Friday, April 26, 2024
Homeब्लॉगआम्ही भारतीय होणार कधी?

आम्ही भारतीय होणार कधी?

करोनाच्या महामारीने जगभरात स्फोट झाला आहे. भारतात दुसरी लाट वेगाने फैलावत आहे. त्यात महाराष्ट्रातही गेले काही दिवसापासून कोरोना रूग्नाची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाने एक मोठे संकट उभे ठाकले आहे.

औषधाशिवाय,ऑक्सीजनशिवाय, बेडशिवाय,उपचाराशिवाय रूग्न मरता आहेत. गरजेप्रमाणे प्रत्येक भारतीयास औषधे मिळायला हवीत. भारतीय म्हणून भारतीयांची गरज भागविण्यासाठी एकोप्याने उभे राहात आपण भारतीय आहोत याचे दर्शन घडायला हवे होते. पण या संकटसमयी देखील एकात्मतेचे दर्शन मात्र झाले नाही. पहिले आमचे पाहू आणि नंतर तुमचे.. असे काही सुरू आहे. प्रत्येक प्रांत त्याच बरोबर एकाच प्रातांतील प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक जिल्हयातील तालुके एकमेकाच्या विरोधात उभे राहातांना दिसता आहेत. त्यासाठी विविध बंधनाचे आदेश निघता आहेत. त्यामुळे पाठयपुस्तकाच्या पहिल्या पानावरती असलेली आणि रोज परीपाठात म्हटली जाणारी “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत..” या प्रतिज्ञेचे दर्शन काही होतांना दिसत नाही. आपण एक भारतीय राष्ट्र आणि समाज म्हणून दर्शन कधी घडविणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे..

- Advertisement -

गेले काही दिवस महाराष्ट्रात करोनाचा प्रादूर्भाव वाढतांना दिसतो आहे.अशावेळी राज्यात रेमडेसिवरचा पुरवठा होण्यात अडचणी येता आहेत. रूग्नांना वेळेत औषधाचा पुरवठा होतांना दिसत नाहीत. मोठया प्रमाणावर औषधाचा काळाबाजार सुरू आहे. काही ठिकाणी हजाराच्या किमतीसाठी पन्नास हजार मोजले जाऊन औषधे उपलब्ध होता आहेत. काही ठिकाणी ते रात्रंदिवस भ्रमंती करूनही रूग्नांना मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार होऊ नये म्हणून औषधांचे वितरण सरकारच्या नियंत्रणाखाली आणले आहेत. लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघात अधिक साठा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

खेळता खेळता शिकूया..

ज्याच्या हाती सत्ता तो पारधी या न्यायाने सर्व चालणार असेल तर सामान्य माणसांना कोणीच वाली असणार नाहीत का? अनेक ठिकाणी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्हयात औषधाचा पुरवठा केला जाऊ नये, ऑक्सीजन पुरविला जाऊ नये यासाठी प्रशासकिय आदेश दिले जाता आहेत. कोणीतरी दुस-या जिल्हयाची गरज म्हणून प्रशासनाकडून केला जाणा-या पुरवठांच्या गाडया अडवितांना दिसत आहेत. हे पाहिल्यावर मी माझ्या जिल्हयापुरता, तालुक्यापुरता आणि गावा पुरता विचार करणार असू तर व्यापक दृष्टीचे नेतृत्व भविष्यात कधीच पाहावयास मिळणार नाही का? हा प्रश्न आहे. आज दृष्टी मर्यादित करून नेतृत्व दिसू लागले तर भविष्यात देशाला, राज्याला एकसंघ बांधून ठेवणारे नेतृत्वाचे कधीत दर्शन होणार नाही. एकात्मतेचा विचार हरवला तर देश एकसंघ राखणे कठीण नाही का जाणार? याचा विचार करावा लागणार आहे.

ज्यांच्या हाती सत्ता आहेत त्यांनी जर केवळ आपल्या पुरते पाहू असा विचार केला, तर राज्यघटनेने दिलेल्या अधिकार आणि जबाबदारीचे काय? हा प्रश्न आहे. सामान्याना समतेचा, न्यायाचा मिळालेला अधिकार फक्त राज्य घटनेतच दिसेल. खरेतर प्रत्यक्ष व्यवहारात घटनेची मूल्य अधोरेखित होण्याची गरज आहे. आज संकटात आपण कोणत्याही प्रांताचे आणि जिल्ह्याचे असलो तरी आपण भारतीय आहोत हे अधोरेखितच व्हायला हवे. खरेतर जेथे गरज आहेत तिथे सामान्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची कटिबध्दता दर्शविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. आपण भारतातील सर्व नागरिकांची जबाबदारी मस्तकी घेतली आहे. राज्यातील जनतेचा विचार करणे महत्वाची असतेच. पण याचा अर्थ इतर राज्यातील नागरीकांचा विचार वा-यावर सोडून द्यायचा असतो असे नाही.

