चाय से खतरा...

इंग्लंड अमेरिकेला सावत्र आईसारखी वागणूक देत होता. बाळाच्या वाटयाचे दूध हिसाकावून स्वतः धष्टपुष्ट झाला होता. त्याचवेळी अमेरिकेची अवस्था मात्र कुपोषित बालकाप्रमाणे करून ठेवली होती. स्वकष्टावर उभ्या राहिलेल्या अमेरिकेच्या मनात इंग्लंडचे वर्चस्व झुगारण्याची बीजं रूजू लागली होती. धर्म, इतिहास व साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
चाय से खतरा...

२९ नोव्हेंबर १७२३ ची थंड सकाळ. झोपेतून जागे होत असलेले एक शहर. शहराच्या रक्तवाहिन्यांमधून माणसांचा प्रवाह हळुहळु वाहू लागलेला. शहराच्या भिंतींवर एक भित्तीपत्रक झळकत होते. भित्तीपत्रकाने गोठलेल्या-अर्धवट झोपेत असलेल्या शहराला करंट लागला. शहरातील प्रत्येकजण भित्तीपत्रक वाचण्यासाठी-पाहण्यासाठी धावू लागला. शहराच्या रक्तवाहिन्यामध्ये जणू उच्च रक्तदाब निर्माण झाला. बोस्टनच्या प्रत्येक रस्त्यावर माणसांचा अलोट प्रवाह वाहू लागला.

झोपेतून उठलेल्या प्रत्येकाला मरगळ घालविण्यासाठी चहाची तलफ होण्याची ही वेळ,असली तरी आज चहाने प्रत्येकाच्या मनात प्रचंड राग निर्माण केला होता. मनाच्या किटलीत दबा धरून बसलेल्या असंतोषाच्या वाफेनं किटलीचे झाकण उडाले. आज बोस्टनवासीयांना मरगळ झटकण्यासाठी प्रत्यक्ष चहा ऐवजी भित्तीपत्रकातील बोस्टनच्या बंदरात चहा घेऊन आलेल्या जहाजाची माहिती आणि त्यासंदर्भात केलेले आव्हान पुरेसे होते.

बोस्टन बंदरात मध्यरात्री डर्डमाऊथ हे इंग्लंडवरून आलेले जहाज दाखल झाले होते. डर्डमाऊथने भरून आणलेला चहा बोस्टनच्याच काय अमेरिकेतील कोणत्याच शहरातील चहाच्या कपात असता कामा नये,याची खबरदारी घेण्याचे आव्हान भित्तीपत्रकात करण्यात आले होते. इंग्लंडवरून अमेरिकेत चहा घेऊन आलेल्या डर्डमाऊथमधील चहा अमेरिकेतील कोणत्याच शहरात न उतरवता जहाज परत इंग्लंडला पाठवण्यात यावे असा ठराव बोस्टनवासीयांनी शहराच्या मुख्य सभागृहात एकमताने संमत केला. तेंव्हा सकाळचे ९ वाजले होते.

रात्रीच्या ९ वाजेपर्यंत अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा अध्याय बोस्टनच्या बंदरावर प्रत्यक्ष साकार होणार होता. एका अर्थाने अमेरिकेची माता असलेल्या इंग्लंडवरून आलेल्या चहाला बोस्टनवासी विरोध करत होते. अमेरिकेवर असणा-या राजसत्तेचा विविध स्तरांवर गैरवापर करत त्याचे शोषण करण्याचे काम त्याची जननी करत होती. आई स्वतः अर्धपोटी-उपाशी राहिली तरी आपल्या बाळाच्या संगोपनासाठी वाटेल ते कष्ट-अभाव सहन करत असते.

इंग्लंड मात्र अमेरिकेला सावत्र आईसारखी वागणूक देत होता. बाळाच्या वाटयाचे दूध हिसाकावून स्वतः धष्टपुष्ट झाला होता. त्याचवेळी अमेरिकेची अवस्था मात्र कुपोषित बालकाप्रमाणे करून ठेवली होती. स्वकष्टावर उभ्या राहिलेल्या अमेरिकेच्या मनात इंग्लंडचे वर्चस्व झुगारण्याची बीजं रूजू लागली होती.

ईस्ट इंडिया कंपनीचा चहा विकत घेण्याची सक्ती अमेरिकी जनतेवर करण्यात आली होती. तसे एकाधिकार ही कंपनीला देण्यात आले होते. चहाच्या व्यवसायात ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी आणि त्यांच्या चहाची चव बोस्टनच नव्हे, तर कोणत्याच अमेरिकन माणसाला सहन होत नव्हती. व्हर्जिनियाची तंबाखू इंग्लंडच नव्हे ,तर संपूर्ण युरोपला भावली होती. युरोपवर इंग्लंडची सत्ता नसल्याने व्हर्जिनियाच्या तंबाखूला युरोपात व्यापार स्पर्धा करावी लागली होती. अमेरिका म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचाच भाग किंवा वसाहत असल्याने ब्रिटिश राजसत्ता 'हम करे सो कायदा' अशा अर्विभावात वागत होती.

अमेरिकन जनतेच्या खानपानावरही स्वतःचे नियंत्रण असावे आणि अमेरिका म्हणजे आपल्या संपत्तीची खाण, इथपर्यंत मालकीहक्काची नशा ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या डोक्यात भिनली होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांना अमेरिकेच्या निर्मितीतील 'स्वातंत्र्याची तीव्र आस' या सर्वात महत्वाच्या तत्त्वाचे विस्मरण झाले होते. अमेरिकेला करावी लागणारी ही अनिवार्य चहाची आयात, ही ब्रिटनच्या राजसत्तेच्या जोखडाविषयीच्या असंतोषाला तोंड फोडण्यास निमित्तमात्र ठरली. ईस्ट इंडिया कंपनीचा चहा पिणे अमेरिकन जनतेला बंधन वाटणे स्वाभाविक होते. अमेरिकेला आकार देण्यासाठी त्यांच्या किमान चार पिढयांनी अथक संघर्ष केला होता.

१७२३ मध्ये असलेला अमेरिकन समाज हा ख-या अर्थाने अमेरिकन होण्यास प्रारंभ झाला होता. ब्रिटन अथवा इतर युरोपिअन देशातून आलेल्या त्यांच्या पूर्वजांचे या भूमीवर झालेले आगमन आणि त्यांच्यात किमान सत्तर-ऐंशी वर्षांचा कालखंड लोटला होता. जेम्स टाऊनची वसाहत वसविण्यासाठी आलेले ब्रिटिश आणि १७२३ मधील अमेरिकन ब्रिटिश यांच्यात किमान तीन पिढयांचे अंतर पडलेले होते. त्यामुळे मातृभूमी म्हणून इंग्लंडविषयी असलेली तीव्र आस्था कालौघात कमी होण्यात गैर असे काही नव्हते.

भारतातून अमेरिकेत भविष्य घडविण्यासाठी गेलेल्या लोकांचे अनुभव पाहिल्यास आपल्या हे सहज लक्षात येते. अमेरिकेत त्यांनी संपत्ती कमवली आणि उर्वरित आयुष्य मातृभूमीत व्यतीत करण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांची मुलं भारतात येण्यास नकार देतात. कारण ते जन्माने व मनाने अमेरिकन झालेली असतात. त्यांची मातृभूमी अमेरिका असते.

असाच प्रकार अमेरिकेतील १७२३ मधील समाजाची झाली असणार. साहस,संघर्ष व श्रम यांच्या जोरावर त्यांनी तेथे एक नवे जग निर्माण केले होते. त्यामुळे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी अंगाने एक स्वतंत्र समाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण होणे. हे निसर्ग नियमाला व मानवी स्वभावाला धरूनच होते. त्यांची ही अस्वस्थता एका नव्या राष्ट्राच्या जन्माच्या प्रसुती वेदनांची चाहूल होती. ब्रिटन अमेरिकेला स्वतःची वसाहत समजून ओरबडण्यात मशगुल होता.

ब्रिटिश राजसत्तेच्या मनमानी व अप्पलपोटया धोरणामुळे अमेरिकन समाजाच्या आर्थिक विकासाच्या संधी हिरावल्या जात होत्या. तीन हजार सागरी मैलांवरून ब्रिटनचे सत्ताधीश आपले नियंत्रण व संचलन करताय,ही भावना तीव्र होत होती. अशा एक ना अनेक कारणांनी अमेरिकन समाजाच्या मनात असंतोष धुमसत होता. असंतोषाच्या या ज्वालामुखीचा उद्रेक होण्यास चहा हे कारण ठरले.

बोस्टनच्या मुख्य सभागृहात जमलेले बोस्टनवासी आक्रमक झाले. डर्टमाऊथच्या मागोमाग आणखी दोन जहाजे न आवडणारा आणि अर्थकरणाला न परवडणारा चहा घेऊन येत होती. त्यांनाही बोस्टन बंदरात माल उतरवू दयायचा नाही. असा ही ठराव बोस्टनच्या सभागृहात एकमुखाने घेण्यात आला. सात हजार बोस्टनवासीयांचा हा जमाव बंदराच्या दिशेन निघाला. अशा संतप्त जमावाला अधिक आक्रमक व हिंसक करण्यासाठी कंडया किंवा अफवा कायमच उपयुक्त ठरत असतात. त्या पसरतात आणि पसरवल्या देखील जातात. पसरण्याच्या मागे बिनडोक असतात आणि पसरवण्याचे मागे डोकेबाज असतात. असे दोन्ही बाजूने अनुकुल वातावरण मिळालेला हा लोकांचा जमाव बंदरावर पोहचला. जमाव अमेरिकन असला तरी शासन ब्रिटिश होते.

शासन आपल्या नेहमीच्या खाक्याप्रमाणे माघार घेण्यास तयार नव्हते. बेभान व अनियंत्रित जमावाला कोणी रोखू शकत नाही किंवा रोखण्यात येत नाही. असा उग्र जमाव सतत व सहजासहजी निर्माण होत नसतो. त्यामुळे एक मोठा प्रलय होतोच आणि करवला देखील जातो. त्यानुसार काही लोकांना स्वयंसेवक करण्यात आले आणि बंदरावर खडा पहारा देण्याचे काम सोपवण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत चहा बोस्टनच्या धरतीवर उतरवला जाणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यायची होती. कारण रात्री-अपरात्री चहा उतरवला जाऊ शकत होता. अशातच एकाएकी अशा काही घटना घडल्या की नेमलेले स्वयंसेवकच काय तर सगळे बोस्टन बंदराकडे धावू लागले.

बंदरात लंगर टाकून शांतपणे हेलकावे घेत असलेले डर्टमाऊथ थरथरायला लागले. बोस्टनवासीयांनी डर्टमाऊथवर चढाई केली. अवघ्या तीन तासात सुमारे ९०,००० पौंड चहा पावडर बोस्टनच्या खवळलेल्या सागरात विसर्जित झाली. आज बोस्टनने केवळ चहा पावडरचे विसर्जन केले नव्हते,तर एका अर्थाने ब्रिटिश शासनाच्या भयाचे विसर्जन केले होते. डर्टमाऊथला रीता करणारा हा काही दंगेखोर जमाव नव्हता. बोस्टनच्या सामान्य ते प्रतिष्ठित अशा प्रत्येक व्यक्तीचा हात चहाच्या खोक्यांना लागला होता.

सभ्य, सामान्य, स्वातंत्र्यप्रेमी व देशभक्त असे हे नागरिक होते. त्यामुळे हा दंगा नव्हता,ती एका क्रांतीची पहाट होती. जीचा उल्लेख जगाच्या इतिहासात 'बोस्टन टी पार्टी' म्हणून केला जातो. खर म्हणजे सर्वसामान्य समजाप्रमाणे हा एखादा चहापानाचा कार्यकम नव्हता,तर स्वातंत्र्य संग्रामाचा प्रारंभ होता. चहासारख्या पदार्थाने जगाच्या इतिहासात वेगवेगळया पद्धतीने भूमिका पार पाडलेली दिसते. अशा या चहाने चांगले घडवलेले आहे आणि चांगले चाललेले बिघडवले देखील आहे. यामुळेच 'चाय से खतरा' या उक्तीचा ऐतिहासिक अन्वयार्थ प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार घेऊ शकतो.

-प्रा.डॉ.राहुल हांडे,

भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्य अभ्यासक आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com