अंतरिचीया प्रेमे शिकतीया मुले...

अंतरिचीया प्रेमे शिकतीया मुले...

शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आला तेव्हा त्यातील कलम 17 मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक, शारीरिक शिक्षा करता येणार नव्हती. त्या संदर्भाने मोठया प्रमाणावर चर्चा समाजमाध्यमात झाली. पालक, शिक्षकांमधून देखील मोठयाप्रमाणावर चर्चा झाली आणि त्याला विरोधही सुरू झाला होता. खरेतर कायदा आल्यानंतर कलम 29 च्या.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...

प्रशिक्षणाचा वर्ग सुरू होता. शंभर टक्के मुले शिकती होतील का? असा प्रश्न एका ध्वनीचित्रफीतीतील संवादाच्या अनुषंगाने विचारला गेला होता. प्रशिक्षणार्थी पैकी अनेकांची म्हणणे होते की, शंभर टक्के मुले नाही शिकू शकत. अधिकाधिक प्रयत्न केले तर बहुतांश मुले शिकू शकतील, मात्र सारेच मुले कशी शिकतील ? असा त्याचा सवाल होता. मग शंभर टक्के मुले शिकण्यासाठी काय करायला हवे ? तेव्हा उत्तरे आली अभ्यासक्रम हवा, पुस्तके हवी, शिक्षक हवेत, शाळा हवी.

प्रशिक्षकाने ऐकून घेतले आणि त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, “ या सा-या सुविधा शंभर टक्के उपलब्ध असतील तर शंभर टक्के मुले शिकतील का ? ” तर पुन्हा उत्तर नाही असेच आले, म्हणजे साहित्य नसले तरी शंभर टक्के मुले शिकत नाही आणि साहित्य असले तरी शंभर टक्के मुले शिकत नाही. मग याचा अर्थ काही मुले कधीच शिकू शकत नाही असा ठाम विश्वास मनात ठासून भरलेला असतो.मुलांना शिकते करण्यासाठी सुविधांची उपलब्धतता महत्वाची नाही तर हदयाची गरज असते.ते हदय म्हणजे तरी काय ? तर मनातील शुध्द भावनेने बालकांच्यावर केला जाणारा प्रेमाचा वर्षाव. आपल्या सोबतचे बालक शिकावे असे जेव्हा वाटते तेव्हा त्यासाठी सर्वाधिक गरज असते ती अंतरिक प्रेमाची.प्रेमाची वाट निर्माण करण्यासाठी नाते बांधावे लागते. ते नाते जितके भक्कम असते तितके शिकणे परिणामकारक होत असते.मुळात प्रेमाची माणसं सोबत असतील तर हिम्मत मिळते. हा मोठयांचा जसा अनुभव असतो त्याप्रमाणे शिकण्यासाठी लागणारे बळही शिक्षकांच्या प्रेमातून मिळत असते.

शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आला तेव्हा त्यातील कलम 17 मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक, शारीरिक शिक्षा करता येणार नव्हती. त्या संदर्भाने मोठया प्रमाणावर चर्चा समाजमाध्यमात झाली. पालक, शिक्षकांमधून देखील मोठयाप्रमाणावर चर्चा झाली आणि त्याला विरोधही सुरू झाला होता. खरेतर कायदा आल्यानंतर कलम 29 च्या संदर्भाने मोठी चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र त्या संदर्भाने फारशी चर्चा झाली नाही. कायद्याने शिक्षा करणे बंद केल्याने विद्यार्थी कसे शिकणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.या संदर्भाने माध्यमातूनही बरेच काही चर्चिले गेले.शिक्षा केल्याशिवाय मुले अभ्यास करत नाही या आपल्या धारणेला या कलमामुळे धक्का बसला होता.त्यामुळे शिक्षेचे समर्थन करत काही काळ शिक्षा करण्याचा प्रयत्न झाला.मात्र कायदा आल्यानंतर शिक्षा झाली म्हणून अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले.त्यानंतर शिक्षा करण्याच्या प्रयत्नात घट झाली. शिक्षा करायची नाही हे मनावर बिंबवले गेले पण त्यात नाराजीचा सूर होता..

