कैसे तोडू बंध प्रेमाचे…

jalgaon-digital
8 Min Read

बालकांच्या शिक्षणाचा मार्ग प्रेमाच्या महाव्दारातून जातो असे म्हटले जाते.शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे.या प्रक्रियेत कोणीतरी शिकविणारा आहे आणि कोणीतरी शिकणारा असतोच.मात्र शिकविणारा आणि शिकणारा असेल तरच शिक्षण होते का ? याचे उत्तर नाही असे आहे.मुळात शिक्षण होण्यासाठी त्या दोघात नाते असावे लागते.ते नाते जितके प्रेमाने भक्कम बांधलेले असेल तितके शिकणे प्रभावी होते.नाते हे नेहमीच प्रेमाने बांधलेले असते.जिथे प्रेमाचे बंध असतात तिथे स्वीकृती असते.जेथे स्वीकृती असते तिथे प्रेरणा असते.प्रेरणा म्हणजे शिकण्यासाठीच्या प्रवासासाठीची शक्ती असते.त्यामुळे शिकण्यासाठी पुस्तके,अभ्यासक्रम,शाळा,शिक्षकांची जितकी गरज आहे त्यापेक्षा अधिक गरज ही शिकविणारा आणि शिकणारा यांचे नात्याची असावी लागते. त्या प्रेमाची ओल जितरी खोल असेल तितके शिकणे परिणामकारक आणि प्रभावी होण्याची शक्यता अधिक असते.

शिक्षण हक्क कायद्याचे आस्तित्व आला आणि त्या कायद्यातील कलम 17 मध्ये बालकाला शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला.ना शारीरिक शिक्षा करायची, ना मानसिक शिक्षा करायची.शिक्षणात शिक्षाच नाही तर अभ्यास कसा होणार ? असा प्रश्न विचारला गेला.शिक्षा,धाक असल्याशिवाय मुले अभ्यास करत नाही ही आपली गेली अनेक वर्षाची धारणा आहे.त्यामुळे त्या कलमाला आरंभी विरोध करण्याची मानसिकता निर्माण झाली.त्याला विरोध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता कायदाच संसदेने मंजूर केला आहे म्हटल्यावर विरोधाने काहीच होणार नाही हे जाणीव झाल्याने हळूहळू विरोध मावळत गेला.काही ठिकाणी गुन्हे ,तक्रारी दाखल झाल्या आणि मुलांना मारणे पूर्णतः थांबले. शिक्षा बंद केल्याने त्याचा परिणाम खरच गुणवत्तेकरीता झाला का ? याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे हे मात्र खरे.

कायदा आस्तित्वात येऊन आता एक तप पूर्ण झाले आहे. मात्र मानसशास्त्राचा विचार करता शिक्षा करून मुले शिकते होतात हे काही खरे नाही.कदाचित मुलांमध्ये अधिक कोडगेपणा उंचावण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे शिकण्याकरीता मुलांच्यावरती प्रेम करायला हवे असे गिजूभाई सातत्याने सांगत आले आहे.खरंतर कोणत्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळवायचे असेल तर तिथे कार्यरत असलेल्या प्रत्येकात एक नाते निर्माण करण्याची गरज आहे. कार्यालय असेल तर तेथील प्रत्येकासाठी संघटन महत्वाचे आहे.हे संघटन नेमके काय आहे,तर प्रत्येकाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण करणे महत्वाची असते.तेथे असलेल्या प्रत्येकात प्रेमाची ओल असेल तरच संघटन उभे राहते.मात्र प्रेमाचा ओलावा नसेल तर एकमेकाच्या विरोधात कंडया पिकविणे घडत जाते.शत्रुत्वाचा अर्थ प्रेमाचा अभाव असतो.त्याप्रमाणे शिक्षणात देखील आहे.विद्यार्थी व शिक्षक यांच्यात संघटनाची गरज असते.त्यासाठी प्रेमाचा ओलावा महत्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यात जितका ओलावा अधिक असेल तितके शिकणे पक्के व गतीमान होत जाते.मुलांना रागवले म्हणजे मुले शिकतात असे नाही.मारले म्हणजे शिकतात असेही नाही.प्रेमाने मात्र निश्चित शिकतात.मुल आणि आई यांच्या नात्यात अधिक ओलावा असतो.त्यामुळे मुल आईने सांगितलेले की अधिक ऐकतात असा साधारण आपला सर्वांचा अनुभव आहे.आई ही पहिली गुरू असते याचे कारण मुल आणि आई यांच्या नात्यात प्रेमाचे सर्वात पहिले नाते भक्कमपणे तयार झालेले असते.आईने सांगितले की त्याला ते पटते.शक्यतो आईचा उपमर्द होणार नाही याची काळजी ते बालक घेत असते.एखादी चूक झाली तर ती चूक आईच्याच समोर मान्य केली जाते.

आईच्या समोर चूक मान्य करताना कोणताही कमी पणा असत नाही.त्याचवेळी मुलाने एखादी चूक केली तर ती पोटात घालण्याचे सामार्थ्य देखील आईच्याच हदयात असते.मुळात माफ करण्याचे सामार्थ्य आणि चूक मान्य करण्याची हिम्मत ही आई आणि मुल यांच्या केवळ नात्यात असत नाही तर त्या नात्यात असलेला प्रेमाचा ओलावा हे त्याचे मुळ कारण आहे.जिथे जिथे प्रेमाचा ओलावा,बंध असतात तिथे तिथे चूका स्वीकारणे आणि माफ करणे आपोआप घडते.शिक्षणात मुल जेव्हा चूक करते तेव्हाच रागावणे आणि शिक्षा करणे होते.मात्र जेव्हा नात्यात प्रेम असते तेव्हा ते घडण्याची शक्यता नसते.मुलाने केलेली चूक ही प्रेमाच्या नात्यात चूक वाटत नाही.कारण प्रेमाच्या नात्यात स्वीकृती असते.आणि प्रेम नसेल तर संतापाची भावना निर्माण होणे साहजिक आहे.

एकदा घरी पाहुणे आले होते.त्या पाहुण्याना चहा घेऊन सुनबाई आली.हॉलमध्ये पायरी उतरत असताना तीचा पाय घसरला आणि चहाचा ट्रे पडला,चहा ह़ॉलभर सांडला.बश्या फुटल्या. सासू लगेच ओऱडली “ तुला धड चालताही येत नाही का ? बश्यांपरी बश्याही गेल्या,सारेच नुकसान झाले.आईबांबानी शिकवेलच नाही नीट.” सुनेला खरेतर लागले होते.तीला आधाराची गरज होती..पण घडले मात्र उलटेच.पुन्हा दुस-या आठवडयात पाहुणे आले.सून माहेरी गेल्याने पाहुण्यांसाठी चहाचा ट्रे घेऊन मुलगी आली.दुर्दैवाने हॉलच्या पायरीवरून तीचाही पाय घसरला.बश्या फुटल्या..पण आई म्हणाली “ बेटा लागले का ? ती पायरीच फार गुळगुळीत झाली आहे.”

आईने तीला हात देऊन उठविले.कोठे लागले हे पाहिले. औषध लावले आणि आराम कर.गोळी दिली व झोपविण्यासाठी खोलीत घेऊन गेली.मग आई स्वतः चहा घेऊन आली.खरेतर घटना दोन्ही समान होत्या,दोन्ही मुली सासुबाईंशी नात्यांने जोडलेल्या होत्या,घटना समान होतीपण प्रतिक्रिया मात्र भिन्न होती.जिथे प्रेमाचा ओलावा अधिक होता तिथे वेदनांची जाणीव होती.मात्र जिथे ओलावा कमी होता तिथे मात्र शब्दांचा उध्दार व व्देष होता.प्रेमात अधिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा विचार असतो.तेथील स्वातंत्र्याच्या भावनेत स्वैराचार नसतो.पुरेपुर स्वातंत्र्य असते आणि त्या स्वातंत्र्यात अधिक जबाबदारीची जाणीव असते.मुलांना आपण जेव्हा प्रेमाने बांधुन ठेवतो तेव्हा ते अधिक शिकत असतात.

आपल्या शिक्षकांचे आपल्यावरील प्रेम कमी होऊ नये म्हणून विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करत असतात.शिकण्यासाठी पुस्तकाच्या ओळी आणि धडे कामी येत नाही तर त्या ओळीतील अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे.त्यासाठी प्रेरणा महत्वाची असते.शिकविणे याचा नेमका अर्थ काय असतो असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असते प्रेरणा निर्माण करणे.आपल्यावर ज्यांचे प्रेम असते त्यांची कौतूकाची थाप आपल्या पाठीवर पडावी म्हणून मुले प्रयत्न करत असतात.त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत सर्वाधिक काय महत्वाचे असते तर प्रेमाचे नाते.ते नाते तयार झाले की,वाईट वागण्याची प्रेरणाच नष्ट होते.चांगले वागण्यासाठी हिम्मत मिळते.ती मिळत जाते.शिकणे म्हणजे मूल्यांची पेरणी करणे,शिकणे म्हणजे संस्काराची शिदोरी देणे असते .प्रेमाने हे आपोआप घडत जाते.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की,

जैसा भ्रमर भेदी कोडें / भलतैसे काष्ठ कोरडे

परि कळिकेमाजी सांपडे / कोंवळिये //

जसा एखादा छोटासा असलेली भुंगा कठीण असलेल्या लाकडासही भोक पाडतो . त्या लाकडातून तू सहजपणे आरपार जावू शकतो. त्याच्यात त्या कठिण असलेल्या लाकडाला भेदण्याची मोठी शक्ती आणि हिम्मत असते . मात्र तोच भुंगा जर कोवळया कमळाच्या कळीमध्ये प्रवेशित झाला आणि काही काळांने त्यांनेकळी मिटली तर त्या कोवळ्या कळीलाभोक पाडण्याचे मनातही आणत नाही.याचे कारण तो भुंगा आपली शक्यी गमावतो असे नाही तर कळीशी जे नाते असते ते महत्वाचे असते.त्यामुळे भुंगा शक्ती असूनही त्या कळीला भेदण्याचे धाडस करत नाही.त्याप्रमाणे शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांच्यात नाते निर्माण केले तर आपल्याला मुलांची शक्ती योग्य त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही.प्रेमाच्या धाग्याने सहजपणे आपल्याला मुलांना योग्य दिशेने घेऊन जाणे शक्य होते.

शिकणे हे अत्यंत कठीण काम आहे.कोणी कोणाला शिकू शकते हे काही खरे नाही.प्रत्येकजन स्वतःहूनच शिकत असते.त्यामुळे केवळ शिकण्याची प्रेरणा भरली तरी आपण बरेच साध्य करू शकतो.शिकण्याच्या मंदिरात प्रेमाचा वर्षाव झाला तर शिकणारे भक्त शिकविणा-या देवतेवर गुणवत्तेच्या फुलांची उधळण केल्याशिवाय राहाणार नाही.मंदिरात जशी देवघेवीचा विचार असत नाही.तेथे भक्त आणि देव यांच्यात फक्त नाते असते तसे शिक्षणाच्या मंदिरात नाते असायला हवे.

संदीप वाकचौरे

(लेखक – शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *