जो जो वांछील.. ते तो लाभो

शिक्षण म्हणजे केवळ पाठयपुस्तकातील पाठ संपवने नाही. वर्तमानात शिक्षणाचा विचार अभ्यासक्रम, पाठयपुस्तक, परीक्षा याच्या बाहेर जात नाही. आपल्या शिक्षणाची गुणवत्ता ही मार्कांच्या आलेखावर मोजली जाते. शिक्षण घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी यशस्वी झाला आहे असे कधी मानले जाते? साधारण त्याला उत्तम.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
जो जो वांछील.. ते तो लाभो

शिक्षणाची ध्येय आणि उददीष्टांचा विचार केला तर आपल्याला बालकाच्या व्यक्तीमत्वाचा समग्र विकास शिक्षणातून अपेक्षित आहे. शिक्षणातून समाज व राष्ट्राची निर्मितीची अपेक्षा केली जात असते. समाज हा उत्तम नागरिकांचा समूह असतो. अशा उत्तम समाजासाठी आवश्यक असलेल्या नागरिकांची निर्मिती ही शिक्षणाच्या प्रक्रियेतूनच होत असते. त्यामुळे उत्तम व उन्नत नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे प्रयोजन आहे.

नागरिक जितके उत्तम शिक्षण प्रक्रियेतून घडविले जातील तितक्या मोठया प्रमाणावर समाज व राष्ट्र उन्नत बनणार आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे बालकांच्या मनावर केलेली विचाराची पेरणी असते. त्या पेरणीत उद्याच्या भविष्यासाठीची वाट दडलेली असते. वर्तमानात आपण उत्तम पेरणी केली तर उद्यासाठीचे भविष्य अधिक उज्जल लाभेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी माणसांची मने अधिक चागंली विकसित व्हायला हवी. माणसांच्या मनाची जडणघडण आपण कशी करतो त्यावरच भविष्याची प्रकाशमय वाट अवलंबून असणार आहे. त्यामुळे एखाद्यावेळी मुलाला पैकीच्या पैकी मार्क नाही मिळाले तरी चालेल पण आपले मुल शिक्षणातून माणूस म्हणून घडायला हवे याचा विचार केला जाण्याची गरज आहे.

जो जो वांछील.. ते तो लाभो
पापीयांचा नको मत्सर...

आज दुर्दैवाने आपणाला मार्काच्या पलिकडे जात शिक्षणाचा विचार करता येत नाही. हा विचार शिक्षक करतीलही पण त्यापेक्षा अधिक विचार पालकांनी करण्याची गरज आहे. पालकांचा मोठा दबाव अलिकडे शिक्षण प्रक्रियेवर पडतो आहे. त्यामुळे मुळ उद्दीष्टांच्यापेक्षा शाळा मागणी तसा पुरवठा करण्यात धन्यता मानत आहेत. ही बाब लक्षात घेता मानसिक परिवर्तनासाठी शिक्षण प्रक्रियेची गरज अधोरेखित होत आहे.

शिक्षण म्हणजे केवळ पाठयपुस्तकातील पाठ संपवने नाही. वर्तमानात शिक्षणाचा विचार अभ्यासक्रम, पाठयपुस्तक, परीक्षा याच्या बाहेर जात नाही. आपल्या शिक्षणाची गुणवत्ता ही मार्कांच्या आलेखावर मोजली जाते. शिक्षण घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी यशस्वी झाला आहे असे कधी मानले जाते? साधारण त्याला उत्तम नोकरी, आर्थिक सुबत्ता, उत्तम घर, भौतिक सुविधा प्राप्त केल्या की शिक्षण कामी आले असे आपण मानतो. मग त्याचे जीवन यशस्वी झाले असा शिक्का मारून मोकळे होतो. व्यक्तीला अधिकाराची पदे मिळाली, सत्ता मिळाली की यशस्वी झालो असे मानले जाते. मात्र खरच शिक्षणाच्या यशाचे मापन करण्याची ही फुटपट्टी आहे का? शिक्षणाचे यश केवळ भौतिक सुखांच्या अंगाने मोजले जाणार असेल तर ही यश मोजण्याची ही मापन पट्टी अत्यंत छोटी आहे.

