श्रमाविना स्मार्ट शिक्षण..

jalgaon-digital
9 Min Read

शाळांनी काय करायला हवे? शाळा कशासाठी हव्यात? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा शिक्षणतज्ज्ञांची एकच उत्तरे असते. जीवनाची व्यापकता लक्षात घेता आपले समग्र जीवन उन्नत करण्याचे काम शिक्षणातून घडायला हवे अशी भूमिका प्रतिपादन केली जाते. पण वर्तमानाने आखलेल्या दिशेने प्रवास सुरू ठेवला तर खरच शिक्षणातून जीवनाचा विकास आणि जीवन उन्नत करण्याची पाऊलवाट विकसित होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न शिक्षणा बद्दल विचार करणाऱ्या कोणालाही पडत जातो.

केवळ पाठयपुस्तक केंद्रीत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला तर अक्षराची साक्षरता प्राप्त करता येईल पण जीवन जगण्यासाठी लागणारी सक्षमता मात्र प्राप्त करता येणार नाही. जीवनासाठी शिक्षणाचा व्यापक विचार सातत्याने प्रतिपादन केला जातो पण प्रत्यक्ष व्यवहारात तो अधोरेखित होतांना मात्र दिसत नाही. जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य किमान शिक्षणात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाने प्राप्त केल्याशिवाय शिक्षणातून ती पेरता येणार नाही. जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य आपण प्राप्त केली तरच व्यक्तीचे आणि राष्ट्राचे भविष्य आनंदक्षम असेल अन्यथा केवळ साक्षरतेने जीवन फारसे समृध्द होणार नाही.

शिक्षण व्यवस्थाच नापास…

शिक्षणातून अक्षर साक्षरता आली तर आपण शब्दांना वाचू शकतो पण त्या पलिकडे असलेल्या शब्दांचा विचार करण्याची क्षमता विकसित करण्याची गरज असते. दोन ओळीत असलेल्या अंतरातही बराच मोठा अर्थ सामावलेला असतो. तो वाचता आला तर जीवन प्रवासातील अंतर कमी होत असते. हे कौशल्य शिक्षणातून पेरता आले, रूजविता आले तर साध्यता होण्याची शक्यता आहे. जीवन जगण्यासाठी हाती काही कौशल्य असावे लागतात. कौशल्य विरहित शिक्षण हे नेहमीच जीवन पराभवाकडे घेऊन जात असते म्हणून महात्मा गांधी म्हणत असत की “शाळेत मुलांना श्रमाचे काम मिळायला हवे. आपल्याला लागणारे कपडे, पादत्राणे, भांडीकुंडी मुलांनी स्वतः बनवावी. एवढच काय, घरही बांधावित, शेती करावी, मुलोद्योगाचं शिक्षण शाळेत असावं.” गांधीजीच्या शिक्षण विचाराची व्याख्या करतांना नेहमी म्हटले जाते हाताला काम, डोक्याला विचार आणि हदयाला भाव देते ते शिक्षण.

वर्तमानात यातील काय घडते याचा सुक्ष्म विचार करण्याची वेळ आली आहे. गांधीजींच्या शिक्षण विचारातच समाजाची उन्नती आणि सुख सामावलेले आहे. आज गांधीजीच्या विचारापासून शिक्षण तुटत चालले आहे. तो प्रवास दिवंसेदिवस दूरावतांना दिसत आहे. हे दूरावणारे शिक्षण वर्तमानात स्मार्ट ठरवत आहोत का? असा प्रश्न पडला आहे. आपण आपली कामे देखील स्वतः करू शकत नाही. आपल्या “साहेबी” पणाच्या वृत्तीत आपण स्वालंबानाचा घात केला आहे. साहेब या देशात आले आणि त्यांनी शिक्षणात श्रम करणारे आणि साहेबी पण मिरविणारे असे दोन भाग जणू विभाजीत केले आहे. त्यांना हवे तसे त्यांनी करणे यात विशेष काही नाही. मात्र गांधीजी म्हणत होते की हाताला काम देणारे शिक्षण हवे. हाताला काम देणारे शिक्षण शाळेत देणार असाल तर शिक्षणाला अर्थ आहे. आपण शाळेत कौशल्यविरहित शिकविणार आणि त्या कौशल्याशिवाय प्राप्त केलेल्या माहितीवर आधारित विद्यार्थ्यांने कौशल्यांधारित प्रवासात जीवन यशस्वी करावे अशी अपेक्षा ठेवतो. मुळात आपण जे पेरले नाही ते कसे उगविणार? हा खरा प्रश्न आहे. आपला भारत कृषीप्रधान देश आहे. मात्र शाळांमध्ये शेतीविषयी काही नाही. जे काही कार्यानुभवात काही घटकांचा समावेश आहे त्याचा विचार फक्त श्रेणीपुरता. प्रत्यक्ष त्याचे अनुभवाचे पाठ देणारी शाळा अभावयुक्तच.

