Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगकडू असूनी गोळी औषधिया कामा

कडू असूनी गोळी औषधिया कामा

शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर असते की, शाळा महाविद्यालयात शिकल्यानंतर आणि शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडल्यानंतर जे स्मरणात राहाते तेवढेच खरे शिक्षण. शिक्षण ही काही डोक्यात कोंदण्याची गोष्ट नाही. ती जाणीव पूर्वक एका दिशेचा प्रवास आहे. प्रत्येकाला जीवनात काही ना काही प्राप्त करायचे असते. त्यासाठी त्याची धडपड सुरू असते, पण या धडपडीत आपल्याला मोठयांचा सल्ला महत्वाचा असतो. तो सल्ला आपण किती मनावर घेतो हे महत्वाचे आहे.

खरेतर कोणी तरी खडतर वाटा चालत शहाणपण प्राप्त केलेले असते. ते शहाणपणाच्या गोष्टी लहान्यानी ऐकायला हव्या असतात. जीवनाचा प्रवास हा अनुभवी, ज्ञानी, बुध्दिवान, प्रज्ञावान असलेल्या व्यक्तिच्या शहाणपणाने इतरांनी करायची गरज असते. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचा अनेकांनी सातत्याने प्रयत्न केला. घरातील मोठी माणसं आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर मुलांचे भविष्य घडू पाहत असतात. त्याकरीता ते सतत बालकांच्या विकासासाठीचा घोषा करत असतात. त्याचवेळी शिक्षणातही शिक्षक त्याच दिशेने प्रवास करू पाहत असतात. पण तो प्रवास विद्यार्थ्यांना नकोसा झाला आहे. शिक्षकांनी केलेला आग्रह,सक्ती ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षा वाटू लागली आहे. मात्र ही सक्तीच विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वलतेच्या दिशेचा प्रवास घडवेल. त्यामुळे अभ्यासाची सक्ती आज कडू वाटत असली तर उद्याच्या भविष्याची गोड फळे चाखण्यासाठी आपल्याला या वाटा चालण्याची निंतात गरज आहे.

- Advertisement -

जीवनात आपल्याला शहाणपण हवे असेल, ज्ञानसंपन्नता हवी असेल तर त्या व्यक्तीला अखंड साधना करावी लागते. साधना हा अखंड स्वाध्यायाचा मार्ग असतो. त्यासाठी त्या दिशेने चालू पाहाणा-याला कष्ट सोसावे लागतात. ज्यांनी हा मार्ग निवडला आहे त्यांचा उध्दार झाला. त्यांना प्रतिष्ठा, सन्मान मिळाला. ज्ञानाची साधना ही कदाचित धन संपत्ती देणार नाही. मात्र जीवनाचा आनंद, समाधान दिल्याशिवाय राहाणार नाही. आपल्याल जीवन उन्नत करायचे असेल तर त्यासाठी साधनेकडे डोळेझाक करता कामा नये. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात य़श प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी कष्ट सोसण्याची तयारी ठेवायला हवी. आपल्या इतिहासात शिष्य गुरू परंपरा मोठी आहे. त्या परंपरेत आपल्याला अनेक शिष्यांनी आपल्या गुरूजींकरीता केलेली प्रयत्नाची पराकाष्टा महत्वाची दिसते.

गुरूजींनी आपल्या शिष्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जाणीव पूर्वक काही वाटा निवडलेल्या होत्या. ते अनुभव आपण जाणले तर शिष्य आपल्या गुरूंनी सांगितलेल्या वाटांसाठी किती प्रयत्नांची पराकाष्टा करत होते याची जाणीव होत होती. मुळात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर प्रत्येकाला कष्ट सोसावेच लागतात. त्यासाठी तयारी करायला हवी. कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच प्राप्त करता येत नाही ही जाणीव मनात घऱ करत असे. अलिकडे विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासा विषयी असलेले प्रेम कमी होत चालले आहे असा अनुभव शिक्षणातील अनेक जन सांगू लागले आहेत. कोरोना नंतर शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक नुकसान जितके झाले त्यापेक्षा अधिक नुकसान विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वृत्ती आणि मनोवृत्ती हरवत चालल्या आहेत हे नुकसान खूप मोठे आहे. मुळात विद्यार्थ्याचा मुळ धर्म शिकणे आहे. नवनविन जे काही असेल ते प्राप्त करणे आहे.