जो जो वांछील.. ते तो लाभो
कडू असूनी गोळी औषधिया कामा

शिक्षणाचे खरे यश तर माणसांच्या उन्नत मनोवृत्तीवर अवलंबून आहे. त्याच्या मानसिकतेची झालेली जडणघडण, त्यातून होणारे त्याचे जीवन दर्शन, त्याचा जीवन व्यवहार व सामाजिक वर्तन यावर शिक्षणाच्या यशाचे मापन करायला हवे. शिक्षणाने माणूस घडवायचा असतो याचा अर्थ त्याच्या उच्चतम मानसिकतेची जडणघडण करणे अपेक्षित आहे. शिक्षणाचा व्यापक विचार केला तर, मन घडविते ते खरे शिक्षण. मात्र आपण शिक्षणाचा उपयोगच केवळ बाहयांगाचा प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने करत असतो. शिक्षणातून जीवनाचे दर्शन घडायला हवे असते. त्याकरीता अंतरिक परिवर्तनाचा विचार शिक्षणातून करण्याची गरज आहे.

शिक्षणाने निर्मळ मने घडविणे नाही ते शिक्षण कुचकामी आहे. दुस-याचे वाईट चिंतने हे शिक्षित असल्याचे लक्षण नाही. शिक्षणाचा विचार हा मन निर्मळतेकडे जाण्यासाठी करायचा आहे. शिक्षण घेतलेल्या माणसांच्या मनातील व्देष, मत्सर, लोभ, अंहकाराचा लोप होणे अपेक्षित आहे. शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील फरक जीवन व्यवहारात अधोरेखित होण्याची गरज असते. तो फरक भौतिकतेच्या दिशेने नको तर अंतरिक परिवर्तनाच्या दिशेने प्रतिबिंबीत होण्याची गरज आहे. दुस-याच्या कल्याणात आपले कल्याण सामावले असल्याची धारणा शिक्षणातून विकसित करण्याची गरज आहे.

जो जो वांछील.. ते तो लाभो
कर्माची वाटे संतोषिया लाभे...

कधीकाळी समाजात अशी माणस होती. ज्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात बलिदान केले त्यांचा काय बर स्वार्थ होता.. त्यांना ना नोकरी हवी होती ना पेन्शन.. त्यांना स्वतःचे पुतळेही निर्माण करायचे नव्हते. ना त्यांना स्वतःचे स्मारके बनवायची होती. फक्त देशाच्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडणे आणि या देशातील सामान्य माणसांचे जीवन सुखी करत त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव वाटयाला यावा म्हणून सारा अट्टहास होता. सा-या जीवनात केवळ निरपेक्षता सामावलेली होती. अलिकडे आपण शिक्षणातून खरचं निर्मळता, निरपेक्षता आणि त्यागाचा विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का? याचा विचार करण्याची गरज आहे.

भगवान रजनीश म्हणतात त्याप्रमाणे “आपले शिक्षण हे व्देष पसरविणारे आहे.ज्याचा व्दितीय क्रमांक आला आहे त्याला पहिल्या क्रमांकापेक्षा तुला अधिक चांगले मार्क मिळायला हवे असे सांगायचे. मग त्यांने येणकेन प्रकारे त्यासाठी प्रयत्न करायचे. घरात सुध्दा जावेच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा अधिक मार्क मिळाले तर आनंद व्हायला हवा असतो मात्र घडते ते उलटेच. त्याच्यापेक्षा आपल्या मुलाला अधिक मार्क मिळायला हवे इतकीच काय ती धारणा”. त्यासाठी मग घरात पेरणी होणार. आपल्या मुलाला इतर मुलापेक्षा कमी मार्क मिळाले तरी चालतील पण जावेच्या मुलापेक्षा अधिक मार्क मिळायला हवेत. यापेक्षा अधिक काही नको इतकीसी काय ती अपेक्षा. कोणताही क्रमांक प्राप्त करायचा असेल तर त्यासाठीची स्पर्धा ही व्देषच पसरवत असते हे लक्षात घ्यायला हवे.

जो जो वांछील.. ते तो लाभो
कैसे तोडू बंध प्रेमाचे...