आम्ही बालकद्रोही…

जेथे हाताला श्रम करण्याची सवय नाही तेथे भविष्यात श्रम करावे अशी अपेक्षा कशी ठेवता येईल. त्यामुळे शाळेने शेती करावी. त्या शेतीत विद्यार्थ्यांनी राबावे. कष्ट उपसावे, घाम गाळावा यातून श्रमप्रतिष्ठेतेचा संस्कार आपोआप होईल. आज श्रमप्रतिष्ठेबददल सर्वदूर बोलले जाते. पण श्रम करण्यात फारसा कोणाला रस नसतो. श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी उपक्रम घेतली जातात पण त्या उपक्रमात उद्घाटन करण्यापुरता झाडू हाती येतो. मात्र त्यावेळी श्रमाबददल भरभरून बोलणा-यांच्या आय़ुष्यात श्रमाचा घामही त्यांनी अनुभवलेला नसतो. केवळ पोपटपंची करून वेळ मारून नेली जाते. ज्यांनी जीवनभर श्रमात घाम गाळला आहे. त्यांनी श्रमाचे मोल सांगावे मात्र अनुभवशुन्यता असूनही शब्दांच्या जंजाळात लोक बोलत जातात. म्हणून बोलणाऱ्याचा प्रभाव अलिकडे पडेनासा झाला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर त्यांच्या प्राचार्यांनी शिकविलेल्या कवितेचा परिणाम झाला आणि त्यांनी नरेंद्र दत्त ते विवेकानंद असा प्रवास करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामध्ये शिकविणा-यांच्या अंगी त्याग आणि प्रेरणीच शक्ती होती. ती निर्मळ प्रवासातून आली होती.

मुळतः माणूस आपल्याकडे जे असेल ते देऊ शकतो. जे नाही ते कसे काय दिले जाऊ शकते? मग नसताना देणे म्हणजे शब्दाची उधळण असेल त्यातून शब्दे पेरले जातील पण विचार नाही. म्हणून पूर्वी “महाजन येन गतास पंथः” असे म्हटले जात होते याचे कारण ते महाजन म्हणजे विचाराचे आचरण असलेले आणि जीवनभर एका ध्येयासाठी काम करणारी माणंस होती. त्यांचा प्रभाव पडत होता. त्यांच्या जगण्यात विचाराची प्रभा होती आणि त्या प्रभेत समाजाला प्रकाशित करण्याची शक्ती सामावलेली होती. श्रम जीवनभर करणा-या माणंसाबददल आत्मियता, प्रेम मात्र धोरणात आणि वर्तमानात दिसत नाही. श्रमकरी वर्गाबददल आत्मियता आणि प्रेम केवळ बोलून प्रतिबिंबीत होत नाही तर ते जीवन व्यवहारातून अधोरेखित होण्याची गरज असते. आपण जेव्हा श्रमाचे प्रात्यक्षिक करतो तेव्हा त्यात श्रमकरी वर्गाच्या कष्टाची जाणीव होत असते. त्यामुळे श्रमाचा अनुभव देणारे शिक्षण असण्याची अपेक्षा आहे.

आम्हाला स्वातंत्र्य हवे…

आज शाळेत कष्टाची पेरणी न करणा-या शाळा स्मार्ट ठरता आहेत. कधीकाळी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलांना वर्ग झाडणे, परिसर स्वच्छता करणे, वर्ग सारवणे यासारखे कामे करावी लागत होती. त्याकरीता मुले पाणी आणणार आणि मुले-मुली शेण आणायची. अनेक मुली तर सारवण्याचा संस्कार घरच्यापेक्षा शाळेतच अधिक शिकल्या. मुले देखील शाळा झाडत असायचे. त्यामुळे झाडन्याबददलची लज्जा नष्ट होत होती आणि त्यातील कष्टाची जाणीव सहजपणे होत होती. हे सर्व संस्कार मुलांकरीता आहेत म्हणून त्यातही पालकांना आंनद होता. आज शाळांमध्ये फरशी आली त्यामुळे सारवणे संपले. पाल्यांकडून सापसफाई केली गेली तर पालक तक्रार करू लागातात. हवे तर आमच्याकडून पैसे घ्या, त्या पैशातून श्रमकरी महिला, पुरूष नेमा आणि त्यांच्याव्दारे स्वच्छता करून घ्या. पैशाने माणंस मिळतील पण संस्कार विकत कसे विकत घेता येतील हा प्रश्न आहे. शिपाई आलेत आणि आमच्या हातातून कष्टाचे संस्कार निसटले आहे. आमची कामे आपण करायची असतात ही जाणीवही पुसटशी झाली आहेत.