नवे काही शिकण्याची मानसिकता सातत्याने जोपासायला हवी. एखादी गोष्ट येत नसेल तर ती प्रयत्न करून शिकतो असे पूर्वी म्हटले जात होते. मात्र अलिकडे विद्यार्थी आपल्याला एखादा घटक येत नसेल तर तो येत नाही असे बिनधास्तपणे सांगू लागला आहे. या बिनधास्तपणात शिकण्याची इच्छाच होत नाही. हा बिनधास्त पणा मुलांच्या भविष्यात अंधाराचे साम्राज्य निर्माण करणार तर नाही ना? अशी शंका येते. येत नाही हे ठिक आहे पण शिक्षकांनी शिकविल्यानंतर करण्याची वृत्तीची आता निंतात गरज आहे.त्या करीता आई बाबांनी देखील जाणीव पूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. अभ्यासाची सवय हरवत गेली तर मुलांचे किती नुकसान झाले आहे त्यापेक्षा समाजाचे नुकसान अधिक होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. समाजाला केवळ गर्दीने आस्तित्व येत नाही. समाजाची समृध्दता लोकसंख्येने उंचावत नाही. त्याकरीता अभ्यासू वृत्तीची किती माणस त्या समूहात आस्तित्वात आहे हे महत्वाचे.

पूर्वी अरूणी आणि वेद हे गुरू बंधू गुरूजींनी सांगितलेले कामे करत होते. गुरूजींनी एकदा शेताला पाणी देण्यास सांगितले. मग हे बंधु पाणी भरण्यासाठी शेतात गेले. बराच वेळ झाला पाणी देत होते. पण एका ठिकाणी पाणी देत असताना पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने आला. काही केलेतरी पण पाणी अडविले जाण्यासाठी लागणारी माती उपलब्ध नव्हती. जी होती तीने पाण्याचा प्रवाह आडला जाणार नाही. अखेर शिष्यांपैकी एक जन बांधावर आडवा झाला आणि पाणी अडविले. तो त्या पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला. उशिर झाला म्हणून गुरूजी शोधण्यासाठी गेले. आवाज दिला. प्रतिसाद मिळाला पण शिष्य कोठे दिसेना.. अखेर आवाजाच्या दिशेने गुरूजी गेले तेव्हा आवाज आला. तिथे शिष्य मातीने पूर्ण माखलेला होते. खरेतर यातील विद्यार्थ्यांची निष्ठा, कष्ट उपसण्याची तयारी महत्वाची आहे.

अलिकडे शिक्षकांनी सांगितलेला कष्टाचा मार्ग अनुसरणे कमी होत चालले आहे. शिक्षकांनी शिकवलेले अधिक जाणून घेण्यापेक्षा अधिक सुलभ उपाय शोधण्याकडे कल वाढतो आहे. ऑफलाईन परीक्षा नको तर ऑनलाईन परीक्षा घ्या ही मागणी करत विद्यार्थी आंदोलन करता आहेत याचा अर्थ काय काढायचा? पाठ, प्रकरण समजून न घेणे. शिक्षणासाठी तयारी न करणे, शिकायच्या घटकासोबत त्यासंबंधीचे अवांतर वाचन न करणे, त्यासाठी पुरक वाचन न करणे यागोष्टी घडता आहेत. त्यामुळे पाठातील आशयापुरते वाचले तरी परीक्षेत मार्क मिळतात. त्याच बरोबर मार्कांसाठी बाजारात अनेक साहित्य उपलब्ध आहे. मग ते अपेक्षित,गाईड सारख्या तयार साहित्याचा उपयोग करतात. त्यामुळे शोधणे,जिज्ञासेने प्रवास करणे घडत नाही. शिक्षण घेत असताना आपल्या मनात उत्सुकता, जिज्ञासा नसेल तर ज्ञानाचा प्रवास कसा घडणार हा खरा प्रश्न आहे. आपण या दिशेने प्रवास करणार नसू तर आपण विद्यार्थी कसे? खरेतर कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर अभ्यास करायला हवा, साधना करा, अभ्यास करा असा संदेश कोणी दिला तरी मुलांना वाईट वाटते. इतकी वाईट स्थिती आहे. शाळेत मुलांची हुशारी उंचवावी म्हणून शिक्षक सातत्याने कष्टत असतात. आपापल्या परिने ते प्रयत्न करतात.या प्रयत्नाचा विचार न करता विद्यार्थी चालत राहिले तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचे, समाधानाचे दिवस कसे येतील ?

शिक्षण ही वर्गात शिक्षक शिकवतील आणि विद्यार्थी वर्गात बसतील आणि मुले शिकतील असे वाटणे हे चिंतन चुकीचेच म्हणायला हवे. शिकणे हे स्वयंप्रेरणा असायला हवी. मुळात कोणीतरी शिकविते म्हणून शिकतो ही धारणा ज्ञानरचनावादात चुकीचीच ठरविली आहे. त्यामुळे मुळात आतूनच अभ्यासाची वृत्ती विकसनाचे आव्हान आहे. शिक्षक मुलांनी अभ्यास करावा म्हणून सतत घोषा लावत असतात. त्या घोषात शिक्षकांचा स्वार्थ नसतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा यासाठी शिक्षक कधी कधी शिक्षा करतात. कधी रागवतात, कधी एखादी चापटही मारतात. अर्थात या सर्व शिक्षा कायद्याने प्रतिबंधित केल्या आहेत. तरीपण या गोष्टी शिक्षक करत असतात तेव्हा अनेकदा मुलांना त्याचा राग येतो. त्याचे वाईट वाटते. अनेकदा पालकांही त्याबददल वाईट वाटत असते. मात्र मुळात आपल्याला उत्तम भविष्य हवे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आज आपल्याभोवती इतर व्यवधान आहेत. त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येणे घडेलही. आपल्या भोवतालचे दूरदर्शन, मनोरंजन आनंदायी असेल आणि अभ्यास हा कंटाळवाणा असेलही पण तरी सुध्दा आपल्या भविष्यासाठी हा मार्गच निवडायला हवा. त्यात कितीही कष्ट असले, यातना असल्या आणि कदाचित मनाविरोधातील भावना असल्या तरी त्यात उद्याचे प्रकाशमय आय़ुष्य दडलेले आहे .

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की,

जै सुखालागी आपरपयां / निंबचि आथी धनंजया / तै कडूवटपणा तयाचिया / उबगिजेना 18/24

माऊली म्हणतात ये धनंजया आपल्या भोवती असलेल्या अनेक वृक्षांपैकी क़डूलिंब नावाचा वृक्ष आहे.त्याची चव अत्यंत कडू आहे.सहजतेने कोणी पीत नाही. मात्र कडूलिबांचे सेवन केल्याना जर आपल्याला आरोग्याचा सुखलाभ होत असेल तर त्याच्या कडूपपणाला कंटाळता कामा नये.त्याच्या चवीपेक्षा त्याचे सेवन केल्याने आपल्याला होणार लाभ महत्वाचा आहे .त्यामुळे आपले आरोग्य उंचावेल.त्यातून आपल्या शारीरिक व्याधी दूर होतील.त्यामुळे आपण कडूलिंबाचे सेवन करण्याला पर्याय देऊ नये हे लक्षात घ्यायला हवे.त्याच अर्थाने अभ्यास केल्याने जीवन अधिक उन्नत आणि समृध्द होणार असेल तर आपणही अभ्यासाला दूर सारता कामा नये.अभ्यासाचा मार्ग हा कितीही खडतर असला तरी तीच वाट आपण चालायला हवी.त्यातच आपले हीत सामावलेले आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या