कर्माची वाटे संतोषिया लाभे...

आपल्यापेक्षा अधिक मोठी गाडी कोणाची तरी असते, आपल्यापेक्षा कोणाचा तरी बंगला मोठा आणि सुंदरही असतो.. आपल्यापेक्षा कोणाकडे तरी सुवर्णालंकार अधिक असतात.. आपल्यापेक्षा कोणाकडे तरी सुंदर वस्त्र असतात.. म्हणजे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत म्हणून.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
कर्माची वाटे संतोषिया लाभे...

प्रत्येक माणूस जीवनभर सातत्याने आनंदाच्या शोधात भटकत असतो. त्याचा अखंड प्रवास आणि धडपड ही आनंदाच्या वाटेसाठी असते. मात्र अनेकदा अखंड जीवनभर प्रवास करूनही आनंद मिळतोच असे होत नाही. जीवनात शांतता असेल तरच आनंदाची वाट सापडण्याची शक्यता असते. शांतता ही केवळ कर्माचा त्याग करून, शांत राहून प्राप्त करता येण्याचा भाव नाही. मनात शांततेचा भाव निर्माण करायचा असेल तर त्यासाठी कर्माच्याच वाटेना जावे लागते.

आपल्याला नेमून दिलेले कर्म जोवर आपण प्रामाणिकपणे करत नाही तोवर जीवनात शांततेचा प्रवास घडत नाही. कर्माचा आनंद हा शांततेच्या अनुभवातूनच मिळत असतो. त्यामुळे कर्माचा त्याग आपल्याला कधीच शांतता आणि आनंद प्राप्त करून देणार नाही. त्या उलट कर्माचा प्रवास जीवनात आनंदाची पेरणी करेल. तर कर्माचा त्याग जीवन दुःखाने भरून टाकेल. आपल्याला कोणती वाट हवी आहे याचा विचार करण्याची गरज आहे.

कर्म हीच जीवन आनंद प्रवासातील महत्वाची साधना आहे. ते कर्म प्रत्येकाच्या वाट्याला आले आहे. आपण जेथे कोठे असतो त्या प्रत्येक ठिकाणी आपले कर्म करण्याची वाट निरपेक्षतेने चालत राहीलो तर आनंदाला पारखे होण्याची वेळ येणार नाही. मुळात आनंद ही गोष्ट इतरत्र मिळण्याची शक्यता नाही. त्याच बरोबर आत्मिक आनंद हा काही भौतिक सुखात मिळण्याची शक्यता नसते. तो काही अध्यात्माची साधना केली म्हणजेच मिळतो असे नाही. आपल्याला संपत्ती मिळाली, आपल्याला हवे ते साधने मिळाली,मोठा बंगला मिळाला, सुवर्णांलकार मिळाली तरी त्यातूनही तो मिळतोच असे नाही. फार तर आपल्याला सुख मिळेल. पण ते सुख किती काळ टिकते हा खरा प्रश्न आहे.

आपल्यापेक्षा अधिक मोठी गाडी कोणाची तरी असते, आपल्यापेक्षा कोणाचा तरी बंगला मोठा आणि सुंदरही असतो.. आपल्यापेक्षा कोणाकडे तरी सुवर्णालंकार अधिक असतात.. आपल्यापेक्षा कोणाकडे तरी सुंदर वस्त्र असतात.. म्हणजे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत म्हणून सुख मिळते, त्याच वस्तू आणि त्यापेक्षा अधिक चांगल्या वस्तू इतरांकडे असतील तर ते सुख फार काळ टिकत नाही. बाहय वस्तूचे मिळणारे सुख हे तात्कालिक आणि दीर्घकाळ टिकणारे असत नाही. मात्र कर्म जेव्हा आपण निरपेक्ष आणि प्रामाणिकपणे करतो तेव्हा मिळणा-या सुखापेक्षाही होणारा आनंद अधिक आहे. या निरपेक्षतेतच आत्मीक आनंदाचे मुळ आहे. मुळात आनंद हीच मोठी आत्मिक भावना आहे.

