पंधरा दिवसांपूर्वी राज्यात पावसासाठी प्रतीक्षा केली जात होती. लोकांचा धीर सुटत चालला होता. खरीप हंगाम वाया गेला, अशी भावना होत चालली होती. आता ती चिंता दूर होत आहे. अर्थात, पावसाने सर्वत्र हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पिण्याच्या पाण्याचे संकटही अजून कायम आहे. काही ठिकाणी अतीपावसाचाही धोका आहेत. ताज्या पाऊसमानाचा वेध.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. गोवा, कोकण, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची काही धरणे ओसंडून वाहत असली तरी महाराष्ट्रातल्या जायकवाडी, कोयना, उजनी या मोठ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा होणे बाकी आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस पडता झाला असला तरी काही धरणे अजूनही पाण्याची आस बाळगून आहेत. मान्सूनचे तंत्र बिघडले आहे. त्याचा शेती आणि शेतकर्यांवर परिणाम होत आहे. कोकण आणि विदर्भाच्या बर्याच भागांमध्ये, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. गोदावरी खोर्यातला विष्णुपुरी प्रकल्प भरला आहे. जळगाव, चाळीसगाव परिसरातल्या हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे जायकवाडी आणि उजनी धरणातला पाणीसाठा वाढणार असला तरी महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातल्या निफाड ते सांगोला या भागातला अपवाद वगळता अन्य तालुके अजूनही तहानलेले आहेत. राज्याच्या बर्याच भागात नद्या वाहत्या आणि कालवे कोरडे अशीही स्थिती आहे. मोठ्या धरणांमधला पाणीसाठा 37 टक्क्यांहून अधिक होत नाही तोपर्यंत वरच्या भागात कालव्यांना प्यायला पाणी सोडता येत नाही. त्यामुळे पर्जन्यछायेच्या भागातले कालवे अजूनही कोरडे आहेत. काही दिवसांपूर्वी ‘नको नको रे पावसा, असा अंत पाहू’ अशी स्थिती होती. आताही बर्याच भागात ‘नको नको रे पावसा, असा अंत पाहू’ हीच स्थिती आहे, फक्त त्यामागची भावना वेगळी आहे.
धुव्वाधार पावसाने अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतजमीन खरवडून निघाली आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे एक हजार पर्यटक अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. भंडारदरा, निळवंडे धरणात क्षमतेच्या पन्नास टक्के पाणी जमा झाले आहे. नगर जिल्हा हा गोदावरी आणि कृष्णा खोर्यात विभागला आहे. गोदावरी आणि भीमा नद्या वाहत्या झाल्या असल्या तरी नगर शहराच्या शेजारची सिना मात्र अजूनही तहानलेली आहे.
पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेतच, खरिपातली पिकेही पाण्यात आहेत. त्यामुळे खरिपाचे भवितव्य काय, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. पुढील काही दिवस पावसामध्ये सातत्य राहणार आहेच, पावसामध्ये सातत्य असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. लहान-मोठे नदी, नाले आणि तलाव तुडुंब भरले असले तरी अप्पर वर्धा धरणाची पाणीपातळी मंद गतीने वाढत आहे. महाराष्ट्राच्या बर्याच भागात कमी काळात जास्त पाऊस झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणात जादा पाणी आले आहे; परंतु काही धरणांच्या लाभक्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही.
कमी काळात जादा पाऊस पडल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच मातीचा थरही निघून जातो. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय भूगर्भातली पाण्याची पातळी वाढत नाही. भीज पावसाने पाण्याची पातळी वाढते. पावसामुळे पश्चिम विदर्भातली 111 गावे प्रभावित झाली आहेत. नाशिकमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इगतपुरी तालुक्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
इगतपुरी तालुक्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहिला. संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. इगतपुरी, घोटी शहरासह ग्रामीण भाग आणि एकूणच तालुक्याचे जनजीवन प्रभावित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. सप्तशृंगी गडावर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दहा भाविक जखमी झाले. आता भाविकांना गडावर येण्यास दीड महिना बंदी घालण्यात आली आहे. राज्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पावसाविना खरीप हंगाम हातचा जाणार, अशी स्थिती होती. तर आता खरिपातील सर्वच पिके पावसाने साचलेल्या पाण्यात आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्यांना कायम बसत आहे. यंदा उशिरा झालेल्या पावसावर शेतकर्यांनी अल्पावधीत खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. शिवाय समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही झाली, मात्र उगवण होताच अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्यात आहेत.
शेतांना तळ्याचे स्वरूप आले. यामुळे कांदा, मूग, भुईमूग, बाजरी ही पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली. अशीच स्थिती राहिली तर शेतकर्यांसमोर दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अधिक शेतकर्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊन पेरण्या उरकत्या घेतल्या, मात्र पेरणी होताच सुरू झालेला पाऊस आता आठ दिवसांपासून कायम आहे. पेरणी होताच अधिक पाऊस झाला तर पिकांची वाढ खुंटतेच; शिवाय पिकेही पिवळी पडायला लागतात. हवाहवासा असलेला पाऊस चार दिवसांमध्येच नकोसा झाला आहे. अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले तर मात्र शेतकर्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा बी-बियाणांसह खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
त्यामुळे दुबार पेरणीसाठी पुन्हा अधिकच्या किमतीने बियाणांसाठी खर्च करावा लागणार. शिवाय बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होणार की नाही, हाही मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे अगोदरच खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. 15 जुलैपर्यंत पेरण्या झाल्या तर सरासरीएवढे उत्पादन मिळते; परंतु पावसामुळे दुबार पेरणीला उशीर झाल्यास खर्च करूनही उपयोग होणार नाही.
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक यासह अर्धा डझनहून अधिक राज्यांमध्ये पुराने कहर केला असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरवर्षी अनेक भागात पूर येतात, पण पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था का केली जात नाही आणि त्यासाठी राज्य सरकारे आपापल्या शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी का ठरवत नाहीत? वास्तविक, आपल्या देशातल्या नगर नियोजनाबाबत राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नाहीत. नगर नियोजनातल्या त्रुटींमुळे देशातली महानगरेच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील शहरे आणि अगदी मोठ्या शहरातील जनताही त्रस्त आहे.
नियोजनशून्य बांधकामांमुळे थोडासा पाऊसही संपूर्ण शहरासाठी मोठी आपत्ती ठरतो. दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येकाने मुंबईतल्या रस्त्यांचे रूपांतर नदीत होताना पाहिले आहे, पण दिल्ली, एनसीआरसारख्या शहरात पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरते तेव्हा त्याला पावसापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांची बेफिकीरी अधिक कारणीभूत असते. यात बदल कोण आणि कसा करणार हाच कळीचा प्रश्न आहे.