स्वधर्माची चालूया वाट ..

आपल्याला सुख हवे असेल तर धर्माचे पालन करायला हवे असे सांगितले जाते. धर्म म्हणजे त्यात स्वधर्माचा विचार आहे. स्वधर्माचा विचार हाच प्रत्येकाच्या जीवनासाठी सुखाचा मार्ग आहे. मग आपले काम कोणतेही असू दे. प्रत्येक काम तितक्याच मोलाचे असते.व्यक्तीचे मोठेपण आणि प्रतिष्ठा तो कोणत्या पदावर आणि कोणत्या श्रेणीत काम करतो यावर अवलंबून नसते तर त्या पदावरील जबाबदारी किती उत्तमतेने पार पाडतो हे महत्वाचे असते. आपण स्वीकारलेली.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
स्वधर्माची चालूया वाट ..

प्रत्येकजन आपापल्या जीवनात यश प्राप्त करणेसाठी सातत्याने विविध प्रकारचे प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या यशासाठीवेगवेगळे मार्ग अनुसरत असतो. यशाचे मोजमाप करण्याची प्रत्येकाचीच मापन पटटी वेगवेगळी असते. यशाची व्याख्याही भिन्न असतात. कोणाला य़श म्हणजे प्रचंड पैशाची कमाई, कोणी अलंकारात सुख मानते तर कोणी उंच उंच इमारतीत, कोणी अधिकारात, कोणी घोडागाडीत सुख मानत असते.

मात्र त्या पलिकडे सुख, समाधानाच्या कल्पनेत जगणारी अनेक माणसं आपल्या भोवतालमध्ये आहेत. आपल्याला सुख हवे असेल तर धर्माचे पालन करायला हवे असे सांगितले जाते. धर्म म्हणजे त्यात स्वधर्माचा विचार आहे. स्वधर्माचा विचार हाच प्रत्येकाच्या जीवनासाठी सुखाचा मार्ग आहे. मग आपले काम कोणतेही असू दे. प्रत्येक काम तितक्याच मोलाचे असते.व्यक्तीचे मोठेपण आणि प्रतिष्ठा तो कोणत्या पदावर आणि कोणत्या श्रेणीत काम करतो यावर अवलंबून नसते तर त्या पदावरील जबाबदारी किती उत्तमतेने पार पाडतो हे महत्वाचे असते. आपण स्वीकारलेली जबाबदारी,कर्तव्यात समर्पणाची वृत्ती,त्यातील प्रामाणिकपणा, प्रत्येक कामातील आनंद,कामातील सौंदर्य उंचावण्यासाठी स्वतःला झोकून देत समृध्दतेची वाट चालणे हाच स्वधर्म.अशी स्वधर्माची वाट चालणारी माणसं आपल्या कामावर ठसा उमटवत असतात.मग ती माणसं कोणत्या पदावर काम करतात आणि कोणत्या दर्जाचे काम करतात यालाही काहीच मोल नसते.जीवनभर आपल्या कामातील प्रामाणिकपणा माणसांच्या जीवनातील लाचारी,विचारशुन्यता संपवत असते आणि जीवनाची उन्नतीची दिशा,सन्मान प्राप्त करून देत असतो.त्यामुळे या वाटा शिक्षणात चालू लागलो तर आपल्याला हरवलेल्या अनेक गोष्टींचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही.