विकासाची प्रक्रिया देशातील सर्वांच्या श्रमावरती सुरू असते हे लक्षात घ्यायला हवे. वर्तमनानात दृष्टी आणि विचाराची व्यापकता कमी होत चालल्याने राज्य व राष्ट्रीय समूहाला मोहिनी घालणारे नेतृत्व अलिकडे आपल्याला अभावाने पाहावयास मिळत आहे. प्रांतवादाचे भूत अधिराज्य करतांना दिसत आहे. अलिकडे राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव दिसतो आहे. याचे कारण नेतृत्वाच्या कर्तृत्वाला मतदारसंघाच्या सिमेने बंधिस्त केले आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढला गेला तेव्हा त्यांचे नेतृत्व सिमारेषा पार करून गेले होते.महात्मा गांधी हे गुजरातचे होते. पण त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव मात्र संपूर्ण देशावर होता. त्यांच्या आचार, विचार आणि कर्तृत्वात समग्र देशाच्या स्वातंत्र्याचा विचार होता. तेच लोकमान्य टिळक, नेहरू,पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचेही तेच होते. किंबहूना त्या काळातील सर्वच राष्ट्र पुरूषांच्या विचारात राष्ट्रीयत्व ठासून भरलेले होते.

हमारी स्टाईल भी अलग है…

त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही ते प्रांत, भाषा, धर्म यांच्या पलिकडे देशातील सर्वांसाठी दर्शनीय, वंदनीय राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातील सामान्य जनता प्रतिसाद देत होती. आपण भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून एक आहोत ही धारणा समाजमनात कायम ठासून भरली होती. त्यामुळे कोणतेही नेतृत्व कोणत्याही प्रांतातून आले तरी देशातील कोणताही प्रांत त्यांना स्विकारत होता. दिल्लीच्या नजिक झालेल्या दंगलीच्या वेळी महात्मा गांधी ती शमविण्यासाठी गेले होते आणि ती दंगल त्यांनी शमविली होती. त्यांना भारत आपला वाटत होता आणि लोकांना नेता आपला वाटत होता. देशातील जनता आपली वाटत होती. जनतेचे प्रश्न आपले मानले जात होते. त्यांचा विकास आणि उन्नती हाच त्यांचा ध्यास होता. समाजाच्या समग्र विकासाची दृष्टी त्यांच्यामध्ये सामावलेली होती. त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवासात देश बांधनीचे काम घडत होते.

सर्व देशातील नागरिकांसाठी एकच धोरण होते आणि त्याचे अंमलबजावणीत त्याचे प्रतिबिंब दिसत होते. धोरणाला छेद देणारे अपवादाने काही घडत असेलही. मात्र त्यात स्वतःचे,स्वतःच्या प्रांताचे हित सामावलेले फार अभावाने दिसत होते. जनतेसाठी प्रामाणिकपणा साठून भरलेला होता. त्यामुळे जनतेचा त्यांचेवरती विश्वास होता आणि एकसंघता ही त्यामागील प्रेरणा होती. ती एकसंघता आज दिसत नाही. अनेक राज्य आज ऑक्सीजनसाठी हात पसरता आहेत. रेमडेसिवरसाठी आर्त हाक मारली जात आहे आणि त्याच वेळी जनतेला पैसा ओतूनही ती उपलब्ध होऊ नये यापेक्षा दुर्दैव ते काय? राज्य कोणतेही असू दे.. आपण संकटसमयी एक असतो. किंबहूना एक असायला हवे.. ती पंरपरा आपण चालू नाही शकलो तर देशाची एकात्मता आणि समूहाची एकात्मता टिकणार कशी? खरेतर आपण भारतीय आहोत. आपल्या देशात अनेक राज्य, विविध भाषा, वेशभूषा यात भिन्नता आहेत पण तरीसुध्दा आपण एकात्मतेने बांधलो गेलो आहोत. शाळेच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकावरती पहिले पान हे प्रतिज्ञेचे असते. ती प्रतिज्ञा वाचतांना काय अपेक्षा आहेत याचे दर्शन घडते. भारतातील कोनाकोप-यातील प्रत्येक मुल “भारत माझा देश आहे असे म्हणताना सारे भारतीय माझे बांधव आहेत” असे म्हणत आहे.

