प्रसिद्ध सुलेखनकार
प्रसिद्ध सुलेखनकार
ब्लॉग

उपयोजित कलेचा उपासक हरपला!

प्रसिद्ध सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन

Gokul Pawar

Gokul Pawar

- संजय देवधर

सौंदर्यनिर्मिती हा अभिजात दृष्यकलेचा प्रमुख उद्देश! प्रचार, प्रसार आणि मूल्यवृद्धी ही उपयोजित कलेची वैशिष्ट्ये! जाहिरात व प्रकाशन या दोन शाखांमध्ये उपयोजित कलेचा जास्त विस्तार झाला. त्यात विविध माध्यमातून कल्पक कलाकार कलाविष्कार घडवतात. उपयोजित कलेतील अशाच एका दिग्गज उपासकाचे निधन झाले. प्रसिद्ध सुलेखनकार कमल शेडगे वयाच्या 85 वर्षीही कार्यरत होते. पुस्तकांची मुखपृष्ठे व नाटकांची शीर्षके, जाहिराती यात त्यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली.

इ.स.1857 मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कला संस्थेची स्थापना झाली. पुढे 100 वर्षांनी 1957 मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ ऍप्लाईड आर्ट हा स्वतंत्र विभाग सुरु झाला. 63 वर्षांच्या वाटचालीत या विभागाने अनेक नामवंत कलाकार दिले. औद्योगिक क्रांतीनंतर जाहिरात कलेचा उगम झाला. त्यामुळे कलेला प्रसार, प्रचाराचे नवे प्रयोजन लाभले.अलीकडच्या काळात उपयोजित कलेचा खूप विस्तार झाला आहे. मुद्रणाचे स्वरूप वैविध्यपूर्ण व आकर्षक झाले आहे. वृत्तपत्र, मासिकातील जाहिराती, भित्तीपत्रके, बोधचिन्हे, पॅकेजिंग, दिनदर्शिका, स्टेशनरी अशा विविध माध्यमात दृश्यकलेचा प्रभावी आविष्कार झालेला दिसतो. उपयोजित कलेने सर्व क्षेत्रे कवेत घेतली आहेत असेच चित्र दिसते. डिझाईन, कथाचित्रे, आकर्षक शीर्षके, सुलेखन, छायाचित्रण, मुखपृष्ठे, जाहिराती अश्या वेगवेगळ्या प्रांतात महाराष्ट्रातील अनेक चित्रकारांनी आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केला आहे.

चित्रकार कमल शेडगे हे त्यातले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व! वयोमानानुसार शरीर तितकीशी साथ देत नसले तरीही ते नियमितपणे दररोज थोडा वेळ कलानिर्मिती करीत होते.

आज संगणकयुगात विविध अक्षरवळणांचे जे संगणकीय अक्षरसंच (फॉन्टस) आपण पाहतो त्यांची सुरुवात कमल शेडगे यांनी केली. गंमत म्हणजे ते स्वतः आजही संगणकाची मदत न घेता पूर्वापार पध्दतीने हातानेच सर्व रेखाटने करीत. मराठी रसिकांना त्यांचे नाव नाटकांच्या जाहिरातींमुळे अधिक परिचित आहे. अनेक मराठी नाटकांची आकर्षक शीर्षके कमल शेडगे यांच्या कुंचल्याचा आविष्कार आहे.1965 साली त्यांनी प्रथम नाटकांच्या जाहिरातीत कायापालट घडवून आणला. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे वैशिष्ट्यपूर्ण शीर्षक व जाहिरात त्यांनी कल्पकतेने केली.

तेथून पुढे असंख्य नाटकांना त्यांनीच केलेली कलात्मक शीर्षके लाभली. उदाहरणार्थ विच्छा माझी पुरी करा, सखाराम बाईंडर, बॅरिस्टर, नटसम्राट, ती फुलराणी, घर श्रीमंताचं, चांदणे शिंपित जा... अशी नाटकांची शीर्षके आठवून बघा! प्रेक्षकांना नाटकांकडे खेचण्यासाठी अशा आकर्षक शीर्षकांचा नक्कीच उपयोग झाला. त्यामुळेच नाट्यनिर्माते शेडगे यांच्याकडेच नव्या नाटकाचे शीर्षक व जाहिरातीचा आग्रह धरीत. प्रकाशन व्यवसायातही कमल शेडगे यांचे खूप मोठे योगदान आहे.