ती कर्मानेच मिळतेच. कर्मातील प्रामाणिकतेत आनंद सामावलेला असतो. आपण जेव्हा ते कर्म लोभाने करत जातो तेव्हा फार काही लाभण्याची शक्यता नाही. लोभात सुखही नसते आणि आनंदाचा भावही नसतो. मात्र तरीपण माणसं त्यामागे लागतात हेही खरे आहे. याचे कारण त्यात आनंद आहे असे वाटत जाते. त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न होतो मात्र अखेर त्यात आनंद नाही हे नंतर लक्षात येते. आनंदाच्या वाटेच्या प्रवासातील लोभ हाच स्पीडब्रेकर आहे.

अनेकदा कर्म करत असताना अपेक्षा ठेवून प्रवास केला तर जे काही मिळते ते सुख असते. अर्थात तेही दीर्घकाळ टिकणारे नसते. मात्र तेच कर्म निरपेक्षतेने करत गेलो तर आपल्याला मिळणारा आनंद अव्दितीय आणि अवर्णनीय असतो. कारण आनंद हा निरपेक्ष कर्माचा भाव आहे. आनदं हाच परमेश्वर असतो. परमेश्वराचे रूप काय आणि कसे आहे? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचे उत्तर “परमानंद रूपं हरी ओम हरी ओम” असे मिळते. परमेश्वर हा काही मूर्तीत नाही, तो देवळात नाही, तो तिर्थक्षेत्री नाही तर, तो आहे आपल्या निरपेक्ष कर्मात. गाडगेबाब, संत तुकोबा, ज्ञानोबा आणि इतर सर्वच संतानी हीच वाट अधिक महत्वाची असल्याचे सांगितले आहे. त्यांनी तीच वाट चोखाळली, त्यातील अनेकांनी तर मंदिरात जाणेही पसंत केले नाही.

वारी केली नाही पण आपल्या कर्माची वाट मात्र सोडली नाही. गाडगेबाबा तर कष्ट केल्याशिवाय त्या गावातील अन्न देखील घेत नव्हते. कष्टाशिवाय कोणत्याही प्रकारचा मोबदला घेणे हे पाप आहे असे गांधीजी सांगत असे. कर्म आपल्याला आनंद अनुभव मिळून देत असतो. कर्माचा निरपेक्ष भाव हा आनंद आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आत्मिक आनंद अनुभवास मिळतो तेव्हा एका अर्थाने परमेश्वरच भेटीचा आनंद मिळालेला असतो. परमानंद हा ईश्वराचा भाव आहे. तेच ईश्वराचे स्वरूप आहे. तो जर भाव आपल्याला आपल्या कर्माच्या पेरणीतून मिळत असेल तर तेच परमेश्वराचे दर्शन समजण्यास काय हरकत आहे. परमेश्वर शोधण्यासाठी आपल्याला कोठेही जाण्याची गरज पडत नाही. संत सांगतात “देव घ्या कोणी, देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी”. त्यामुळे आनंदाचा शोध म्हणजे एका अर्थाने परमेश्वराचा शोध आहे. आनंद मिळाला की परमेश्वर भेटला असेच समजावे.

शिक्षक म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा आनंदाच्या शोधात असलेल्या शिक्षकाला पुरस्काराने आनंद मिळत नाही. त्याचा उत्तम मूल्यमापन अभिप्राय लिहिला म्हणून आनंद मिळत नाही. त्याच्या पाठीवर हात टाकत कौतूक केले म्हणून आनंद मिळत नाही. आपले खोटे मूल्यमापन केले म्हणून त्याला आनंद होत नाही तर उलट अंतरिक दृष्टया तो अत्यंत निराश झालेला असतो. खरा शिक्षक यापलिकडे जात स्वकर्माचा आणि स्वधर्माचा विचार करत असतो. त्याच्या वर्गातील अध्यापनाचा प्रवास हा निरपेक्षतेचा असतो. आपल्या समोर बसलेल्या बालकांच्या आनंदासाठी त्याचा सारा अट्टहास सुरू असतो. आपण अध्ययन अध्यापनाचा अनुभव दिल्यानंतर तो मुलांना समजला, त्याचे आकलन झाले की शिक्षकाचा चेहरा उजळून निघतो. मुलाला अधिक चांगले य़श मिळाले की, शिक्षकाचा चेह-यावरती प्रसन्नतेचे भाव प्रतिबिंबीत होतात. आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा झाला याचा आनंद आई-बाबांच्या इतकाच त्याच्या शिक्षकांना होत असतो.