जगात अनेक ऱाष्ट्राध्यक्ष आपली कामे स्वतःची स्वतः करतात. अगदी किराणा भरणे असेल, नस्ती घेणे असेल, आवश्यक ते कात्रणे जपूण ठेवण्यासाठी चिटकविणे असेल, शेती करणे असेल तर ती कामे त्यांची ते करतात. राष्ट्रप्रमुखाला आपली कामे करण्यात कोणतीही लज्जा असत नाही. जेथे राष्ट्रप्रमुख स्वतःची कामे स्वतः करतात तेथे तेथील समाजावरती देखील त्याचा परिणाम होत असतो. सांगून आजवर जग बदलले नाही तर ते पाहून बदलत असते. बोलणारा कसा जगतो त्यानुसार पाहाणार जीवनाची धोरणे आखत असतो. त्यामुळे आपल्याला उद्याचा समाज कसा हवा आहे त्यानुसार शिक्षणात मनुष्यबळाची उभारणी हवी आहे. शिक्षणातील मनुष्यबळ कौशल्ययुक्त असेल तर ते कौशल्यांची पेरणी करतील, ते केवळ साक्षरतेपुरते मर्यादित असेल तर ते केवळ साक्षरता पेरतील. म्हणूनच शिक्षणात केवळ साक्षर माणंस असून चालत नाही, तर ती अधिक दर्जेदार आणि समाज व राष्ट्रनिष्ठ असावी लागतात. ती जितके स्वतःला समर्पित करतात तेवढा समोरचा समर्पित भावनेने वाटचाल करीत असतो. गांधीजीच्या अंहिसावादी विचाराने वसाहतवादी असलेले इंग्रज नमले होते याचे कारण त्यांचा जीवनप्रवासच विचाराची पेरणी करत होता. त्यामुळे कोटयावधी भारतीय त्यांच्यामागे चालत होती. त्यांच्या जीवनात वर्तन आणि विचार यात कोणतेही अंतर नव्हते. वर्तमानात अशी माणसं शोधावी लागतात. त्याचे कारण शिक्षणातून पेरायचे राहून गेले.

….तरच आनंदाचा प्रवास

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करताना आपण शिक्षण सर्वापंर्यंत जरूर पोहचविण्यात यशस्वी झालो आहोत. पण त्या समूहाचा उध्दारकरण्याकरिता लागणारी विचाराची पेरणी शिकलेल्या प्रत्येकाच्या मस्तकी करण्यात अपयशी ठरलो आहोत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राष्ट्र उत्तमतेच्या दिशेने न्यायचे असेल तर शिक्षणात अधिक उत्तम आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची पेरणी करण्याची गरज आहे. त्यासाठी विचाराच्या पाऊलवाटा चालाव्या लागतील. वाटांचा शोध घेतांना त्यांचा महामार्ग निर्माण करण्याचे आव्हान आहे. शिक्षणात केवळ प्रकाशाची बेट असून चालणार नाही तर अवघी शिक्षणाची प्रक्रियाच प्रकाशमान असायला हवी. त्याशिवाय जग प्रकाशाच्या वाटेवर चालू शकणार नाही. त्यासाठी मार्ग मात्र गांधीजीच्या अंतिम विचारधारेने जातो हेही लक्षात घ्यायला हवे. पेरणी केली तर उगवते .जे पेरले तेच उगवते हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे आज जे काही उगवतांना दिसते आहे त्याचे पेरणी पूर्वी झाली आहे. भविष्य आपल्याला कसदार हवे असेल तर विचाराचे बियाने अधिक दर्जेदार पेरायला हवे. मशागत करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. रूजण्यासाठी देखील प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागेल.काय हवे हे लक्षात घेऊन चालत राहायला हवे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *