Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगस्पंदन : इक प्यार का नग्मा है...

स्पंदन : इक प्यार का नग्मा है…

डॉ. प्रवीण घोडेस्वार

एकवीस फेब्रुवारीला सोनी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात संतोष आनंद यांना काही वेळासाठी मुद्दामच आमंत्रित करण्यात आलं होतं. व्हील चेअर वरून आलेले आणि पक्षाघाताने थरथरणारे शरीर अशी त्यांची अवस्था बघून साऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्या कार्यक्रमातले सारेच सहभागी (स्पर्धक-परीक्षक-वादक) गहिवरले होते.

मला खात्री आहे की हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले असतील. त्यांची ही अवस्था पाहून मन खूप विषण्ण झालं. डोळे भरून आले. आजच्या पिढीतले फार कमी जण त्यांना ओळखत असतील. माझ्याही समकालीन मित्र-मंडळींना संतोष आनंद फार परिचित असतील असं वाटत नाही. याला कारणही तसेच म्हणावे लागेल. ते हिंदी चित्रपट सृष्टीतले गीतकार असले तरी त्यांच्या वाटेला फार गाणी लिहिण्याची संधी आली नाही. लेखाचं शीर्षक असलेलं गाणं त्यांनीच लिहिलंय. ढोबळमानाने १९७० ते १९८० या दशकांत त्यांची कारकीर्द बहरली. अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक मनोजकुमार यांनी त्यांना बऱ्यापैकी संधी दिली.

- Advertisement -

महोब्बत है क्या चीज…

रोटी कपडा और मकान, शोर, पूरब और पश्चिम, क्रांती, प्यासा सावन, प्रेम रोग, संगीत या त्यांच्या चित्रपटांची गाणी खूप लोकप्रिय झालीत. इक प्यार का नग्मा है…(शोर) आणि महोब्बत है क्या चीज…(प्रेमरोग) या दोन गाण्यांसाठी त्यांना प्रतिष्ठेचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा ‘संगीत’ हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातलं ‘हो रब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या…हे गाणं लोकप्रिय झालं होतं.

आपली हिंदी चित्रपटसृष्टी तशी फार बेभरवशाची आहे. इथं कधी कोणाचं नशीब फळफळेल आणि कोणाला रस्त्यावर यायला लागेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. नशीब फळफळायला उच्च दर्जाची गुणवत्ता नेहमीच असते असं नाहीये. सुमार कुवत असलेली अनेक मंडळी अमाप यश संपादन करतात तर अत्यंत प्रतिभावान असलेल्या कलावंतांच्या प्राक्तनात मात्र अपयशाची गडद छाया दाटून राहिलेली आढळते. मघाशी म्हटल्याप्रमाणे सारा नशिबाचा खेळ. गीतकार संतोष आनंद देखील गुणवत्ता असूनही पुरेशी संधी न मिळालेल्या कमनशिबी कलावंतांपैकी एक.

यांनाही संधी मिळाली नाही

आपल्या देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेटमध्ये सुद्धा अशी उदाहरणे सापडतात. मुंबईचे पद्माकर शिवलकर आणि दिल्लीचे राजेंद्र गोयल ह्या दोन फिरकी गोलंदाजांची नावं या संदर्भात आठवतात. दोघेही अतिशय प्रतिभावंत फिरकीपटू होते. आपल्या कामगिरीच्या बळावर त्यांनी अनेकदा आपल्या संघाला रणजी स्पर्धेत यश मिळवून दिले होते. शिवलकरांना तर वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईच्या रणजी क्रिकेट संघात सामील करून घेण्यात आलं होतं. ही घटना नव्वदच्या दशकातली. तेव्हा मुंबई क्रिकेट संघात दर्जेदार फिरकी गोलंदाजांची वानवा होती. संतोष आनंद यांच्याप्रमाणेच गीतकार नीरज, अमित खन्ना, योगेश यांनाही आशयपूर्ण गाणी लिहून देखील फार संधी मिळाली नाही.

संतोष आनंदसोबत लक्ष्मीकांत-प्यारेलाल

संतोष आनंद यांनी तत्कालीन आघाडीची संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासमवेत जास्त काम केलं. या जोडीने सर्वाधिक काम गीतकार आनंद बक्षी सोबत केलं आहे. साहजिकच लोकांना संतोष आनंद यांनी लिहिलेली गाणी आनंद बक्षी यांचीच आहेत असं वाटायचं. त्यांच्याकडे प्रतिभा होती म्हणूनच राज कपूरने त्यांना आपल्या ‘प्रेमरोग’ या चित्रपटासाठी संधी दिली. विशेष म्हणजे त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळालेली वर उल्लेख केलेली गाणी लक्ष्मी-प्यारे यांनीच स्वरबद्ध केली आहेत. संतोष आनंद यांची ‘प्यासा सावन’ मधली गाणी रसिकांना फार आवडली होती. मेघा रे मेघा रे.., तेरा साथ है तो मुझे क्या कमी है.., इन हसीन वादियोंसे…अशी अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. याच चित्रपटातली गाणी ऐकून राज कपूरने आपल्या मराठमोळ्या सुरेश वाडकरांना प्रेमरोग साठी पाचारण केलं. प्रेमरोगची गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यामुळे सुरेश वाडकर हिंदीत प्रस्थापित गायक बनले. बघा दोन कलावंतांच नशीब कसं वेगळं होतं. वाडकर पुढे निघून गेले, संतोष आनंद यांना मात्र या लोकप्रिय गाण्यांचा सातत्याने काम मिळण्यासाठी फारसा लाभ झाला नाही. त्यांच्या फिल्म फेअर विजेत्या दोन्ही गाण्यांत लता मंगेशकरचा आवाज आहे. ‘इक प्यार का नग्मा है’ मध्ये मुकेश सहगायक तर ‘महोब्बत है क्या चीज’ यात सुरेश वाडकरांची साथ लाभली आहे.

संतोष आनंद यांचा शुक्रवारी वाढदिवस

लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या गायिका नेहा कक्कडने त्यांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. स्वाभिमानी कलावंत संतोषजींनी तर नम्र शब्दांत यास नकार दिला. पण नेहाने तुमच्या नातीकडून एक छोटीशी भेट म्हणून स्वीकार करण्याचं केलेलं भावनिक आवाहन त्यांना टाळता आलं नाही. तर कार्यक्रमातले दुसरे एक परीक्षक संगीतकार विशाल दादलानी यांनी संतोष आनंद यांच्या कवितांना/गाण्यांना चाली लावून ते रसिकांना पेश करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या भावपूर्ण शब्दांना नव्या दमाचे संगीतकार गाण्यांच्या रुपात लोकांपुढे कसे सादर करतात याची उत्सुकता आहे. लवकरच ही गाणी ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळेल अशी आशा करू या. शुक्रवार, ५ मार्चला संतोष आनंद ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना निरोगी आयुष्यासाठी मनापासून अगणित शुभेच्छा!

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या