Friday, April 26, 2024
Homeब्लॉगपापीयांचा नको मत्सर...

पापीयांचा नको मत्सर…

शिक्षणाचा उददेश हा मानवाचे माणसात रूपांतर करणे हाच आहे. मानव हा प्राणी आहे आणि मानवावर संस्कार झाल्यानंतर त्याचे माणसात रूपांतर होते. ते संस्कार करण्याचे काम शिक्षणातून होत असते. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असे ऍरिस्टॉटल म्हणत असे. त्या सामाजिक करण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाचे मोल महत्वाचे आहे. शिक्षणाने माणसांत शहाणपणाचे पेरणी करायची असते, विवेकाची जागृतीचे अपेक्षा असते. शिक्षणातून आपण केवळ अक्षर साक्षरतेचा विचार करत नाही तर, माणूसपणाचा झरा निर्माण करण्याचे काम ते करत असते.

शिक्षण म्हणजे संस्कार असतो असे म्हटले जाते. शिक्षणांचा संबंध नेहमीच मूल्यांशी जोडला जातो. मानवी जीवनाला उच्चतम उंचीवर घेऊन जाण्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे. माणसाचे आय़ुष्य शिक्षणाशिवाय गतीमान आणि नितीमान होण्याची शक्यता नसते. त्यामुळे शिक्षणाचे मोल अधिक असल्यानेच वर्तमानात लाखो रूपये खर्च करत पालक पाल्यांसाठी शिक्षणाची वाट निवडता आहेत. मात्र वर्तमानात शिक्षणाच्या अपेक्षा खरच पूर्ण होता आहेत का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कडू असूनी गोळी औषधिया कामा

शिक्षणाची प्रक्रिया ज्या अभ्यासक्रमाच्या आधारे सुरू असते. तो अभ्यासक्रम मूल्य, गाभाघटक, जीवन कौशल्य यांचा विचार करत विकसित झालेला असतो. शिक्षणाचे ध्येयाचा विचार केला तर आपल्याला शिक्षणातून माणूस घडवायचा आहे. जगात शांतता प्रस्थापित करायची आहे.माणसा माणसातील व्देष आपल्याला नष्ट करायचा आहे. मत्सर संपवायचा आहे.मात्र दुर्दैवाने आपल्यातील अंहकार, व्देष आणि मत्सराला पूर्णविराम देण्याऐवजी त्याचाच परिपोष सुशिक्षित असलेल्या माणसांमध्ये होताना दिसत आहे. शिकलेली माणसं अधिक एकमेकाचा व्देष करता आहेत. सहकार्याचा भाव कमी होतो आहे. आपण माणूस आहोत ही जाणीवही दिवंसेदिवस लोप पावते आहे. संत साहित्यात आपण संत एकनाथाच्या जीवन चरित्राकडे जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांच्यात माणूसपण किती ठासून भरले होते याचे पुन्हा पुन्हा प्रत्यंतर येत जाते.एकनाथानी आपल्या आयुष्यात सतत माणूसपणाचा विचार केला. त्यांनी काशीवरून आणलेले पाणी हे गर्दभाला पाजले.

जे पाणी पवित्र आहे असे मानले जात होते.ते पाणी गर्दभाला पाजणे हे माणूसपणाच्या उंचीचे लक्षण आहे. आपण प्राणी, पक्षी यांच्यात देवत्व पाहातो पण तात्कालिक असते. कुत्र्या समोर आला तर त्याला खंडोबा म्हणून पाहतो मात्र त्यांने भाकरी पळवली तर त्यालाच आपण दगड फेकून मारत असतो. आपल्यात मूल्यांचा विचार पक्का नाही. तो अनेकदा समजावून घेताना लवचिकतेची वाट चालत असतो. मूल्य हे नेहमी त्रिकालबाधित सत्य असायला हवीत. व्यक्तीसापेक्षता त्यात येता कामा नये. प्रेम हे मूल्य असेल तर जगातील सर्व प्राणीमात्रावर करता यायला हवे.माझे जे आहे त्यांचेवर प्रेम करणे हे मूल्य कसे? त्यात स्वार्थाचा भाव आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्याच नाथानी आपल्यातील माणूसपणाचे दर्शन अनेक प्रसंगात घडविले आहे. स्नान करताना पाण्यात असलेला विंचवाला त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेर काढताना त्यांने डंक मारला पण तरी त्यांनी त्याला वाचविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला.

कर्माची वाटे संतोषिया लाभे…

नाथ त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत होते याचे कारण नाथामध्ये माणूसपण साठवलेले होते.माफ करणे हा माणूसपणाचा स्वभाव असतो. विंचू काही माणूस नव्हता. नाथांनी आपला माणूसपणाचा स्वभावधर्म पाळला.आणि विंचवाने स्वतःचा स्वभावधर्म पाळला.माणसातील चांगुलपणाचा शोध घेण्याचे काम शिक्षणाचे आहे. माणूस म्हणून आपल्यात जे काही चांगले आहे ते पुढे घेऊ जाण्याचा विचार शिक्षणातून रूजण्याची गरज आहे. शिक्षण हे चांगूलपण पेरण्याचे काम करत असते.हा मूल्यांचा विचार आहे तो आपण किती आणि कसा पुढे घेऊन जातो हे महत्वाचे आहे.

महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की,

विद्येविना मती गेली.

मती विना निती गेली

नितीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

वित्ताविना शुद्र खचले

एवढे सारे एका अविद्येने केले.

शिक्षणाचे हे मोल असेल तर आपल्याला या दिशेने प्रवास करण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.जीवनातील सारे अपयश येण्याचे कारण शिक्षणाचे अभाव आहे. मात्र आज शिक्षण घेऊनही आपल्याला यशापर्यंतचा प्रवास करता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या अपयशाच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. शिक्षण घेऊन यश मिळत नसेल तर तो काही शिक्षणाचा पराभव नाही तर शिक्षण मनात ज्या पध्दतीने रूजण्याची गरज होती त्या स्वरूपात ते रूजले नाही. बी चांगली होती पण खडकावर लावली तर उगवणार कशी? त्यामुळे शिक्षणाचा विचार रूजण्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागणार आहे.शिक्षणाने मनात परिवर्तनाची वाट चालायची असते.मनात बदल घडविणे महत्वाचे आहे. मनात वाईट विचार येतातच.पण त्या वाईट विचारावर मात करण्याचा प्रयत्नासाठी आवश्यक असणारी दिशा शिक्षणातून दर्शित करायची असते. चांगले आणि वाईट असा भेद करण्यासाठी लागणारी विवेकशीलता शिक्षणाने निर्माण केली तर माणूस घडविण्याचा विचार रूजल्याशिवाय राहणार नाही.

कैसे तोडू बंध प्रेमाचे…

आज आपल्याला चांगले काय आणि वाईट काय याचा भेद करण्यासाठी लागणारी क्षमता शिक्षणातून पेरण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तो विवेक आपण गमवला असल्याने समाजात मूल्यांचा -हास अनुभवास येतो आहे. दुर्दैवाने वाईट विचाराचा व्देष करण्याऐवजी आपण वाईट विचाराच्या व्यक्तीचा व्देष करत आहोत. मुळतः व्यक्तीचा व्देष करण्याची गरज नाही.गांधीजी म्हणत असे की, पापाचा व्देष करा पाप्याचा नको. विचार वाईट असतात व्यक्ती नाही हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून गांधीजी जीवनभर इंग्रज राजसत्तेच्या विरोधात लढत राहिले, पण त्यांनी कधीच इंग्रज व्यक्तींचा व्देष केला नाही. अगदी ज्यांनी त्यांना तुरूंगात पाठविले त्या तुरूंग अधिका-यासाठी त्यांनी तुरूंगात चप्पल जोड विनल्याचे दिसते. ज्यांनी त्यांच्यावर खुनी हल्ले करून मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केले त्यांना देखील त्यांनी माफ केले.

पुढे तर हीच मंडळी गांधीजीचे रक्षकही बनले.याचे कारण ती व्यक्ती वाईट नाही आहे तर त्या व्यक्तीच्या आत दडलेले विचार वाईट होते.त्यामुळे वाईट व चांगल्या विचाराच्या संदर्भाने विवेकाच्या पातळीवर भेद करता आला की, त्या वाईट विचारापासून दूर जाता येईल. वाईट विचार संपले की व्यक्तीत चांगूलपणाचे दर्शन घडेल. तो चांगूलपणाच दर्शित झाला की एक माणूस शिक्षणातून उभा राहिल्याचे समाधान मिळेल. अशी माणसं निर्माण होत गेली त्यांचा एक समूह बनेल.त्या समूहातून एक नवा समाज उभा राहिल. त्या समाजातून राष्ट्र उभे राहत असते. शिक्षणातून पहिला माणूस उभा केला जात असतो. तो जितका विवेकशील आणि शहाणपण सोबत घेऊन उभा केला जाईल त्या प्रमाणात राष्ट्र विकासाच्या दिशेने झेप घेत असते. त्यामुळे आपण शिक्षणाचे मोल जाणताना माणसांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

उद्याचे भविष्य उज्वल हवे असेल तर…

जगातील कोणताही माणूस कधीच वाईट असत नाही. प्रत्येक माणूस नेहमीच चांगला असतो. त्यांच्या चांगुलपणाची वृध्दी करणे आणि जे वाईट आहे त्याचा -हास करणे हेच शिक्षणाचे काम आहे. पण वाईट संपविणे याचा अर्थ वाईट व्यक्ती संपविणे असा होत नाही. माणूस मारून जगात कधीच विचार नष्ट करता आलेले नाही. गांधीना मारले मात्र गांधीजीचा विचार मात्र संपला नाही. उलट त्या विचाराची अधिक गरज अधोरेखित होत गेली आहे. विचार मरत नाही हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्याला शिक्षणातून चांगल्या विचाराची माणसं निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या 18 व्या अध्यायात म्हटले आहे की,

जे खळाची व्यंकटी सांडो / तया सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे पडो / मैत्र जीवांचे 18/1793

जगाच्या पाठीवर जशी चांगली लोक असतात तशी वाईटही लोक असतात.समाज म्हणजे चांगल्या वाईटाचा समूह असतो. समाजात आपल्याला चांगुलपणाची दृष्टी देणारी व्यवस्था उभी करायची असते. त्या दृष्टीत भोवताल चागुंलपणाच्या विचाराने प्रकाशमय करण्याची शक्ती असते. समाजात चांगुलपणा कमी आहे असे म्हटले जाते मात्र त्याची दखल नेहमीच घेतली जाते.आपल्याकडे पाच पांडव असतात तेव्हा शंभर कौरव असतातच. पाचही पांडवाची नावे सांगता येतात मात्र त्याचवेळी आपण शंभऱ कौरंवाची नावे नाही सांगू शकत. याचे कारण वाईटांकडे कितीही मोठा समूह असला तरी तो विजयाचे दिशेने जाणारा ठरत नाही.

पेरिले तेची उगवले…

त्यामुळे आपल्याला त्या वाईंटावर प्रहार करायचा नाही आहे तर वाईट विचारांना सोबत घेऊन जाणा-या व्यक्तीच्या वाईट विचार संपवायचे आहे. त्याचा नाश करण्याचे आव्हान पेलायचे आहे. माऊली म्हणतात की, दुष्ट लोकांच्या बुध्दीमध्ये पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी आणि परस्परांबददल मित्रभाव नांदावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. आपल्या शिक्षणातून हेच साध्य करण्याची अपेक्षा आहे. आपल्यात मैत्रभाव निर्माण व्हावा म्हणून रोज प्रतिज्ञा म्हणत असतो. आपल्या सारे बांधव आहोत.त्यातून बंधुभाव निर्माण करण्यासाठीच परिपाठाचा विचार केला जात आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण शास्त्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या