परिवर्तनाची हिम्मत दाखवायला हवी

शिक्षक हा केवळ सरकारी नोकर नाही, तर तो राष्ट्र आणि समाजाचा निर्मिता आहे. त्याने चार भिंतीच्या आते जे काही पेरले आहे त्यावर समाज व राष्ट्र कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरते. या दिशेचा प्रवास करणे त्यांच्या पेरणीवरच अवलंबून आहे. शिक्षकांची विचार पेरणीची शक्ती मोठी आहे. ती शक्ती प्राप्त करण्यासाठी... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
परिवर्तनाची हिम्मत दाखवायला हवी

पाच सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. समाज आणि शासन व्यवस्था शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते हा शिक्षकी पेशाचा सन्मान आहे. समाजात विविध व्यवसाय व पेशाची माणंस असतांना देखील शिक्षकीपेशाबददलचा इतका सन्मान का व्यक्त केला जातो? असा प्रश्न कोणालाही पडेल.

शिक्षक हा केवळ सरकारी नोकर नाही, तर तो राष्ट्र आणि समाजाचा निर्मिता आहे. त्याने चार भिंतीच्या आते जे काही पेरले आहे त्यावर समाज व राष्ट्र कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरते. या दिशेचा प्रवास करणे त्यांच्या पेरणीवरच अवलंबून आहे. शिक्षकांची विचार पेरणीची शक्ती मोठी आहे. ती शक्ती प्राप्त करण्यासाठी इतिहासात अऩेकांनी आपले समग्र जीवन शिक्षकीपेशात व्यतीत केले आहे. तो पंरपरेचा सन्मान आजही कायम आहे. समाज शिक्षकांना सतत सन्मान देत आला आहे त्या वाटा इतिहासाप्रमाणे वर्तमानात देखील चालाव्या लागणार आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे जगातील अनेक विद्वानांपैकी एक होते. भारतीय तत्वज्ञानाचा गाढे अभ्यासक होते. भारताकडे जेव्हा केवळ चमत्कार म्हणून पाहिले जात होते तेव्हा राधाकृष्णन यांनी भारतीय तत्वज्ञानाची खोली आणि उंची जगाला दाखवून दिली होती. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांचा त्या व्यासंगाने आणि ज्ञानाच्या जोरावरती त्यांना राष्ट्रपती पदापर्यंत पोहचता आले. त्या काळातही त्यांना मिळालेला सन्मान हा राष्ट्रपती आहेत म्हणून नव्हता, तर त्यांच्यातील असलेल्या ज्ञानाचा होता. ते ज्ञानवंत होते म्हणून त्यांना त्या पदापर्यंत गरूड झेप घेता आली. त्यांना त्या काळात जगातील अऩेक नामंवत विद्यापीठांमध्य़े सन्मानाने निमंत्रित केले जात होते.

जग त्यांच्या ज्ञानाबददल तोंडात बोट घालत होते. एक विद्वान शिक्षक या देशाला त्यांच्या निमित्ताने मिळाला. त्यांचा हा प्रवास देशातील तमाम शिक्षकांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. खरेतर एक शिक्षक राष्ट्रपती होतो यात काय विशेष? असा प्रश्न भगवान रजनीश विचारतात. शिक्षक हा ज्ञानाच्या जोरावरती उंची प्राप्त करीत असतो. खरेतर शिक्षकांची असणारी उंची हीच त्या राष्ट्राची उंची असते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने ज्ञानाची साधना करणे अपेक्षित आहे. शिक्षक ज्या दिवशी आपली ज्ञानाची तहान संपवितो त्या दिवशी शिक्षकांमधील शिक्षकत्वाचा अंत झाला असे मानले जाते. शिक्षक जीवंत आहे याचा पुरावा म्हणजे शिक्षक ज्ञानाची उपासना करतो आहे.त्यामुळे अखंड साधना करत राहाणारा व्यक्ती स्वतःला शिक्षक म्हणून घेण्यास पात्र आहे.

पदवीने नोकरी करता येते मात्र त्यातून शिक्षक म्हणून सेवा बजाविता येणार नाही. त्यामुळे समाज देखील जे शिक्षक ज्ञानसंपन्न आहेत त्यांचा आदर करतात. आपली सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या वृत्तीने करणारे शिक्षक कधीच कोणाच्याही चरणावरती नतमस्तक होत नाही. त्यांची मस्तके पुस्तके आणि ज्ञानाच्या जोरावरती घडलेली असतात. त्यामुळे लाचारी हा शब्द त्यांना स्पर्शही करत नाही. त्यांची गरज गुणवत्ता ही असते, नवनविन ज्ञानाची प्राप्ती ही त्यांची भूक असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात जिज्ञासा आणि अंखड शिक्षणाची तहान निर्माण करणे महत्वाचे असते. आपल्या विषयाचे परीपूर्ण ज्ञान आणि प्रभावी अध्यापन हा प्रवास त्यांना सतत खुणावत असतो. आपल्या कामावरती त्यांची निष्ठा असते. त्या निष्ठेसोबत पेशावरती असणारे प्रेमही उल्लेखनीय म्हणायवा हवे. पुरस्काराच्या मागे लागणे त्यांना ठाऊक नसते. पुरस्कार त्यांच्या मागे चालत येतात. ही माणसे पुरस्काराने कधीही हवेत उंचावत नाही आणि पुरस्कार मिळाला नाही म्हणून कधी निराशही होत नाही. केवळ काम करीत राहाणे हाच त्यांचा अखंड जीवन प्रवास आहे. त्यांचा प्रवास निखळ आनंदाचा असतो. याप्रवासात स्वतःच्या स्वार्थाचे दर्शन नाही आणि केलेल्या कामाचे प्रदर्शन देखील नाही.

