आजीचे वेगळेच काहीतरी

jalgaon-digital
4 Min Read

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

मागील लेखात प्रथमेश आजीवर व बहीण प्रज्ञावर खूपच रागावला होता. आजोबा त्याचा राग शांत करत होते. त्याला आजीचा राग तर आला होता, पण आजीचा आवडीचा कागद पाहायची उत्सुकता लागली होती. आजीने लिहिलेल्या कागदाची घडी उघडली आणि वाचू लागला. त्यात आजीने लिहिले होते गोष्टी ऐकणे, इतरांना मदत करणे, औषधांची नावे व त्याविषयीची माहिती वाचणे. हे वाचताच प्रथमेशने कपाळाला हात मारून घेतला. ‘हे भगवान! आजी का तो कुछ करना पडेगा।’ असे म्हणत तो पळतच आजीकडे गेला आणि गॅलरीतल्या झाडांना पाणी घालणार्‍या आजीच्या कपाळाला हात लावून म्हणाला, आजी, तुला बरं आहे ना गं! तू हे काय लिहिलेस? औषधांची नावे व त्याविषयीची माहिती वाचणे. ही काही आवड असते का? आणि या आवडीतून करिअर कसे काय करणार?

प्रथमेशच्या प्रश्नाने आजी भानावर येत म्हणाली, आता आले माझ्या लक्षात. तू का माझ्या अंगाला हात लावून पाहत होतास. तुला वाटले की, मी भलतेच काहीतरी लिहून दिले. बरोबर आहे ना! आता ऐक. तुझी आजी पण चार बुकं शिकली आहे आणि घरात तुझे आजोबा, तुझा बाबा, तुझी आई आजच्या घडामोडींवर तावातावाने चर्चा करतात; तेव्हा मी बोलत नसली म्हणून काय झाले, ऐकत तर असते ना! आजीने असे म्हणताच, आजीचे बोलणे मध्येच तोडत प्रथमेश म्हणाला, हो आजी, आता तू काय म्हणशील सांगू, चार पावसाळे आम्ही तुमच्यापेक्षा जास्त खाल्लेत. प्रथमेशने असे म्हणताच आजी आणि नातू दोघे जोरजोरात हसू लागलेत. त्या दोघांचे बोलणे आतून ऐकणारे आजोबा म्हणाले, दोघे मूळ मुद्यावर या. नुसते हसतच नका बसू. तितक्यात प्रथमेश कोणाला, आजोबा हँसना सेहत के लिए अच्छा होता है। हो रे लबाडा! मला माहीत आहे, पण तू खेळायला पळशील आणि तुझी शंका तशीच राहून पुन्हा नंतर तुझ्या आजीचे डोकं खाशील आणि नंतर तुझी आजी माझे डोकं खाईल. त्याचे काय! हे मात्र खरे हं आजोबा!

आजी म्हणाली हे बघ बेटा, तुझ्या आजोबांना व मला डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधांच्या बाटल्यांंवरील, गोळ्यांच्या रॅपरवरील सर्व माहिती वाचून तू सांगत असतोस. या औषधात कोणते घटक पदार्थ आहेत, हे औषध घेतल्यावर काय होईल? औषध-गोळ्या कुठे ठेवायच्या? अशा अनेक बारीकसारीक गोष्टी सांगत असतोस. कुणाकडे आपण जातो आणि एखादी औषधाची बाटली, औषधाच्या गोळ्या दिसताच तू ते सरळ उचलून वाचत बसतोस आणि वाचून झाल्यावर विचारतो, काकू, हे औषध कोण घेते? का घेते? असे प्रश्न विचारून औषधांची सर्व माहिती घेत राहतोस. दवाखान्यात गेल्यावर पण भिंतीवर लावलेल्या औषधांच्या जाहिराती लक्षपूर्वक वाचत असतोस. बाजारात कोणते नवीन औषध आले याची माहिती तर तुलाच आधी असते. गुगलवर पण तू औषधांविषयीच माहिती शोधत असतोस. लोणच्याच्या बरणीत प्रज्ञाने स्टीलचा चमच तसाच ठेवल्यावर तिच्यावर किती ओरडतोस? तिला म्हणतोस, कळत नाही का? लोणच्यात स्टीलचा चमच ठेवल्यावर रिअ‍ॅक्शन होते. तुझ्या आईच्या स्वयंपाकातही केमिकल रिअ‍ॅक्शनची तुझी जंत्री सकाळपासून सुरू होते आणि हे सर्व मी ऐकत असते बरं का? यावरूनच तू औषधनिर्माण क्षेत्रात करिअर करतोस की काय! बाप रे! आजीने तर कमालच केली! मानना पडेगा आजी को।

प्रथमेश असे म्हणताच आजी-नातूच्या गप्पा ऐकणारे आजोबा प्रथमेशला म्हणाले, आता कळाले का तुला! तुझ्या आजीशी मी लग्न का केले? आजोबा व प्रथमेश जोरजोरात हसू लागले. प्रथमेशला त्याच्या शंकेचे उत्तर मिळताच तो म्हणाला, मी पळतो आता रितेश, संकेत, चिन्मयसोबत खेळायला. असे म्हणत प्रथमेश घराबाहेर पळाला नि तुम्हीही आता खेळायला जा मुलांनो. तुम्ही खेळून आल्यावर आपण पुढची आवड व करिअरविषयी जाणून घेऊया! खूप खेळा, नवीन कौशल्य शिका आणि स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करायला तयार राहा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *