सामान्य माणसाशी नाळ जुळलेला नेता

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात स्व.वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही. दादा न शिकलेले. पण शिकलेला दादांच्या पुढे फिका पडे, इतके दादांचे चौरस ज्ञान होते आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ. त्यामुळे दादा सर्वाथाने ‘दादा’ होते.....पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या ब्लॉग मालिकेचा बारावा भाग.....
सामान्य माणसाशी नाळ जुळलेला नेता

महाराष्ट्र दादांना कधीही विसरू शकणार नाही. एक स्वातंत्र्यसेनानी, देशासाठी पाठीवर गोळी झेललेला एक लढवय्या नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन क्रांतिकारी विचारधारा बदलून विकासाचा, सहकाराचा विचार राबवून माळरानावर सहकार फुलवणारा महाराष्ट्राचा फार न शिकलेला शहाणा माणूस म्हणजे दादा.

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही. दादा न शिकलेले. पण शिकलेला दादांच्या पुढे फिका पडे, इतके दादांचे चौरस ज्ञान होते आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ. त्यामुळे दादा सर्वाथाने ‘दादा’ होते.

स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात दादा होते. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी, पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते. तेव्हा सांगली जिल्हा झाला नव्हता. दादांना पकडायला बक्षीस होते. दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड-या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला. दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले.

दादांच्या पाठीत उजव्या बाजूने गोळी घुसली. शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. दादा अनेक वर्षे सांगत असत, ‘स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ-या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली आहे.’ दादांच्या पाठीवर आणि छातीवर दोन्ही बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा शेवटपर्यंत होत्या. दादांनी स्वातंत्र्यवीर असल्याचे कधीही भांडवल केले नाही.

दादांचे वागणे, बोलणे, राहणे, पोशाख किती साधा. साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणजे दादा. १९५२ साली ते आमदार झाले. ५२, ५७, ६२, ६७, ७२ असे सलग पाच वेळा आमदार होऊनही दादांनी कधीही ‘मला मंत्री करा,’ असे काँग्रेस नेत्यांना सांगितले नाही. दादांचा जीव मंत्रीपदात कधीच नव्हता. ६७ ते ७२ ही पाच वर्षे दादा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.

१९६७ साली देशात नऊ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली. महाराष्ट्रात दादा अध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री या जोडीने काँग्रेसच्या २०२ आमदारांना निवडून आणले. १९७२ साली विधानसभा निवडणुकीत ही संख्या २२२ वर गेली.

महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा – ज्याला प्रचंड म्हणता येईल – तो विजय दादा प्रदेश अध्यक्ष असताना मिळाला. मग इंदिरा गांधींनी वसंतदादांना चक्क आदेश दिला आणि ते मंत्री झाले. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते आले. दादा चौथीपर्यंत शिकलेले. म्हणजे शिक्षण जवळ जवळ नाहीच. पण व्यवहाराचे त्यांचे शिक्षण इतके मोठे होते की, दादा एक विद्यापीठच होते. न शिकलेल्या या माणसाला विद्यापीठाने पुढे डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली.

दादांचा मोठेपणा असा जगदमान्य झाला. दादा पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, ‘कुठल्या खो-यात किती पाणी आहे?’ चाफेकर सांगायचे, ‘अमूक टीएमसी आहे.’ दादा म्हणायचे ‘टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..’ दादांचा प्रत्येक शब्द असा व्यवहारी असायचा.

दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कशातही फरक पडला नाही. ते मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल असोत, ते जेवत असोत किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असोत. त्यांना भेटायला कोणालाच कधी संकोच वाटला नाही. दादांच्या भोवती माणसे नाहीत, असा कधी दिवस नव्हता. आणि माणसांना भेटून दादा कंटाळले असेही कधी घडले नाही.

सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा कसा बदलता येतो, हे दादांनी महाराष्ट्राला शिकवले. दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत कर्मचा-याची बदली होत नव्हती.

एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. मुलगा पुण्यात, मुलगी औरंगाबाद जिल्हा परिषदेत. बदलीची मागणी झाली. बदली करता येत नाही, असे सांगण्यात आले. विषय दादांपर्यंत गेला. दादांनी संबंधित खात्याच्या सचिवाला बोलावले.

सचिवाने सांगितले, ‘दादासाहेब, आपला नियम असा आहे की, एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होत नाही.’ दादा म्हणाले, ‘म्हणून तर तुम्हाला बोलावले. आजपासून एका ‘जिल्ह्यातून’ दुस-या ‘जिल्ह्यात’ बदली करता येईल, असा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे आण आणि माझी सही घे..’ त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. जे करायचे ते सामान्य माणसाच्या हिताचे असेल तर लगेच करायचे. त्यात कोणतीही लाल फित दादांना आडवी आली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com