आपली स्पर्धा जेव्हा मार्कांची होते तेव्हा त्यात व्देषा पलिकडे फार काही नसते. कोणतीही स्पर्धा ही निराशाच निर्माण करत असते. स्पर्धेत आनंद नसतो हे लक्षात घ्यायला हवे. सहजीवन हाच आनंदाचा मार्ग आहे. त्यामुळे सोबत शिकत राहणे. शिकता शिकता सहकार्य आणि देवाणघेवाण करत राहणे याला पर्याय नाही. तोच शिक्षणाचा राजमार्ग आहे. शिक्षणाचा उद्देश हा आनंद निर्माण करणे हा आहे. शिक्षण घेणा-या प्रत्येकाला आणि मिळणा-या मार्कामुळे आनंद मिळायला हवा आहे. वर्तमानात शिक्षणातून सारे काही पेरले आहे मात्र आनंद पेरायचा आणि मिळवायचा राहून गेला आहे. त्यामुळे शिक्षण घेतलेली माणसं आनंदाच्या दिशेचा प्रवास करू शकली नाही. शिक्षणात मन घडविण्याचा विचार फारसा होत नसल्याने शिक्षण दुःखमुळ झाले आहे. मनाची जडणघडण आनंदाच्या दिशेने होऊ लागली तर आपल्याला बरेच काही साध्य करता येईल.

आनंदाने युक्त असलेले मन हे व्देषमुलक असत नाही. संत म्हणतात त्याप्रमाणे चित्ताची शुध्दता असेल तर जगात शत्रुत्व असे उरणारच नाही. जगातील जे काही पाप आहे, त्या पापाचा असलेला अंधकार नष्ट होवो. पाप म्हणजे परपिडा, ती परपिडा नष्ट होवो. आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ दे. वाईट जे काही असेल ते निघून जाऊदे. आणि जगावर स्वधर्माचा सूर्याचा उदया होऊदे. या भावनेची निर्मिती मानसिक पातळीवर होणे म्हणजे खरे शिक्षण आहे. स्वधर्माचा सातत्याने गीतेत उल्लेख येतो.आपला स्वतःचा धर्म म्हणजे कर्तव्यता. ती कर्तव्यता जोपासणे महत्वाचे आहे.

जो जो वांछील.. ते तो लाभो
उद्याचे भविष्य उज्वल हवे असेल तर...

शिक्षकाचा स्वधर्म ज्ञानाची साधना करणे आहे.नवनविन अध्यापन पध्दती, आपल्याला जो घटक शिकवायचे आहेत त्या घटकासाठी तयारी करणे. सतत ज्ञानाची उपासना करत राहणे म्हणजे आपल्या स्वधर्माचे पालन करणे आहे. विद्यार्थ्यांने आपला स्वधर्म हा सातत्याने अभ्यास करणे. चुका करत करत शिकत राहणे. शिकण्यासाठीचा प्रवास सुरू ठेवणे. जिज्ञासा शमविण्यासाठी सतत नाविन्याचा शोध घेत राहणे हा विद्यार्थ्याचा स्वधर्म आहे. त्यामुळे असा स्वधर्माचा सूर्य सर्वत्र उगवेल तर अवघे जग सत्याच्या प्रकाशात उजळून निघेल. समाजातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होईल. त्यामुळे अशी अंतरिक घडण शिक्षणातून होण्याची अपेक्षा आहे.

संत ज्ञानेश्वरानी म्हटले आहे की,

दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्य पाहो

जो जे वांछील ते तो लाहो / प्राणिजात

आपण जेव्हा स्वधर्माच्या पलिकडे कसलाच विचार करत नाही. तेव्हा मनातील भिती नष्ट होते. स्वधर्माची वाट ही नेहमी आनंदाची वाट दाखवत असते. त्यातून होणारी जडणघडण लक्षात घेतली तर मनात सत्याची कास निर्माण होते. चित्ताची शुध्दता निर्माण होते. त्यातून प्रत्येकाचे भले होवो हा विचार दृढ होतो. त्यातून कोणाला तरी अधिक मिळाले आहे म्हणून व्देषाची भावना निर्माण होत नाही. त्या उलट मनात सतत एकच ध्यास असतो, जगात जे जे म्हणून प्राणीमात्रा आहेत त्यांनी जे जे म्हणून काही अपेक्षित केले आहे. त्यांनी ज्या काही इच्छा मनात धरल्या असतील त्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ही धारणा मनात निर्माण होते. इतराच्या भल्यातही आनंदाला उधान असते. इतरांच्या कल्याणातच आनंद सामावलेला आहे. ही धारणा शिक्षणातून निर्माण करण्यात आपल्याला य़श मिळाले तर जगातील संघर्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे शांततेकरीता आहे .त्याचा उद्देशही या निमित्ताने संपुष्टात येण्यास मदत होईल. त्यामुळे मनाच्या शुध्दतेचा अनुभव हीच मोठी उलब्धी शिक्षणातून व्हायला हवी. त्यातच समाज व राष्ट्राचे भले आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com