जीवनात हरवलेले सुख,समाधान शोधण्यासाठी माणस धर्म पंरपरा,रूढींचा विचार स्वीकारत धर्माच्या आणि धर्माचा अधिकार आपल्याकडे आहे असे सांगणा-यांच्या मागे चालत राहतो.त्या वाटेने चालत गेलो की आपल्या जीवनात आनंद मिळतो असेच अनेकदा वाटत राहते. अनेकदा सुखासाठी आपण अध्यात्मिक जीवनाची वाट चालत राहतो. प्रत्येकाच्या जीवनाच्या यशाचे गमक वेगवेगळे असेलही.मात्र तरीसुध्दा आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे असा प्रश्न पडला तर त्याची उत्तरे प्रत्येकाची भिन्न असतात.मात्र जीवनात स्वतःशी प्रामाणिक राहणे हीच जीवनाची सार्थकता आहे. जग काय म्हणते आणि जगाच्या नजरेत काही दिसावे म्हणून काही करण्यापेक्षा आपणच आपल्या नजरेत उंचवण्यासाठी प्रयत्न करणे हा स्वधर्म आहे. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन समर्पणाच्या वृत्तीने कार्यरत राहणे हाच जीवनातील यशाचा मार्ग आहे.तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी प्रत्येक धर्म व्यक्तीच्या कर्माला महत्व देत असतो. धर्म हा उन्नत व सदविचाराची पेरणी करण्यासाठी आहे. त्यामुळे कर्म आणि जीवनाची प्रामाणिकतेची वाट चालणे म्हणजे धर्माचे पालन आहे. अनेकदा आपण धर्माची वाट चालत राहणे हे धर्म आचरण आहे.धर्माचे आचरण म्हणजे ईश्वराची साधना आहे. मात्र केवळ पूजा अर्चापुरता धर्म मर्यादित नाही. धर्माचा विचार सामाजिक जीवन समृध्द करणे असाही आहे. त्यामुळे धर्माचा विचारात स्वधर्माचा विचारही असतो हेही लक्षात घ्यायला हवे.

शिक्षक म्हणून मी उत्तमतेचा ध्यास घेणे, गुणवत्तेची वाट चालणे,ज्ञानाची उपासना करणे हीच ईश्वराची प्रार्थना आहे.मंदीरात जाणे नाही झाले तरी शाळा हे मंदिर आहे.बालक हेच आपल्यासाठी देव आहे.त्यांच्या विकासासाठीचे रोजचे प्रयत्न हीच प्रार्थना.सातत्याने व्यवस्थेच्या विकासासाठी प्रयोगशिलता जोपासणे ही साधना. शिक्षक म्हणून प्रत्येक बालकांचा प्रवास गुणवत्तेपर्यंत करणे हीच आपली आराधना.मात्र आपण आपल्या कर्मापासून दूर जात,त्यातील केलेला बेबनाव,स्वतःच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत,इतरांवर अपय़शाचे खापर फोडत केलेले कार्याने आणि कितीही पूजाअर्चा आणि तिर्थयात्रा केल्यातरी ईश्वरापर्यंत पोहचण्याची शक्यता नाही. जीवनात कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे.गीतेच्या तत्वज्ञानात टिळकांना कर्मयोग सापडला.विवेकानंदाला देखील जीवन तत्वज्ञानात कर्म महत्वाचे वाटले.त्यामुळे ते ईश्वराच्या शोधात जाऊ पाहणा-या प्रत्येकाला स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहा असे सांगत होते.मैदानावर खेळणा-या खेळाडूंना ते सांगत असे की, “ तुम्ही जर फुटबॉल खेळत असाल तर तो चेंडू जितका वर जाईल तितका ईश्वर तुमच्या जवळ येईल ” . ईश्वराच्या शोधात मुळात कोठेही जाण्याची गरज नाही.संत वाडःमयात म्हटले आहे की, “ देव घ्या कोणी ,देव घ्या कोणी,ऐता आला घर पुसोनी.. ”. देव तर स्वधर्माचे पालन करणा-या भक्ताच्या शोधात स्वतः घरी चालत येत असतो.बाबा आमटे यांना कुष्ठरोग्यांमध्ये देवाचे दर्शन झाले.तरूण सागर लिहितात , आपण अनंत मार्गाने पैसे कमविणार.ते पैसे मिळविण्यासाठी वाम मार्गाचे प्रयत्न करणार.मग आपण किराणा माल विकत असू दे नाहीतर इतर कोणत्याही वस्तू विकत असू.आपण त्या विक्रीतून मोठया प्रमाणावर नफा मिळविणार.त्या मिळालेल्या नफ्यातून पुण्य मिळविण्यासाठी आपण मोफत वैदयकिय सुविधा देणार,धर्मदाय संस्था सुरू करणार . वाममार्गाने विविध पदार्थ विकणार,त्यातून ग्राहकांचे आरोग्य बिघडणार .त्यांचे आरोग्य बिघडले म्हणून त्यांना मोफत उपचाराची सुविधा आपल्याच धर्मदाय आरोग्य केंद्रात करणार.या प्रयत्नातून आपण पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करणार ,मात्र पुण्य मिळविण्यासाठी अगोदर पापाचा मार्ग निवडलेला असणार . मात्र तो मार्ग न निवडता जे कर्म करत पैसा मिळवत असतो तेथील कर्म प्रामाणिकपणे केले तर धर्मदाय उपक्रमाची देखील करण्याची गरज नाही.आपण कर्मात खोट करून धर्माचा विचार चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्यातून पुण्य कसे मिळणार ? आपण धर्माला रूढी,पंरपरा आणि कर्मठपणा यात गुंतून ठेवले आहे.त्यामुळे धर्माने समाजाची उन्नती होण्याची जी भूमिका ,अपेक्षा आहे तीच फोल ठरत आहे.धर्माचा खरा विचार मागे पडतो आणि केवळ कर्मठ पणा म्हणजे धर्म असा विचार पुढे जात आहे.त्यामुळे ना समाजाचे हित साधले जाते ना स्वतःचे.

