Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगउद्याचे भविष्य उज्वल हवे असेल तर...

उद्याचे भविष्य उज्वल हवे असेल तर…

आपल्याला जीवनाभर सत्व आणि तत्वाची पाऊलवाट चालायची असेल तर आपल्याला योग्य विचाराची सोबत असायला हवी असते. यशाच्या शिखरावर चालण्यासाठी मूल्यांचा विचार करावा लागतो. विवेकाची कास धरावी लागते. जीवनाचे मूल्य जितके निरपेक्ष आणि जीवन प्रवासाची वाट जितकी प्रामाणिक असेल तितकी त्या व्यक्तीची आणि समाजाची उंची उंचावत असते.

त्यामुळे या वाटेने चालणारी माणसांची संख्या शिक्षणात अधिक असेल तर जगाच्या कल्याणाची वाट अधिक समृध्द होत जाते. तत्वनिष्ठ आणि विवेकी माणस समाजात वाढत असतील तर समाजातील व राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे युध्दाच्या मनोवृत्तीची खुमखुमी आपोआप संपुष्टात येईल. माणसांच्या भोवतालमध्ये अधिक प्रेमाचा संवाद दिसू लागेल.

- Advertisement -

अनेकदा आपण समाजातील वर्तमान खराब असल्याचे सातत्याने बोलताना अनेकाना पाहतो. पण वर्तमान खराब आहे याचा अर्थ भूतकाळात चुकीची पेरणी झाली आहे असा निघतो. आपल्याला भविष्य सुंदर हवे असेल तर वर्तमानातील पेरणी अधिक उत्तम व्हायला हवी आहे. शेवटी जगात कार्यकारण भावाचा सिंध्दात आस्तित्वात आहे. त्यानुसार आपण जे पेरतो ते उगवते.

उद्याचे भविष्य उज्वल हवे असेल तर पेरणीची काळजी घ्यायला हवी असतो. आता आपण उत्तम तेच पेरले तर भविष्यात अधिक उत्तमतेची उगवण झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम विचाराची पेरणी करण्यासाठी माणसंही उत्तम विचाराची हवी असतात हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पेरणीचा विचार शिक्षणातून पेरला जात असतो. येथे समाजाच्या जडणघडणीची व्यवस्था आहे. शिक्षण हे राष्ट्र निर्मितीचे साधन मानले जाते आणि शिक्षकाला राष्ट्र निर्मिता म्हणून समाजाने स्वीकारले आहे. याचे कारण त्याची ताकद समाज जाणतो.

समाजात उत्तम आणि आदर्श शिक्षकाचे आयुष्य कसे असावे याबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मिळणारे उत्तर महत्वाचे आहे. समाजात शिक्षक चांगले असावे असे म्हटले जाते मात्र केवळ शिक्षकच नव्हे तर समाजातील प्रत्येक नागरिकच चांगला असायला हवा असतो हे महत्वाचे. शिक्षक चांगले असावेच लागतात कारण तेच वर्गातून उद्याचे भविष्य घडवित असतात. उद्यासाठी लागणारा नागरिक या पेरणीतून निर्माण होत असतो. तोच दृष्टी आणि दृष्टीकोनाची पेरणी करत असतो. शिक्षक हे जे काही पेरणार असतो ते उगवते हा निसर्गाचा नियम आहे. आदर्शाची पाऊलवाट शिक्षकांच्या विचारातून जात असते.

खरेतर शिक्षक हा नेहमीच समाजासाठी आदर्शवत राहीला आहे. याचे कारण तो वर्गात सातत्याने उत्तम ते पेरत असतो. त्यातून समाज व राष्ट्राला उत्तम असे नागरिक मिळत असते. अनेकाचे आयुष्य घडवत असतो. आपला विद्यार्थी हुशार झाला पाहिजे, गुणसंपन्न झाला पाहिजे. म्हणून तो सातत्याने कार्यरत असतो. त्याच्या पेरणीने अनेक बालकांच्या आय़ुष्याची समृध्दवाट तयार होत असते. शिक्षकाची जितकी उंची अधिक असते तितका समाज समृध्द असतो. चांगल्या माणसांनी चांगला समाज आणि चांगल्या समाजाच्या निर्मितीने चांगले राष्ट्र उभे राहत असते.

नांदेड येथे अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले होते. त्या अधिवेशनाला जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. खरेतर आय़.ए.एस सारखी सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण झालेले हे अधिकारी होते. या श्रेणीच्या अधिका-यांबददल आजही समाजमनात एक वेगळी प्रतिष्ठा आहे. त्याबददल निश्चित आदर आहे. त्याचवेळी पुण्यातील कुलकर्णी नावाचे एक सदगृहस्थ आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. पांढ-या रंगाचा नेहरू शर्ट आणि पायजमा, खांदयाला अडकवलेली एक शबनम असा वेश परिधान केलेला होता.

सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. कुलकर्णी सरांचा सत्कार एका अधिका-यांच्या हस्ते झालो. तेव्हा ते अधिकारी सत्कार करताना कुलकर्णी सरांच्या चरणावर नतमस्तक झाले. त्या पाठोपाठ दुसरे अधिकारी उठले आणि त्यांनी देखील त्यांचे दर्शन घेतले. खरेतर हे पाहिल्यावर अनेकाना धक्का बसला. मात्र नंतर कळाले की हे कुलकर्णी सर हे त्यांचे स्पर्धा परिक्षांचे गुरूजी होते. या माणसांने आजवर अनेक विद्यार्थी घडवले. मात्र त्याचा त्यांनी गवगवा केला नाही. अनेकाचे आय़ुष्य घडविताना त्यांनी फक्त पेरणी केली. त्या पेरणीत निरपेक्षता होता. पैसा हे त्यांच्यासाठी सर्वस्व नाही. ते फक्त पेरत गेले. त्यांनी परोपकार केला. मात्र त्यात कोठेही जाणीव नाही आणि त्यांची कोठेही वाच्यता नाही. अनेक चांगली माणसं त्यांनी घडविली होती पण त्याबददलचा थोडासाही अहंकाराचा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला नाही.

परोपकाराची वृत्ती होती पण अत्यंत शांततेची पेरणी होती. जीवनाचे एखादे ध्येय निश्चित झाले की केवळ पेरत राहण्याचा विचार मनात घोळत राहतात. तेथे कर्म हेच सर्वश्रेष्ठ वाटत जाते. त्यामुळे उपकाराचे भाव आपोआप नष्ट होतात. त्यांनी इतके अधिकारी घडविले होते. त्यातील कोणी आय.ए.एस होते कोणी आय.पी.एस कोणी त्याच तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. कोणी राज्य शासनाच्या सेवेत असलेले वर्ग एक, दोनचे अधिकारी होते. मात्र या माणसाच्या चेह-यावर कोणताही अहकांराच, परोपकाराचा भाव नाही ही गोष्ट उपस्थितांना फारच अप्रुप वाटत होती.

समाजात अनेक विदवान माणसं असतात. ती माणसं सातत्याने नम्र असतात. अंहकाराचा स्पर्श थोडाही त्यांना झालेला दिसत नाही. मुळात अभ्यास करणा-या प्रत्येकाला या विश्वातील ज्ञानाच्या विस्ताराच्या सिमा ज्ञात झालेल्या असतात. इतक्या मोठया ज्ञान सागरात आपण ते काय? हे ती व्यक्ती जाणत असतो. त्यामुळे आपणास जे काही ज्ञात झाले आहे ते फार नाही. उघडे जग पाहिल्याने त्यांना स्वतःच्या आस्तित्वाची नेमकी जाणीव झालेली असते. त्यामुळे अभ्यासाची प्रौढी मिरवावी असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे अखंड ज्ञानाची साधना करत ही माणसं जीवनभर कार्यरत राहतात.

मिळविलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या भोवतालमधील माणसं शहाणे करावीत यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. जे जे आपणासी ठावे. ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करूनी सोडावे सकळजन ही त्यांची धारणा असते. आपण प्राप्त केलेले ज्ञान विकावे असे त्यांना वाटत नाही. ज्ञान वाटल्याने जग शहाणे होते याचा त्यांना अधिक आनंद असतो. त्यामुळे ज्ञानाचा बाजार न करण्याचे शहाणपण ते जोपासत असतात. शेवटी विद्या ही काही विकण्याची गोष्ट नाही हे त्यांना ज्ञात असतात. जे लोक ज्ञानाचा बाजार करतात त्यांना विदवान तरी कसे म्हणणार?

शिक्षक जीवनभर आपल्या प्राप्त झालेले ज्ञानदान करत असतो. देण्यासाठी तो अधिक आतूर झालेलो असतो. खरेतर जगातील कोणीही शिक्षक राखून ठेवतो असे नाही. जो राखून ठेवतो तो शिक्षक कसा? आपल्याला जे काही द्यायचे आहे त्यात गुणवत्ता राहावी, चांगले ते पेरले जावे यासाठी तो जीवनभर साधना करतो. रोज नवे काही देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपले विद्यार्थी हेच त्या शिक्षकासाठी सर्वस्व असतात. विद्यार्थ्याच्या विकासापलिकडे त्यांना काहीच अपेक्षित नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणारा शिक्षक हा नेहमीच आदराला पात्र ठरला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत नमूद केलेली एक ओवी जाणून घेतली तर शिक्षक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव होण्यास मदत होत असते.

संत ज्ञानेश्वर म्हणतात..

परोपकारू न बोले / न मिरवी अभ्यासिले /

न शके विकूं जोडले / स्फीतीसाठी

या विचाराची पाऊलवाट चालत राहणे म्हणजे स्वतःला जाणत राहणे आहे. ती वाट आपल्याला अधिक समृध्द करून जाणारी आहे म्हणून चालत राहायला काय हरकत आहे?

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या