शिक्षक हे नेहमीच त्यांनी जे काही अध्ययन अनुभव दिले आहेत ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरावे म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यासाठी प्रयोगशीलतेची वाट चालत असतात. त्यासाठी त्यांचे अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू असतात. ते गळी उतरविण्यात अपयश आले तर शिक्षक दुःखी होतात. मुलाला येत नाही याचे दुःख शिक्षकांच्या वाटयाला अधिक असते. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदही शिक्षकाला अधिक असतो. याचे कारण शिक्षकाची पेरणी ख-या अर्थाने निरपेक्ष असते. त्याला होणारा आनंद कशातच मोजता येत नाही. त्याचे मूल्यांकन कसे करणार असाही प्रश्न असतो. कारण तो आनंदाचा भाव असतो. आनंद कशाच्याच व्दारे मापन करता येत नाही. माणसांचे एकमेकावर प्रेम असते असे अनेकदा म्हटले जाते. पण त्या प्रेमाचे मूल्यांकन आपण कोणत्याही साधनाने करू शकत नाही.

प्रेम हा भाव आहे आणि कोणत्याही मनातील भावभावनाचे मापन केले जाऊ शकत नाही. प्रेमाचा भाव हा नेहमी निरपेक्ष असतो. मनात अपेक्षा ठेऊन कधीच प्रेम केले जाऊ शकत नाही. समोरच्याचे सौंदर्य़, संपत्तीवर भाळून प्रेम केले तर ते सौंदर्य आटले की प्रेमाचा झराही आटत जातो. पण भाव समजून प्रेम झाले तर तो झरा कधीच आटच नाही. मादाम क्युरी या दिसण्यास फारशा सुंदर नव्हत्या, त्याकाळी प्रयोगशाळेत पुरूष वैज्ञानिकांबरोबर स्त्री वैज्ञानिकास कामास ठेवले जात नव्हते. कारण त्याचा परिणाम पुरूष वैज्ञानिकांच्या कामावर होऊ नये ही मुळची धारणा होती. मात्र ते पाहून एका नामवंत वैज्ञानिकाने लिहिले..की, “मादाम यांना पुरूष वैज्ञानिकासोबत कामाला ठेवले तरी कोणताच परिणाम होणार नाही”. पण मादाम क्युरीच्या सौंदर्यापेक्षा पेरी क्युरी हे तिच्या बुध्दीमत्ता, निर्मळता आणि तिच्या मनातील भावनेवर प्रेम करत विवाहास तयार झाले होते. त्यांनी विवाह केला आणि यशस्वी देखील झाला. त्यांनी अखंडपणे सोबत काम केले आणि ते नोबेल पुरस्कापर्यंत पोहचले.

जगातील पहिली नोबेल पुरस्कार मिळविणारी ती पहिली स्त्री ठरली. याचे कारण बाहय सौंदर्यापेक्षा दोघांचेही अंतरिक सौंदर्यावर अधिक प्रेम होते. प्रेमाचे नाते फुलले की आनंद मिळत जातो. आनंद हा प्रेमाचा भाव आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे अनेक क्षणही प्राप्त झाले होते. निरपेक्ष कर्मात आनंद अंतर्भूत असतो.

संत ज्ञानेश्वर महाराज अठराव्या अध्यायात म्हणतात की,

तरी स्वाधिरकाराचेनि मार्गे / आले जे मानिले आंगे / पतिव्रतेचेनी परिष्वंगे / प्रियाते जेसे 9/ 586

ज्या प्रमाणे पतिव्रतेच्या आलिंगनाने नव-याच्या मनात आनंदाचे भाव निर्माण होत असतात. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाटयाला आलेले जे कर्म, ते स्वभावतःच आनंदाने केले जाते. त्याप्रमाणे आपले कर्म आहे. ते करत राहाणे यात कोणतेही दुःख असत नाही. कर्मातच आनंद दडलेला आहे. त्यामुळे अखंड जीवन कर्माच्या वाटेने चालत राहणे हाच आनंदाचा मार्ग आहे हे जाणायला हवे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण शास्त्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com