सोनेरी स्वप्न विरण्याची भीती!

सोनेरी स्वप्न विरण्याची भीती!

ट्वटर कंपनीने गेल्या महिन्यात अनेक कर्मचार्र्‍यांना नारळ दिल्याने माहिती तंत्रज्ञान जगाला धक्का बसला. अशा प्रकारची कारवाई करणारी ट्विटर ही पहिलीच कंपनी नाही. मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात 1000 कर्मचार्र्‍यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. राईडशेअर कंपनी लिफ्टनेदेखील 13 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली. ‘अल्फाबेट’ने नव्या भरतीवर स्थगिती आणली. स्टार्टअप कंपन्यांचा विचार केल्यास यावर्षीच्या प्रारंभापासूनच देशातील स्टार्टअप कंपन्यांनी 12 हजार कर्मचार्‍यांना कमी केले. कर्मचारी कपात, वेतन कपात आणि कामकाजाचे वाढते तास अशा प्रकारचे उपाय पाहता टेक कंपन्यांतील सुवर्णकाळ अस्तंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाह

डॉ. संजय वर्मा, सहाय्यक प्राध्यापक, बेनेट युनिव्हर्सिटी

सध्याच्या नोकरदारांची स्थिती पाहून रोटी, कपडा और मकान या चित्रपटातील प्रसिद्ध गीत, ‘तेरी दो टकिया की नोकरी, मेरी लाखों का सावन जाए’ हे गीत आठवते. तत्कालीन काळात सॉफ्ट आणि पांढरपेशी समजली जाणारी नोकरी ही आतासारख्या हायटेक नोकरीप्रमाणे नसायची. आजघडीला कोणताही युवक घ्या तो संगणक, आयटी, मॅनेजमेंटसह प्रत्येकजण उत्पादनाऐवजी सेवा क्षेत्रात जाण्याची इच्छा बाळगून आहे.

विद्यापीठ आणि व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या संस्थांमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. या संस्थेतून आयटी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा बीपीओसारख्या सेवा क्षेत्रासाठी पात्र मुले तयार केली जात आहेत. फेसबुक, अ‍ॅमेझॉन किंवा ट्विटर, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये लाखो, कोटींचे पॅकेज मिळाल्याचे सांगतात. पण स्थिती बदलत चालली आहे. कोट्यवधींचे पॅकेज देणार्‍या या कंपन्यांकडून तरुणांच्या स्वप्नांना धक्के दिले जात आहेत. ट्विटर किंवा फेसबुकचे उदाहरण घ्या. अलॉन मस्कने जेव्हा ट्विटरचा कार्यभार हाती घेतला तेव्हा त्याने व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टीकसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारणी करण्याचे ठरवले. भारतीय सीईओ पराग अग्रवालसह अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांची उचलबांगडी केली. विशेषत: भारतीय कर्मचार्‍यांवर कपातीची कुर्‍हाड कोसळली. यापैकी बहुतांश कर्मचारी आयटी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी निगडीत आहेत. ट्विटरबरोबरच फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’ कंपनीकडूनदेखील असाच अनुभव आला. तत्पूर्वी काही आयटी कंपन्यांनीदेखील अशा प्रकारचे धोरण अंगिकारले. अर्थात, करोनाकाळ ओसरल्यानंतर मोठ्या अपेक्षेने हे क्षेत्र रुळावर येण्याची शक्यता मांडली जात असताना आयटी क्षेत्रात ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यास ट्विटरने सुरुवात केली.

गेल्या दोन-अडीच वर्षांत करोनामुळे ठप्प पडलेल्या व्यवसायामुळे झालेले नुकसान लवकरच भरून काढले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण घरात बंदिस्त राहिलेले लोक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. खरेदीचा माहोल सुरू झाला आहे. जग आता पूर्वपदावर येऊ लागल्याने अनेक व्यवसायांंना उदारणार्थ पर्यटन उद्योगाला चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र सर्वच ठिकाणी असे चित्र नाही. अनेक स्टार्टअप कंपन्यांना आपला व्यवसाय वाचवण्याचे आव्हान आहे. यात अनेक कंपन्या शैक्षणिक अभ्याक्रमाशी, कोचिंग आणि आयटीशी संबंधित आहेत. तसेच ऑनलाईन फूड डिलिव्हरीचादेखील यात समावेश आहे. करोनाकाळात स्टार्टअप कंपन्यांचे काम आणि उत्पन्न वाढले. घरबसल्या या कंपन्यांनी ग्राहकांना सेवा दिली. मात्र आता करोनाचा परिणाम कमी झाल्याने या कंपन्यांचे काम कमी झाले.

स्टार्टअपवर वाढते संकट

ट्विटर कंपनीने गेल्या महिन्यात अनेक कर्मचार्‍यांना नारळ दिल्याने माहिती तंत्रज्ञान जगाला धक्का बसला. अशा प्रकारची कारवाई करणारी ट्विटर ही पहिलीच कंपनी नाही. मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये एक हजार कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबरोबर राईडशेअर कंपनी लिफ्ट (एलवायएफटी) नेदेखील 13 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली. पेमेंट प्रोसेसिंग फर्म-स्ट्राईप ने 14 टक्के कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज इ-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आणि गुगलची पालक कंपनी ‘अल्फाबेट’ने नव्या भरतीवर स्थगिती आणली. नवोन्मेष उद्योग (इनोव्हेटिव्ह इंंडस्ट्री किंवा न्यू एज बिझनेस) च्या श्रेणीत असलेल्या ज्या स्टार्टअप कंपन्यांकडे अनेक वर्षांपासून रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून पाहिले जात होते, त्याच कंपन्या अडचणीत आल्या आहेत. कर्मचारी कपात आणि नवीन भरतीवर स्थगिती देणार्‍या कंपन्यांत इन्फोसिसचादेखील समावेश आहे. या कंपन्यांनी मून लायटिंगचा गाजावाजा करत आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काम करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना नोकरीवरून काढून टाकले. परंतु सध्याच्या स्थितीत स्टार्टअप कंपन्यांत असणार्‍या समस्यांचे समाधान दिसून येत नाही.