22 जून 1935 रोजी कमल शेडगे यांचा जन्म झाला. नावामुळे काही जणांची फसगत व्हायची.कमल हे मुलीचे नाव वाटायचे. कमल यांचे वडील टाईम्स प्रकाशनात सजावटकार होते. ते विविध नियतकालिकांची शीर्षके तयार करीत. छोट्या कमलवर वडिलांच्या कलेचे संस्कार झाले. नटनट्यांची चित्रे काढण्याचा व नवनवी अक्षरवळणे गिरवण्याचा छंद त्यांना बालपणीच लागला.

शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढे कोणत्याही कलासंस्थेत जाऊन त्यांनी रीतसर कलाशिक्षण घेतले नाही. स्वतःच स्वतःला घडवले. अर्थात वडिलांच्या रुपाने गुरु घरातच होता. तारुण्यात पदार्पण केल्यावर वडील त्यांना टाईम्समध्ये घेऊन गेले. कलाविभाग प्रमुख वॉल्टर लँगहॅमर यांनी कमलचे कलागुण बघितले. त्यांना लगेचच नोकरी मिळाली. नंतर रमेश संझगिरी टाईम्सचे कलासंचालक झाले. त्यांनी कमल यांना शीर्षके, आकर्षक मांडणी, विविध प्रकारची डिझाईन यांचे जणू प्रशिक्षणच दिले. 1956 ते 1990 पर्यंत ते 34 वर्षे सेवा करुन निवृत्त झाले. नंतर आपल्या स्वतंत्र व्यवसायात रमून गेले ते अगदी अखेरपर्यंत!

आपल्या अक्षररचनेचा प्रवास सांगणारी तीन पुस्तकेही कमल शेडगे यांनी प्रकाशित केली. माझी अक्षरगाथा, चित्राक्षरं आणि कमलाक्षरं ही पुस्तके वाचनीय व प्रेक्षणीय आहेत. त्यांच्या दोन मुलांपैकी धाकटा कमल यांच्याच व्यवसायात आहे. मात्र तो बदलत्या काळानुसार संगणकावर काम करतो. शेडगे यांच्या अक्षरकलाकृतींची प्रदर्शनेही झाली आहेत. माझा त्यांच्याशी वैयक्तिक परिचय होता. मुंबईत किंवा ते नाशिकला आले की गाठीभेटी होत. त्यांच्या 85 वाढदिवसानिमित्ताने फोनवर गप्पा झाल्या होत्या. तेव्हाही त्यांच्या बोलण्यात उत्साह होता.15 दिवसांतच ते आपल्यातून निघून जातील, अशी पुसटशी शंकाही तेव्हा आली नाही. यापुढेही त्यांची कला रसिकांना आनंद देत राहील. या ज्येष्ठ कलाकाराला आदरांजली!

-----

दासबोधापासून सुलेखनाची परंपरा !

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात ‘लेखनक्रिया निरूपण’ या नावाने स्वतंत्र समास लिहिला आहे. शिकवण या एकोणिसाव्या दशकाच्या प्रारंभी त्यांनी अक्षर कसे असावे, याविषयी विवेचन केले आहे. सुलेखनाविषयी मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात, अक्षर वाटोळे, मोकळे व सरळ असावे. दोन शब्दांत सारखे अंतर ठेवावे. आरंभापासून शेवटपर्यंत एकच अक्षरवळण असले पाहिजे.

याशिवाय त्यांनी लेखन साहित्याचे वर्णन करुन कागद, लेखणी व इतर साधनांचा ऊहापोह केला आहे. शाई कशी तयार करावी व वापरावी, ग्रंथ कसे जपून ठेवावेत हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. कमल शेडगे यांनी त्यापासून स्फूर्ती घेतली. त्यांनी सुलेखनाला सुरुवात केली तेव्हा देवनागरी मुद्राक्षरांत अक्षरवळणांची विविधता नव्हती. इंगजी रोमन लिपीला समांतर अशा सुरेख अक्षरांचे फॉन्टस् शेडगे यांनी समर्थपणे घडवले व मराठी अक्षरांचे रुपच पालटून टाकले. आधुनिक स्वरूप आले. त्याचा मराठी प्रकाशन व्यवसायाला खूप उपयोग झाला.

- संजय देवधर, 9422272755

Deshdoot
www.deshdoot.com