प्रत्येक दिवस प्रेमाचा

प्रत्येक दिवस प्रेमाचा

पारा हाती लागत नाही, त्याचप्रमाणे प्रेम ही सर्वव्यापी संकल्पनाही नेमकेपणाने व्यक्त करता येत नाही. प्रत्येकासाठी तिचा वेगळा अर्थ असू शकतो. माझ्यासाठी प्रेम ही अनुभवण्याची बाब आहे. एका मुलाखतीप्रसंगी बोलताना व्यक्त केलेले मनोगत.

सध्या समस्त मनुष्यजात एका विचित्र अवस्थेतून जात आहे. कधी नव्हे इतके भावनात्मक गुंते असणारा हा काळ आहे. एकीकडे जगाची लोकसंख्या दररोज मोठ्या आकड्यांनिशी वाढत असली तरी दुसरीकडे माणसा-माणसांतील अंतरेही त्याच गतीने वाढत आहेत. घरे विभक्त होऊनही आता बराच काळ लोटला आहे. मात्र अशा विभक्त घरांमध्ये राहणारे एका कुटुंबातील सदस्यही आता मनाने विभक्त होण्याच्या तयारीत आहेत. घरातील तीन-चार सदस्यांनाही आता वेगळ्या स्पेसची आवश्यकता भासू लागली आहे. सगळीकडेच नसली तरी काही ठिकाणी मात्र ही स्थिती संवादाच्या, प्रेमाच्या आणि मायेच्या अभावाने ओढवली आहे, असे म्हणता येईल. काही घरांमध्ये परस्परांना प्रेमाची अभिव्यक्ती करताना अडचणी येत असतात. काहींचा अहंम् तीव्र असतो. काहींना माणसापेक्षा पैशाचा अधिक मोह असतो. यशाची मस्ती चढत असते. अशा एक ना एक कारणांमुळे माणूस माणसापासून, नाती परस्परांपासून दूर जातात.

व्यक्तीश: विचार करायचा तर प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. असे दिवस साजरे करायचे म्हणजे त्यासाठी ठरवून वेळ काढला पाहिजे. पण मला त्याची कधी गरज वाटली नाही. प्रेम हे आपल्या मनाच्या अंतरंगात असते. त्यासाठीचा दिवस साजरा करा अथवा करू नका; आपल्या मनात प्रेमाची झालर कायम असतेच. अर्थात, प्रत्येकाला माझे म्हणणे पटेल असे नाही. पण माझ्यापुरते सांगायचे झाले तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी असे दिवसच कशाला हवेत? माझी पत्नी प्रिया आणि मी याबाबत एकाच मताचे आहोत. आम्ही कधी या दिवसासाठी काही खास प्लॅन केला नाही. एकमेकांसाठी वेळ मिळतो तोच प्रेमाचा दिवस असे मला वाटते. प्रेम करण्यासाठी वर्षाचे 365 दिवस असताना त्यासाठी एकच दिवस का निवडावा, असा प्रश्न मला पडतो. पण असे दिवस साजरे करण्याची मानसिकता वाढण्यामागेही काही कारणे असावीत, असे मला वाटते. आजची जीवनशैली धकाधकीची बनली आहे. त्यामध्ये प्रत्येकाला सेलिब्रेशनचे एक निमित्त हवे असते. असे वेगवेगळे दिवस साजरे केल्याने माणसे एकत्र येतात. लोकांना धकाधकीचे जीवन जगावे लागत असले तरी त्यांना माणसांचा सहवास हवाच असतो. अशा दिवसांच्या निमित्ताने माणसे एकत्र येत असल्याने हे दिवस साजरे करण्याची मानसिकता वाढली असावी.

माझ्या बाबतीत सांगायचे तर मी जसा आहे तसाच लोकांसमोर येतो. माझ्या स्वभावाप्रमाणे दुसर्‍यासमोर भावना व्यक्त करण्यापेक्षा ती भावना फिल करणे मला आवडते. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आनंदी असावी, असे मला वाटते. प्रेम हे नि:स्वार्थी असावे. मी इतके केले म्हणून तू तितके केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यामध्ये असता कामा नये. प्रेम ही शब्दांनी व्यक्त करण्याची भावना नाही तर फिल करण्याची, अनुभवण्याची बाब आहे, असे माझे मत आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगण्याची काही गरज नसते असे मला वाटते. प्रेम शब्दांनी व्यक्त करण्याऐवजी ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम असेल ती आनंदी कशी राहील हे पाहिले पाहिजे. प्रेमाची ही अनुभूती सर्व प्रकारच्या प्रेमाला लागू होते. मग ते आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम असो, मित्रांवरचे असो किंवा नात्यांमधील माणसांवरचे असो! प्रेमाविषयीची ही जाणीव मला कोणत्याही प्रेरणेतून झालेली नाही तर ती अनुभवांनी आली असावी, असे वाटते. बायको, मैत्रीण, नातेवाईक या सार्‍यांच्याच प्रेमाकडे मी याच पद्धतीने पाहतो. आपण मोठे होत जातो तसे दिवसेंदिवस चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये जमा होत जातात. त्यामध्ये अनुभवांनी वाढ होत जाते. याच धर्तीवर प्रेमाविषयीची माझी मानसिकता बनली असावी, असे वाटते.

