झोकून द्या, यश तुमचेच!

झोकून द्या, यश तुमचेच!

विद्यार्थीदशेतील महत्त्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत. वर्षभर केलेल्या अभ्यासाबरोबरच उज्ज्वल यशाची वाट दाखवण्यासाठी या काळाचे खूप महत्त्व आहे. यासाठी टी-20 अथवा एकदिवसीय सामन्यातील शेवटच्या षटकांचे उदाहरण घेता येईल. या षटकांमध्ये ज्याप्रमाणे अधिकाधिक धावा खेचल्या जातात त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वीच्या उर्वरित काही दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने अभ्यासात झोकून दिले तर यश नक्कीच मिळू शकते.

विद्यार्थ्यांच्या जीवनाचा विचार केला तर दहावी-बारावीच्या परीक्षा या त्यांचे पुढचे जीवन घडवणार्‍या, पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणार्‍या आणि भावी यशाची पायाभरणी करणार्‍या असतात. ताण हा दोन प्रकारचा असतो. एक सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह टेन्शन आणि दुसरे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह टेन्शन. सकारात्मक ताण हा उपयुक्त ताण असतो. विद्यार्थ्यांनी नकारात्मक ताण घेऊ नये. पण सकारात्मक ताण अवश्य घ्यावा. कारण त्याचा फायदा होणारच आहे. या ताणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. या शेवटच्या कालावधीत वाचलेले लक्षात राहण्याचे प्रमाण खूप जास्त असते. हे अनेकांनी अनुभवले असेल.

हे उरलेले दिवस म्हणजे परीक्षापूर्व कालावधी आणि प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर केलेल्या अभ्यासापेक्षाही उज्ज्वल यशाची वाट दाखवण्यासाठी या काळाचे खूप महत्त्व आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर टी-20 किंवा एकदिवसीय सामन्याचे देता येईल. यामध्ये 15 षटकांमध्ये 80 रन होतात किंवा 40 षटकांत 200 रन्स होतात. पण टी-20 च्या शेवटच्या पाच षटकांमध्ये अंतिम रन संख्या अनेकदा 180 पर्यंत जाते, तर एकदिवसीय सामन्यात ती 300 पर्यंत जाते. कारण या शेवटच्या पाच-दहा षटकांमध्ये खेळाडू तुटून पडलेला असतो आणि संपूर्ण क्षमतेने प्रत्येक फटका मारत असतो. हाच फॉर्म्युला आपण परीक्षेच्या या कालावधीसाठीसुद्धा लावू शकतो. या कालावधीत अभ्यासावर तुटून पडा. सराव परीक्षेत किंवा प्रीलिममध्ये कमी गुण पडले असतील तरीही निराश होण्याची अजिबात गरज नाही. पूर्ण क्षमतेने अभ्यासात झोकून दिले तर यश नक्कीच मिळू शकते, हे लक्षात घ्यावे.

विद्यार्थ्यांनी गुणांची काळजी कधीही करू नये किंवा कोणा दुसर्‍याचा विचारही करू नये. भावाला इतके गुण मिळाले किंवा मित्राला इतके गुण मिळाले अशी तुलना करू नये. ज्याने त्याने स्वतःशीच स्पर्धा करावी. सराव परीक्षेत 76 टक्के मिळाले असतील तर वार्षिकमध्ये 82 टक्के कसे मिळतील, असा विचार करून त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. मी सराव परीक्षांची उत्तरपत्रिका तपासून बघेन आणि प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नात माझे गुण कमी झाले आहेत, कुठली गोष्ट मला व्यवस्थित जमलेली नाही याचे निरीक्षण करेन, असा विचार करावा. टेस्ट सीरिजच्या उत्तरपत्रिका अभ्यासाव्यात आणि नेमक्या चुका कमी कराव्यात. असे प्रयत्न केले तर उत्तम गुण नक्कीच मिळू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची मार्कलिस्ट स्वतःच तयार करावी. ध्येय निश्चित करावे आणि त्यानुसार प्रत्येक विषयाच्या पुढे आपले गुण लिहावेत. निश्चयाचे फळ नक्कीच गोड असते. इतरांशी तुलना करून दुःखी होऊ नये. स्वतःसाठी लढण्याचा प्रयत्न करून, चुका दुरूस्त करून पुढे जावे.

विद्यार्थ्याने मनात कोणताही न्यूनगंड आणू नये. कमी गुण मिळाले तर काय होईल, अपयश आले तर काय होईल असा विचार न करता आपल्यासमोर आव्हान आहे आणि त्याला आपल्याला सामोरे जायचे आहे असा विचार करावा. मनाच्या श्लोकांमध्ये एक ओळ आहे, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ तर मी म्हणेन ‘सामर्थ्य आहे कष्टाचे, जो जो करील तयाचे’. तो हुशार आहे, मी नाही असा विचार करू नये. कष्ट करा, नियमित अभ्यास करा, गुण आपोआप तुम्हाला मिळतील.

या परीक्षेच्या कालावधीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी आपले रुटीन अजिबात सोडू नये. वर्षभर जर तुम्ही सात ते आठ तास झोप घेत असाल तर याही कालावधीत तेवढीच झोप घ्या. उगाच जास्त अभ्यास करायचा म्हणून चारच तास झोपायचे असे करू नये. तसेच पुरेसे जेवावे. काहीजण झोप येईल म्हणून कमी जेवतात. पण तसे करू नये. त्यामुळे एनर्जी कमी होते. थोडावेळ टीव्ही बघत असाल तर तोही बघावा. पण अगदी कमी वेळ. रोज खेळण्याची सवय असेल तर अर्धा-एक तास खेळून यावे. दिवसभर अभ्यासच घेऊन बसलात तर एका मर्यादेनंतर अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे आपल्या नियमित सहजप्रवृत्ती टाळू नयेत. खेळल्यामुळे चिंता, क्लेश, दुःख या सर्व गोष्टी मुले विसरतात. म्हणूनच मी सर्वांनाच सांगेन, सर्वांनीच मुलांना त्यांचे दैनंदिन सवयीच्या गोष्टी करू द्याव्यात. म्हणजे मुले मोकळ्या मनाने परीक्षेला सामोरी जातील. याकाळात रिलॅक्सेशन एक्सरसाईज खूप महत्त्वाचा असतो. दोन-अडीच तासांनी उठावे, वॉर्मअपचे थोडेसे व्यायाम करावेत. जेणेकरून ताण निघून जाईल किंवा दर दोन-अडीच तासांनी पाच मिनिटांसाठी शवासन करावे. शवासन अतिशय ऊर्जावर्धक असते. दिवसातून पाचवेळा जरी ते केले तरी संपूर्ण मनावरचा आणि शरीरावरचा ताण निघून जातो. ताण घालवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे उठून स्वयंपाक घरात जावे. डबे हुडकावेत, पालकांनीही याकाळात डब्यात शेंगदाणे, लाडू, चिवडा असा खाऊ भरून ठेवावा. डबा उघडून थोडेसे खावे आणि पुन्हा अभ्यासाला बसावे. अर्थात, हे खाणे नियंत्रणात असावे. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे या कालावधीत नातेवाईकांनी त्यांचे येणे-जाणे कमी करता आले तर करावे. सराव परीक्षेत किती गुण पडले, एवढेच पडले का, इतके कमी कसे पडले अशी निराशाजनक, नकारात्मक वाक्ये विद्यार्थ्यांसमोर बोलू नयेत. मुलांसमोर या गोष्टी बोलल्या तर मुले विचलित होतात. शुभेच्छा देण्यासाठीसुद्धा यावेळी जाऊ नये. जायचेच असल्यास परीक्षा झाल्यावर जावे. विद्यार्थ्यांना त्यांचे काम आनंदाने करू द्यावे. आई-वडिलांनीसुद्धा ‘तुला अमूक विषयात सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते बरे का, आता त्याचा जास्त अभ्यास कर’ अशा आशयाची वाक्ये वारंवार मुलांना ऐकवू नयेत. आपण कुठल्या विषयात कमी आहोत याची मुलांना पुरेपूर जाणीव असते. त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणजे ती मुले बरोबर त्या विषयाचा अभ्यास करतात.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार केला तर त्यांनी एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवावी की या दिवसात तळलेले, बाहेरचे मुळीच खाऊ-पिऊ नये. कारण या दोन गोष्टींमुळे घसा धरतो आणि आजारी पडण्याची दाट शक्यता असते. आजारी पडलात तर वर्षभराची संपूर्ण मेहनत व्यर्थ जाते. परीक्षा झाल्यावर तुम्ही हे पदार्थ कितीही खाऊ शकता. या कालावधीत विद्यार्थी खूप कमी पाणी पितात. तर असे न करता भरपूर पाणी प्यावे. घरी पालकांनी लिंबाचे सरबत तयार करून ठेवावे. जेवढे पाणी पोटात जाईल तेवढा ताजेपणा जाणवत राहील, हे लक्षात घ्यावे.

परीक्षेच्या काळातील आणखी एक धोका म्हणजे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. या मॅचेस विद्यार्थ्यांनी बघू नयेत असे नाही; पण ती किती वेळ बघावी याचे भान नक्कीच ठेवावे. पण एकदा टीव्हीसमोर बसल्यानंतर तीन-चार तास कसे जातात हे विद्यार्थ्यांना समजत नाही आणि मग मॅच संपल्यावर गेलेल्या वेळाबद्दल आणि राहिलेल्या अभ्यासाबद्दल खूप टेन्शन मुलांच्या मनावर येते. त्यातच भारत हारला तर मुलांचा पूर्ण मूडच जातो आणि मग स्वतःवर, आई-वडिलांवर चिडचिड होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मुलांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. आई-वडिलांनी याबाबतीत अधिक सतर्क असावे. गरजेपुरतीच 15-20 मिनिटे मॅच मुलांना बघू द्यावी. ही गोष्ट त्यांनी कौशल्याने करावी. अशा पद्धतीने परीक्षेला सामोरे जाताना अशा काही गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने केल्या तर उत्तम यश नक्कीच मिळवता येऊ शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com