
कोणाही व्यक्तीला जीवनात यश प्राप्त करायचे असेल, त्यांने मनाशी बाळगलेले ध्येय साध्य करायचे असेल, विद्यार्थ्यांला परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करायचे असतील तर प्रत्येकाला त्यासाठी कष्ट सोसावे लागतात. त्यावेळी अनेक कष्ट हा त्रास वाटत असतो मात्र तो कष्टाचा त्रास सहन केल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही. विद्यार्थी असू दे नाही तर शिक्षक त्यांना आपल्या प्रवासात सातत्याने अभ्यास करावा लागतोच. अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. ज्ञानाची साधना इतक्या सहजपणे कधीच होत नाही.
तो अखंड प्रवास असतो.त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. क्षेत्र कोणतेही असो अभ्यास करावाच लागतो. कोणत्याही क्षेत्रात प्रभाव आणि परिणाम साध्य करण्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही. अभ्यासाशिवाय कोणतेच यश प्राप्त होत नाही. सहजतेने आजवर कोणालाही काही मिळालेले नाही आणि कोणालाही काही मिळत नाही. समजा मिळाले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी त्याकरीता प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागते. ती पराकाष्टाच आपल्याला भविष्याचा मार्ग अधिक उत्तम स्वरूपात निर्माण करत असते. अभ्यासाशिवाय प्रभाव निर्माण होत नाही.त्यामुळे संत म्हणतात की, अभ्यासूनी प्रकटावे... अभ्यासाचा प्रभाव कायम राहतो.त्यासाठी शिक्षणातही तोच मार्ग अनुसरण्याची गरज सातत्याने अधोरेखित करण्यात आली आहे.
ज्ञानसंपन्न शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतो. तो केवळ पुस्तक शिकवतो म्हणून नाही. प्रत्येक शिक्षक पुस्तकातील पाठ, प्रकरणे शिकवत असतोच म्हणून काही सर्व शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या जीवनावर पडतो असे घडत नाही. माणसं कितीही मोठी झाली तर त्यांच्या जीवनातून शिक्षकांचे स्थान कमी होत नाही. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांनी आपल्या जीवनातील पाच गुरूंची महती सांगितली आहे. त्यातील शालेय शिक्षक म्हणून अय्यर गुरूजी यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला कशी दिशा मिळाली याचा अत्यंत सुंदर प्रवास विनम्रतेने नमूद केला आहे. आता इतर शिक्षकही त्यांच्या वाटयाला आले होते तरी पण अय्यर गुरूजींचाच केलेला उल्लेख काय सांगतो? अय्यर गुरूजी हे छोटयाशा विद्यार्थ्यांना शिकविताना देखील अभ्यासूनी प्रकट होत होते. त्यामुळे त्यांनी शिकविलेली कविता जीवनभर विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिली. त्यातून त्यांना जीवनाची वाट सापडली.
त्यांनी अध्ययन अध्यापनात पेरलेल्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जीवनाची वाट सापडलेली दिसते. विवेकानंदाच्या आयुष्यात देखील इंग्रज प्राचार्यांनी शिकवलेल्या कवितेचा सर्वाधिक प्रभाव पडलेला अनुभवला आहे. त्या संदर्भातील उल्लेख त्यांनी आपल्या जीवन प्रवासात केला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी अनेक माणसं अनुभवली आहे. प्राचार्य ना.य.डोळे, प्राचार्य मधुसूधन कौंडीण्य, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, प्रा.डॉ.रावसाहेब कसबे यांच्या सारख्या अनेक शिक्षकांचा प्रभाव समाजमनावर देखील कायम राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी आपल्यावर जीवनभर शिक्षकांचे उपकार आहेत हे मान्य करत सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना अध्यापन करणा-या शिक्षकांच्या घरी जात त्यांचा सन्मान केला. माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे यांनी आपल्यावर रयतच्या निमित्ताने कर्मवीर आणि पी.जी.पाटील यांच्या झालेल्या संस्काराने भविष्याची दाखविलेली वाट नमूद करत शिक्षकांचे जीवनातील स्थान किती वरचे आहे हे अधोरेखित केले आहे. आता या मान्यवराच्या जीवनात आलेले शिक्षक आणि हे मान्यवर ज्यांच्या जीवनात आले म्हणून त्यांचे असेलेले उच्चप्रतिचे स्थान लक्षात घेता हे काही सहजतेने किंवा शिक्षक म्हणून प्राप्त झालेले नाही.
शिक्षक असणे ही नोकरी आहे पण ती नोकरी करताना त्यासाठी शिक्षक किती ज्ञानाची उपासना करतो ते महत्वाचे आहे.समाज मनावर अशाच शिक्षकांचा अधिक प्रभाव आहे. तसेच ज्ञानाची वाट चालणा-या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव व परिणाम दिसून येतो. शिक्षकी पेशा म्हणजे बालकांच्या आय़ुष्याची जडण घडण करणारी व्यवस्था आहे.ती व्यवस्था समृध्द व ज्ञानमय असायला हवी असते. राष्ट्राला ज्ञानार्थी शिक्षक मिळाले तरच त्या राष्ट्राला आणि तेथील बालकांच्या आयुष्याला भविष्य असते असे मानले जाते. त्यामुळे शिक्षक म्हणून अखंड ज्ञानाची पाऊलवाट चालण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आली आहे. इतिहासात आजही अनेक शिक्षकांची नावे घेतली जातात, ती नावे न विसरण्याचे कारण म्हणजे त्या शिक्षकांची साधना आहे. शिक्षकांच्या ज्ञानसाधनेचा तो प्रभाव आहे.
