बाळ जरी खट्याळ... तरी मला हवा

बाळ जरी खट्याळ... तरी मला हवा

उद्या (14 नोव्हेंबर) बालदिन. लहान मुले आवडणार्‍या चाचा नेहरू यांचा जन्मदिन. वयाने मोठे होत जातांना ‘लहानपण दे गा देवा’ अशीच सर्वांची भावना असते. मोठे होता होता आपल्यातील बालक कुठे आणि कसे हरवते तेच कळत नाही. प्रत्येकात दडलेल्या बालकाचा शोध घ्यायचा प्रयत्न करणारी विशेष पुरवणी

विक्रम सारडा

सगळे जण असे म्हणतात की मी खूप मोकळा मोठ्याने हसू शकतो. अगदी लहान मुलासारखा हसतोस असे मित्र म्हणतात. माझ्या मते हसणे हसणेच असते. त्याच्यात लहान मोठ्यांसारखे असे काही नसते. परिस्थितीप्रमाणे मोठे लहान होतात आणि लहान मोठे होतात. ही गोष्ट लहान मोठ्या माणसांचीच. किंबहुना आजचे बालदिनाचे औचित्य साधून मोठ्यातल्या लहानांची.

तसा माझ्या कुटुंबात, माझ्या पिढीतला मी सर्वात धाकटा म्हणजे लहान. सगळ्यांकडून कोड-कौतुक आपसूकच झाले. जबाबदारी घ्यायला मोठे बंधू, बहिणी होत्याच. त्यामुळे मला बालपणातही कधीच मोठेपणाचा आव आणावा लागला नाही. हसणे, खेळणे, बागडणे यातच मी मोठा झालो. शाळेत, कॉलेजमध्ये असतांना सुद्धा सतत आनंदीच असायचो. तो आनंद प्रकट करण्यासाठी कधी हसायचो, कधी नाचायचो. जिना उतरतांना हा मुलगा नाचतच का येतो असे मित्रांना नेहमी वाटायचे. कधी माझ्याच तंद्रीत शिट्ट्या वाजवायचो. मनाला येईल तसे कपडे घालायचो. मला त्याच्यात बरे वाटेल एवढाच निकष पुरेसा होता. तेव्हापासूनच माणसाने नेहमी गंभीर का रहावे असा प्रश्न पडत असे.... आजही पडतो.

हा गंभीरपणा माणसाचे आयुष्य निरस करतो की काय असे मला नेहमी वाटत असते. खूप विचार करून प्रश्न सुटणार असतील तर माणसाने तेही करावे. पण ते सुटणारच नसतील, ते त्याच्या वेळेनुसार परिस्थितीनुसार पुढे सरकणारे असतील तर माणसाने वेळेनुसार परिस्थितीनुसार पुढे सरकत रहावे असे आपले माझे मत.

आयुष्याचा हा फंडा घेऊन जेव्हा माझ्या व इतरांच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा मला असे वाटते की, मोठे होतांना, गंभीर होतांना आपण आपल्यातला बालक बाजूला सारत असतो. खरं तर आपल्यातला हा लहान बालक खूपच निरागस रोमांचकारी, उत्साही, सरळ, प्रभावी असा मला नेहमीच वाटतो. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्राला औपचारिक तू कसा आहेस असे विचारण्यापेक्षा त्याला लहानपणासारखी कडकडून मिठी मारली तर किती बरे वाटू शकते, हे अनुभवूनच बघायला हवे. अशा वेळेस तरी आपल्यातला लहान जागा व्हायला नको का?

मोठेपणीही लहान होण्यात गंमत असते. मुळातच आपल्यातला लहान जागरुक असेल तर उगाचच सतत गांभीर्याने वागावे लागणार नाही. मुळातच बाल्यावस्थेत असलेले मन हे क्लेशविरहित असू शकते. आपण लहान मुलांचे आयुष्य बघितले तर त्यांना मिळत असलेले अनुभव, शिकवण, अवतीभवतीची परिस्थिती याचा ते त्यांच्या परिने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. मुळातच निरागसतेने संपन्न असलेले बालमन हे समोर येणार्‍या व्यक्ती, परिस्थिती याकडे देखील सरळसोट नजरेने बघत असत. त्यात त्यांना जास्त अर्थ लावायला लागत नाही किंवा मागच्या पुढच्या आखण्या कराव्या लागत नाहीत. त्यामुळेच या सगळ्याचा ताण त्यांच्या ठायीच नसतो. मोठ्यांचे मात्र तसे होत नाही. प्रौढ अवस्थेत जातांना सगळ्यात महत्वाची ठरते ती प्रतिमा. ती स्व प्रतिमा असते किंवा इतरांसमोर छाप पाडणारी प्रतिमा असू शकते. त्याला जोड मिळते ती अहंम किंवा इगोची. या अवस्थेत माणूस सातत्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वागत असतो. बालकांचे तसे नसते. त्याला ना काही सिद्ध करायचे असते ना त्याला स्वत:च्या प्रतिमेची छाप पाडायची असते. हाच विचार आपण आपल्या प्रौढ अवस्थेत सुद्धा आपल्या मनात स्वच्छंदपणे आणला तर तुम्हाला कुठल्याही अंतरक्रियेत जाणीवपूर्वक काहीच सांभाळावे लागणार नाही. माझ्या वागण्यात मी शक्यतो हा स्वच्छपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाशी वागतांना काही चुकलें, अगदी चेष्टेतही आणि ते माझ्या लक्षात आले तर त्या व्यक्तीची माफी मागण्यात मला कमीपणा वाटत नाही. मोठी माणसे न कळत स्वत:भोवती भिंती उभ्या करत असतात. विचार, क्लेश, द्वेष, स्पर्धा, खोटा स्वाभिमान, यश, या भिंतीपलिकडे खूप मोठे आनंददायी जगण असू शकते हे बघणेच विसरतात. बालकाच्या भोवती या भिंती दिसतच नाही. त्यामुळे त्याचे जग हे कायम आनंददायीच असत. माझं बालमन सातत्याने मला खुणवत असत आणि ती जागरुकता कुठेतरी माझ्या जगण्याला भावते. लहान मुलांशी होणारी माझी मैत्री. ते मला आणि मी त्यांना सोपेपणाने स्वीकारणे हे मला खूप आनंद देत. आजही मी लहान मुलांकडे तितकाच आकर्षित होतो. कारण माझ्यातले बालक त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी मला खुणवत असतो.

नुकताच घडलेला एक प्रसंग.

एका सहलीला माझ्याच वयाच्या मित्रमंडळींसोबत गेलेलो असतांना एका कुटुंबासमवेत एक छोटीशी मुलगी भेटली. तीन चार वर्षांची असेल. त्या गोंडस लेकराकडे बघून मी हसलो आणि तिला हात दिला. ती ही हसली आणि तिनेही मला हात दिला. माझ्याकडे असलेले चॉकलेट मी तिला दिले आणि तिच्या चेहर्‍यावर छानसे हसू बघून मलाही आनंद झाला. या छोट्याशा गाठीभेटीनंतर पुढच्या दोन दिवसात आमची चांगली मैत्री झाली. दुसर्‍या दिवशी तिच्या वाढदिवसाचा केक कापायला मी आलोच पाहिजे असा तिने आग्रह धरला. तिच्या कुटुंबीयांनाही एक आजोबा या लहान मुलीचे छानसे मित्र झालेत हे बघून समाधान वाटले. त्या सहलीतला जितका वेळ मी माझ्या वयाच्या मित्रमंडळींसोबत घालवला तितकाच वेळ या नवीन छोटुशा मैत्रिणीबरोबर घालवण्यात मला आनंद मिळाला. तिच्याबरोबर बोलतांना, खेळतांना मी ही लहान झालो तितकाच, तीन चार वर्षांचाच...! तिच्याबरोबर निरागसता अनुभवतांना माझे मनही सुखावत होते. मस्ती करतांना, तिच्या बरोबर टेबल खुर्च्यामागे लपंडाव खेळतांना तो रोमांच मलाही एक ऊर्जा देत होता. ती ज्या पद्धतीने अवती भवती असणार्‍या माणसांशी बोलत होती, वागत होती त्याच नजरेने जगाकडे बघतांना मलाही हे जग किती साध सोप आहे हे दिसत होते. ही निरागसता आपल्याला मोठ्या वयातही अनुभवता येऊ शकते हे त्या छोट्याशा मुलीने मला परत एकदा शिकवल होतं. मिळेल तेव्हा हे क्षण आपण लहान बनून आपल्या ओंजळीत सामावू शकतो. आनंदाने बघू शकतो. उर्जेने वावरू शकतो. प्रेमाने वागू शकतो आणि निरागसतेने जगू शकतो. गरज आहे फक्त आपल्यातल्या त्या बालकाला मधून मधून अनुभवण्याची!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com