याचा अर्थ केवळ माझ्या जातीचा, पातीचा,धर्माचा, पंथाचा माणूस माझा आहे असे नाही तर त्या पलिकडे प्रत्येक भारतीय हा माझा भाऊ आहे या जाणीवांच्या प्रसारणाची भावना आहे. त्या बंधूत्वाच्या जाणीवा विकसित करण्याचे आव्हान शिक्षणातून पेलण्याची गरज आहे. “माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे” ही भावना निर्माण करण्याचे आव्हान शिक्षणातून पेलले गेले नाही, तर आज जी परीस्थिती आहे ती अधिक वाईट होण्याची स्थिती अनुभवावी लागेल. मी आणि माझे या पलिकडे आपण जाणार नसू तर माणसांच्या गर्दित एकसंघता कशी निर्माण होणार? आपल्यात राष्ट्रप्रेम ठासून भरलेले असायला हवे याचा अर्थ माझ्या प्रांताचा विचार असा होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आजच्या परीस्थितीत आपण आपल्या माणंसासाठी “मदतीचा हात” देण्याऐवजी “हात धुण्याचा” विचार मनात येणे आणि आपण ज्या भारतीयांचे नेतृत्व करतो आहोत त्या भारतीयांसाठी लढण्याची शक्ती भरून अग्रभागी राहाण्याची भूमिका नेतृत्वाने केली तरच समाज पुढे चालत जात असतो. अन्यथा सामन्यांच्या मनात जीवनाबददलची निराशा भरून राहाते. त्याचे दुषपरिणाम राष्ट्र विकासावरती होत असतो.

शेवटी देश केवळ डोक्यांच्या संख्येने पुढे जात नसतो, तर त्यांच्या मनात किती आनंद, समाधान ठासून भरले आहे यावरती क्रयशक्ती उंचावत असते. त्यामुळे ती उंचावण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. ते आव्हान तेव्हा पेलले जाते जेव्हा आपले नेतृत्व आपल्या सोबत आहेत याची जाणीव होते. त्या जाणीवा पोकळ वाटू लागल्या तर लोकांच्या गर्दीची मानसिकता पराभूत होत जाते. आपण ज्या गर्दीचे रूपांतर समाजात आणि ज्या देशाचे रूपांतर राष्ट्रात करू पाहातो आहोत त्यासाठी आजचे संकटात अधिक जाणीवाचे भरण होण्याची गरज आहे. अन्यथा हे संकट आणखी नव्या संकटाला जन्म देत जाईल. जगात जेव्हा अनुस्फोटाचे संकट घोंगावले होते त्यावेळी अनुस्फोटाने नाहीशी झालेली आणि जीवंत असूनही जीवन हरवलेली लहान मुले बघून आईनस्टाईन म्हणाला होता “आपण देवाला क्षमा करू शकू याची एकच शक्यता आहे.. तो जर नसेल तरच” आज समाज समूहात या भावनाचा जन्म तर होणार नाही ना? अशी शंका येते. शिक्षणानंतरही समाजमनाचे नेतृत्व करण्यात अपयश येत असेल तर शिक्षणावरती प्रश्नचिन्ह आहे.

संवाद ही गरज

डॉ.हेम गिनॉट यांच्या पुस्तकात एक उतारा प्रकाशित झाला आहे त्यात म्हटले आहे की, “मी दुस-या महायुध्दाच्यावेळी नाझी फौंजाच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून वाचलेला एक जीव आहे. कुणीही आयुष्यात पाहिल्या नसतील अशा गोष्टी मी याची देही याची डोळा पाहिल्यात. विद्वान अभियंत्यांनी बांधलेली गॅस चेंबर्स, डॉक्टरीचे ज्ञान मिळविलेल्यांनी विष टोचून मारलेली मुले, प्रशिक्षित नर्सने मारून टाकलेली बाळे, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी गोळ्या झाडून मारून टाकलेल्या स्त्रिया आणि मुले. त्यामुळे शिक्षणाबाबत मी साशंक आहे.

माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्या मुलांना माणूस व्हायला मदत करा. तुम्ही घेतलेली मेहनत विद्वान राक्षस,कुशल माथेफिरू घडवत नाही ना? वाचन, लेखन आणि अंकगणित ही कौशल्य आपल्या मुलांना अधिक चांगला माणूस म्हणून घडवत असतील, तर ती शिकण्यात अर्थ आहे..” अन्य़था शिक्षण म्हणजे केवळ अक्षरांची ओळख आहे आणि अर्थहिनतेचा प्रवास आहे इतकेच.. वर्तमानात संकट आहे.. अशावेळी सर्वांनी मतभेद विसरून एकमेकाच्या हातात हात घालून चालू लागलो तरच.. प्रवास आनंदाचा घडेल अन्यथा अपघात ठरलेला आहेच..

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या