आम्हाला स्वातंत्र्य हवे...

शाळा म्हणजे शिकण्याचे केंद्र असले तरी त्या पलिकडे बालकांच्या अंतरिक विकासाचे ते केंद्र आहे. शाळा बंद असल्यांने कदाचित लिहिणे, वाचने, परीक्षा होणार नाहीत, या गोष्टी काही प्रमाणात घरी शिकतीलही. पण विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला मात्र बाधा पोहचली आहे. मुलांची शारीरिक वाढ होत राहील पण विकासाच्या प्रक्रियेला पुरक जे शाळा महाविद्यालयातून मिळत असते, त्या गोष्टींना विद्यार्थी मुकले आहेत... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
आम्हाला स्वातंत्र्य हवे...

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते आहे आणि शाळेची घंटा उद्या वाजणार आहे. पण मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी केवळ घंटा वाजेल, आणि त्या घंटेला प्रतिसाद देत वर्ग भरणार नाहीत. मुलांना गतवर्षाप्रमाणे याही वर्षी घरी बसून ऑनलाईन शिकावे लागणार आहे. मुले घरी असल्याने ती कंटाळली आहेत. शाळा सुरू असतांना त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कटांळा आणत असली तरी शाळेला सुटटी लागल्यावर काही दिवस आंनद मिळतो आणि पुन्हा कधी शाळा सुरू होतील असे वाटत असते.

शाळा म्हणजे शिकण्याचे केंद्र असले तरी त्या पलिकडे बालकांच्या अंतरिक विकासाचे ते केंद्र आहे. शाळा बंद असल्यांने कदाचित लिहिणे, वाचने, परीक्षा होणार नाहीत, या गोष्टी काही प्रमाणात घरी शिकतीलही. पण विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला मात्र बाधा पोहचली आहे. मुलांची शारीरिक वाढ होत राहील पण विकासाच्या प्रक्रियेला पुरक जे शाळा महाविद्यालयातून मिळत असते, त्या गोष्टींना विद्यार्थी मुकले आहेत. शाळा नाही म्हणून मुलांच्या मनाच्या गरजाची पूर्ती होण्यात अडचणी आहेतच. शाळे अभावी त्यांचा संवाद समवयस्कांबरोबरचा कमी झाला आहे. मैदानाशी असणारे नाते तुटले आहे. सामुहिक जीवनाचा आंनद हरवला आहे. घरात त्यांचा संवाद होत असला तरी त्यांच्या मनातील भावनाना मोकळी वाट मात्र नाही. सर्व लहाणेग्यांना मोठयांचे ऐकावे लागते आहे. त्यांना ऐकूण घेणारे कान आपल्या अवतीभोवती अभावाने आहेत. मित्रांना काही सांगावे वाटले तरी मित्र एकत्रित येण्याची सध्या व्यवस्था नाही. मुलांच्या मानसिकतेचे भरण करण्यासाठी आता शाळा सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे. त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य हवे आहे शिकण्याचे आणि जगण्याचेही. त्यामुळे त्या बालकांच्या मनात आज तरी स्वातंत्र्याची अपेक्षा आहे आणि ती त्यांची गरजही आहे.

आम्हाला स्वातंत्र्य हवे...
पुस्तकातून घडूदे मस्तके..

करोनाने जगभरात मोठया प्रमाणावर कहर केला. त्याचा परीणाम जगातील सर्व क्षेत्रावर झाला आहे. मागील वर्षी बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत. अशा परीस्थितीत औपचारिक शिकण्याचा कमी अधिक प्रमाणात मिळणारा आनंद मुलांनी गमवला आहे. शाळेत मुले नाहीत त्यामुळे शाळेच्या इमारती देखील गत काही दिवसापासून मुक्या आहेत. तेथील परीसर हिरव्यागार झाडांनी फुलला असला तरी तो भकास वाटू लागला आहे. शाळेच्या आवारातून जाताना देखील ती शांतता नकोशी झाली आहे. मुलांसाठी शाळा म्हणजे केवळ इमारत नाही. त्या चार भिंतीच्या आत मुलांचा आंनद साठवलेला असतो. त्यातच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडत असतो. त्या चार भिंतीच्या आत मुल स्वतःचे भविष्य घडवत असते. स्वप्न पाहात असतात. त्यातून जीवनाची वाट शोधत असतात. अखंड जीवनाचा संस्कारही येथेच घडत असतो. बाहेर जगण्याच्या पातळीवर मिळणा-या अनुभवांचा अर्थ लावण्याचा संस्कार येथे घडत असतो. जीवनाच्या पातळीवर शिक्षण सर्वत्र होत असले तरी औपचारिक शिक्षण करण्याचा तरी सध्या तरी दुसरा मार्ग आस्तित्वात नाही. त्यामुळे एकूणच मानवी जीवनाच्या प्रवासात शाळा महत्वाचा टप्पा आहे. शाळेत काही नाही असे म्हटले जात असले तरी मुलांचे भावविश्व, त्यांच्या आवडीचा विचार करून शाळेत अभ्यासक्रमाची अमंलबजावणी होत असते.