शिक्षक हा ज्ञानाचा साधक असेल तर त्याच्यामध्ये सत्व जीवंत असते.त्याच्या ज्ञानाच्या साधनेत प्रामाणिकपणा साठवलेला असतो. त्याच्यात अहंकार नसला तरी स्वतः स्वाभिमान कायम असतो. अशी माणसं लोकशाहीला पुरक नागरिकांची निर्मिती करत असतात. ज्ञानाची वाट चालणारी माणसं सत्याची वाट चालत असतात. सत्य आणि ज्ञान यांचे काही नाते आहे. त्या नात्याचा प्रवास काहीसा कठीण वाटतो. अभ्यास करणे हाही अनेकांना त्रास दायक ठरण्याची शक्यता असते. मुळात आपल्याला जर उत्तम शिक्षक व्हायचे असेल तर त्यासाठी सुक्ष्मतेने नियोजन, अध्ययन अनुभवाचा विचार, आपल्याला जे रूजवायाचे आहे त्यासाठीचा विचारप्रक्रिया, मूल्य, कौशल्य यांचा विचार अनिवार्य आहे. यासाठी शिक्षकाला सुक्ष्मतेने विचार करणे गरजेचे आहे. एकवेळ वरिष्ठ महाविद्यालयात तास घेताना जितका विचार करावा लागत नाही त्यापेक्षा अधिक विचार प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करताना करावा लागतो. त्या स्तरावर नियोजनात जितका अधिक गंभीर विचार केला जाईल तितका प्रभाव अधिक असणार आहे.
प्रभावी अध्यापन, अध्यापनासाठीचे नियोजन,कार्यवाही आणि नेतृत्व या दृष्टीने शिक्षकांने किती सुक्ष्मतेचा विचार केला आहे त्यावरच अध्यापनाचा प्रभाव आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन अवलंवून असते. तो प्रभाव निर्माण करण्यासाठी शिक्षकाला ज्ञानाची साधना अनिवार्य ठरते. मग त्या अभ्यासाचा कितीही त्रास झाला तरी ती वाट चालावी लागेल. ती वाट चालणारे शिक्षक जीवनभर विद्यार्थ्यांच्या हदयात घर करतात. विद्यार्थी छोटे आहेत त्यांना कोठे काय कळते असे म्हणून आपणच आपले समाधान करू.. पण ते समाधान खोटे आहे.बालक जाणते सारे.. त्याला कोण आपल्यासाठी किती ज्ञानाची उपासना करते ही जाणीव त्यांना होत असते. त्यांची समज हळूहळू जशी वाढत जाते त्याप्रमाणे त्यांच्या मनावर शिक्षकांचे साम्राज्य प्रस्थापित होत असते. अनेकदा काही शिक्षक लोकप्रिय असतात पण ते विद्यार्थी प्रिय असतील असे नाही. विद्यार्थी प्रियतेचा मार्ग हा ज्ञानसंपन्नेतेचाच प्रवास असतो. प्राचार्य ना.य डोळे यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविलेले प्रयोग हे शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे ठरले. मुळात गरजा कोणत्या हे ठरविण्यासाठी ज्ञानाचा प्रवास मदत करणारा ठरतो. आपण त्या संदर्भाने जे काही प्रयत्न करत जातो. ते प्रयत्न विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. यासारखे प्रयोग करण्यासाठी लागणारी दृष्टी ही अभ्यासातून निर्माण होत असते.
संत ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरीत म्हटले की,
हे असो दीपाचिया सिध्दी / अवघड धू आधीं / नातरी तो औषधी / जिभेचा ठावो
जसे आपल्याला दिवा लावायचा असेल तर तो इतका सहजतेने लागत नाही. त्यामुळे दिवा लावताना काहीसा त्रास होणारच हे साहजिक आहे. अर्थात हा दिवा सातशे वर्षापूर्वीचा. तेव्हा वीजेचे आस्तित्व नव्हते. त्यामुळे दिवा लावताना धुर होणारच. त्या धुराचा त्रास सहन केल्याशिवाय दिव्याचा लख्ख प्रकाश अनुभवता येणार नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली असेल आणि त्यावर उपाय करण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी कडू औषध सेवन करावे लागते. आपण ते कडू आहे म्हणून औषध नाकारले तर शरीरावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता नाही. त्याकरीता जिभेला कडूपणा सोसावा लागेल. त्याशिवाय रोग बरा होत नाही.
त्याप्रमाणे आपल्याला समाज मनावर प्रभाव टाकायचा असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. संत ज्ञानेश्वरानी सुचविलेला मार्ग हा आपल्याला उन्नत करणारा आहे हे लक्षात घ्यायल हवा. शिक्षक जितका ज्ञानसंपन्न असेल तितकी प्रभाव अधिक असेल. ते पाहून विद्यार्थी आपल्या शिक्षकांची वाट चालणे पसंत करतात. शेवटी विद्यार्थ्याला आपण काय सांगतो यापेक्षा शिक्षकांचे जीवन अनुभव त्यांना कसे अनुभवता येतात त्यावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे ज्ञानसंपन्न समाजाची निर्मितीचा मार्ग शिक्षणांच्या दारातून जातो हे लक्षात घ्यायला हवे.
संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)