फुलल्या आणि दरवळल्या बाजारपेठा

फुलल्या आणि दरवळल्या बाजारपेठा

- सत्तार शेख

मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक परंपरांची निर्मिती केली. यातील अनेक परंपरा आजही मानवाच्या प्रगतीला पोषकच ठरल्याचे दिसून येतात. सर्वधर्मसमभावाची कास धरणार्‍या भारतात इस्लाम धर्मियांनीदेखील हीच विवेकाची परंपरा सुरू ठेवली. रमजान महिन्यातील रोजा म्हणजे मराठी भाषेत उपवास होय. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मन इंद्रिये शुद्ध होऊन पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होऊन जीवन यशस्वी होते. म्हणूनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वाचा सण. या सणानिमित्त घरा-घरातले वातावरण अध्यात्मिक होऊन जाते. घरातली मनोरंजनाची साधने याकाळात बंद केली जातात. घरात प्रत्येकजण कुराण आणि पारेंचं पठण करत असतो. तरुण मुले याकाळात हे सारे वाचून इबादत करतात.

रमजानपूर्वीच खरं तर घरांत उत्सवी माहौल असतो. घरातल्या सर्व वस्तू घासून-पुसून स्वच्छ केल्या जातात. घरातले धुणे काढले जाते. घर-दुकानाला रंग-रंगोटी केली जाते. याकामात घरोघर तरुण आघाडीवर असतात. महिनाभर घरखर्चासाठी हात थोडासा सैलच केला जातो. घरात या महिन्यात बाहेरुन येणार्‍यास आदरातिथ्य करण्यास मोठं महत्त्व आहे.

या काळात खातीरदारी वा मेहमान नवाजीचं वेगळे महत्त्व सांगितलं जातं. रमजान महिन्यात जेवू घालणं मोठ्या सत्कर्माचं काम आहे. रोजेदारांना इफ्तार करवणं म्हणजे मोठं पुण्य समजले जाते. त्यामुळे महिनाभर इफ्तार पार्ट्या रंगत असतात. बड्या प्रशस्त हॉटेलपासून ते एखाद्या टुरिस्ट हबला जाऊन इफ्तार पार्ट्या हल्ली दिल्या जातात. मात्र अनेकांच्या घरातही इफ्तारच्या मोठ्या पंगती बसवल्या जातात. मोठ्या आत्मीयतेनं रोजेदारांना इफ्तार करवला जातो. महिनाभर मोहल्ल्यातून मस्जिदींमध्ये रोजेदारांसाठी पदार्थांच्या थाळ्या पाठवल्या जातात. मोहल्यांत राहणारे बिगरमुस्लीम दोस्तही यात सहभागी होतात.

रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा महिना समजला जातो. महिनाभर अन्न-पाणी वर्ज्य करून स्वत:चीच परीक्षा घेतली जाते. उपाशी राहून आपल्या इंद्रीयशक्ती आटोक्यात आणता याव्यात. आपल्या नफ्स अर्थात उमाळा मारणार्‍या इच्छांवर विजय मिळवता यावा, सदाचार ग्रहण करावेत. वाईट विचार आणि कर्मांना थारा न देता चांगलं आचरण करावं, हा सुप्त हेतू रमजानचा आहे.

पवित्र रमजान महिन्यातील उपवासानंतर (रोजे) उत्साही वातावरणात ‘रमजान ईद’ साजरी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून ईदसाठीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलल्या आहेत. शिरखुर्म्यासाठीचा खास सुकामेवा, हैदराबादी शेवयांपासून ते नवे कपडे, विविध प्रकारचे अलंकार, रंगबिरंगी बांगड्यांसह सुगंधी अत्तरे आणि अन्य वस्तू खरेदीसाठी आलेल्या अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. याखेरीज खजूर, ड्रायफ्रूट्सच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे.

सध्या बाजारात पुरुष व महिलांसाठी विविध रंग व कलासुरीचा नमुना ठरतील, अशा देश-विदेशातील पॅटर्नचे झब्बे, टोपी, बुरखा, मकना, ओढणी व स्कार्फ, हाजी रुमाल, लुंगी आदी वस्त्रप्रावरणांनी कापड दुकाने सजली आहेत. स्वतःच्या खरेदीबरोबरच गोरगरिबांना दान करण्यासाठी कपड्यांची खरेदी केली जात आहे. पठाणी, शेरवानी, जोधपुरीसह पांढरे, एम्ब्रॉयडरी असलेले झब्बे आकर्षण बनले आहेत. नेट, नेटिंग, कापडी, हार्ड, फर व फुट्टा आदी प्रकारातील भारतीय टोपीसह इंडोनेशिया, चीन, तुर्की, मलेशियन, बांग्लादेशी, सौदी अरेबिया, सुदानी, मस्कती आदी टोप्यांनाही मोठी मागणी आहे. मद्रासी, बंगाली, पानिपत, आझमगड येथील मलेशिया, सिंगापुरी लुंगीही प्लेन, चौकडा, लायनिंग व प्रिंटेड अशा प्रकारात दुकानांमध्ये उपलब्ध आहे. मुस्लिम महिलांसाठी स्पायकर, स्टोन, लेस आणि कोट या प्रकारातील ओमानी, सौदी, मलेशियन, इंडोनेशियन, तुर्की बुरख्यांसह आरबी बुरखे उपलब्ध आहेत. या बुरख्यावर परिधान करण्यात येणार्‍या व डायमंड वर्क, प्लेन, प्रिंटेड लेस वर्कमध्ये उपलब्ध असलेल्या मकना, ओढणी, स्कार्फना मोठी मागणी आहे.

नमाजला बसण्यासाठी वापरण्यात येणारे जानमाजही विविध रंग व आकारात दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. लाल व काळ्या रंगातील मेंदीचीही विक्रमी खरेदी होत आहे.

याखेरीज बाजारपेठा उच्च दर्जाच्या सुवासिक अत्तरांनी दरवळून गेल्या आहेत. बच्चे कंपनीही नवे कपडे, नव्या वस्तू खरेदी करताना हरखून गेलेली दिसत आहे महिलांच्या चेहर्‍यावर मनसोक्तपणे खरेदी आणि ईदचा दुहेरी आनंद दिसत आहे.

- सत्तार शेख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com