समाजात आपण जेव्हा राहतो तेव्हा आपण आपल्या धर्माचे पालन करणे अपेक्षित आहे. पण ते पालन करणे म्हणजे नेमके काय आहे ? असा प्रश्न पडतो तेव्हा आपण धर्माचा विचार मस्तकी घेऊन ती वाट चालत राहणे होय.आपण जे काही करत आहोत,मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असू त्यात प्रामाणिकतेची वाट तुटवड राहणे हा आपला स्वधर्म आहे. भारतीय स्वातंत्र्य युध्दात अनेक क्रांतीकारकांनी स्वतःचे बलिदान केले ,त्या बलिदानात भाव स्वधर्माचा होता. स्वातंत्र्याची लढाई ही परमेश्वराची पूजा होती.अनेकदा आपण ज्या पदावर काम करतो त्या पदाची जबाबदारी अधिक प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी सतत झटत राहणे हीच खरी साधना आहे.परमेश्वर प्राप्त करण्यासाठी सातत्याने साधना करावीच लागते असे सांगितले जाते. परमेश्वर ही काही तात्काळ भेटणारी गोष्ट नाही.त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करायला हवी असते असे अध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने सांगण्यात येते.त्याप्रमाणे आपणही आपल्या कामाला न्याय देताना ,प्रामाणिकतेची वाट चालू लागलो तर बरेच काही साध्य होण्याची शक्यता आहे.

आज समाजात संघर्ष आहे.माणसं असमाधानी आहेत.स्वतःचे सुख हरवले आहे.सुख प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न होता आहेत.धार्मिक विधी होता आहेत.यज्ञ होता आहेत.पण तरी सुध्दा समाधान,आनंद,सुख काही मिळताना दिसत नाही. खरेतर या पलिकडे आपल्या कामातील प्रामाणिकपणा हाच खरा यज्ञ आहे.आपण ज्या पदावर काम करतो आहोत त्या पदाच्या जबाबदा-या अधिक कर्तव्य भावनेने पार पाडणे हीच साधना आहे.स्वधर्माचे पालन करणारी प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरभक्तच असते.तीच त्याची साधना म्हणायला हवी.पैसा खाणे हा भ्रष्टाचार ठरतो.त्याबददल समाज मनात घृना आहे मात्र वेतन घेऊनही वेळेवर न पोहचणे ,आपण ज्या पदावर काम करतो त्या पदासाठीचे ज्ञान प्राप्तीसाठी साधना न करणे,काम चलाऊ पणा करणे हाही भ्रष्टाचारच म्हणायला हवा.शिक्षक म्हणून मी माझा अभ्यासक्रम पूर्ण करणे,प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिकणे गतीमान करण्यासाठी त्याच्या बौध्दिक क्षमतेनुसार विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे.आपल्या कामातील कौशल्याची वृध्दी होण्यासाठी आपण स्वतःला समृध्द करणे ही साधनाच आहे.त्यामुळे साधना केली तरच परमेश्वर भेटणार आहे.परमेश्वर हा मंदिरात नाही तर स्वधर्माच्या कर्मात सामावलेला आहे.संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की,

म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन ।जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥

ज्ञानेश्वर महाराज लिहितात की, स्वधर्माचे आचरण करणे, हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हाच बंधनात पडत नाही.त्यामुळे जीवनात अपयशही मिळत नाही.जीवन सतत यशाचे शिखर पादाक्रांत करणे घडत राहते.आपण कोणत्या दिशेचे प्रवास करायचा आहे हे ठरवायला हवे.

- संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Related Stories

No stories found.