….तरच आनंदाचा प्रवास

jalgaon-digital
9 Min Read

जग आज एका अशांततेच्या उंबरठयावर उभे आहे.. जगात अनेक देशांना महासत्ता होण्याची घाई आहे.. सत्तेच्या केद्रंस्थानी येण्यासाठी प्रत्येकजन येण केन प्रकारे प्रयत्न करीत आहे. कधी युध्दाची स्पर्धा.. कधी दुसरे पर्याय शोधून आपले वर्चस्ववादी भूमिकेने प्रस्थापित होण्याची घाई सर्वत्र आणि सर्वांना कमी अधिक प्रमाणात आहे. या घाईत आपण जगाची शांतता गमावत आहोत.. ती स्पर्धा जशी राष्ट्रा राष्ट्राच्यामध्ये असलेल्या स्पर्धेने शांतता हरवतो आहोत पण त्याच प्रमाणे माणंसामाणंसातील शांततेचा भाव देखील आपण गमावत आहोत. त्यामुळे शिक्षणाने जग साक्षर होत आहे.

संपूर्ण जगात साक्षरतेचा आलेख अधिक उंच उंच वाढतो आहे आणि त्याचवेळी जगातील शांततेचा प्रवास अधिक अरूंद होतो आहे. माणंसही आपल्या जीवनातील शांततेचा मार्ग हरवत चालला आहे. माणंस शिकल्यानंतरही अधिक अशांत होता आहेत. या अशांततेने जगच एका विनाशाच्या काठावर उभे आहे. त्या प्रमाणे माणंसही अशांततेच्या वाटेने चालता आहेत. पण त्याचवेळी शिक्षणाचा उददेश काय? असा सवाल केला तर त्याचे उत्तर शांततेकरीता असाही विचार पेरला जातो आहे. जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून आपण शिक्षण देतो आहोत.. पण शिक्षणातून शांतता निर्माण झाली आहे का? हा प्रश्न आहे. आज माणंस अधिक लोभी, आणि स्वार्थी होता आहेत.. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे असेच सारे काही झाले आहे.. या लोभाने आपण माणंस आपली शांतता हरवत चाललो आहोत.. त्यामुळे शिक्षण न घेतलेला माणूस अधिक शांत आहे आणि आम्ही शिक्षण घेऊनही अशांततेने जगत आहोत. शांततेचा अभाव असल्याने आंनदालाही पारखो झालो आहोत.

आम्हाला स्वातंत्र्य हवे…

शिक्षण हे माणंसाच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी आहे. शिक्षणातून समाधान, आनंद मिळायला हवा आहे. माणूंसपणाच्या निर्मितीसाठीच शिक्षणातून मूल्यांचा विचार पेरला जातो. आपण अभ्यासक्रमाची गाभाघटक, शिक्षणाचे ध्येय लक्षात घेतले तर त्यात शांततेचा विचार अधोरेखित करण्यात आला आहे. एकिकडे शांतता हवी आणि दुसरीकडे आम्ही शिक्षणात स्पर्धेची पेरणी करीत आहोत. मुलांनी परीक्षेत हमखास नंबर मिळवायला हवा.. मागील वेळी जो नंबर मिळाला आहे त्यापेक्षा यावेळी वरचा नंबर मिळायला हवा आहे. त्यासाठी स्पर्धेचा विचार पेरला जातो. त्यासाठी जणू मूल्यमापन आहे. शिक्षणात होणारे मूल्यमापन, परीक्षा कशासाठी आहे? हे जाणून घेण्याऐवजी मुळ उददेशालाच हरताळ फासला जातो आहे. नको असलेल्या मार्गाने जाण्यासाठी त्यातून शिक्षणातूनच नवा मार्ग दाखविला जातो आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला एकमेकाच्या पुढे जायचे आहे.

आपण कोण? कोणापेक्षा पुढे जायचे आहे आणि कोणापेक्षा मागे राहिलो आहोच.. आणि कोणाला कोठे पोहाचायचे आहे? हे सांगण्यासाठीच शाळास्तरावरती जणू परीक्षा आहेत असे वाटू लागले आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये म्हणून पुढचे प्रयत्न करीत आहेत. जे मागे आहेत त्यांना जे पुढे आहेत त्यांच्या पुढे जायचे आहे. ही स्पर्धाच त्यांना अशांततेच्या मार्गाने घेऊन जाते आहे. शाळेतही तुला आणखी मार्क मिळवायचे आहे म्हणून सांगितले जाते आणि घरचे तुला काही स्वप्न आहेत. त्या करीता तुला अधिक मार्क मिळविण्याची गरज आहे हे सांगता आहेत. ते मार्क मिळवायचे असेल तर त्यासाठी शिकणे परिणामकारक व्हावे लागेल. त्यासाठी कष्ट करण्याची दिशा दाखवावी लागेल. पण येथे जी स्पर्धा सुरू आहे ती निकोप आहे का? असा प्रश्न आहे. ती निकोप नसल्यांने येनकेन प्रकारे मार्क कसे मिळविता येतील याची घाई झाली आहे. त्यातून परीक्षेतील भ्रष्टाचार जसा वाढतो आहे त्याच प्रमाणे परीक्षेतील गैरप्रकार देखील दिवंसेदिवस वाढता आहे.

पुस्तकातून घडूदे मस्तके..

ही स्पर्धा जीवघेणी ठरल्यांने, वाममार्गात कोणी आडवे आले तर त्याला आडवे करण्याची भाषा देखील केली जाते आहे. शिक्षणातून स्पर्धा पेरली तर बाहेर त्याचे परिणाम आपण अनुभवत आहोत. त्यामुळे मुलांच्या जीवनात सहकार्याचा भाव कसा येणार..? स्पर्धा निकोप नसेल तर हिंसेचा आधार ठरलेला असतो. त्यामुळे जेव्हा शिक्षण अहिंसेच्या दिशेने घेऊन जात होते तेथे आता शालेय वयात हिंसा घडताना दिसते आहे.. ती कुठवर पोहचते आहे, तर एकमेकाचा खून करण्यापर्यंत पोहचली आहे.. विद्यार्थ्यांमध्ये होणारा वर्तन बदलाचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. ही हिंसा नेमकी येते कोठून…? जगात कोणतीही स्पर्धा ही घातक असते. त्यामुळे स्पर्धेतून आपण हिंसा जशी पेरतो तशी जीवनात अशांतता देखील. या हिंसेच्या मार्गाचा प्रवास आनंद, समाधान देणार नाही. त्यामुळे शाळेतून स्पर्धेचा विचार पेरण्या ऐवजी सहकार्याचा भाव पेरला गेला तर समाज सहकार्याच्या दिशेन उभा राहिल आणि राष्ट्रही एकमेकाला सहकार्य करतांना अवघे जग महान होईल.. ते जग माणंसाना जगण्यासाठी योग्य बनेल.

आपण शिक्षणातून निर्माण केलेली स्पर्धा जीवन व्यवहारात देखील येते आहे. आता आपली ही स्पर्धा किती जीवघेणी ठरते आहे, हे आपण अनुभवतो आहोत.. राज्यात बोगस लस देऊन पैसे उकळणे असेल किंवा रेमडेसिवर मिळत नाही म्हटल्यावर त्याचा काळाबाजार करणे असेल. अगदी पॅरिसिटामॉलच्या गोळ्यांचे पाणी करून बाटलीत भरणे असेल.. आणि ते विकणे असेल.. यातून आपण कोणाचा जीवघेत आहोत ही जाणीव नसणे, जेथे सहकार्य आणि मदतीचा विचार शिक्षणातून पेरला जातो त्यासाठी अभ्यासक्रम, पुस्तके असतात, पण त्या पलिकडे मुलांच्या मनात हे विचार अधिक दृढ होता आहेत तेव्हा मात्र चिंता करावी अशी परीस्थिती आहे. जगावर राज्य करता यावे म्हणून जगातील माणंसाचे जीव घेतले जातील अशी धोरणे आणि निर्णय घेत जैविक युध्दाची परीभाषा केली जात असेल तर आपण शिक्षणांच्या विचार पायावरती मस्तके उंचावली, त्या आधारे संशोधनाचा पाया घातला आणि ते संशोधने जगातील माणंसाचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेणार असेल तर जगानेच शिक्षणाच्या मुळ गाभ्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. माणंस जगली तर जगावर राज्य करण्यास अर्थ आहे.. माणंसच मेली तर कोणावरती राज्य करणार आहात? याचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठीच शिक्षणातून विवेक पेरण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालशिक्षणांच्या दिशेने…

शिकणे जर सहकार्याच्या तत्वावर सुरू केले तरच शांततेचा मार्ग दिसणार आहे. शिक्षणाचा पायाच सहकार्य असायला हवा. जो सध्याच्या आधुनिकतेची कास धरणा-या व्यवस्थेत तो मागे पडतो आहे. त्याला सोबत घेऊन जाण्याची मानसिकता निर्माण होण्याची गरज आहे. एकमेकाला मदत करीत सर्वांनी सोबत चालत राहाण्यासाठी हातात हात घालत चालण्याची गरज आहे. सोबत चालण्याचा संस्कार शिक्षणातून पेरला गेला, तर बरेच काही हाती लागेल. हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर द मेन्टली हॅण्डीकॅप्ड मुलांसाठी स्पर्धा सुरू होती. अंतिम स्पर्धेत नऊ विद्यार्थी धावणार होते.. अंतिम घोषणा झाली आणि धावण्यास मुलांनी सुरूवात केली. त्यापैकी एक स्पर्धक धावताधावता मैदानावर अडथळा आल्यांने कोसळला.. त्याचे डोळ्यात पाणी आले.. तो रडू लागला.. इतर पुढे गेलेल्या स्पर्धकांनी तो रडण्याचा आवाज ऐकला आणि मागे फिरले. त्या सर्वांनी त्याला हात दिला.. आत्मविश्वास आणि विश्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात हातात घेतला.. सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालत पुढे आपला मार्गक्रमन करणे सुरू ठेवले आणि सर्वच जनांनी एकाचवेळी अंतिम रेषा पार केली. ही सहकार्याची भावना पाहून सर्व क्रींडागंणावरील प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.. कोणी जिंकले नाही.. कोणाला नंबर मिळविला नाही.. पण आम्ही जिंकलो हा भाव सर्वांच्या मनात होता.. आणि त्यांच्या सहकार्यांच्या भावनेला नागरीकांनी सलाम केला होता. मी नाही जिंकलो तर आपण जिंकलो होतो.. ही भावना शिक्षणाचे यश आहे.

शाळेत देखील आपण, आम्ही ही भावना रूजविली तर सर्वच मुले शिकती होतील. समुहाने शिकायचे ही भावना मुलांचे शिकणे प्रभावी आणि परिणामकारक करेल पण त्यापेक्षा शिक्षणात आनंद भऱेल हे महत्वाचे. आपण जेव्हा कुंटुबात असतो तेव्हा कर्ता एक व्यक्ती असला तरी तो श्रेयासाठी आणि मोठेपणासाठी कोणा सदस्याला मागे लोटत नाही. सर्वांना बरोबर घेऊन कुंटुबाची प्रगती साधत असतो त्या प्रमाणे शिक्षणात व्हायला हवे. शाळांचे घर होणे म्हणजे काय तर त्यातील भाव रूजने होय. पण आता तर घरांची शाळा होता आहेत.. हा प्रवास आपल्याला कोठे घेऊन जाणार आहे ते पाहाणे महत्वाचे ठऱणार आहे. आपण घरातील स्पर्धा आणि तुलना आता शाळेतही आणली आहे. तेथेही मुल, मुलींच्यामध्ये तुलना होते आहे. ही तुलना शाळेत थांबली तरच काही साध्य होईल.. शेवटी शाळेत तुलना करतांना आपण मुलांचा आत्मविश्वास गमविण्यास भाग पाडत असतो.. त्यातून त्याचे किती नुकसान होते यापेक्षा समाज व राष्ट्राचे मात्र अधिक नुकसान होत असते हे लक्षात घ्यायला हवे.

सब घोडे बारा टक्के..

शिकण अधिक सहकार्यांने, एकमेकाला देणारे, मदत करणारे… दुस-या प्रगतीत आंनद मानणारे, दुसरा मागे आहे म्हणून त्याला सोबत घेऊन जाणारे होत नाही तोपर्यंत व्यक्ती आनंदी होणार नाही.. त्याच्या नशिबी कायम अशांतता असणार यात शंका नाही. माणंस जोवर अशांत असणार आहेत तोपर्यंत जगातही शांततेची पाऊलवाट चालत राहाणार आहे. शेवटी माणंसाच्या आत जे आहे त्याचा साक्षात्कार होणे म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे चैतन्याचा अविष्कार आहे.. म्हणून संत म्हणाले देह देवाचे मंदीर.. आत आत्मा परमेश्वर त्या प्रमाणे तुमचा धर्म कोणताही असूदे.. प्रत्येकाच्या आत मध्ये एक चैतन्य ठासून भरलेले आहे.. आणि ते चैतन्य इतरांच्या सुखात आनंद माणनारे असते हे महत्वाचे. शिक्षणातून त्या चैतन्याचा शोध लागेल तेव्हा ही स्पर्धा कायमची थांबेल. तोपर्यंत अशांततेचा प्रवास सुरूच ठेवावा लागणार आहे..

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *