे प्रश्नच पडू शकतात. त्यामुळे त्यांचा राग करण्यात काही एक अर्थ नसतो. हया सामान्यांना हे माहित नसते की नेपाळ किंवा दक्षिण भारतातील एखाद्या भागातील एखादी पोटची मुलगी वयात येतांना आई-बापाकडूनच दलांलांना विकली जाते. आपल्या गावाच्या बाहेर एक विशाल व अथांग जग आहे. याची साधी कल्पना या अशिक्षित अजाणत्या मुलीला नसते. तिला एखादया महानगराच्या अशा नरकात आणले जाते. त्यावेळी ती विद्रोह कशी करू शकणार अथवा पळून कुठे जाणार. अखेर स्वतःचे प्राक्तन समजून किंवा जीवन असेच असते असा समज करुन, ती मुलगी हया नरकाच्या दलदलीत कायमची गाडली जाते.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

अगदी तसेच नीग्रोंच्या बाबतीत झाले होते. एखादया प्राण्याला पकडून विकावे. त्याप्रमाणे त्यांना पकडून अमेरिकेच्या बाजारात विकले गेले. निसर्गाला परमसत्ता मानून त्याच्या कृपाशीर्वादाने आदिम जीवन जगणा-या हया निष्पाप जीवांना आपण ज्या परिसरात जन्मलो-वाढलो त्याचे बाहेर एक अत्यंत निर्दयी भांडवली जग आहे. हे माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. अमेरिकेत आल्यानंतर तेथील माणसांच्या रंगापासूनच कदाचित आपल्यापेक्षा वेगळया रंगाची माणसं पाहून नीग्रों गुलामांच्या अत्यंत मर्यादित अनुभव विश्वाला धक्का बसला असेल. एखादया वेळेस ही माणसं आहेत ना हया विचाराने त्यांना भयभीत केले असेल. अमेरिकेच्या विशुद्ध भांडवली जगात केवळ काम करणारे 'मशिन' म्हणून हया लोकांना आणण्यात आले. यामुळे काळाच्या ओघात नीग्रोंना आपली भाषा, धर्म, संस्कृती आणि चालीरीती हयांचे विस्मरण होत गेले. सुरवातीच्या दोन पिढयांपर्यंत आपल्या मातीचा गंध त्यांच्या स्मरणात असेल; परंतु तिस-या पिढीपासून मात्र त्यांच्या घामाने-रक्ताने भिजलेल्या अमेरिकेच्या मातीचा गंधच त्यांना आपलासा वाटू लागला असेल. असे असूनही ही माती आणि माणसं त्यांना आपले तर सोडा साधे माणूस मानायला देखील तयार नव्हते.

आता त्यांच्या जवळ स्वतःची वेगळी ओळख म्हणून केवळ त्यांचा रंग आणि शरिर होते. गो-यांनी त्यांचे हे वेगळेपण स्वतःची वासना भागवण्यासाठी आणि स्वार्थ साधण्यासाठी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. नीग्रो महिलांवर बलात्कार केले आणि गुलाम जन्माला घालण्याचे यंत्र म्हणून त्यांचा वापर केला. हया वर्णसंकरातून एक वेगळाच वर्ण तयार झाला. श्वेत रक्ताच्या बलात्काराने तयार झाला असला आणि त्याच्यामध्ये श्वेत रक्ताचे व वर्णाचे अस्तित्व असले तरी तो नीग्रोच गणला गेला. अशा प्रजेला 'मुलाटो' असे संबोधले गेले. आपल्याकडील चातुर्वण्य व्यवस्थेत देखील नेमके हेच झाले आहे. मनुकृपने ठरवण्यात आलेल्या उच्च वर्णीय पुरुष आणि शुद्र स्त्रीच्या संकरातून निर्माण झालेल्या अपत्यांना आईचे शुद्रत्वच प्रदान करण्यात आले. कारण आई बदनाम झाली तरी चालणार होते; परंतु उच्च वर्णीय बापाचे साधे नाव देखील उच्चारले जाता कामा नये. हे त्यामागचे सुनियोजित षडयंत्र होते.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
संविधान हाच धर्म

तसेच सेवा करण्यासाठी शुद्रांची संख्या वाढणे देखील महत्वाचे होते. १८५२ साली हॅरिएट बीचर स्टोव हया शिक्षिकेने आपल्या 'अंकल टॉम्स केबिन' हया कादंबरीतून सर्वात प्रथम गो-यांच्या काळया अमेरिकेचे दर्शन जगाला घडवले. त्यानंतर नीग्रो गुलामी विरोधातील आवाज अधिक बुलंद झाला. असे असले तरी त्यापूर्वी १८३१ साली 'नॅट टर्नर' नावाच्या एका नीग्रोने ६० हजार नीग्रोंना सोबत घेऊन बंड केले होते. तोपर्यंत नीग्रो गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे विशेष असे नेतृत्व निर्माण झाले नव्हते. नॅट टर्नर हा आपण नीग्रोंचा पहिला मोठा नेता म्हणू शकतो. २ ऑक्टोबर १८०० साली जन्मलेला नॅट टर्नर हा एक नीग्रो धर्मोपदेशक होता. ज्याने १८३१ मध्यक व्हर्जिनियाच्या साउथॅम्प्टन कउंटीमध्ये गुलाम नीग्रो आणि गुलामीतून मुक्त झालेल्या लोकांच्या चार दिवसांच्या बंडाचे आयोजन केले होते.