माझ्या आणि प्रियाच्या प्रेमाच्या बाबतीत लोक बरेच प्रश्न विचारतात. मी आणि प्रिया लग्न करण्याआधी एकाच क्षेत्रात काम करत असल्याने भेटलो होतो. नंतर एकमेकांना एसएमएस करणे, भेटणे सुरू झाले आणि आम्ही परस्परांच्या प्रेमात कधी गुंफलो हे दोघांनाही कळले नाही. नंतर आम्हाला त्याची जाणीव झाली. भेटल्यानंतर दीड वर्षांत आमच्यातील नाते पक्के झाले. त्यानंतरही आम्ही एकमेकांना काही वेळ दिला आणि 2011 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. प्रेमामध्ये स्नेह, माया, ममता, आदर, भक्ती अशा अनेक भावना आहेत. स्नेहामध्ये काळजी, माया असते. शक्यतो आपल्यापेक्षा लहान असणार्‍या व्यक्तींबाबत आपल्याला स्नेह वाटतो. भूतदया किंवा पशुपक्ष्यांबद्दल वाटणारी आपुलकीही या प्रकारात मोडत असावी. समान वयोगटातील, समान आवडीच्या व्यक्तींमध्ये प्रेमाचे धागे लवकर गुंफले जात असावेत. पत्नीप्रेम, भगिनीप्रेम, बंधूप्रेम, मित्रप्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम असे अनेक प्रकार त्यामध्ये आहेत.

आपल्यापेक्षा मोठ्या असणार्‍या किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी असणारा आपल्या मनातील आदर हाही प्रेमाचाच एक भाग आहे. यामध्येही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी, त्याच्याविषयी असणार्‍या प्रेमाचा समावेश असतो. त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीविषयी, त्याच्या कामगिरीविषयी आपल्या मनात प्रेम असते आणि त्यातून त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. त्याच्या विचारांवर आपले प्रेम असते. स्त्रीला मातृत्त्व प्राप्त झाले की आपल्या बाळाविषयी वाटणारे प्रेम म्हणजे ममता. भक्ती हे प्रेमाचे सर्वोच्च रूप आहे, असे मला वाटते. त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

प्रेमामध्ये अपेक्षांचे ओझे नसते. तिचे आयुष्य सुखाचे व्हावे असे वाटणे म्हणजे त्याच्यावरचे प्रेमच असते. ते शब्दांनी व्यक्त होत नाही तर आपल्या कृतीतून उलगडत जाते. प्रेमाचे हे प्रकार अनेकांच्या लक्षात येत नाहीत. मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती सगळीच माणसे मला जवळची वाटतात. मैत्रीतही सुंदर प्रेमाचे नाते असते.

रक्ताची नाती पटली नाहीत तरी आपल्याला त्यांचा स्वीकार करावा लागतो. मैत्रीच्या नात्यात तसे नसते. ही नाती आपल्यावर कोणी लादलेली नसतात तर त्याची निवड आपल्या मनाने केलेली असते. त्यामुळे इतर जवळच्या नात्यांप्रमाणे हे नातेही ग्रेट आहे, असे माझे मत आहे. अशा मनाने स्वीकारलेल्या मैत्रीचे नाते कायम राहते. आधी सांगितल्याप्रमाणे मैत्रीच्या नात्यातही नि:स्वार्थी प्रेम असावे. आपण याच्यासाठी काही केले म्हणून त्यानेही आपल्यासाठी काही करावे, अशी अपेक्षा त्यामध्येही असता कामा नये. अपेक्षा आल्या की मैत्री संपते, असे मला वाटते. मला अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच मित्र आहेत. पण त्यांच्याशी असणारे माझे नाते अगदी पक्के आहे.

चंदेरी दुनियेमध्ये येण्याच्या आधीपासून माझी या मित्रांशी मैत्री आहे. चित्रसृष्टीत काम करताना अनेक लोक कामासाठी दुसर्‍यांशी मैत्री करतात. चित्रसृष्टीतच नाही तर इतर क्षेत्रातही अशा भावनेने मैत्री करणार्‍यांचे प्रमाण मोठे असते. या मैत्रीमागे प्रेम असतेच असे नाही. अर्थात, सगळेच लोक तसेच असतात असेही नाही. चित्रसृष्टीत काम करतानाही कामाव्यतिरिक्त किंवा कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रेम करणारी माणसे भेटतात. ती आपल्याला आपोआप कळतात. मग त्यांच्याशी मैत्रीचे नाते फुलत जाते. मी कधीच स्वत:ला एकटे समजत नाही. भविष्यातही अशी माणसे भेटत राहतील यावर माझा विश्वास आहे. याच भावनेशी मी या प्रेमाच्या दिवसाकडे पाहतो आणि त्यामागील भावनेचा आदर करतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com