स्टार्टअप कंपन्यांचा विचार केल्यास यावर्षीच्या प्रारंभापासूनच देशातील स्टार्टअप कंपन्यांनी 12 हजार कर्मचार्‍यांना कमी केले. यावरून या क्षेत्रातील कठीण काळ लक्षात घेता येईल. अशा प्रकारची कपात ही युनिकॉर्न समजली जाणारी आणि भविष्यात भरभराटीचे संकेत देणार्‍या कंपन्यांत झाली. जसे ऑनलाईन कोचिंग क्लास देणारी बायजू, वेदांतू, अनअ‍ॅकेडमी, लिडो लर्निंग यांचा समावेश आहे. म्हटले तर पहिल्या सहा महिन्यांत नोकरी गमावणार्‍यांची संख्या 22 हजार आहे. मात्र यातील चिंताजनक बाब म्हणजे त्यापैकी 60 टक्के तरुण हे भारतीय आहेत. या वर्षाखेरीस स्टार्टअपमधील सुमारे 50 ते 60 हजार युवकांना घरी पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण करोनाकाळात झालेला तोटा भरून काढण्यास प्राधान्य देत आहेत. त्यांनी वेळीच कार्यवाही केली नाही तर कंपनीच्या अस्तित्वाला धोका निर्माण हेाऊ शकतो.

यामागचे आणखी एक कारण म्हणजे स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणूक करणारी मंडळी ही या क्षेत्रातून फारसा फायदा होत नसल्याचे पाहून आपली गुंतवणूक काढून घेण्याबाबत विचार करत आहेत. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकदारांनीदेखील हात आखडता घेतला आहे. करोनाकाळात गुंतवणूकदारांनी संयम पाळला; परंतु आता स्थिती पूर्वपदावर आल्याने स्टार्टअप कंपन्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होताना दिसून येत नाही. नव्या कंपन्यांची गोची ही फेसबुकच्या स्थितीवरून लक्षात येईल. फेसबुकला पूर्वीपासूनच इंस्टाग्राम, यूट्यूबसारख्या सोशल मीडियाकडून जोरदार टक्कर मिळत आहे. 18 वर्षे जुने असणारे फेसबुकचे कोट्यवधी ग्राहक टिकटॉक, इन्स्टाग्राम, यूट्यूबकडे गेले. या कारणांमुळे फेसबुकच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. त्यामुळे फेसबुकच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. हा बदल पाहता कंपन्यांनी नवीन भरतीला लगाम घातला आणि कपातीचे वातावरण निर्माण केले.

उत्पन्नावर चोहोबाजूंनी फटका

वास्तविक बहुतांश टेक कंपन्यांसमोर नवीन आव्हानांचा सामना करणे आणि भांडवल उभारणी करणे हेच मोठे आव्हान आहे. या कारणामुळे गुंतवणूकदारांना या क्षेत्रात ठोस उत्पन्न मिळण्याची हमी मिळताना दिसून येत नाही. टेक कंपन्या एकप्रकारे कोंडीत सापडल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी म्हटले की, भविष्यात ट्विटर कंपनी दिवाळखोरीत निघाली तर आश्चर्य वाटणार नाही. केवळ आयटी किंवा सोशल मीडिया कंपनीच नाही तर ऑनलाईन कोचिंगच नाही तर ओला अ‍ॅपसारख्या टेक आधारित टॅक्सीसेवा आणि क्रिप्टो करन्सीसारखा व्यवसाय करणार्‍या स्टार्टअप जेमिनी, वाल्ड, बिटपांडा आदीदेखील भांडवलचा सामना करत आहेत.

विशेष म्हणजे भारत सरकारने यावर्षीच्या प्रारंभी मोठा गाजावाजा करत देशात 60 हजार स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्याचे जाहीर केलेले असताना टेक कंपन्या अडचणीत आल्या. यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतीय स्टार्टअप कंपन्या जागतिक बाजारात 5.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेचार पाच खर्व रुपयांचे भांडवल उभारू शकली. हे भांडवल गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2016 पासून देशात स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आणि त्यास करोनाकाळात झटका बसला. करोनाकाळामुळे 70 टक्के स्टार्टअप अडचणीत आले आणि त्यापैकी 12 टक्के तर सुरुवातीला बंद पडले. ट्विटरपासून ते फेसबुक कंपन्यात आदी क्षेत्रात कपात करण्याबरोबरच वेतन कपात आणि कामकाजाचे वाढते तास (ट्विटरने आठवड्यात 80 तास काम करण्याची घोषणा) अशा प्रकारचे उपाय पाहता टेक कंपन्यांतील सुवर्णकाळ अस्तंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com