खरेतर शालेय वयातील मुलांना गाणी, गोष्टी ऐकायला आवडतात.त्या गोष्टी पूर्वी घरात आजी, आजोबा सांगायचे पण आज तो भूतकाळ हरवला आहे. त्यामुळे मुलांना गाणी आणि गोष्टीसाठी काही प्रमाणात तर सध्या शाळाच उरल्या आहेत. या बरोबर संवादाची देखील गरज असते. घरात मुलांना संवादाची संधी असली तरी त्या वयाला अनुरुप भावविश्वाच्या संवादासाठी समवयस्कांचा गट हवा असतो. असा समूह घर आणि भवतालमध्ये कोठून मिळणार? हा प्रश्न आहे. घरच्यांशी गप्पा होत असल्या तरी त्याला निश्चित अशा मर्यादा आहेतच. मोठयांचा विषय आणि मुलांची अभिरूची यांचे तसे नाते नसते. त्या संवादाला देखील काही मर्यादा असतात. संवाद ही तर मानवी मनाची नितांत गरज आहे. तीच गरज मुलांची देखील आहे. माणूस न बोलता राहू शकतो का? ही कल्पनाचा अस्वस्थ करणारी आहे. माणसाला बोलण्याची संधी मिळाली नाही तर माणूस वेडा होईल अशा स्थितीत मुलांना एकमेकाशी गप्पा माराव्या वाटतात. कोणाला तरी आपल्या मनातील भावभावना ऐकवाव्या वाटतात, कोणाला ऐकावे वाटते. त्यांच्या मनात काही तरी चाललेले असते. त्या मनातील भावभावनाना व्यक्त करण्यासाठी शाळा हवी असते.

आम्हाला स्वातंत्र्य हवे...
बालशिक्षणांच्या दिशेने...

गांधी म्हणाले त्या प्रमाणे शाळेत शिक्षण म्हणून जे काही अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरू असते त्यातून तीन एच चा विकासाची प्रक्रिया घडणे अपेक्षित असते. काही प्रमाणात तसे काम सुरू असते. शाळेत हाताला काम, हदयाला भाव आणि डोक्याला विचार दिले जात असतात. या वयात या स्वरूपाचा विकास जितका महत्वाचा असतो, त्यापेक्षा विकासाच्या प्रक्रेयेचा मार्ग मुलांसाठी अधिक महत्वाचा असतो. शारीरिक विकासाकरीता मुलांना मैदान हवे असते. शाळेच्या आवारात मुले खेळत असतात. या वयात खेळणे हा त्यांचा स्वधर्मच असतो जणू, खेळातून मुलांची मने घडत असतात. मैदानावर खेळण्यासाठी सोबत संवगडी असतात. त्या खेळात मुलांचे सामाजिकीकरण घडत असते. संवादाची गरज येथे भागविली जाते. मैदानावर मुलांच्या वाढत्या वयाच्या विकासा सोबतची गरज पूर्णत्वाला जाण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे शाळेसाठी मैदान महत्वाची गरज आहे.