ही माणंस आपल्या कामावर निष्ठा ठेवत चालत राहातात आणि त्यांच्यावरती समाज व राष्ट्र विकासाची दिशा अवलंबून असते. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारी माणंस हेच आकाशाचे खांब असतात. एकदा एक व्यक्ती आकाशाकडे पाहात विचार करीत असतांना त्याला आकाश कोसळण्याची भिती वाटते. त्या भिती आणि चिंतेने तो वेडा होतो. तो पळत घराच्या बाहेर येतो.. घरातील मंडळीना देखील बाहेर बोलवतो. “आकाश कोसळेल.. त्याला खांब नाहीत. पटकन पळा” असे सांगतो आणि तो धावत सुटतो.. अखेर थकतो आणि नदीच्या काठावर जाऊन पाण्यात डुंबू लागतो. तेव्हा काठावरती एक साधू महाराज बसलेले असतात. ते त्या माणंसाचे बडबडणे ऐकतात. त्यांच्या बडबडीचे नेमके कारण लक्षात घेतात. जवळ बोलवितात आणि त्याला सांगतात.. की “आकाशाला खांब नाही असे नाही, आकाश खांबाशिवाय कसे काय टिकेल? ते खांब आहेत पण दिसत नाही इतकेच”. मग तो धावत सुटलेला माणूस म्हणतो “मग खांब कोठे आहे? ” तेव्हा साधू म्हणतात, की “समाजात प्रामाणिकपणे, समर्पणाने, कोणत्याही स्वार्थाशिवाय जी माणंस केवळ सदविचाराच्या वाटेने चालत राहातात ही माणंस म्हणजे आकाशाचे खांब आहेत. ती दिसत नाही पण आकाशाची खांब असतात हे मात्र निश्चित”. त्यामुळे शिक्षकांप्रति इतिहासा पासून तर वर्तमानापर्यंत सर्व व्यवस्थाच सन्मान देत आली आहे.

शिक्षक हा समाजाचा व राष्ट्राचा निर्माता मानला जातो, याचे कारण तो केवळ चार भिंतीच्या आत मुलांवरती संस्कार करीत नसतो, तर उद्याच्या राष्ट्राच्या जडणघडणीसाठी लागणारे मनुष्यबळाच्या मस्तकाची निर्मिती करीत असतो. त्यामुळे प्रत्येक देशातील व्यवस्था अधिक उत्तम राहाण्यासाठी आणि समाज समृध्द होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. आपला समाज किती समृध्द आहे त्यावरती राष्ट्र प्रगतीच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यामुळे जगातही शिक्षकांना सन्मान दिला जात असतो. अमेरिकन राष्ट्रप्रमुख बराक ओबामा जेव्हा इजिप्तला भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा त्या देशाने त्यांच्या भेटीच्या निमित्ताने एक व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान तेथील विद्यापीठात नियोजित केले. त्यासाठी देशातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षकांना निमंत्रित केले गेले होते. इतर कोणीही राजकिय व्यक्ती,मंत्री यांना प्रतिबंध करण्यात आला होता. देशाचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते. ते विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरतात. त्यामुळे त्यांना जितके प्रेरक आणि उत्तम दर्जाचे व्याख्याने, ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून दिले जातील तितका परिणाम वर्गातील विद्यार्थ्यांच्या मनावर अध्यापन करतांना होणार आहे. ही जाणीव तेथील राज्यकर्त्यांच्या मनात होती. त्या जाणीवा व्यवस्थेने जोपासल्या तरच देश भरारी घेऊन प्रगती साधली जाते.

शिक्षकांना समृध्द करीत जाणे आणि त्यांच्याव्दारे समाजाला दिशा दाखविणे घडायला हवे.शिक्षकांनी देखील जीवनभर शिकण्याचा प्रवास घडविण्यासाठी तयारी दाखवायला हवी. शिक्षक म्हणून आपण स्वतःला जितके समृध्द करीत जाऊ तितका सन्मान उंचावत जाणार आहे. समाजाला शिक्षक हा नोकर वाटता कामा नये, ज्या दिवशी शिक्षक हा सरकारी नोकर वाटू लागले त्या दिवशी समाजाच्या मनातील परिवर्तनाच्या अपेक्षा मेलेल्या असतील. शिक्षकांने स्वातंत्र्य उपभोगत समाज व राष्ट्राचे उत्थान घडविण्यासाठी पाऊलवाटा निर्माण करण्याची हिम्मत दाखवायला हवी. परिवर्तनाची पाऊलवाटा चालणे कठिण असते. परिवर्तन हे व्यवस्थेला धक्का देणारे असते. त्यामुळे ते नकोच असते. मात्र त्या वाटा चालल्या शिवाय शिक्षकांचे स्थान अधोरेखित होणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी मनात विचाराची मशाल पेटवत.. परिवर्तनासाठी संघर्षाची हिम्मत कमवायला हवी. त्यात सर्वांचे हित आहे. शिक्षकांच्या विचारात मात्र सातत्याने निरपेक्षता आणि समाजाचे भले दिसायला हवे म्हणजे इतिहासात दिसणारा विश्वास प्राप्त करता येईल.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com