प्रेम ही मोठी जादू आहे.अंतिरक प्रेम भाव असेल तर कोणतेही आव्हान पेलेने शक्य आहे.जगाच्या पाठीवर आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असू तर परिवर्तनाची वाट चालणे शक्य आहे.परिवर्तनासाठी प्रेम हीच सर्वोच्च भावना आहे हे विसरता येत नाही. महात्मा गांधी यांच्यावरती अनेकदा हल्ले झाले,पण गांधीजीच्या अंतरेक प्रेमाच्या ओलाव्याने त्या हल्लेखोर माणसांच्या मनांचे देखील परिवर्तन झाले आणि मारण्यासाठी जी माणसे आली होती ती माणसे देखील पुढे गांधीजीच्या जीवन संरक्षणासाठी समोर आली.महात्मा फुले यांच्या आयुष्यात देखील असे प्रसंग आले होते.आपण जर प्रेमाच्या नात्याने,संवादाने मृत्यूच्या वाट निर्माण करणारे शत्रू देखील बदलत असतील तर आपल्याला शिक्षणाच्या परिवर्तनशील वाटा देखील निर्माण करता येणे शक्य आहे.शिक्षक आणि मुलांच्यामध्ये प्रेमाचे नाते असेल तर मुले शिकती होण्यास मदत होते.शिक्षक हा मुलांसाठी अत्यंत महत्वाचा धागा आहे.शिक्षक आणि मुले यांच्यात एक अनोखे नाते असते.त्या नात्यात जीव्हाळा असतो.त्यात प्रेमाचा आलोवा भरलेला असतो.शिक्षकांच्या अंतकरणात विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता अधिक असते.शिक्षकांसाठी शाळेतील मुले ही स्वतःच्या मुलां इतकीच महत्वाची असतात.त्यामुळे प्रेमाने ते नाते फुलत असते.शिक्षक व मुलांच्या नात्यात प्रेमाचा ओलावा असेल तर मुलांच्या शिकण्याचा प्रवास सुलभ होतो. प्रेम ही भावना असली तरी त्यात स्वीकृती असते.

मुलांना जेव्हा स्वीकारले जाते तेव्हा त्याच्य मनात आत्मविश्वास निर्माण होत असतो.स्वीकृती झाली की संवादाला गती मिळते.संवादातून स्नेह वृध्दींगत होतो.प्रेमाने जेव्हा स्वीकारले जाते तेव्हा दोषांचा विचार हरवलेला असतो.प्रेम म्हणजे समर्पण असते.त्यामुळे आपण विद्यार्थ्यांवरती प्रेम करतो तेव्हा विद्यार्थ्यांच्यामध्ये विकासाची जबाबदारी शिक्षकाने घेतलेली असते.खरेतर या वयात मुलांना स्वीकारले जाणे महत्वाचे असते.आपल्याला शिक्षकांने स्वीकारले आहे ही जाणीवच मुलांना पुढे घेऊन जाण्यास मदत करत असते.एक मुल अनाथ होते.त्या मुलांचे आईबाबा दोघांचेही निधन झाले होते.मुल अवघ्या आठ नऊ वर्षाचे होते.त्याला आईबाबांच्या प्रेमाची प्रतिक्षा होती.प्रेमाची भूक होती.परीस्थिती आर्थिक दृष्टया अंत्यत हलाखीची होती.अशा परीस्थितीत मुलाला फक्त घरातील अत्यंत वयोवृध्द आजीचा आधार होता.ती आजी पाच दहा घरे मागून आणायची.त्यातील जे मिळेल ते नातवाच्या डब्यात द्यायची.कपडे फाटलेले असायचे.जीवनाशी संघर्ष सुरू होता.त्यावयात अन्नासाठीची धावाधाव जितकी होती तितकीच भूक आई-बाबांच्या प्रेमाची होती.पण ते मिळत नव्हती.त्यामुळे शिकण्यात मन लागत नव्हते.अगोदरच्या शिक्षिकेने केलेल्या नोंदीनुसार विद्यार्थी हुशार होता पण आईबाबांच्या मृत्यूनंतर त्याचे मन रमत नव्हते.त्याची प्रेमाची भूक भागविली जात नव्हते.