आज जरी मैदान जागेवर असली तरी त्यासाठी लागणारे सहकारी आणि वातावरण सध्या उपलब्ध नाहीत ही खरी खंत आहे. त्यामुळे शाळांची मैदाने म्हणजे केवळ शिक्षण हक्क कायद्याची परीपूर्ती नाही, तर त्या पलीकडे मुलांच्या जगण्याला समर्थ बनविण्याची शक्ती त्यात सामावलेली आहे. त्यामुळे शाळेची मैदाने आणि बालके यांचे नाते शाळा तयार करीत असते. आज शाळा बंद आहेत आणि मैदान मुके बनली आहेत. शाळा जेव्हा सुरू असतात तेव्हा मैदाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोलत असतात, हसत असतात, बागडत असतात.. आणि मैदानाच्या माध्यमातून मुले आपले नाते अधिक भक्कम करीत असतात. मैदानावर होणा-या गप्पा मुलांचे भावविश्व समृध्द करीत असते, मात्र आज ते घडत नाही. मुले बोलूनही घरात मुकेच आहेत. त्यांचे बोलणे फार कोणी मनावर घेतांना दिसत नाही. त्यात शब्द आहेत पण संवाद हरवलेला आहे.त्याच बरोबर शाळेत बालकांची एकमेकाशी होणारी देवाणघेवाण मात्र या निमित्ताने होतांना दिसत नाही.

आम्हाला स्वातंत्र्य हवे...
सब घोडे बारा टक्के..

खरेतर आजच्या अत्यंत गंभीर वातावरणात मुलांना समजून घेणारी व्यवस्था हवी आहे. आज मुले घरी अभ्यास करतील. काही पालक करूनही घेतील पण त्यापलीकडे मुलांच्या विकासाच्या कक्षा असतात त्यांचा विचार करायला हवा असेल तर शाळांची गरज आहे. शेवटी शिक्षण औपचारिक जरी येथे होत असले तरी त्या शिक्षणाची गरज आहेच. आज घरी कदाचित घोंकपटटी करीत मुलांकडून अभ्यास करून घेतला जाईल. मुलांकडून इतर सहजतेने होणाऱ्या गोष्टी मुलांना करू दिल्या जाणार नाहीत. थोडेशा संधीचा लाभ घेत मुल बाहेर पडले तर पालक काळजी, चिंतेपोटी त्याला आत बोलवितांना दिसतात. बालकांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होण्याची शक्यता नाही. खरेतर पालकांनी त्याच्या घरच्यां अभ्यासाकडे इतकेही लक्ष देऊ नये, की त्याच सर्व स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल. सध्या तर बालकाच्या प्रत्येक गोष्टीवर कमी अधिक प्रमाणात घरातून निर्बंध आहेत आणि आता शाळा सुरू झाल्यांने त्या निर्बंधात आणखी भर पडली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी त्याच्यावरती निर्बंध टाकतांना इतकेही टाकू नये, की त्याच्या शिक्षणातील रस, अभिरूची कमी होईल.

शाळा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बालकांना समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असते.एकाचवेळी विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे विकसन करण्यासाठी प्रयत्न होत असतात, कधी कला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव या सारख्या विविध विषयांचे संदर्भाने होणा-या तासिका मुलांना समजावून घेत, तणाव मुक्त करण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी मोठी मदत होत असते. आज या तासिका घरात पालकांना टाईमपास वाटण्याची शक्यता असते. त्याच बरोबर शाळेत सामाजिक जीवनाचा अनुभव घेत असतात, शाळा ही भविष्यासाठीचा नागरिक घडविणा-यासाठी जीवंत अनुभव देणारे ठिकाण आहे हे लक्षात घ्यायला हवे. खरेतर अपेक्षित इतके काही तिथे घडत नसेल पण शाळांची वर्तमानात विद्यार्थ्यांना निश्चित प्रतिक्षा आहे. आपण मुलांशी बोलतो तेव्हा त्यांच्या आतून स्वर असतो..कधी होतील शाळा सुरू..? आता खूप कंटाळा आला आहे का..? आम्हाला आमचे शिक्षक हवेत.. नवी कोरी पुस्तके हवीत.. मैदाने हवेत.. आम्हाला परीपाठ करायचा आहे.. कविता.. पाढे म्हणायचे आहे.. मस्त चित्र रंगावायची.. खेळ खेळायचे आहेत.. मातीच्या वस्तू बनवायच्या आहेत.. मित्राशी दोस्ती करायची आहे.. एकत्रित बसून जेवायचे आहे.. मस्ती करायची आहे.. सांगा ना कधी सुरू होतील शाळा..? कितीही नाही म्हटले तरी किमान काही प्रमाणात तरी शाळेत स्वांतत्र्य तरी जपले जाते. चला तर आजच्या या परीस्थितीतही लवकर शाळा सुरू होतील.. घंटेचा आवाज पुन्हा कानात घुमेल आणि मुलें पुन्हा बागडू लागतील अशी अपेक्षा करूया..

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com