अमेरिकन गो-यांनी नीग्रोंना आपल्या मालकांना काही पैसे देऊन मुक्तता मिळवण्याची संधी दिली होती. हा पैसा उभा करणे सर्व गुलामांना शक्य नव्हते. स्वातंत्र्याची आस असलेले आणि अतिरिक्त श्रम करण्याची शारीरिक क्षमता असलेले मोजके नीग्रो गुलाम अशी मुक्तता मिळवू शकत होते. तरी त्यांना फसवूण अथवा त्यांचे अपहरण करुन दुस-या भागात पुन्हा गुलाम म्हणून त्यांची विक्री करणा-या गो-या बदमाशांच्या टोळया अस्तित्वात होत्या. बेंजामिन टर्नर नावाच्या गो-या मालकाकडे असलेल्या गुलामाच्या मुलाचे नाव नॅट होते. १८३१ साली त्याने केलेल्या उठावानंतर तो नॅट टर्नर म्हणून ओळखला जाऊ लागला. मालकाचे आडनाव नीग्रो गुलामाला दिले जात असे. कारण तो कोणाचा गुलाम आहे, हे सहज ओळखता आले पाहिजे. तसेच निग्रोंना स्वतःचे नाव व आडनाव असण्याचे कारणच नव्हते. कारण ते माणसेच नव्हते तर पशु होते. नॅटच्या वडिलांनी गुलामीतून मुक्तीसाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे बालपणात काही काळ नॅटला मुक्त जीवन जगता आले होते.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

याकाळात तो वाचायला-लिहायला शिकला. 'बायबल'च्या वाचनाने त्याच्या मनावर सखोल धार्मिक प्रभाव पडला. उपवास-प्रार्थना यांच्यामुळे नॅटची परमेश्वरावरील श्रद्धा अधिकच दृढ होत गेली. तो आणि त्याचे वडिल ज्या बेंजामिन टर्नरचे गुलाम होते, त्याचा १८१० साली मृत्यू झाला. त्यावेळच्या व्हर्जिनियातील गुलामसंदर्भातील कायदयानुसार नॅटला बेंजामिनचा मुलगा सायमनचा गुलाम व्हावे लागले. तोपर्यंत नॅट एक धर्मोपदेशक बनला होता. त्याला काळयांसोबतच काही गोरे अनुयायी देखील मिळाले होते. त्याला दृष्टांत झाले होते. असा समज अनेकांना झाला होता. कदचित गुलामांच्या मुक्तीसाठी नॅटने स्वतः देखील तसा प्रचार केला असेल. नीग्रो गुलामांना त्यांचाच एक नीग्रो बायलबलचा उपदेश देऊ लागला तेंव्हा हे लोक त्याला 'प्रेषित' म्हणून संबोधू लागले.

एथेल्ड्रेड टी ब्रँटली सारखा गोरा नॅटचा एकनिष्ठ मित्र आणि अनुयायी होता. २१ ऑगस्ट १९३१ रोजी नॅट टर्नरने आपले नियोजित बंड केले. त्याने आपल्या हया बंडाला धार्मिकसंदर्भ दिला होता. तसेच सूर्यग्रहणाचा शुभाशुभ संदर्भ जोडून त्याने आपल्या बंडाची योजना आखली होती. नॅटचे बंड फसले आणि त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्यावर दिखावा म्हणून खटला चालवण्यात आला त्याला मारूनच टाकायचे होते; परंतु खटल्याचे नाटक करून त्याच्या हत्येला न्यायाच्या कक्षेत बसवायचे होते. अखेर सहा आठवडयांच्या न्यायालयीन नाटकानंतर त्याला मृत्यूदंड देण्यात आला.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
अखेर नदीचे पाणी पेटले..

११ नोव्हेंबर १९३१ रोजी वयाच्या ३१ वर्षी हया आद्य नीग्रो क्रांतीकारकाला मृत्यूदंड देण्यात आला. त्याच्या बंडातून त्याने सुमारे ५५ नीग्रो गुलामांची मुक्तता करण्यात यश मिळवले. तो आणि त्याचे बंड अल्पायुषी ठरले. असे असले तरी नॅट टर्नरने नीग्रोंच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण केली होती. नॅट टर्नरचे सर्व कार्य धर्मकेंद्रित राहिले. आपले स्वत्व गमावलेल्या नीग्रोंना आपल्या मालकाचाच देव आपला वाटला.

आद्य नीग्रो क्रांतीकारक
कॅलिफोर्निया गोल्ड रश

धर्मातील दया, क्षमा, करूणा इत्यादी तत्त्वांचा आधार घेऊनच अशा परिस्थितीत आपल्या मुक्तीची बीजं रुजवता येणे शक्य आहे. याची जाणीव नॅट टर्नरला असणार. तत्कालीन परिस्थितीत त्याला असेच करणे शक्य होते. मी कोण आहे? या प्रश्नाने अस्वस्थ आणि परिस्थितीने हतबल नीग्रो गुलाम धर्मभोळे होणे अपरिहार्य होते. त्यांच्या जीवनातील अमर्याद क्रौर्याला सहन करत जगण्यासाठी परमेश्वर नावाची अज्ञात व अलौकिक परमशक्तीच आधार देऊ शकत होती. यातूनच भविष्यात त्यांची विवेकवादी विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होत जाणार होती. त्यामुळे कादंबरीतील अंकल टॉमच्या आधी नॅट टर्नर याने आपण मुक्त होऊ शकतो, हा विचार नीग्रोंच्या मनात पेरला होता.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com