अखेर हे सारे पाहिल्यावर मुख्याध्यापक बाईंनी त्या बालकाच्या शिक्षणातील अडथळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय लक्षात आले तर मुलाच्या शिक्षणात इतर कोणताही अडथळा नव्हता..पण शिक्षणासाठी जे प्रेम हवे असते तेच त्याला मिळत नव्हते.मग बाईंनी त्याच दिवशी दुपारी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले..त्याला नवा गणवेश दिला.दप्तर,पुस्तके दिली.आपल्या डब्यात त्याला जेवायला घेतले.उद्यापासून तू डबा आणायचा नाही असे सांगितले.हळूहळू तो रोज बाईंच्या सोबत जेऊ लागला.बाईंशी बोलू लागला..मनातील प्रेमाची भूक बाईंच्या प्रेमाने कमी होऊ लागली.बाईंच्या रूपाने त्याला आईचे प्रेम मिळू लागले.मुल बाईंकडे हटट करू लागला.त्यावयाला अनुरुप सर्व घडत होते आणि बाई जणू आई म्हणून सर्व इच्छा पूर्ण करत होत्या.त्या सर्वांचा परिणाम म्हणजे पुढील सत्रात विद्यार्थ्यांचा संपादन स्तर उंचावला होता.याचे कारण बाईंनी त्याला स्वीकारले,त्यातून नात्याचा वीन घटट झाली.त्यामुळे विश्वास मिळाला आणि अपेक्षित गोष्ट साध्य झाली.मुलाला जेव्हा नाकारले जाते तेव्हा त्याला अभ्यास करावा वाटत नाही.कारण आपण जे काही करत असतो ते केवळ प्रेम करणा-या व्यक्तीसाठी करत असतो.मुले शिक्षेमुळे जितके सुधारत नाही त्यापेक्षा प्रेम केल्याने सुधारतात.

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीचा अबोला,नाराजी कोणाही पत्करू इच्छित नाही.अशा परीस्थितीत मुल प्रेम करणा-या शिक्षकांसाठी अभ्यासाची दिशा घेत असतात.आपल्या शैक्षणिक प्रवासात आपल्यावर जे शिक्षक प्रेम करतात किंवा आपण ज्या शिक्षकांवर प्रेम करतो तो विषय आपल्याला अधिक आवडत असतो.त्याचे कारण विद्यार्थी व शिक्षक यांच्या नात्यातील असलेली वीण महत्वाची असते.आपल्यावर प्रेम करणारे शिक्षक नाराज होऊ नये म्हणून मुल सतत प्रयत्न करीत असते.त्यामुळे मुले शिकती करण्यासाठी फक्त मुलांवर प्रेम करण्याची गरज आहे.गिजूभाई बधेका म्हणतात की,मुलांवर प्रेम करणे हाच शिक्षणात गुणवत्ता प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे.प्रेमाच्या नात्यातून मुले शिकू शकतात..काल पर्यंत मुलांना शिक्षा केली जात होती..पण शिक्षा झाली म्हणून काही मुले शिकती झाली असा अनुभव नाही.त्यामुळे हा प्रयोग करून पाहण्यास काय हरकत आहे.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका ओवीत प्रेमाची ताकद अधोरेखित केली आहे.ते लिहितात एखादा भुंगा हा अत्यंत कोरडे असलेल्या,कठिण असलेल्या लाकडाला सहजपणे पोखरतो.. भुंगा हे किती सहजतेने करतो..पण तोच भुंगा कमळाच्या फुलांच्या आत दडला असेल तर ते त्याला अत्यंत मुलायम,मऊ असलेल्या कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांमधून त्याला बाहेर पडता येत नाही.याचा अर्थ त्याच्यात बाहेर पडण्याची शक्ती नसते असे नाही तर त्यात एक प्रकारचे मानसिक असे घटट नाते असते.त्याप्रमाणे मुल आणि शिक्षक यांच्याही नात्यातील ओलाव्याने शिक्षक मुलांच्या अंतकरणातून बाहेर पडत नाही.त्याचे स्थान अत्यंत उत्तमतेने कोरलेले असते.

जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥

मुलांच्या शिक्षणाच्या वाटा या प्रेमाच्या वर्षावाने अधिक समृधद् होत असतात.त्यामुळे समाजात त्याला जेव्हा प्रेमाचा अनुभव येईल तेव्हा आपल्याला शिक्षणात गुणवत्ता आलेली अनुभवास आल्याशिवाय राहाणार नाही.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.